निर्णय - भाग 2
निर्णय - भाग 2
गीता माहेरी येवून दोन दिवस झाले . दोन दिवसात विशालची वाट पाहूनही तो आला नाही म्हणून ती थोडी घाबरली होती . कारण ह्या वेळी
" विशालने साधा फोन केला नाही की इकडे आला पण नाही . माझी काळजी नाही हे तर तो नेहमीच दाखवून देत असतो . पण ह्यावेळी मी घर सोडून आले तरी त्याला काहीच कसं वाटतं नाही . " ती मनात विचार करत होती .
" जावं का आत्ता घरी ? विशाल गेला असेल ऑफिसला . वीणा असेल तर तिला भेटून विचारलं असतं आता पुढे काय करू ? तिच्या म्हणण्याप्रमाणे घर सोडून निघून आले , नंतर काही बोलणं पण झालं नाही तिच्यासोबत ."
"एक तीच आहे जवळची जी मला किती छान समजून घेते . तिने मला मदत केली नसती तर विशालने आत्तापर्यंत मला कधीच घराबाहेर काढले असते ."
गीता तिच्या नादात होती , आईने हाक मारली तरी कळले नाही .आईने पाठीवर थाप मारली तेव्हा तिने दचकून आईकडे पाहिलं .
" काय ग ? कसला विचार करतेस एवढा ? आणि काय बडबडते आहेस ? वीणा कोण ?"
"आईने ऐकलं वाटतं!" जीभ चावत गीता जरा गडबडली .
" अग आई वीणा माझी मैत्रीण , शेजारच्या फ्लॅट मध्ये रहाते ." गीता म्हणाली .
" ती तुला कसली मदत करते ?" आईने विचारले.
"अग , आपल्या नवऱ्याला कसं ताब्यात ठेवायचं , हे ती मला वेळोवेळी सांगत असते . नवरा बाहेर जातो , बाहेर काय करतो हे आपल्याला घरी बसून कळत नाही मग याच गोष्टीचा फायदा घेवून हे पुरुष बाहेर पण एक दोन मैत्रिणी करतात आणि त्यांच्या सोबत मस्त एन्जॉय करतात .बायका मात्र घरी त्यांची वाट बघत , घरातच कुढत रहातात .बायकांनी नवऱ्याचं घर सांभाळायचं , नवऱ्याचं हवं नको ते सारं बघायचं आणि हे बाहेर जावून मस्त मजा मारत बसतात ."
"अग काय बोलतेस तू गीता ? विशाल तसा नाही वाटत ग ! " आई आश्चर्य चकित होवून म्हणाली.
" तेच तर ! मला पण असच वाटत होतं , पण मी माझ्या डोळ्याने पाहिलं आहे त्याला एका मुलीसोबत हॉटेल मध्ये कॉफी पिताना ."
" मला वीणाने दाखवले होते . ती तिच्या एका मैत्रिणीसोबत तिथे गेली होती , तिने ह्या दोघांना पाहिले आणि मला फोन करून बोलावून घेतले आणि लांबून दाखवले ."
"अग मग जवळ जावून चांगले खडसावून विचारायचे ना ! "आई रागाने म्हणाली .
"वीणा नको म्हणाली .घरी गेल्यावर त्याला विचारायचे कुठे गेला होता ते आणि मग बघायचे तो काय सांगतो ते . खरं सांगितलं तर ठीक आहे नाहीतर तो आपल्याला फसवतो आहे हे नक्की. "अग आई मी त्याला जेवायला घरी बोलावते , मला एकटीला घरात दिवसभर नाही करमत आणि जेवण पण नाही जात एकटीला , पण हा कधी लवकर येत नाही .कितीतरी वेळा मी त्याच्या ऑफिसमध्ये फोन करते पण तो तिथे पण नसतो , मीटिंग असते म्हणतो , नाहीतर दुसरं काहीतरी कारण सांगतो . मी पहिल्यांदा विश्वास पण ठेवायचे पण जेव्हा पासून वीणा मला त्याच्या बद्दल हे असलं काही सांगू लागली ना तेव्हापासून मला त्याच्यावर विश्वास नाही बसत .तिचा पण डिव्होर्स झालेला आहे .खुप ञास झाला होता तिला पण .तिच्या नवऱ्याचे त्याच्या सेक्रेटरी सोबत असणारे अनैतिक संबंध तिला कळले आणि मग त्याने स्वतःचे दोष लपवण्यासाठी कोर्टात तिच्यावर केलेले आरोप यामुळे तिला खुप दिवस लागले यातून सावरायला .आता जरा आम्ही दोघी एकत्र बोलतो त्यामुळे तीच मन हलकं होतं . विशालचं आणि माझं नातं मलाही छान वाटत होतं .पण तो जेव्हा त्याच्या वेळा माझ्यासाठी पाळत नाही ना मग मला वेगळं जाणवत रहातं त्याच्या बद्दल . कधी कधी ऑफिस मधून मुलींचे फोन येत असतात त्याच्या ,अगदी हसून हसून बोलत असतो त्यांच्यासोबत . कधी वेळेच्या आधीच निघून जातो , कधी लवकर येतो म्हणून म्हणतो आणि उशीर करतो .मग आता तूच सांग आई ,का नाही संशय येणार मला ? "
" अग पण तो तुला कधी काही त्रास नाही देत , तुझे सारे हट्ट पुरवतो , फिरायला नेतो , तसं पाहिलं तर तो त्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडतो .मग असे कसे ग त्याला काही चुकीचे ठरवायचे ?"
"बाहेर सगळी मजा करून झाल्यावर मग माझी आठवण होत असेल , काही झालं तरी बायको आहे , समाजात प्रतिष्ठा असते ना कुटुंब सोबत असेल की . आणि मनात कुठेतरी भीती पण असेल , तुम्ही लोकांनी जर त्याला जाब विचारला तर काय उत्तर देणार तो , मग नाईलाजाने का असेना त्याला माझ्यासोबत हे प्रेमाचं नाटक करावं लागत असेल "
असंच काही बाही सांगत होती गीता आणि आईला खरंच असं वाटू लागलं की मुलीने माहेरी येवून काही चूक नाही केली . विशाल चुकीचं वागतो आहे . याचा त्याला चांगला जाब विचारला पाहिजे . असं तिला वाटू लागलं
" बाबांशी बोलून आपण त्याला भेटायला बोलावू आणि त्याचं नक्की काय चाललय ते त्याला विचारू ." आई गीताला म्हणाली .
गीता थोडी रिलॅक्स झाली आणि विशाल आता येईल ह्याची तिला खात्री वाटू लागली .
(क्रमशः)
