Navnath Pawar

Abstract

3  

Navnath Pawar

Abstract

नैनं छिदन्ति शस्त्राणि ... !

नैनं छिदन्ति शस्त्राणि ... !

5 mins
881


"... दादा, नैनं छीदन्ति शस्त्राणि ...."

     भला मोठा झोका घेत ती खिदळत म्हणाली. आज नक्की तिच्या डोक्यावर परिणाम झाला असला पाहिजे, मी मनात पुटपुटत पुढे निघालो. तशी तिने झोक्याला अजून उंच झुलवत पुन्हा ललकारी दिली..!

"दादा ...नैनं दहंती पावक:.... "

     मला शांततेत पुढे जाऊ द्यायचे नसेल तर ती अशीच लक्ष वेधून घेण्यासाठी नाटक करते. आता हिला काहीतरी जळजळीत सुनावल्या शिवाय गप्प राहणार नाही हे मला कळून चुकले.

"... आज नक्की तुझं डोकं फिरलंय ... तिन्ही सांजेला ही काय पोपटपंची लावलीय ? गीतेचे श्लोक काय असे झोक्यावर मस्ती करताना समजत असतात का ? "

"दादा तुम्हीही वेडे आहात, सारे जगच वेडे दिसतेय मला...!"

" हो का ग गधडे ... ! थांबव तुझा झोका, मग दाखवतो माझे वेडेपण काय असते ते ! "

"हा झोका चालू राहील तोवर मला धोका नाही दादा ... आणि तशीही मी खाली उतरणारच नाही... मी याला अजून उंच उंच नेईल ... "

"बरं बरं नकोस उतरू खाली. पण सांजवेळेला डोक्याला ताप तरी नकोस देऊ ..."

" ही ही ही ...! दादा, आज मी तुम्हाला एक नवलाई सांगणार आहे. ती ऐकल्याशिवाय तुम्हाला नाही जाऊ देणार ..!!! "

".. तुझं डोकं फिरल्याची नवलाई मला समजली... अजून काय सांगायचं बाकी असेल तेही लवकर सांग. "

     मी जरा वैतागाने बोललो.

"मी आहेच जराशी वेडी.. त्यात नवीन काय ? मी तर हे सांगणार होते कि ... कालपर्यंत तुम्हाला आणि मलाही माहित नव्हते असे एक मोठे ज्ञान समजलेय मला आता या झोक्यावर हिंदोळे घेताना .."

"भगवान बुद्धाला बोधी वृक्षाखाली ज्ञान मिळाले होते ... तसे तुला झोक्यावर खेळताना काही दर्शन झाले वाटतं "

"नुसते दर्शन नाही दादा ... सुदर्शन झालेय म्हणा... ऐकाल तर तुम्हालाही आनंद होईल... या तुमच्या वेडीलाही काही सापडू शकते म्हणून .."

"तुला हात जोडतो बाई, आता लवकर काय ते सांगून टाक "

... माझ्या लक्षात आले कि माझ्याशी बोलताना तिचा झोका बराच मंदावला होता... तिने आता पटकन खाली उडी मारून मोठ्या उत्साहाने सांगू लागली,

" ...तुम्हाला माहितय दादा ... किती तरी दिवस तुम्ही माझ्यासाठी अमृत कुपिचा शोध घेत होता... मला सतत काळ्या सावल्या भीती दाखवायच्या ... तेव्हा तुम्ही म्हणायचे घाबरू नको ... मी तुझ्यासाठी अमृत संजीवनी आणून देणार आहे... एकदा ती गुटी घेतली कि... तुला कोणी शस्त्राने जखमी करू शकणार नाही, अग्नीने जाळू शकणार नाही... वारा तुला सुकवू शकणार नाही... आणि मृत्यू तुझ्या वाटेला जाणार नाही... आठवतं न पाच वर्षापूर्वी तुम्ही असं काही तरी बोलले होते ते ..?"

"हो ग, पण माझा शोध अजून संपलेला नाही.... मी तर तुला फक्त हिम्मत देण्यासाठी बोलत होतो... असली कुपी नसते ग बाई  "

"... आणि आठवतं का ? पाच वर्षापूर्वी पहिल्यांदा मी तुम्हाला दादा म्हणून हाक मारायचा प्रयत्न केला होता.... तेव्हा एक तुच्छतापूर्ण कटाक्ष टाकून तुम्ही म्हणाले होते ... ‘तुला दादा शब्दाचा अर्थ तरी कळतो का ?... कशाला शब्दाचे बुडबुडे फुगवतेस... ! मला असल्या रडक्या... चिडक्या... सतत मनात कुढनाऱ्या ...  कुठल्या तरी अज्ञात भीतीच्या छायेत आकसणाऱ्या.... अशा कोणाही व्यक्तीशी नाते सांगायला आवडत नाही... आणि तू तर मला दादा म्हणायला निघालीस ... तुझी काय लायकी मला दादा म्हणायची ...! चल हट ... जाऊ दे मला !!’ पण मी माझा हट्ट सोडला नाही... हे खरेच होते कि तेव्हा मी रडकी चिडकी होते... मनाने खचले होते... सतत फासाचा दोर नजरेसमोर दिसत असायचा... मलाही चीड यायची स्वत:ची.... रात्रदिवस विचार करत बसायचे ... पण अंधार कमी होण्याचे नावच घेत नसे... मग मी आणखीच उद्विग्न व्हायचे... सापडेल त्याला बोचकारायचे ... रक्त बंबाळ करायचे... स्वत:ही व्हायचे ....तेव्हा तुम्ही हळुवारपणे धीर द्यायचे... पण मी दादा म्हणताच तुम्ही अंगावर पाल पडल्यासारखे दचकले...! ‘तुझे माझे असे कुठलेही नाते असू शकत नाही... असायचे असेल तर स्वत:ला बदलावे लागेल....’ अशा कितीतरी अटी आणि शर्ती घालू लागले... आणि कुठल्या एका सणकीत मी त्या कबूल केल्या... आणि मग त्या पाळण्यासाठी धडे गिरवू लागले... माझ्या प्रयत्नाने खुश होत तुम्ही बोलून गेले कि,’मी तुला एक अमृतकुपी आणून देईल...’ आठवतं कि नाही बोला ना दादा ...."

" हो म्हणालो असेल. मग...? "

"मग काय दादा, काल मला तिचा अवचित शोध लागला... आणि तुम्हाला कधी एकदा सांगेल असे झाले...".     

"अगं अशी कुठली कुपी नसते बाई, मी तर तुझी आशा जिवंत ठेवण्यासाठी खोटीच थाप मारली होती.."    

"म्हणूनच मी तुम्हाला आणि जगालाही वेडे म्हणाले दादा... ! अशी कुपी खरेच असते... नव्हे माझ्यापाशीही होती ... पण मला आजपर्यंत तिचा पत्ताच नव्हता...... तुम्हालाही नव्हता.... म्हणून इतके दिवस फसगत झाली आपली .... "  

"अस्सं ... मलाही सांग ना तिचा पत्ता ..."    

     मी तिच्या गारुडाची मजा घेत म्हणालो.

"..ही.. ही.. ही ! काय वेडेपणा दादा ... अहो प्रत्येक जीवाच्या नाभीत असते ती... बाळाची नाळ तुटून वेगळी होण्याच्या क्षणी ती जीवाला प्राप्त होत असते... आणि मरताना तो ठेवा पुढच्या जन्मासाठी ज्योत होऊन पुढे निघून जातो.... मला शोध लागल्यावर गटागट संपवली ती... आणि माझं अंगांग दिव्य उत्साहाने भरून गेलंय... आता मला वाऱ्याची भीती वाटत नाही... आधी तो मला उडवायचा ... आता मीच त्याला फु .... करून उडवते... आधी अग्नीच्या ज्वाला चटके द्यायच्या ... आता मी दिसताच ... त्या जरा आदबीने मागे सरकतात... आणि जे हात मला मारायला ... छळायला धावायचे... ते आता अर्धांगवायूचा झटका आल्यागत लुळे पडतात... ... माझ्या मनात एक नाद घोंघावतो आहे... नैनं छीदन्ति शस्त्राणि ... नैनं दहंती पावक: ... न क्लेद यंत्यापो ... न शोषयति मारूत: ... म्हणून आता मला कशाची भीतीच वाटत नाही... कोणी माझे काहीच वाकडे करू शकत नाही, तर घाबरायचे कशाला ? ... आता फक्त एक वेणुनाद जाणवतो... एक यमुना ... कदंब... डोह ... चंद्र .. कैवल्य चांदणे ... आणि कान्हा.... गोकुळ .... ! ... त्यानेच रात्री स्वप्नात येऊन मला ती कुपी शोधून दिली....! जाताना म्हणाला.... ‘तू तर माझी धाकली बहीण योगमाया...! आठव कंसाच्या हातून कशी सुटली होतीस ते... आठव घनघोर मेघात सामावून जाताना कशी कडाडली होतीस ते .... आणि कंस त्या क्षणी कसा भयभीत झाला होता तो... अगं, कुठल्या जंजाळात हरवून बसलीस आपले चैतन्य आणि तेज .... तू जर अशी भित्री भागुबाई बनून दडून बसू लागली तर माझ्या नावाला बट्टा नाही का लागणार ... वसुदेव देवकीच्या पोटी आलेली धाकटी बहीण तूच होती हे सांगताना मला लाज नाही का वाटणार ... अगं तू तर अवध्य, अमर, अपराजिता, सौदामिनी..  चल जागी हो त्या भयनिद्रेतून ... आणि म्हण,  ‘.... नैनं छीदन्ति शस्त्रांनी’ .... आणि काय गम्मत दादा, ... जागी झाले आणि चकितच झाले.... आता सूर्य कितीही तापला तरी मला काही वाटत नव्हते... अंधाराला तर धाकच वाटू लागला माझ्या नजरेचा .... आणि आगीचे भय संपले होते... फासाचा दोर तर केव्हाच फुलांचा हार बनून गेला होता  ... आता मी हा झोका मनसोक्त उंच उंच चढवणार .... बघतच राहा तुम्ही ...!"

     ... आणि खरोखरच तिने मस्त गिरकी घेत झोक्यावर झेप घेतली... झोका पुन्हा उंच उंच हिंदोळे घेऊ लागला... पुन्हा ती गीतेचे ते श्लोक बडबडू लागली होती. आपल्याच नादात ... नव्हे कैफात ...! पण खूप खुश होती ती. माझा हात उगीचच माझ्या बेम्बीशी चाळा करू लागला ... पण तिथे एक रिकामी कलंडलेली वाटी सुद्धा नीट राहिली नव्हती. माझे अमृत केव्हा सांडून गेले मलाही माहित झाले नव्हते. पण तिच्या अपार उत्साहात त्याची जराही खंत मला जाणवत नव्हती..... नाहीतरी आता ते असून नसून काय फरक पडणार होता ... शेवटी तिलाच तर देणार होतो न मी....  तिच्या झोक्यावर एक कौतुकाचा कटाक्ष टाकून मी वळलो ... मला आता निघावेच लागणार होते... कित्येक दिवसांची झोप डोळ्यावर रेंगाळू लागली होती. आणि हो... आता निद्रनाशाचे कारणही उरले नव्हते...!


Rate this content
Log in