The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Navnath Pawar

Tragedy

4  

Navnath Pawar

Tragedy

दु:खी

दु:खी

5 mins
1.1K


"साहेब, तुमच्या गाडीचे सलग तीन हप्ते थकलेत. कधी भरता डेट सांगा. नाहीतर आम्हाला गाडी ओढून न्यायला लागेल. पुन्हा सोडवून घ्यायला तुम्हालाच पंधरा हजारचा भुर्दंड बसेल."

"तारीख तर नाही देऊ शकत, पण पुढच्या आठवड्यात माझे एक थकीत पेमेंट यायची शक्यता आहे. तोवर मला समजून घ्या..."

"ठीक आहे. तुमच्यासाठी करतो ऍडजस्ट. पण एनीहाऊ, वीस तारखेच्या पुढे जाऊ देऊ नका."

"बरं .. बघतो."

      

फायनान्स कंपनीच्या माणसाला कसाबसा कटवून जगन्नाथने घाम पुसला. नोटबंदी लागू झाल्यापासून मार्केट अचानकच बसले होते. नवीन ऑर्डर मिळणे तर दूरच, असलेले पैसेही मार्केटमधून वसूल होत नव्हते. दुसरीकडे सप्लायर, फायनान्सर पैशाचे तगादे लावून हैराण करत होते. पैसे वसुलीची काहीच शक्यता नसतानाही काहीतरी थापा मारून दिवस काढावे लागत होते. सप्लायरला मार्केटची परिस्थिती समजत असल्याने ते एकदम गळा पकडायला येणार नव्हते. पण फायनान्स कंपनीवाले मात्र इतके बेमुदत थांबायला तयार नव्हते. गाडीचे लोन अकाउंट एनपीएत गेले तर ते घरासमोरून गाडीची वरात मिरवत घेऊन जायला कमी करणार नव्हते. खरे तर जगन्नाथला कोणाचेही पैसे बुडवायचे नव्हते, पण अचानक थंड झालेल्या मार्केटपुढे तो असहाय्य झाला होता. त्यामुळे अशात कुठलाही फोन वाजला तरी तो एकदम दचके. त्यात अनोळखी नंबर असेल तर तो घेताना अक्षरश: अंगातून घामाच्या धारा वाहू लागत.

      

आताही अनोळखी नंबरवरून पुन्हा फोन वाजला तसा जरा विचार करूनच त्याने कॉल घेतला. तिकडून ओळखीचा आवाज आला.

"हॅलो जगन्नाथ, ओळखलं का, मी प्रभाकर गुरुजी बोलतोय."

"अरे वा, किती वर्षांनी तुमचा आवाज ऐकतोय सर !"

"हो तर, काल गावाकडे गेलो होतो. तिथे तुझ्या भावाकडून नंबर घेतला. म्हटलं माझ्या पहिल्या विद्यार्थ्याशी बोलावं"

"वा, मलाही खूप आनंद झाला सर. कसे आहात आपण?"

"दोन वर्षापासून रिटायर झालोय. देवानं वार्निंग पण दिलीय. म्हणून म्हटलं जमेल त्या सगळ्यांशी बोलून तरी घ्यावं."

"अरे बापरे, असं काय झालंय सर ?"

"व्हायचं काय दुसरं, हार्ट अटॅक येऊन गेलाय दोनदा. आता कधीही तिसरी घंटा होईल."

"ओह. असं म्हणू नका सर. अजून तुम्हाला कितीतरी कौतुकं पाहायची बाकी आहेत. इतक्या लवकर काही होत नाही तुम्हाला."

"जाऊ दे रे, कसं ठेवायचं ते मी त्या योगेश्वर भगवंतावर सोडून मोकळा झालोय. आता जगलो तरी बोनस आणि त्याने बोलावले तर परमानंदच. बरं तुझं कसं चाललंय सांग. तुझी खूप भरभराट झालीय म्हणे. तू मोठी गाडी घेतली म्हणत होता तुझा भाऊ."

"हो.. तुमच्या आशीर्वादानं माझं तसं छान चाललंय."

भरभराट शब्दाने कुचंबून जगन्नाथ कसाबसा बोलला.

"मग एकदा ये ना गाडी घेऊन भेटायला. बायकोलाही घेऊन ये. ...आणि ऐक ना, मला एकदा तुझ्या गाडीतून गावाकडे जाऊन सर्वांना भेटून यावे वाटतेय. हवं तर ही माझी अखेरची इच्छा किंवा गुरुदक्षिणा समज. तर तुला कधी वेळ मिळेल?"

      

आता जगन्नाथला आपल्या नशीबावर हसावे की रडावे ते कळेना. ज्या गुरुजींच्या प्रचंड मेहनतीमुळे आपण आयुष्यात काहीतरी बनू शकलो, त्यांची एवढीशी इच्छा पुरवणे त्याला मुळीच अवघड नसायला पाहिजे होती. अख्ख्या आयुष्यात गुरुजींनी कोणाची पाच पैशाची लाचारी पत्करली नाही. माझ्या गाडीत जायचे ते केवळ माझ्या प्रगतीचा अभिमान व्यक्त करायचा म्हणून आणि आपण किती अभागी. सरांना गाडीत बसवले असताना लोकांचे पैसे मागणारे फोन येत राहणार. प्रत्येक फोन आल्यावर मला फुटणारा घाम पाहून सरांना काय वाटेल..? बरं फोन बंदही करता येत नाही. फायनान्सवाले लगेच दारात येऊन बसतील. तमाशा करतील. त्यापेक्षा तूर्तास टाळावेच सरांना. पण काय बरं सांगावे..? जगन्नाथला पुन्हा दरदरून घाम फुटला.

" हॅलो जगन्नाथ, अरे काहीतरी बोल. तुला माझा आवाज ऐकू येतोय ना ? हॅलो, हॅलो ...."

"हां सर, मी एक महिना जरा बिझी आहे. त्यानंतर मी तुम्हाला फोन करतो."

"नक्की कर, मी वाट पाहतो."

फोन कट होईपर्यंत अंगातून गरम वाफा येत असल्याचा भास होऊ लागला.

         

महिना चार-सहा महिने असेच गेले. पण आर्थिक अरिष्ट कमी व्हायचे नावच घेत नव्हते. त्यामुळे जगन्नाथाला सरांना फोन करताच आला नाही. त्याचे मन दोन्हीकडून स्वत:ला खात होते. कितीही धडपड केली तरी कस्टमर पेमेंट द्यायची टाळाटाळ करतच होते. दुसरीकडे बायकोचे दागिने, बचत काढून घेऊन गाडी जप्त होण्यापासून वाचवावी लागली होती. गुंतवणूक म्हणून घेऊन ठेवलेला एक प्लॉट विकला तरी सगळे देणेकरी सेटल झाले असते. पण नोटबंदीमुळे अर्ध्या भावातसुद्धा कोणी गिर्हाईक तयार होत नव्हते. बरं धंद्याची गरज पन्नासेक लाखाची असल्याने इतके पैसे कोणी हातउसनेसुद्धा देऊ शकणार नव्हते. आधीचे कर्ज थकीत असताना कोणती नवीन बँक दारात उभी करणार नव्हती. अशात दुसरीकडे गुरुजींचे वाक्य आठवले की, त्याला प्रचंड अस्वस्थ होत होते. हरामखोर आहे मी, माझे आयुष्य घडवणाऱ्या गुरुजींची इतकीशी इच्छा पण पुरवता येत नाहीये. त्यांना तर माझे वैभव, भरभराट पहायची आहे. हे दैन्य घेऊन त्यांच्या दारात कसा जाऊ..? अशावेळी परमेश्वर वगैरे सब झूठ वाटू लागते. पण गुरुजींचा परमेश्वरावर प्रचंड विश्वास. तो विश्वास वाटण्यासाठी ते वर्षभर पदरमोड करून काम करत. जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर गीता ज्ञानात आहे असे सांगत. त्यांची नोकरी, रिटायरमेंट, पेन्शन याकडे पाहता त्यांचे तत्वज्ञान त्यांना खरोखर लागू होत होते. पण आर्थिक अरिष्टात कोणतीच गीता वसुली करून देण्यास असमर्थ होती... जगन्नाथ गुरुजींपासून तोंड लपवण्यापेक्षा जास्त काहीच करू शकत नव्हता.


      दरम्यानच्या काळात जगन्नाथला गुरुजींच्या फोनची अनेकदा आठवण यायची. आपण काहीतरी अपराध करतोय असे वाटून जायचे. पण काय करणार, गाडीला बरेचसे ओरखडे आले होते. तिला टचअप केल्याशिवाय सरांना दाखवायला न्यायला मन होत नव्हते आणि टचअप, पेंटिंगसाठी गाडी आठवडाभर वर्कशॉपला लावायला वेळ मिळत नव्हता. शिवाय दीड वर्षानंतर आपण भेटायला येतो म्हणून फोन केला तर सर काय म्हणतील ही काल्पनिक भीतीही होतीच. मग अजून काही दिवस तो विषय मनातच घुसमटून राहिला. एक दिवस का कुणास ठाऊक गुरुजींची खूप आठवण आली. मग त्याने विचार केला की, उद्या कुठल्याही परिस्थितीत गुरुजींना भेटायला जायचेच. तर जाताना गुरुजींच्या पत्नीसाठी एक जरीची पैठणी घेऊन ठेवली. सरांसाठी एक स्वेटर घेतले आणि सकाळीच सरांकडे जाण्यासाठी गाडी काढली. अर्ध्या तासात त्यांच्या घराजवळ पोहोचलो तर दारासमोर भली मोठी गर्दी. गाडी दूरच पार्क करून काय प्रकार आहे हे पाहायला जातो तो काय...

      श्रीराम जयराम जयजय राम...च्या उदास एकसुरी घोषात एक अंत्ययात्रा समोरून येताना दिसली. ती जवळ आली तसा गुरुजींचा मुलगा पुढे विस्तवाचे मडके घेऊन चालताना दिसला. जगन्नाथला त्याच्या नजरेत काहीही ओळख दिसली नाही. तसा जगन्नाथच्या हातापायांना घाम फुटला. एकेक चेहरा समोरून पुढे जात होता. पण जगन्नाथला कोणाच्या नजरेला नजर द्यायची हिम्मतच होत नव्हती. पुरुषांचा घोळका संपल्यावर दोन बायकांच्या आधाराने उभी गुरुपत्नी दिसली. तिचे उघडे कपाळ दिसताच जगन्नाथला हंबरडा दाटून आला. पण तिच्या नजरेत ओळखीचे चिन्ह नव्हते. त्याक्षणी जगन्नाथला स्वतःपासून दूर पळून जावेसे वाटले. किंबहुना त्याने तसा अट्टाहास करूनही पाहिला, पण प्रत्यक्षात तो एक इंचही हलू शकला नाही. जणू हातापायाला लकवा भरुन जीभ लुळी पडली होती. आता तो जगातला सगळ्यात दु:खी माणूस उरला होता.


Rate this content
Log in

More marathi story from Navnath Pawar

Similar marathi story from Tragedy