Navnath Pawar

Drama Romance

2.5  

Navnath Pawar

Drama Romance

असूया

असूया

6 mins
1K


नववीच्या वर्गात तिचा आज पहिला प्रवेश होता. नव्हे शाळेतही पहिलाच दिवस होता. तिच्या वडिलांची शासकीय सेवेत बदली होऊन आमच्या गावी आल्याने, तिलाही शिक्षणासाठी आमच्या शाळेत दाखल व्हावे लागलेले.


आता नवीन फुलपाखरू वर्गात आल्यावर आम्हा सगळ्यांच्या मनात गुलमोहर फुलायचेच दिवस होते ते. आधीच्या आठ फुलपाखरांच्या नजरेत तिच्या आगमनाने सूक्ष्म असूया जाणवली. पण आज आमच्या नजरांचा फोकस फक्त ती आणि तीच होती. आधीच्या वतनदार, जहागीरदार पाखरावर आम्ही जरा अन्यायच करतोय, हे जाणवूनही आमचा त्याबाबत नाईलाज होता. काहीतरी निमित्त काढून आमची नजर भिरीभिरी तिच्या भोवती फिरायची. असे पाच-पंचवीस अदृश्य भुंगे तिच्या केसात खोचलेल्या अबोलीच्या फुलावर रुंजी घालत होते. तिची नजर चुकवून जरा खालीही उतरत होते. आता त्यात त्यांचीही तरी काय चूक म्हणा. तिच्या वेणीचे पेड मागे असतील तर कमरेपर्यंत उतरायचे आणि समोर असतील तर खुपसे सौंदर्य झाकण्याऐवजी ठळकपणे लक्ष वेधून घ्यायचे. ती त्या वेणीच्या पेडांना झटका देईपर्यंत भुंगे खाली खाली उतरत असत. तिने झटका दिला की एकमेकावर आदळून शरमिंदे होत... प्रसंगी एकमेकांना हलकेच चावत... चावट हसत.... खुणावत !


तर पहिल्या तासाला गणिताचे गुरुजी आले. 'क्ष'+'य'=काय? असला यक्षप्रश्न विचारून आमच्या आनंदाचा 'क्षय' करते झाले. मात्र आमची अगदीच निराशा नव्हती झाली. कारण तिचे गणित पक्के होते. उत्तर द्यायला ती उभी राहिली की आम्हाला तिच्याकडे पाहण्याचे दहा सेकंदाचे का होईना... ओपन लायसन्स मिळायचे. आम्ही मग तिच्यावर रोखलेल्या ऐंशी अधिक दोन (दोन डोळे गुरुजींचे) डोळ्यात आमचेही डोळे भिरकावून द्यायचो. आता तिने कोणाकोणाचा हिशेब ठेवावा? पण गुरुजी तिला शाब्बास म्हणून खाली बसवायचे तेव्हा.... आमचेही काळीज बसायचे!!! जाऊ द्या... तुम्ही इतके समजदार असताना इतके रिपीट कशाला करायचे!


शेवटी ठणकन तास संपल्याची घंटी वाजली. गणिताचे गुरुजी हाताला लागलेली खडूची भुकटी झटकत... हातावर फुंकर मारत निघून गेले आणि आता आमचे लाडके कार्यानुभवचे गुरुजी वर्गात आले. लाडके यासाठी की ते क्वचितच काही शिकवत. कसले कार्य आणि कसला अनुभव हे तेव्हाच काय, आजपर्यंतही मला समजलेले नाही. पण त्यांचा तास म्हणजे अजिबात कुठला त्रास नसे. विविधगुणदर्शन करू पाहणारांना त्या तासात फुल पर्मिशन असे. गाणी म्हणा.. नकला करा.. गोष्टी सांगा आणि ऐका... ज्यांना यात रस नाही त्यांनी एकमेकांना चिमटे घ्या... गचांडी धरा... किंवा मस्त लाईन मारत बसा... वहीवर की फळ्यावर... असेही काही बंधन नव्हते त्यांचे...! आल्याआल्याच विचारायचे... आज काय करायचे रे? आज गाणे म्हणायचे सर... अन मग व्हायचे सुरु...!


तर आज विविध गुणदर्शनमध्ये तिचा नंबर पहिला लागला. हो गाणेच म्हणणार होती ती. तर ती उठली अन सरांच्या टेबलाशेजारी येऊन उभी राहिली. तिचे दोन डोळे क्षणभर कोणाकोणावर भिरभिरले किंवा कोणाला विसरले तिच्या जीवाला माहित. आज तर वाटते की तिच्या डोळ्यांना आमच्यापैकी कोणीच दिसले नसणार. तिला तर गाण्याची शिरशिरी जाणवत असेल त्यावेळी. पण वर्गातले सोळा डोळे जरा जळफळले आणि बाकीचे जाम चेकाळले हे मात्र नक्कीच जाणवले. तर पेढ्यासारख्या गोड आवाजात तिने सुरुवात केली..


आई माझ्या लग्नाची गं का तुलाच पडली घाई


कुणीतरी समजवा न बाई... माझं वय काय झालंच नाही


अरे वा! तिला अजून घाई नाही हे किती छान!! त्या काळी दादा कोंडके आमचा जीव की प्राण होता. तोच आमचा हिरो, तोच सुपरस्टार... तोच आयडॉल... तोच आयकॉन अन काय काय! हे गाणे ऐकताना... आमचा बावळट आ सेम टू सेम दादा सारखाच वासला.... ती मस्त गायली, सगळ्यांच्या कौतुकभरल्या नजरा झेलत जागेवरही बसली.. तरीही आमचा आ वासलेलाच! अहाहा... आम्हाला स्वर्ग पोथ्या पुराणातल्या कथात माहित होता.. तो असा अंगावर मोरपीस फिरवून जाईल हे ध्यानीमनी नव्हते! काय तो आवाज... काय ते निरागस भाव.. काय ती चुळबुळणारी वेणी... आणि तो छुन छुन घुंगरांचा एक पायाने धरलेला ठेका..! तन मनात कुठे कसे... कूच कूच झाले.... ते विचारूच नका..! असं काही झाल्यावर त्याला नेमके काय म्हणायचे हेही समजण्याचे वय नव्हतेच ते. बस इतकेच समजले की, कोणी बोट न लावताही सर्वांगात गोड गुदगुल्या सुरु झाल्या.


तर आता दुसऱ्या कोणा मुलाचा गाण्यासाठी नंबर लावला. हा मुलगा तसा माझा मित्रच पण मागच्या बाकावरचा. वर्गात सगळ्यात जाडजूड, वयस्कर आणि थोराड. तर त्याने आधीच्या गाण्याला कोपरखळी मारत दादा कोंडकेचेच्याच पिक्चरचे गाणे सुरु केले...


अंगात डगला कमरेला पट्टा

डोईवर निळी टोपी घातली

हवालदारीन तुम्हा कशी वाटली...


हा नमुना भलताच बिनधास्त होता. शब्दातले सगळे हावभाव हातवारे करून दाखवायचा. खरे तर तोही निरागस होता. चित्रपटात पाहिले तेच आपल्या स्टाईलमध्ये रिपीट करत असेल. वावगे काहीच नव्हते. पण मला उगीचच वाटले हा तिलाच उद्देशून म्हणतोय. ती इतर मुलामुलींसारखीच त्याला खुलून दाद देत होती. मात्र इकडे माझ्या काळजाचे ठोके उलटसुलट पडत होते. घशाला कोरड, तळवे घामेजलेले अन नजर जराशी भिडायला टाळणारी. त्यात त्याने सुरु केले...


खडकामागं नेऊन... जवळ तुला घ्यावं...


आता हे म्हणताना त्याने केलेल्या हावभावातल्या त्या अदृश्य मिठीत मला तीच दिसू लागली.... आयला! असे कसे होऊ होऊ शकते? वर्गातला सगळ्यात हुशार विद्यार्थी मी. सगळ्यात जास्त आवडून गेलीय मला ती. तर तिलाही सगळ्यात आधी मीच आवडला असायला पाहिजे. आता याला आधार काय ते नका विचारू...! आम्ही कधी आरशात थोबाड पाहिले होते का हेही नका विचारू! पुस्तकी हुशारीचा असल्या आवडीशी काय संबंध असतो? अन अजून तिला कोणाचा नीट परिचयही नाही, तर कसले आवडणे काय असते? आणि त्यात तिचे वय तरी काय? हे सगळे आज समजते, पण त्या वेळी फक्त मनात एक विचित्र अहंकार थयथयाट करत होता.


मी इतका स्कॉलर असताना हा मठ्ठ गोळा तिला जवळ घेतोय म्हणजे काय? साला परीक्षेत कशी मला विचारून उत्तरे लिहितो...? नाही सांगितले तर चक्क नापास होतो..! अन इथे मात्र तो हिरो? छे छे, सगळीकडे कसा एकच हिरो जिंकला पाहिजे..! झाले. कुठून कसली अदृश्य खुन्नस मनात सणकन घुसली. डोक्याच्या शिरा फणफणून फुगल्या. मस्त धमाल करत त्याचे गाणे संपले. पोरांनी टाळ्या, शिट्ट्या, बाकडे वाजवून वर्ग डोक्यावर घेतला. पण मला त्या टाळ्या नसून माझ्या थोबाडाचा तडम ताशा केल्यासारख्या वाटल्या. डोके आणखीनच चढले.


विजयी हास्य करत डौलात पावले टाकत तो माझ्या शेजारी आपल्या जागेवर बसतच होता की, मी अचानक त्याचे केस पकडले. अचानकच फाड फाड मारायला सुरुवात केली. कसे काय झाले, माझे मलाच समजले नाही. एकतर असा हल्ला होण्याची जराही शक्यता नसल्याने तो बेसावध होता. त्यात मी इतरवेळी वर्गातला एक शांत, अबोल आणि हुशार विद्यार्थी. त्याचा चांगला मित्रही होतो. गुरुजीसहित सगळ्यांना माझा हा अवतार नवीन होता. त्यामुळे सगळ्यांना वाटले की त्यानेच बसता बसता माझी काही खोडी काढली असावी. कसेबसे आम्हाला वेगळे करण्यात गुरुजींना यश आले. माझ्या आडदांड रानटी धपाटे घालण्याने त्याचे तोंड लाल झाले होते... केस विस्कटले... शर्टाची बटने तुटली... तरी त्याने अजून मला एका चापटीनेही प्रत्युत्तर दिले नव्हते. उलट गुरुजींनीच त्याला बाजूला ओढून आधी दोन चार छड्या ओपल्या. नंतर मला काय झाले ते विचारले. मला नेमक्या शब्दात काही सांगता येणार नव्हते. काय सांगणार? कसे सांगणार? काय झाले हे मला तरी कुठे नीट समजले होते? पण काही तरी झाले तर नक्कीच होते...! गुरुजींनी संशयाचा फायदा देऊन मला सोडले आणि त्यालाच आणखी बदडले. तो काही सांगेना तेव्हा त्याला एक दिवसासाठी वर्गाबाहेर काढले. तोही त्याबाबत कोडगाच होता. निर्लज्जासारखा हसत बाहेर पडला.


त्यानंतर गुरुजी मला जवळ घेऊन इतकेच बोलले,


”तुझ्यासारख्या हुशार विद्यार्थ्याकडून ही अपेक्षा नव्हती...”


मी नजर झुकवून उभा राहिलो. त्यांनी मला जागेवर बसायला सांगितले. आता तिच्याकडे पाहायला एक अदृश्य संकोच वाटू लागला. त्यात तिचे डोळे कसले पाणीदार होते...! ज्याच्याकडे पाहील त्याचे पाणी पाणी व्हायचे! त्यात आमचा गावरान, आडदांड अवतार. तिला तरी पहिल्याच दिवशी त्यात काय पाहावेसे वाटणार? झाले. ते प्रकरण तिथेच संपले. पण मी त्या मित्राला कोणत्याच परीक्षेत पेपर लिहिताना उत्तर सांगितले नाही. त्या वर्षी नापास झाल्याने तोही आपसूक मागेच राहिला...! पण त्यानंतर कार्यानुभवाच्या तासात कधीही गाण्यांची धमाल अनुभवायला मिळाली नाही.


काल खूप दिवसांनी त्याची अचानक भेट झाली. कशीबशी दहावी पास झाल्यावर तो सैन्यदलात भरती झाला होता. गेली पंचवीस वर्ष भेटच नव्हती आमची. पण त्याला मात्र शाळेतली ती आठवण ताजी असल्यासारखीच आठवत होती. आणि एक प्रश्न मनातून गेला नव्हता, त्या दिवशी मी त्याला का मारले? काल त्याला त्या प्रश्नाचे उत्तर देता आले. आधी आम्ही त्यावर खूप हसलो. नंतर डोळ्यातून पाणी ओघळले. त्याची मी पंचवीस-तीस वर्षांनी माफी मागितली.


"च्यायला तुझ्या..!"


असे म्हणत त्याने मला मिठीच मारली... आणि आईशप्पथ सांगतो... पुन्हा एकदा माझ्या हृदयात कूच कूच झाले. पण यावेळी मैत्रीसाठी होते ते!


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama