ऐक न रे
ऐक न रे


-- गुड नाईट ... बाय... टेक केअर ...
-- ओके बाय ... पण ... ऐक ना जरा
-- आता काय रे ? झोप आली जाऊ दे रे
-- नको ना जाउस ... अजून रात्र अर्धी पडलीय
-- येडा.. ! रात्र काय फक्त जागण्यासाठी असते ... !
-- नाही गं सखी.. रात्र तर तुझ्या सोबत जगण्यासाठी असते...!
-- हीहीही ... माझ्या सोबत ? मध्ये किती योजने आहेत .. माहितेय ?
-- तुझे हसणे आणि लाजणे यात जितकी प्रयोजने असतील ... तितकेच समज !
-- चल जाऊ दे... झोप आवरेना ... वेडा कुठला !
-- बरं जा ... पण ऐक ना ...
-- आता काय ?
-- मला एक दे ना
-- काय देऊ तुला ...
-- तुझे एक स्माईल दे ... पण स्मायली नको हं ... सेल्फी हवी या क्षणाची ...!
-- या क्षणी माझा अवतार काय आहे माहितेय ? मेंदी लावलीय केसांना ...
-- आम्हाला शाळेत असताना एक इंग्रजीच्या पुस्तकात एक लेसन होता .. पर्शिअस अन मेडूसा .. त्यात मेडूसा नावाची चेटकीण असायची ... तिचे दात म्हणजे नांगराचे फाळ ... आणि एकेक केस म्हणजे वळवळता साप असायचा ...
-- शी ... म्हणजे तू मला चेटकीण म्हणालास ... जा नको बोलू माझ्याशी ... बाय ..
-- अलेले ... शोनू रुसली ! शॉली ... शॉली ... ! पण ऐक ना ..
-- काय रे सारखे ... ऐक ना .. ऐक ना ...
-- टाक ना एक सेल्फी ...
-- तू ना अस्सा हट्टी आहेस... बरं घे, टाकली सेल्फी ... आता जाऊ .. झोप आवरेना .. मोबाईल सुटून पडू लागलाय हातातून ...
-- हो जा ... थकली असशील... बाय ... पण जरा ऐक ना ...
-- काय रे हे .. ? आता कशाला थांबू ... ? किती वाजलेत पाहिलेस ? एक वाजून गेलाय ...
-- वाजू दे गं ... एकाचे दोन होईपर्यंत तरी थांब ..!
-- ए ... मार खाणार का आता ? काय एकाचे दोन रे ... ? चल झोप .. मला जाम झोप येतेय
-- ओक्के जा ... सॉरी .. तुला उगीच त्रास देतो ना मी .. जा मग गुडनाईट ..
-- ही चालले .. झाली लॉग आउट ... बाय .. !
-- हो बाय ... पण जाता जाता एक मागू ...
-- नको .. आता सकाळी माग .. झोपू दे मला..
-- सकाळी मागण्यासारखे नाही... आत्ताच हवेय ... दे ना प्लीज ... दे ना .. दे ना .. दे ना .. प्लीज .. प्लीज ... देना प्लीज ...
-- काय रे वैताग तुझा ... चल बोल पटकन ..
-- एक पाच सेकंदाची तुझ्या हसण्याची क्लिप टाक ना ...
-- अरे माझा घसा दुखतोय .. जाम सर्दी झालीय ... डोके जड पडलेय ... कसे हसू फुटेल रे आता अचानक ... ?
-- जा मग .. झोप ... डोक्याला झंडू बाम लावून देऊ ... कि व्हिक्स चोळू तुझ्या गळ्याला ..
-- हीहीही ... नको... ही बघ माझ्या हसण्याची क्लिप ... असे मुद्दाम हसताना लाज वाटते रे ..
-- अहाहा ... किती गोड किणकिणत्या घंटेसारखे हसतेस गं तू ? जणू सरस्वतीच्या वीणेचा झंकार ..! खूप आवडते तुझे असे हसणे... ए अजून एकदा हस ना ..
-- काय रे लाडात येतोस ... किती वाजले पाहिलेस ? दोन वाजत आलेय दोन ... झोप बीप काही आहे कि नाही तुला भूता... !
-- हाहाहा ... तू जर बऱ्या बोलाने हसली नाहीस तर ... हे भूत रात्रभर तुला असेच पछाडत राहील... ए .. हस ना... फक्त एकदाच ... प्लीज .. फक्त एकदाच ..
-- मी नाही जा ... चल झोपू दे... नाहीतर आई ओरडेल माझ्यावर... ती बघ आलीच... आता मात्र नक्की लोग आउट ...
-- तुझ्या आईला माझा नमस्कार सांग... आणि ऐक ना ... हास ना जरा... टाक ना एक क्लिप... खूप ओढ लागली गं तुझ्या हसण्याची... मी गं तुझा तान्हा.. नको चोरू पान्हा .. माउलिये.. !
-- तू ना ... असला नग आहेस ! आईला नमस्कार सांगू ? धन्य आहे रे तुझी भावा ! धन्य आहे !! ती उद्या म्हणेल .. बोलाव राखी पौर्णिमेला ... बोलाव भाऊबिजेला ... ! येशील ..?
-- हो तुझ्यासाठी कायपण ... फक्त आता मला तुझ्या हसण्याची क्लिप दे ... माझी अंतिम इच्छा समज ...
-- ए .. ए ... मार खाणार का आता ? कसली अंतिम इच्छा रे... इमोशनल ब्ल्याकमेल करतोय केव्हापासून ... सोंगाड्या मेला !
-- शाब्बास .. शेवटी पोटातले आलेच ना ओठावर ... मेला ना एकदाचा सोंगाड्या ...! जा झोप आता... उद्यापासून तुला या सोंगाड्याचा कुठला जाच नाही कि आच नाही .. बाय .. भेटू पुढच्या जन्मात...
-- गळा दाबू का रे तुझा... ? पुढच्या जन्मात भेटणार ? मला एक दिवस तरी राहवेल का तुझ्याशिवाय ... चल ही घे एक छोटीशी क्लिप .. पण पुन्हा नाही हं काही लाड ! बाय ...
-- आई गं, किती जीवघेणे हसतेस गं... जा आता .. लवकर ऑफ लाईन हो... तुझ्या हसण्याने इतकी ओढ लावलीय की .... की...
-- की .. कि .. काय ? बोल ना ..!
-- की... आता तुला झोपूच देऊ नये...
-- ........
-- ए .. रागावलीस ...?
-- ........
-- ऐक ना जरा.. आता काही हट्ट नाही... फक्त गुडनाईट ...
-- .........
-- आयला खरेच झोपली वाटतं ... बाय गं सोनी... आणि जागी होशील तेव्हा माझा हा मेसेज वाच... ऐक ना .. मला तू खूप आवडते... ! खूप खूप आवडते ! इतकी कशी गं गोड हसतेस तू !
-- ......
-- बरं ... झोपतो मी .. बाय .. स्वीट ड्रीम्स ... !
-- .....
--- ....
<टिक ...टिक .. तीन वाजले ... टिक ... टिक.... चार ... साडेचार ... >
-- आहेस का रे ? झोपला वाटतं .. उठ ना रे .. मला झोप येत नाहीय.. उठ ना रे ..
-- .....
-- उठ ना रे.. मला झोप येत नाहीय .. खूप लोनली वाटतेय ... खूप एकाकीपण खातेय मला ...
-- .......
<टिक टिक टिक ... टू डुंग .. टू डुंग... ... टू डुंग... साडेचार... पावणेपाच ... पाच ..>
-- उठ ना रे... माझ्या छातीत धडधडतेय रे .. खूप भीती वाटतेय ... लाईट गेलेय ... खूप उकडतेय ... आणि आई बाबाच्या खोलीतून घोरण्याचे कसले विचित्र आवाज येताहेत ... कशी झोपू रे मी ? उठ ना रे ..
--- ......
--- तू कसला लळा लावलास रे मला.. ? अगदी ड्रग घेणाऱ्या व्यसनी सारखे झालेय... तुझ्याशी खूप बोलत राहावे वाटते... ए उठ ना .. किती निष्ठुरपणे झोपलास रे ! उठ ना ... शेजारच्या मंदिरात लाउडस्पीकरवर भल्या मोठ्या आवाजात आरती लावलीय ... त्यावर चढाओढ करीत मशीदीतली ती अजाण ... डोके भणाणून गेलेय ... कशी झोपू रे ... ? झोपेची पुरती वाट लागली रे.. ! ..... ... बरं झोप ... ! तू तरी माझ्यासाठी किती जागशील ... तुलाही तुझे लाईफ असेलच ना ! झोप .. मी पण करते प्रयत्न झोपण्याचा ..!
-- ....
<टिक टिक ... सहा ... सात ... साडेसात ... >
-- GM ... आहेस का गं ... ?
-- ओके झोप... !
...... टिक टिक टिक टिक ... आता डोक्यात टिक टिक सुरु झालीय ... आपण भेटणार आहोत ... लॉंग ड्राईवला जायचेय विकेंडला ... गौताळा... पितळखोरा ... म्हैसमाळ ...सुलीभंजन मस्त भटकू ... तेव्हा ना .. मी तुला खूप हसविल आणि फसवील ... आयला ... वेड लावलेस गं ... च्यायला ह्या फेसबुक अन whats up च्या ... !