धडा पहिला
धडा पहिला
मी व्यवसायिक जीवनात उडी घेतली तेव्हा अनेक किडे डोक्यात वळवळत होते. एकतर जीवघेण्या स्पर्धेचा व्यवसाय निवडायचा नव्हता. दुसरी गोष्ट स्वत:चे डिझाईन आणि निर्मिती असलेला प्रोडक्ट विकून, आनंदमय अर्थप्राप्तीचे निळे स्वप्न आयुष्यभर डोळ्यात जपले, त्याची सत्यता आजमावण्याचा कंड स्वस्थ बसू देत नव्हता. चौथी गोष्ट भांडवल शून्य होते. पाचवी गोष्ट अनुभवाचा वारसा शून्य आणि तरीही कोणाचा सल्ला मानून आंधळेपणाने कॉपी करायचा प्रचंड कंटाळा किंवा तिटकारा !
जमेची एकच बाजू म्हणजे माझे स्वप्न आणि ते वाजवी असो कि नसो, त्याला सर्व ताकदीनिशी पाठबळ देणारी बायको. खरे तर माझ्यापेक्षा तिला व्यवहारिक समज जास्तच. माणसांचे स्वभाव समजायची शक्ती माझ्यापेक्षा जरा उच्चच....! माझी स्वप्ने हा एक सात्विक जुगार आहे, याबद्दल तिला जराही शंका नव्हती. पण का कुणास ठाऊक, मी त्यात यशस्वी व्हावे हे तिचेही स्वप्न होते. मला कशा ठेचा बसू शकतील याचे आडाखे ती बोलूनहि दाखवी, पण जुगारी वृत्ती तिच्यातही असावी. तिने आपले सर्वस्व माझ्यासह जुगारात लावले आणि झाले सुरु आमचे स्वयंरोजगारचे जीवन.
तर त्या सुरुवातीच्या काळातला हा एक किस्सा. ऑटोमेटिक वाटर लेव्हल कंट्रोलरचे माझे डिझाईन घरगुती ग्राहकाकडे बर्यापैकी यशस्वी झाले होते, आणि आता औद्योगिक ग्राहकाकडे वळायची वेळ आली होती. अशावेळी मार्केटिंगचे आव्हान असते. कारण औद्योगिक ग्राहक स्थानिक उत्पादन, तेही घरगुती पातळीवर असताना कितपत प्रतिसाद देईल, याची शंका मनात होतीच. शिवाय मी असा मुखदुर्बळ. स्वत:चे काम खूप उच्च दर्जाचे आहे, हे सांगत फिरणे माझ्या स्वभावाचा भागच नव्हता. पण म्हणतात ना आंधळ्याच्या गायी देव राखी....! तर झाले असे कि मी औरंगाबादच्या हेडगेवार हॉस्पिटलला दोन वर्षापूर्वी एक सिस्टीम दिली होती. त्यांचे तांत्रिक सल्लागार जगदीश आफळे साहेब यांनी का कसे पण ते लक्षात ठेवले होते. त्यामुळे जेव्हा वाळूजच्या औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स या कंपनीच्या नवीन प्लान्टला गरज पडली तेव्हा त्यांनी माझे नाव स्वत:हून सुचवले. आलेल्या संधीचे सोने करायचे म्हणून मीही सगळे काम स्वत: सहभाग देऊन चांगले केले. इतकेच नव्हे तर त्यांचा कुठलाही सर्व्हिस कॉल चोवीस तासाच्या आत माणूस पाठवून सर्व केला, प्रसंगी स्वत: जाऊन सगळे काम केले. त्याचे फळ म्हणजे मला त्यांच्या चितेगाव येथील प्रकल्पाची आणखी मोठी ऑर्डर सुद्धा मिळाली. मग काय आपला पहिला औद्योगिक ग्राहक म्हणून एक भक्तीभाव तयार झाला. त्यांनाही खूप चांगल्या दर्जाचे काम आणि सेवा पुरवून मी त्यांच्या फारोळ्याच्या प्रकल्पाचे आणखी मोठे काम आपोआप मिळवले. आम्ही आमच्या कामाची आणि सेवेची संपूर्ण एका वर्षाची वारंटी देत असू. साहजिकच या वर्षभरात शक्यतो काही अडचण येऊ नये यासाठी मी सतत दक्ष राहत असे. आणि त्यामुळे प्रोजेक्ट प्रेसिडेंट, मेंटेनन्स म्यानेजर , इंजिनिअर सगळेच आमच्या कामावर खुश होते. वर्ष संपल्यावर पेड सर्व्ह
िस सुरु होते. म्हणून मी कंपनीला वार्षिक देखभालीचा करार करावा असे पत्र दिले आणि तिथल्या अधिकार्याने माझी उलटतपासणी सुरु केली.
‘मला सांगा पवार, गेल्या वर्षभरात तुम्ही किती वेळा सर्व्हिस कॉल अटेंड केले ?’
‘तीन वेळेस सर’
‘त्याचे स्वरूप काय होते ?’
‘एकदा तुमच्या ऑपरेटरला सिस्टीम समजली नसल्याने प्रोब्लेम झाला होता, एकदा दुसर्या कंत्राटदाराच्या कामामुळे केबल तुटली होती, आणि तिसऱ्यांदा मात्र आमच्याच सिस्टीममध्ये दोष निर्माण झालेला होता’
मी प्रामाणिकपणे उत्तर दिले, आणि सोबतच्या म्यानेजरने त्याला सहमती दर्शवली.
‘म्हणजे खरा प्रोब्लेम वर्षभरात एकदाच आला होता ..?’
‘होय साहेब ..” मी अभिमानाने छाती फुगवून उत्तर दिले.
‘मग मला सांगा पवार, तुम्हाला ए एम सी ची काय गरज आहे ?’
आम्हाला जेव्हा प्रोब्लेम येईल तेव्हा आम्ही तुम्हाला फोन करून बोलावून घेऊ, आणि सर्विस चार्ज देऊ. ‘
हा बॉम्ब माझ्या बोडख्यावर इतका अलगद पडला कि काहीवेळ मला काय उत्तर द्यावे हे सुचले नाही. कारण सिस्टिमची नियमित देखभाल नसेल तर अनेक प्रोब्लेम येत असतात हे काही त्यांना पटत नव्हते. आणि ए एम सी नसेल तर सर्व्हिस कॉल वर जाऊन काम करणे आम्हाला नुकसानीचे होते. एका कॉलचे चार्जेस एक हजार रुपयापेक्षा जास्त कंपनी देणार नव्हती........ चांगले काम केल्याने अशी उलटी शाबासकी मिळते हा पहिला धडा मिळाल्यावर मी सुन्न झालो. कारण त्यांनी ए एम सी तर केले नाहीच, पण एका कॉलचा दर ठरवून देऊन तशी परचेस ओर्डर देण्याची मागणीही स्वीकारली नाही. आधी काम मग पी ओ या प्रकारात पेमेंट मिळवणे हि तिथे एक अवगड लढाई होती. कारण काम झाल्यावर आमच्या बिलाची काळजी करणे कंपनीला आवश्यक वाटत नसे. सतत सोडून जाणाऱ्या अधिकार्यांमुळे कोणाचा पायपोस कोणाला नसे.
अनेकदा अधिकारी बिल हरवून टाकत, बिलाचा आकडा एकतर्फी कमी करत, बिल परचेसला गेले, तर तिथे गहाळ होई, अकौन्टला बिल पोहोचेपर्यंत किती वेळा चकरा माराव्या लागतील याचा नियम नसे. नात्र तिथून पुढे अकौंटवाले चार ते सहा महिन्यांनी कधीतरी चेक काढत. अगदीच ढिसाळ कारभार होता. पण आमच्या व्यवसायिक भक्तिभावाने आम्हाला चांगलेच ठकवले होते. सेवा देतांना फारच वाहवून जाऊ नये हा माझ्या व्यवसायातला धडा मी शिकलो होतो. तिन्ही प्लांट मिळून वर्षाचे पन्नास हजारचे ए एम सी , आमच्या बावळटपणामुळे कायमचे गेले होते. सर्व्हिस कॉलचे बिल मात्र दहा हजारही होणार नव्हते. हाच अनुभव इतरत्रही आल्यावर समजत गेले कि, भारतात इतकी चांगली सेवा देणे, म्हणजे आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणे असते. अति निर्दोष काम भारतात का होत नाही, याचे उत्तर हे आहे म्ह्णून आपल्याकडे सतत चाळण झालेले रस्ते.. ढिम्म न हलणारी नोकरशाही... वगैरे वगैरे सदा वंदणीय असते.