Navnath Pawar

Romance

4.3  

Navnath Pawar

Romance

त्यांचा पाऊस

त्यांचा पाऊस

3 mins
653


तिला प्लॅटफॉर्मवर उतरवून गाडीने भोंगा वाजवत वेग पकडला... रुळाच्या सांध्यांचा आवाज दूर दूर जाऊ लागला... तसा तिनेही आपला चेहरा वळवला... नेहमीच्या सवयीने स्कायवाॅकचा जिना उतरू लागली... त्याची गाडी कुठे कशी उभी असते हेही सवयीने माहितच असते... तरीही तिची नजर एकवार भिरभिरलीच...


गाडीच्या काचेतून दोन डोळे आपल्यावर रोखले गेलेले असणार या कल्पनेने ती मनोमन थोडीशी मोहरली. चाळीशी ओलांडलेली असूनही तिला विशीतल्या मुलीसारखी त्याच्या भेटीची ओढ आहे... आणि त्याच्या नजरेतून आपण जिना उतरताना कसे दिसत असू या विचारात तिने उगीचंच ओढणी सावरून घेतली... म्हटले तर विनाकारणच एक अस्वस्थता... बॅग घेऊन काळजीपूर्वक उतरताना तिने पुन्हा एकदा समोर पाहिले...


गाडी हळूवार हलून मुंगीच्या गतीने एक्झिटला लागून लावलेल्या आडव्या पाईपच्या रेलींगला जुळवून उभी राहिली... आतला चेहरा अजून स्पष्ट दिसत नसला तरी तिला त्याची नजर जाणवलीच... ती दरवाजाजवळ येताच त्याने आतूनच दरवाजा उघडला... आतल्या गार हवेचा झोत अंगावर येताच तिच्या अंगावर गोड शहारा फुलला... क्षणार्धात तिचे पाणीदार डोळे चकाकत त्याच्या डोळ्यांना भिडले... चारी डोळे एकमेकात विरघळून हसले...


हातातली बॅग मागच्या सीटवर रेटून देऊन तिने त्याच्या शेजारची जागा घेतली... पहिल्या गिअरचा किंचित झटका जाणवताच तिचे ओठ हसले... दुसरा गिअर टाकताना त्याने तिचा हात आपल्या हाती घेऊन लिव्हर मागे ओढली... तिला क्षणभर सत्यनारायण पुजेची आठवण आली... आतल्या थंडीतही त्याच्या गरम बोटांच्या गुंफनीतल्या बोटावर दाब वाढला... आणि त्याने लिव्हरच्या जाड सुपारीवर तिचा तळवा अशा पद्धतीने दाबला कि... त्याच्या मनात काहीतरी चावट विचार आला असणार याचा तिला अंदाज आला... दोघांच्या अंगावर एकदाच सुरसुरी जाणवली... बोटे एकमेकात जोरात घुसळून त्याने तिसऱ्या गीअरला पुढे ढकलले...


त्याच्या स्पर्शात अधिरता नसते... तर अलवार मृदुता असते... पण गाडी जशी फ्लायओव्हरच्या चढाला लागली तसा त्याने अॅक्सीलरेटरला इशारा केला... आणि एखादे विमान टेक ऑफसाठी झेपावत निघावे तसा पोटातला गुदगुल्या करणारा गोळा फिरून दोघांना झपाट्याने वर उचलू लागला... त्या क्षणी गाडीतल्या संगीताचा आवाज त्याने ठळक केला...


फिर हम को तडपते रहने पर मजबूर बनाया जाता है

आंखे भी दिखाई जाती है दामन भी छुडाया जाता है

एक कैद ह्टायी जाती है एक जुर्म बढाया जाता है

क्या आज मुहब्बत करने का कानून बनाया जाता है


...आणि तिकडे गाडी उताराला लागून पुन्हा एकदा पोटात छानसा गोळा गुदगुल्या करू लागतो... आता सगळं अंगांग ढगातल्या कापसासारखं हलकं हलकं... गाडी जमिनीवर उतरत असताना त्यांची मने मात्र समोरून वाहणाऱ्या ढगात गेलेली होती... आता त्यांना किमान तीन दिवस जमिनीचे तोंड पहायचे नव्हते... पण याच मातीचा सुगंध आभाळाला मस्तीत आणत होता... आणि अधीर झालेले आभाळ जमिनीकडे झेपावत थुई थुई बरसू लागले. काचेवर रेंगाळणाऱ्या थेंबांनी भर रस्त्यात दोघांना प्रायव्हसी दिली... तसा त्याने तिचा पालथा तळवा आपल्याकडे ओढून ओठावर टेकवला... आणि सळसळत्या जिभेने... छेडून वेगळाच इशारा केला...


तिला त्यांच्या दोघांचा आठवणीतला एक संवाद आठवून गेला...


-- कालपासून धो धो कोसळतोय पाऊस...

-- तुझ्या आठवणीचा आहे हा पाऊस...

-- हो पाऊस तिकडे आणि तुझ्या स्वरांचा मेघ मल्हार इकडे... उन्मन होऊन आनंद घे पुरता... बोलणे नंतर होत राहील.

-- तू ये न थेंब होऊन.

-- तू डोळे मिटून थेंब अंगावर घेऊन बघ... त्यात तुला माझा स्पर्श जाणवेल.

-- तन मनावर बरस.

-- उघडून जातोय बहुतेक पाऊस...

तेवढ्यात गाडीला झटक्यात ब्रेक लागले.. आणि ती भानावर आली.. पण मनातले ओठावर आलेच...!


-- असा बरा मी तुला जाऊ देईल..!


आता मात्र दोघेही एकमेकांकडे पाहून खळाळून हसले... दोघांच्याही मनात एकच पाऊस दाटून आला होता की!


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance