मुक्ताबाई सखी तुम्हांपाशी
मुक्ताबाई सखी तुम्हांपाशी


वारकरी संप्रदायामध्ये साधनेला आत्मप्रतिमेमध्ये सामावून घेण्याचे आत्मबळ स्त्रियांना मिळाले. 'मुक्ताबाई सखी तुम्हांपाशी' असे म्हणत मुक्ताबाईला दैवी गुण बहाल न करता तिचे स्त्री असणे, माणूस असणे, भक्त असणे, गुरू असणे आणि आत्मविकास साधक असणे, यांच्याबद्दल आदर असणारा 'पुरुष' आज जास्त महत्त्वाचा वाटतो.
संन्यास घेऊन, ईश्वरभक्ती करीत, मठात राहणाऱ्या महानुभाव पंथातील स्त्रिया या भक्त असणे, ही स्वत:ची नवी ओळख घेऊन जगत होत्या. त्यांच्या जगण्याला मिळालेले भक्ती करणे, हे नवे प्रयोजन त्यांनी कसे आत्मसात केले, याचे बरेच लहान-मोठे तपशील 'लीळाचरित्र', 'स्मृतिस्थळ' या चरित्र ग्रंथांमध्ये अनेक प्रसंगी आढळतात. या साऱ्या 'अनुभवी'च्या लीळा वाचल्यानंतर महानुभाव पंथातील साधक स्त्रियांच्या बाबत एक महत्त्वाची नोंद करणे आवश्यक आहे. या साऱ्याच स्त्रियांनी मुख्यत: भरण-पोषणकर्त्या स्त्रीत्वासह साधक असणे अंगीकारले. स्त्रीच्या अंगी असलेले व्यवस्थापन कौशल्य वापरून पंथाच्या मठातील कामकाज, जबाबदाऱ्यांची व्यवस्था त्यांनी चोखपणे पार पाडली. 'विंदां' (करंदीकर)च्याच शब्दांत सांगायचे झाल्यास, तिने साधलेल्या संसार योगातील गृहस्थाश्रमातील भूमिकांमध्ये वाढताना तिचे 'यक्षिणी' असणे, भरवताना 'पक्षिणी' असण्याचे रूप आणि साठवताना तिची 'संहिता'रूपी प्रतिमा. या साऱ्या प्रतिमा महानुभाव पंथाच्या मठामध्ये जोपासत या स्त्रिया पंथाच्या शिष्या झाल्या. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये 'यक्षिणी' असणे, 'पक्षिणी' असणे आणि संहितेसह शिष्य असणे हेच पैलू उठावदार राहिले. त्यामुळे परमार्थ साधनेशी निगडित अनुभव मांडण्यापर्यंत जाऊन स्वत:ची अध्यात्मनिष्ठ ओळख रचणे, हे पंथातील स्त्री शिष्यांकडून अपवादाने घडत गेले. वारकरी संप्रदायामध्ये साधनेला आत्मप्रतिमेमध्ये सामावून घेण्याचे आत्मबळ स्त्रियांना लाभले. म्हणूनच वारकरी संप्रदायातील संत स्त्रियांनी केलेल्या अभंग रचनेला महाराष्ट्राच्या समाजजीवनात तसेच सांस्कृतिक इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे.
निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव यांची मुक्ताबाई ही बहीण. तिचा जन्म इ.स. १२७९साली आपेगावला झाला. इ.स. १२९७मध्ये तिने खानदेशातील मेहुण येथे समाधी घेतली. अठरा वर्षे परमार्थ साधनेत रमलेल्या मुक्ताबाईला वडील बंधू निवृत्तीनाथांची गुरूकृपा लाभली. लोकनिंदेमुळे दु:खीकष्टी झालेल्या ज्ञानदेवांना 'ताटी उघडा ज्ञानेश्वरा' अशी आर्त साद घालणारी मुक्ताबाई आपल्याला सर्वप्रथम आठवते. त्यानंतर आठवते तिच्या 'मुंगी उडाली आकाशी' या अभंगरचनेमुळे. मुक्ताबाईची मराठी भाषकांच्या मनातली सर्वसाधारण प्रतिमा अशी आहे. या मुक्ताबाईने स्वत: रचलेल्या अभंगांशिवाय तिची अनेक रूपे, तिचे अर्थपूर्ण अस्तित्व संत नामदेवांच्या रचनेमध्ये दिसते. त्याशिवाय तिची गुरूकृपा लाभलेल्या चांगदेवांना मुक्ताबाईचे व्यक्तिमत्त्व कसे समजले? निवृत्तीनाथांना बहीण, भक्त, शिष्य या नात्यांमधील मुक्तेचे असणे कसे उलगडत गेले? याचा शोध घेतला, तर अठरा वर्षे आयुष्यमान लाभलेल्या 'मुक्ता'ची अनंत रूपे आपल्यासमोर उलगडतात. ही सारीच रूपे आजही खूप महत्त्वाची आहेत; कारण संसारात राहून परमार्थ साधना करत, अनासक्त वृत्तीने जगणारी, योगमार्गाच्या आचरणातून स्वत:च्या असण्याला स्वायत्त अर्थ देणारी मुक्ताई महत्त्वाची आहे. अशा कमालीचे आत्मबळ लाभलेल्या स्त्रीकडे तिच्या भोवतालचे शिष्य, गुरू, भावंडे आणि एकूणच समाज कोणत्या दृष्टीने पाहत होता, हे आजही महत्त्वाचे आहे. म्हणूनच परमार्थ साधना करणाऱ्या, अध्यात्म जाणून घेण्याचे सर्व अधिकार असलेला, गुरूस्थानी असलेल्या 'त्याच्या' नजरेतून 'तिचे' असणे कोणत्या स्वरूपाचे होते, हे जाणून घेतले पाहिजे. येथे अध्यात्माचा जाणकार 'तो'च्या रचनेतील 'तिचे' असणे अधिक महत्त्वाचे आहे. यातून आत्मविकास साधणाऱ्या स्त्रीच्या जगण्याची, स्वतंत्र असण्याची बूज राखण्याची महाराष्ट्राची, मराठी भाषक समाजाची परंपरा समजणे शक्य होते. धर्म-अध्यात्म क्षेत्रातील पुरुषसत्तेला ओलांडून स्त्री-पुरुष समानता मानणारा पुरुष अध्यात्मसाधक स्त्रीकडे कसा बघत होता, हे स्पष्ट होते. त्यामुळे स्त्रीच्या आत्मसन्मानाची जाणीव राखण्याची पुरुषाची परंपरा समजण्यास मदत होते.
ज्ञानदेवांच्या समाधी सोहळ्याचे वर्णन त्यांच्या भक्त-सुहृद नामदेवांनी केले आहे. त्यातील एका अभंगामध्ये नामदेवांनी रचलेले रूपक विचारांत घेतले पाहिजे.
'शिव तो निवृत्ती सोपान ब्रह्मस्थिती।
ज्ञानदेव मूर्ती विष्णूची हो।
ब्रह्मणी हे कला माय मुक्ताबाई।
विचारूनि पाही स्वयं मुक्त।। (५२६)
नामदेवांनी मुक्ताबाईंना लावलेली माय आणि ब्रह्मणी ही दोन्ही विशेषणे तितकीच महत्त्वाची आहेत. वात्सल्यरूप आणि ज्ञानरूप माऊली ही मुक्ताबाईंची नामदेवांनी केलेली पारख हे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन आहे. वात्सल्य आणि ज्ञान यांच्या संयोगातून मनात जागणारी करुणा, हाच ताटीच्या अभंगाचा मुख्य भाग आहे. ज्ञान आणि वात्सल्य यांच्यातील अविरोध स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वात एकत्र नांदू शकतो, हे जाणून घेणाऱ्या नामदेवांबद्दलचा आदर पुन्हा एकदा दुणावतो.
ज्ञानदेव समाधी प्रसंगी निवृत्तीनाथांनी आपल्या धाकट्या भावंडांचे आणि स्वत:च्या अध्यात्मलीन जगण्याचे केलेले प्रतीकरूप वर्णनही महत्त्वाचे आहे.
निवृत्तिदेव म्हणे सांगतो या वाचे।
राहाणे चौघांचे एकरूप।
त्रिवेणीचा ओघ जैसा एके ठायी।
तैसी मुक्ताबाई आम्हामध्ये।।
रज तम गुण सत्व गुणाठायी।
तैसी मुक्ताबाई आम्हामध्ये।।
भूचरी खेचरी चांचरी ते पाही।
अगोचरा ठायी मुक्तगंगा।। (५५० : संत नामदेवांचा सार्थ चिकित्स गाथा)
आज या अभंगाकडे पाहताना या चारही भावंडांची हृदयस्थ एकरूपता तर जाणवतेच; पण मुक्ताबाईंचे गुरू आणि वडील बंधू निवृत्तीनाथ स्त्रीला सत्वगुणी मूर्ती म्हणतात. एवढेच नाही, तर रज आणि तम गुणांच्या विसर्जनाला सामावून घेणारे सत्वगुण म्हणजे मुक्ताबाई, असे सांगतात. स्त्रीच्या शारीर मर्यादा ओलांडून ती 'मत्त गुणांचा राओ' असे न म्हणता सत्वगुणाचे आगर मानणे, यापेक्षा स्त्री-पुरुष समानता वेगळी काय असते? गोचर - दृश्य आणि अगोचर - अदृश्य यांना वाटणारी शक्ती, चैतन्य म्हणजे मुक्तगंगा, मुक्ताबाई हे निवृत्तीनाथांना वाटते. स्त्री आणि पुरुष यांचा देहविशिष्ट विचार न करता, त्यातील श्रेष्ठ-कनिष्ठता ओलांडणारे निवृत्तीनाथ आत्मविकास साधणाऱ्या स्त्रियांचे सांगाती होते. हा परंपरेचाच एक प्रवाह म्हणावा लागेल.
सोपानदेवांच्या समाधी प्रसंगी नामदेवांनी 'शिवाचा अवतार सद्गुरू निवृत्ती' असे वर्णन केले आहे. मुक्ताईचा उल्लेख 'मुक्ताबाई सखी तुम्हांपाशी' असा केलेला आहे. वारकरी संप्रदायाच्या भक्तीयोगातील ईश्वर भक्त, गुरू-शिष्य यांच्या सख्यत्वाचे, सलगीचे आणि समानतेचे नाते मुक्ताबाई ही अध्यात्मजाणकार सखी यातून होते. मुक्ताबाईला दैवी गुण बहाल न करता तिचे स्त्री असणे, माणूस असणे, भक्त असणे, गुरू असणे आणि आत्मविकास साधक असणे, यांच्याबद्दल आदर असणारा 'पुरुष' आज जास्त महत्त्वाचा वाटतो. स्त्रीच्या अध्यात्मज्ञानाच्या जोपासनेला, तिच्या विकसित होणाऱ्या जाणिवांना, तिच्या संवेदनशील, करुणामय ज्ञानाला खुलेपणाने स्वीकार करणारे वारकरी संप्रदायातील पुरुष परंपरेची वेगळी ओळख करून देतात.