जनी म्हणे...
जनी म्हणे...


संत जनाबाई हे स्त्रीत्वाचे वेगळे रूप. एकाचवेळी दासी असणे आणि अलौकिकात जगणे यांच्यातील समतोल तिने साधला होता. तिची एकरूपता, तिचे धाडस, तिची स्त्रीस्वातंत्र्याची वाट हे सारे आपल्याला मोहून टाकते. भारतीय स्त्री परंपरेचा विचार करताना जनाबाईला विसरून चालणारेच नाही.
संत जनाबाईंची आपल्या मनातील ओळखीची खूण कोणती? असा प्रश्न पडलाच, तर पटकन काय आठवते? त्या सगळ्या आठवणी म्हणजे जनमानसातील जनाबाई, जनमानसाची जनी. 'विठू माझा लेकुरवाळा' अशी मायाळू, प्रेमळ साद देणाऱ्या जनाईने मातृका विठाईचे आणि तिच्या संत लेकरांचे भावचित्र रेखाटले. ईश्वर आणि भक्त यांचे हृदयस्थ नाते रेखणारी जनाबाई चटकन आठवते. 'अरे विठ्या, अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या,' अशी प्रेमाने रागावून विठोबाचा उद्धार करणारी जनाबाई म्हणजे दोन माणसांमधील खुल्या संवादाच्या अनंत शक्यता आणि छटा आहे. मनोगत जाणणाऱ्या विठोबाशी जनी काय काय आणि किती किती बोलते. तिला विठोबा पुरुष म्हणून, माणूस म्हणून किती तऱ्हांनी भावतो, जाणवतो, हे तिचे अभंग वाचल्यानंतर प्रत्येक वेळी नव्याने समजते.
स्त्रीमुक्ती, स्त्रीवाद असे काही नसण्याच्या काळातील म्हणजे चौदाव्या शतकातील जनीच्या या साऱ्या इच्छा, अपेक्षा आहेत. त्या सगळ्या आज जाणून घेताना जनीचे स्त्री असणे, तिचे स्त्रीत्व नव्याने उलगडते. भारतीय स्त्री स्वातंत्र्याचा वेगळ्या पद्धतीने विचार करायला हवा, हे जनाबाईच्या रचना वाचताना तीव्रतेने जाणवते. जनाबाईने तिचे गुरू नामदेव यांचे चरित्र रेखाटले आहे. त्यामध्ये नामदेवांच्या कुटुंबातील आई, वडील, मुले, सुना या सगळ्यांची नावे अभंगामध्ये गुंफली आहेत. त्यात नामदेवांच्या सुनांची नावे कोणकोणती आहेत, तर लाडाई, गोडाई, साखराई. बाप रे! किती गोड नावे आणि तीही सुनांची! आज आपण नको असलेल्या; पण तरीही जन्मलेल मुलीचे नाव 'नकुशी' असे ठेवल्याचे ऐकतो, वाचतो. या पार्श्वभूमीवर नामदेवांच्या या सुनांची एवढी गोड नावे लक्षवेधक वाटतात. स्त्रीचा, घरातील बाईचा मानसन्मान राखण्याची सुरुवात तिच्या घरातल्या नावापासूनही होते, होत असते, याची जाणीव जनाबाईच्या या अभंगामुळे तीव्रतेने होते. या पार्श्वभूमीवर दुसरा विचार मनात येतो, अभंग रचनाकार जनाबाई स्वत:ला कोणकोणती विशेषणे लावते? तिच्या मनातली तिची आत्मप्रतिमा कोणती आहे? 'दासी जनी', 'वेडीपिशी जनी', 'जनी नामयाची', 'जनी म्हणे' अशी स्वत:ची ओळख ती सांगते. एका अभंगामध्ये जनाबाई 'मी तो समर्थाची दासी' असेही म्हणते. हे वाचताना मनात विचार येतो, जनीने तिचे दासी असणे किती बिनधास्त होऊन स्वीकारले, मिरवले. 'तुजवाचूनी विठ्ठला। कोणी नाही रे मजला।' हे म्हणताना जनाबाई तिचे पोरकेपण दयाबुद्धीच्या पलीकडे जाऊन एका अर्थाने चव्हाट्यावर आणते, तेही अत्यंत निर्भय होऊन, अलिप्त होऊन. स्वत:ची कीव न करता, स्वत:ला गरीब, बिचारी असे न मानता जनाबाई अतिशय धाडसी होऊन
'माय मेली, बाप मेला। आता सांभाळी विठ्ठला।
मी तुझे गा लेकरू। नको मजसी अव्हेरू।।
असे म्हणते. दुसऱ्या एका अभंगामध्ये जनाबाई 'क्षमा करावी देवराया। दासी जनी लागे पाया।' एवढी मवाळ होते. जनाबाईने तिचे आई-बापाविना पोरके अशणे, नामदेवाच्या कुटुंबातील कष्टाची कामे करणारी बाई असणे बिनबोभाट स्वीकारले. 'स्त्री जन्म म्हणवुनी न व्हावे उदास,' हे समान हक्काची मागणी करणारे विधान आहे. हे बंडखोर विधान करताना जनाबाई परंपरेचाच आधार घेते. परंपरेच्या अंतर्गत असणारी स्वातंत्र्य जपण्याची क्षमता आणि विद्रोहाची शक्यता जनाबाईला नीटनेटकी समजली होती. मी दलित, उपेक्षित, अनाथ, कष्टकरी स्त्री आहे, तरीही मला भक्ती करण्याचा, आध्यात्म जाणून घेण्याचा हक्क आहे, अधिकार आहे. 'संताचे घरची दासी मी अंकली' आहे. प्रत्यक्ष विठोबानेच मला 'दिल्ही प्रेमकळा', शिवाय 'विदुर सात्विक माझिये कुळीचा', अशी खास भारतीय परंपराच माझ्या पाठीशी आहे. म्हणूनच 'नामयाची जनी भक्तीने सादर' असा एकूण मामला आहे. प्रतिकूल परिस्थिती आणि अभावग्रस्त असणे, या साऱ्यातून भारती स्त्री आत्मस्वातंत्र्याची वाट कशी शोधते, याचे उत्तम उदाहरण म्हणून जनाबाईचा विचार केला पाहिजे. 'दासी जनी' म्हणून घेतलेली माघार तिला हीनदीन, लाचार, अन्यायग्रस्त करत नाहीच, उलट अभाव असण्यातून खूप मोठी झेप घ्यायला बळ देते. अर्थात, जनाबाईने परंपरेशी स्वत:ला जोडून घेतले. अभावग्रस्त लौकिक जगण्यातून खूप मोठी झेप घेणारी जनाबाई परंपरेत राहून परंपरेविरुद्ध बंड करणारी खास भारतीय बंडखोर स्त्री होती. ती भक्त आणि मनस्विनी होती. आपण तिच्याकडे त्या दृष्टीने बघत नाही आणि विचारही करत नाही. जनाबाईने तिच्या अभावग्रस्त जीवनात जपलेली जगण्याची आस आणि उत्कटता लक्षात घेतल्याशिवाय ती विठोबाशी बोलता बोलता 'उभी राहूनि अंगणी। शिव्या देत दासी जनी।' असे का म्हणते याचा उलगडा होत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट जनाबाईच्या रचना वाचताना जाणवते, ती म्हणजे तिचा 'बोल्डनेस.' निर्भय होऊन लिहिते होण्याची स्वतंत्र वाट जनाबाईने निर्माण केली. आजही स्त्रियांच्या लेखनातील बोल्ड भाषाशैलीचे आपल्याला कौतुक वाटते, रागही येतो. संस्कृतीचे भवितव्य टांगणीला लागते; पण निर्भयतेचा, आत्मस्वातंत्र्याचा प्रत्यय देणारे जनाबाईचे अनुभव हादेखील परंपरेचाच एक भाग आहे, याचा आपल्याला विसर पडलेला असतो.
बंडखोर, निर्भय आणि भक्त असण्याचा अनुभव घेत उत्कटपणे जगणारी जनाबाई लौकिक स्तरावर एक अभावग्रस्त, उपेक्षित, कष्टकरी दासी होती. लौकिक आणि अलौकिक स्तरांवर जगण्याचा समतोल साधण्याचे आव्हान जनी सहज, लीलया पेलते. हाताने शेणाच्या गोवऱ्या लावण्याचे, दळण-कांडणाचे, झाडलोट करण्याचे काम करणारी जनाबाई, तिच्या जाणिवेला-नेणिवेला, मनाच्या मनाला, अंतर्मनाला नामस्मरणाचा छंद लावते, गोडी लावते आणि वळणही लावते. 'चिंतनी चित्ताला। लावी मनाच्या मनाला।' हे ती म्हणते तेव्हा विठोबाच्या नामस्मरणाने ती मनाची एकाग्रता तर साधतेच; पण त्याचबरोबर आपल्या मनात येणारे अनेकानेक विचार ती स्वत:च सजगपणे जाणून घेते. विठोबाशी मनात चाललेल्या संवादाच्या निमित्ताने तिला नवे आत्मदर्शन घडते. मनातले राग, लोभ, निराशा, आनंद, जिव्हाळा, वात्सल्य यांची प्रांजळ कबुली ती जगजाहीर करते. नामस्मरणाच्या मार्गाने अवघे आयुष्य नव्या दिशेने घडविण्याचे आव्हान ती पेलते. त्यासाठी ती स्वत:चे आयुष्य, तिचे दासीपण, तिचे सजग आणि प्रांजळ मन, तिची स्वत:शी सतत बोलण्याची अनावर ऊर्मी हे सगळे फणाला लावून नामदेवाची दासी जनी होते. तिने तिचे अनाथ, अभावग्रस्त असणे सहजपणे स्वीकारले. हा तिने घेतलेला निर्णयच होता. तिने नामदेवांच्या चरणी लीन होऊन नामस्मरणाचा छंद मनीमानसी जपण्याचा, मनाला एकाग्र करण्याचा निर्णय घेतला. मनाला सजग करत स्वत:चे विचार, भावना, संवेदना जाणून घेत, अवघे आयुष्य जगणे हा तिचा स्वतंत्र निर्णय आहे. जनाबाईच्या या निर्णयस्वातंत्र्याचा आणि जगण्याला विधायक आकार देण्याचा विचार पुन्हा नव्याने करायला हवा. स्त्रीस्वातंत्र्याची भारतीय परंपरा कोणती आहे, याचा विचार करताना जनाबाईला विसरून चालणार नाही.
मला जनाबाई आणखी एका कारणासाठी खूप महत्त्वाची वाटते. ती हाताने कामे करते, मरेमर कष्ट करते आणि मनाने विठोबाचा ध्यास जगते. विठोबाचा ध्यास घेऊन जगायचे ही तिच्या जगण्याची अनवट, बिकट वाट ती स्वत: निवडते. खरे म्हणजे या अनवट वाटेवरच तिला जगायचे आहे; पण लौकिक व्यवहारात ती नामदेवाघरची राबणारी नगण्य बाई आहे. ही जगाची सक्ती आहे आणि लौकिक जगणे भरून अलौकिक भक्तीच्या जगात रमण्याचीही सक्ती तिला जाणवते. या अवघड पेचप्रसंगातून ती मार्ग कसा काढते याची उत्सुकता जनाबाई वाचताना लागते. जनाबाई तिच्या मनाची एकाग्रता आणि सजगता हळूहळू वाढवत नेते. झाडलोट करता करता विठोबाला भेटते, उन्मन होते. लौकिकातून अलौकिक पातळीवर सहजपणे जाणारे जनाबाईचे मन कसे घडले असेल, हा प्रश्न पडतो.
कष्टाच्या कामांसाठी लागणारी शारीरिक ताकद, ऊर्जा आणि विठोबाच्या ध्यासात गुंतलेल्या, रमलेल्या मनाची एकाग्रता यांचा समतोल सहजपणे साधणारी जनाबाई मला नेहमीच खूप थोर वाटते. शरीरातील ऊर्जा आणि मनाची एकाग्रता यांचा समतोल संयोग साधणारे जनाबाईचे मन जाणून घेतले पाहिजे, मगच 'झाडलोट करी जनी। केर भरी चक्रपाणी।' या अभंगाचा अर्थ नीट समजेल.