Read #1 book on Hinduism and enhance your understanding of ancient Indian history.
Read #1 book on Hinduism and enhance your understanding of ancient Indian history.

Rupali Shinde

Inspirational Others


0.6  

Rupali Shinde

Inspirational Others


एका जनार्दनी नाचती भोंगे

एका जनार्दनी नाचती भोंगे

4 mins 23.3K 4 mins 23.3K

तुकोबा माणसाने स्वत:च स्वत:चा केलेला पराभव आणि स्वत:च स्वत:ला गवसण्याच्या आत्मविकासाचा प्रवास कमालीच्या न लैंगिक न नैतिक दृष्टीने मांडतात. असा समजूतदार पुरुष खूप दुर्मिळच आहे, आजही. महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषक संस्कृतीमध्ये असा समजदार पुरुष तुकोबांच्या रूपाने आहे, तो कदाचित आजच्या स्त्रीवादी विचारधारेतील न लैंगिक, न नैतिक धारणेचे मिथक असू शकतो. ही आजही दिलासादायक गोष्ट आहे.

तिच्या देहाकडे पाहण्याचा दृष्टिकोन केवळ दैहिकता जागवतो का? त्याला तिचा विचार करताना तिच्या शरीराचे उभार, उंचवटे आणि सखल भागच पहिल्यांदा दिसतात, त्याच्या डोळ्यांना जाणवतात. कोणत्याही स्त्रीला त्रास देणारा हा नेहमीचाच अनुभव. तो अनुभव त्याच्या दृष्टीने सरावाचा. देहाच्या पलीकडे स्त्रीच्या मनाचा, तिच्या क्षमतांचा विचार झाला पाहिजे, ही आहे आम्हा स्त्रियांची अनेकानेक वर्षांची मागणी. हा सगळा विचार करत असताना प्रा. डॉ. र. रा. गोसावी यांनी संपादित केलेल्या 'श्रीसकलसंतगाथे'मध्ये तुकोबांनी रचलेले व्यभिचारावरचे अनुभव वाचायला मिळाले. एरवी या अभंगांना तुकोबांच्या विराण्या असे म्हणतात. म्हणजे तुकोबांच्या अभंगातील विरहाने व्याकूळ झालेली स्त्री कधी विरहिणी असते, तर कधी ती व्यभिचारी आहे असेही दिसते. संत साहित्याच्या अभ्यासकांचे हे दोन वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. विशेष म्हणजे, ते विसाव्या शतकातले आहेत, म्हणजेच आधुनिक काळातले आहेत. तुकोबा मात्र या भाववेड्या स्त्रीला चांगले-वाईट असे कसलेही लेबल लावत नाहीत. ते तिचे उतावीळ मन समजूतदारपणे जाणून घेतात. एवढेच नव्हे, तर उतू जाणाऱ्या तिच्या वेड्या मनाकडे संपूर्णपणे तिच्या आधीन होऊन पाहतात आणि अनावर इच्छाशक्तीमधील मनाची एकाग्रता, ऊर्जा म्हणजे देहमुक्ती का, असा प्रश्न आपल्या मनात जागवतात.

निसर्गाने दिलेल्या, नैसर्गिक देहभेदाकडे, स्त्री-पुरुष यांच्या देहाकडे पाहण्याची महाराष्ट्राची, मराठी भाषक संस्कृतीची परंपरा न-लैंगिक आहे. ती निसर्गाप्रमाणेच निकोप, निखळ आहे. हे मान्य करताना अतिशयोक्ती किंवा परंपरेचा गौरव करण्याचे काहीच कारण नाही. वारकरी संप्रदायातील संत पुरुषांनी लावलेला स्त्रीत्वाचा अर्थ स्त्री-पुरुष विषमतेची चौकट ओलांडणारा आहे. म्हणूनच त्याला दिसलेला, जाणवलेला स्त्री देहाचा अनुभव कोणत्या प्रकारचा आहे, हे जाणून घेणे मला महत्त्वाचे वाटते. ज्ञानेश्वरांनी 'अमृतानुभव' या ग्रंथामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्या देहामध्ये नांदणारे 'शिवपण' एकच आहे. तेथे फक्त स्त्री आणि पुरुष असा नामभेद आहे, असे थेट सांगितले आहे. या ठिकाणी देहभेद हा नाममात्र; पण देहातील चैतन्य देहाच्या मर्यादा ओलांडून जाणाऱ्या आहे. एकमेकांशी एकरूप होऊन संपूर्ण विश्वाला व्यापून उरणारे हे विश्वचैतन्य म्हणजे स्त्री आणि पुरुष. या स्त्री आणि पुरुष यांच्या रतिक्रीडेचे, शृंगारक्रीडेचे स्वरूप म्हणजे विश्व. या शृंगारक्रीडेतील शिव म्हणजे 'तो' शमन करणारा आणि शक्ती म्हणजेच 'ती' चेतवणारी, क्षोभ निर्माण करणारी इच्छा आहे.

या दोघांच्या म्हणजे शिव-शक्तीच्या रतिक्रीडेचे वर्णन ज्ञानेश्वर 'अमृतानुभवा'मध्ये करतात,

विषो एकमेकांची जिये।

चिये एकमेकांची विषयी इये।

जिंही दोघीं सुखिये। जिये दोघे।।

जी दोघे (म्हणजे शिव आणि शक्ती, अर्थातच ती आणि तो) एकमेकांचे विषय आहेत आणि विषयही आहेत. विशेष म्हणजे, हे दोघेजण एकमेकांच्या संयोगाने सुखी आहेत. या दोघांचे मीलन होते, संयोग होतो तेव्हा काय घडते? या मीलनामध्ये तो श्रेष्ठ, ती कनिष्ठ असे काही घडते का, हेदेखील पाहायला हवे. ती शृंगारातील समर्पिता आहे. तिने समर्पित केलेल्या देह, मनाचा स्वीकार करणारा, कित्येकदा अतिक्रमण करणारा तो आक्रमक आहे का, हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. या रतिक्रीडेतील तिचे स्थान आणि त्याचे स्थान, यावरून तिची आणि त्याची स्त्री-पुरुष असण्याची सामाजिक, सांस्कृतिक ओळख निश्चित होणार आहे. रतिक्रीडेत सहभागी झालेले तो आणि ती हे परस्परांना सुख देणारे आणि सुख घेणारे, असे सुखाचे समान वाटेकरी आहेत. तो इच्छुक आणि उत्सुकही आहे. ती इच्छेची परिपूर्ती करणारी आहे. इच्छा आणि पूर्तता करण्याची जबाबदारी त्या दोघांची समसमान आहे. म्हणूनच ते दोघे एकमेकांच्या इच्छेचे विषयसाधन आहेत आणि आनंदाचे साधकही आहेत.

तो-ती यांच्यातील साधन होणे आणि साधक होणे, यांतील श्रेष्ठ-कनिष्ठ भाव लोप होऊन, नाहिसा होऊन जाणवणारा, वाट्याला येणारा चैतन्याचा, आनंदीभाव हा महत्त्वाचा आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर स्त्री-पुरुष नामभेदाकडून आपली दृष्टी मनातील भावनिष्ठेकडे, आंतरिक जाणीवेकडे वळवतात. त्याची फलश्रुती म्हणजे, 'शिवपण एकले नांदे' अशी असल्याची स्पष्ट कबुली देतात. शिवपणाच्या अनुभवाला ज्ञानेश्वर शारीरभेदापेक्षा जास्त महत्त्व देतात. म्हणूनच स्त्री आणि पुरुष हा नैसर्गिक शरीरभेद खूप मोठा होत नाही. ज्ञानेश्वर हे स्त्री-पुरुष यांच्या शृंगाराचे वर्णन विश्वनिर्मितीच्या संदर्भात करतात. त्यातील स्त्रीत्वाचा आणि पौरुषत्वाचा अनुभव अंतिमतः शिवपणाच्या जाणीवेमध्ये विलीन होतो. शृंगारातून शुभंकराकडे जाण्याच्या प्रवासात तिच्यातील शिवपण 'तो' जागवतो आणि तिच्यातील शिवतत्त्वाचा आनंद 'तो' घेतो. त्याच्यातील शिवतत्त्वाला चेतवणारी 'ती' शक्ती आहे आणि तिच्यातील शिवतत्त्वाला शांतविणारा, शमन करणारा 'तो' शिव आहे. हा शिव-शक्ती समावेशाचा शृंगार ज्ञानेश्वर अनुभवामृतात रंगवितात. शृंगारातील देहजाणीव ही आत्मजाणीवेतील आत्मसौंदर्यामध्ये परिणत होते. एकनाथांनी 'हळदुली'चे रूपक योजताना विश्व निर्माण करणाऱ्या निरन्न नागव्या आदिम मिथुनाचे प्रतीक रचले आहे. अल्प अक्षर रमणीयतेमधून भावनिष्ठ तन्मयतेकडे घेऊन जाणारे हे रूपक थोडे दुर्लक्षित राहिले आहे. लोकशिक्षक एकनाथ, समन्वयशील एकनाथ या त्यांच्या प्रतीमा आपल्या ओळखीच्या आहेत. भावसौंदर्य आस्वादक एकनाथ ही त्यांची खास वेगळी ओळख 'हळदुली'च्या रचनेमधून निश्चित होते.


हळदुली वाटुनी वाटिला पाटा।

अगुणाचा नोवरा हळदुली उटा।।१।।

नागवा नवरा नागवी नोवरी।

दोघें बैसली चराचरी।२।।

नागवा नवरा नवरी नेसला।

नागव्या नवरीने नवरा वेदिला।।३।।

सभामंडपी दोघे ते दोघे।

एका जनार्दनी नाचती भोंगे।।४।।


नग्नतेला ओलांडून आत्म एकरूपतेकडे विकसित होणारे हे रूपक खजुराहोच्या शिल्पाची आठवण करून देते. स्त्री आणि पुरुष यांच्या देहाकडे पाहण्याच्या दृष्टीची ज्ञानेश्वरांनी रुजवात घातली आणि एकनाथ-तुकोबांनी देह, देहनिष्ठतेतून निर्माण होणारी प्रेरक शक्ती उठावदार केली. लैंगिक प्रेरणा शारीरिक असली, तरी तिचे जेव्हा गरजू असण्यात रूपांतर होते, तेव्हा लैंगिकता क्रियाशील होते. तिला प्रेरणा देणाऱ्या आंतरिक शक्तीचे स्वरूप प्राप्त होते, हे तुकोबांनी अनेक रचनांमधून मांडले. लैंगिकता शारीर पातळीवरच रेंगाळताना माणसाचे होणारे स्खलन तुकोबा सहानुभूतीने; पण कठोर बुद्धीने दाखवतात.

एक ब्रह्मचारी गाढवां झोंबतां।

हाणोनिया लाता पळाले ते।।

गाढवही गेले। ब्रह्मचर्य गेले।

तोंड काळे झाले जगामाजी।।

हे ना तैसे झाले।

तुका म्हणे गेले वायाचि ते।।

माणसाचे पाय मातीचे असतात याची जाणीव तुकोबांना होती; त्यामुळेच 'गाढवही गेले,' अशी दारूण अवस्था ब्रह्मचर्याच्या न पेलणाऱ्या कथित साधकासारखी होते. तुकोबा माणसाने स्वत:च स्वत:चा केलेला पराभव आणि स्वत:च स्वत:ला गवसण्याच्या आत्मविकासाचा प्रवास कमालीच्या न लैंगिक न नैतिक दृष्टीने मांडतात. असा समजूतदार पुरुष खूप दुर्मिळच आहे, आजही. महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषक संस्कृतीमध्ये असा समजदार पुरुष तुकोबांच्या रूपाने आहे, तो कदाचित आजच्या स्त्रीवादी विचारधारेतील न लैंगिक, न नैतिक धारणेचे मिथक असू शकतो. ही आजही दिलासादायक गोष्ट आहे.


Rate this content
Log in

More marathi story from Rupali Shinde

Similar marathi story from Inspirational