Rupali Shinde

Inspirational

4  

Rupali Shinde

Inspirational

स्त्रीजन्म म्हणवुनी न व्हावे उ

स्त्रीजन्म म्हणवुनी न व्हावे उ

5 mins
23.3K


स्त्रियांना याच जन्मी मुक्ती शक्य आहे, हा उदार विचार मांडणारे पुरुष महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक परंपरेत आहेत, हा आजच्या संदर्भात दिलासा देणारा भाग आहे. म्हणूनच वारकरी संप्रदायात रचना करणाऱ्या कवयित्रींची खूप मोठी परंपरा निर्माण झाली.

अवघाची संसार सुखाचा करीन।

आनंदे भरीन तिन्ही लोक।


स्वत:चे घरदार, गणगोत असलेला संसार आणि शिव-शक्तीच्या समावेशनातून उभा राहिलेला विश्वाचा संसार, असे दोन वेगळे संसार नाहीत, ही वारकरी संप्रदायाची विचारधारा आहे. त्यामुळेच प्रपंच विरुद्ध परमार्थ, स्त्री विरुद्ध पुरुष असे विरुद्ध अर्थाचे गट, समूह निर्माण झाले नाहीत. प्रपंच परमार्थाच्या विरोधात असण्याचे कारण नाही आणि परमार्थही प्रपंचाला जाचक, बाधक नाही. 'मी'पण काढून टाकल्यानंतर केलेले कर्म म्हणजे ईश्वर भक्तीचेच एक रूप आहे, एक प्रकार आहे, असा भक्तियोग प्रधान कर्मयोग ज्ञानेश्वरांनी मांडला. प्रपंचातील कोणतेही काम ईश्वराच्या, विठोबाच्या चरणी समर्पित केले, त्याची साक्ष प्रमाण मानून केले, तर अहंकार, गर्व, दंभ अथवा निराशा वाट्याला येण्याचे काहीच कारण नाही, हे वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान भक्ती आणि कर्म यांच्यातील विरोध नाहीसा करते. भक्तिप्रधान कर्मनिष्ठा ज्ञानेश्वरांनी स्पष्ट केली. पुढे नामदेवांनी या भक्तिप्रधान कर्मयोगाला सगुण भक्तीची जोड दिली. विठोबाच्या सगुण, साकार रूपाचे नामस्मरण करीत संसारातील नित्य व्यवहार करत जाणे, असे या सगुण भक्तीचे स्वरूप होते. नामस्मरणाच्या माध्यमातून मनावर विठोबाचा अंकुश तर होताच; पण तो सक्तीचा, भीतीचा नव्हता. ईश्वराच्या प्रेमळ सहवासातून प्राप्त झालेल्या सलोकता, समीपता या मुक्तीचा अनुभव देणारी सगुण भक्ती संत नामदेवांनी वारकरी संप्रदायात रुजवली. भक्तिनिष्ठ कर्मयोगाचे तत्वज्ञान आणि ईश्वराच्या सहवासाचा आनंद देणारी सगुण भक्ती आत्मसात करण्यासाठी जात-धर्माची, स्त्री-पुरुष असण्याची पूर्व अट वारकरी संप्रदायाने ठेवलीच नाही. या संप्रदायाने समाजनिर्मित, जात, धर्म, स्त्री, पुरुष हे भेदभाव भक्तिनिष्ठ कर्मयोगाच्या आणि नामस्मरणाच्या योगाने बाजूला ठेवले. वारकरी संप्रदायाने मांडलेला भक्तिनिष्ठ कर्मयोग आणि सगुण भक्तीचा प्रसार समाज, कुटुंब, स्त्री, पुरुष, जात, धर्म अशा सर्व स्तरांवर झाला. त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये संत कवयित्रींची संख्या सर्वाधिक दिसते. बाराव्या शतकाच्या अखेरच्या काळातील मुक्ताबाई ते सतराव्या शतकातील बहिणाबाई शिऊरकर अशी एक दीर्घ, सातत्याने अनुभव व्यक्त करणारी संत कवयित्रींची परंपरा आपल्याला दिसते.


हे केवळ वारकरी संप्रदायामध्ये का घडले? आधीच्या आणि तत्कालीन संप्रदायांमध्ये अशी परंपरा निर्माण झाल्याचे दिसत नाही. स्त्रियांना संन्यास घेऊन मठात दीक्षा देणाऱ्या महानुभाव संप्रदायातही स्त्री कवयित्री अपवादापुरतीच दिसते. याचा विचार आज अगदी एकविसाव्या शतकातही करायला हवा. स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ शोधण्याची महाराष्ट्राची परंपरा कोणती आहे? या मूल्याचा शोध पुरुष कशा पद्धतीने घेत होते? स्त्री स्वातंत्र्याचा शोध घेताना सगळेच पुरुष केवळ विरोधक होते का? स्त्री स्वातंत्र्याचा विचार आणि ईश्वराचे स्वरूप जाणून घेण्याचा स्त्रीचा अधिकार यांचा विचार भक्तिसंप्रदायाच्या संस्थापक संत, सत्पुरुषांनी कसा केला, याचा विचार करायला हवा. स्त्री स्वातंत्र्याच्या वाटचालीतील पुरुषांचा सहभाग, त्यांचा स्त्री देहाकडे, स्त्री जन्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यातून निदान महाराष्ट्राची, मराठी भाषकांनी रचलेली, स्त्री-पुरुष सहभाग असलेली स्त्री स्वातंत्र्याची परंपरा स्पष्ट होते. स्त्रीला स्वातंत्र्य आणि साधनरूप देणाऱ्या आजच्या जमान्यात ही परंपरा जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.


महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामींची शिष्या बाईसा हिच्या मुक्तीसंबंधीचे विचार, स्वामींनी स्वत:च मांडलेले आहेत. बाईसा ही स्वामींची निस्सीम भक्त. स्वामींच्या निर्याणाची अफवा ऐकून बाईसेने नदीत देहत्याग केला. तिला आत्महत्येचे पातक लागणार नाही; कारण ईश्वरवियोगाच्या दु:खामुळे तिने तसे केले, असे चक्रधरस्वामी म्हणतात; परंतु त्याचवेळी ते स्त्रीदेह पर्यायाने स्त्री जन्म 'भक्तगुणांचा रावो' असल्यामुळे स्त्रीजन्मात बाईसेला मुक्ती नाही. मुक्ती मिळविण्यासाठी बाईसेने 'सुखिया श्रीमंताच्या घरी पुरुष जन्म' घेणे आवश्यक आहे. मग तिला मुक्ती शक्य आहे, असेही सांगतात. यावर अधिक काही बोलण्याची आजही गरज नाही. स्त्री देह असणे हा मुक्तीच्या मार्गावरील सर्वांत मोठा अडथळा आहे. स्त्री-पुरुष हा नैसर्गिक भेद समाजजीवनामध्ये, धर्मसंस्थेच्या अंतर्गत निषिद्धतेचे प्रतीक होतो. समाजजीवनात त्यासाठी लागणारी कारणे, युक्तीवाद आकार घेतात. स्त्री स्वातंत्र्याच्या निमित्ताने होणारे विचारांचे अभिसरण समाज, संस्कृतीमध्ये कसे होते, हे बाईसेच्या निमित्ताने समजते.


समाज व्यवहारात, समाजाने निर्माण केलेल्या, रचलेल्या सामाजिक संस्थांमध्ये स्त्री स्वातंत्र्य या मूल्यावरील वाद-प्रतिवाद कसे होतात, हे समर्थ रामदासांच्या उक्तीमधूनही स्पष्ट होते. समर्थ संप्रदायातील वेणाबाई या संत कवयित्री म्हणून आपल्याला माहीत आहेत; पण काव्यरचना करणाऱ्या कवयित्रींची फार मोठी परंपरा या संप्रदायात निर्माण झाली नाही. स्त्री जन्मामध्ये मुक्ती नाही आणि स्त्री कारणे पुरुषाच्या हातून होणारे अक्षम्य अपराध, असा स्त्री असण्याचा अर्थ केवळ शारीर पातळीवरच, देहनिष्ठ विचार ही मराठी भाषक समाजाची परंपरा आहे.


या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायाने रचलेली स्त्री स्वातंत्र्याचा विचार करणारी स्वतंत्र परंपराही लक्षात घ्यायला हवी. ज्ञानेश्वरांनी मांडलेले जीवनमुक्ती संदर्भातील विचार आणि स्त्री स्वातंत्र्य यांचा एकत्र विचार केला पाहिजे. ज्ञानेश्वर हे स्त्री आणि पुरुष यांच्या आंतरिक क्षमतेचा, आत्मस्वातंत्र्यात्मक विचार करतात. स्त्री आणि पुरुष असा देहनिष्ठ भेदभाव ज्ञानेश्वरांनी केलेला नाही, म्हणूनच स्त्री जन्म हा भक्तिज्ञानातील अडथळा होऊ शकत नाही. स्त्री असणे आणि मुक्तीचा अनुभव घेणे यांचा परस्परसंबंध नाही, हे ज्ञानेश्वर वेगळ्या पद्धतीने सांगतात. ज्ञानेश्वरांचे विचार संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी स्पष्ट केले आहेत. 'ज्ञानदेव विदेहमुक्तीच्या कल्पना नाकारतात. जिवंतपणीच आपण कोण आहोत, याचे चिंतन करून ते समजून घ्यावे. त्यामुळे याच जन्मात मोक्षप्राप्ती होईल. तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे 'याची देही याची डोळा। भोगीन मुक्तीचा सोहळा।' देह असल्यानसल्यने काही फरक पडत नाही. 'म्हणोनि देह असो अथवा जावो। आम्ही केवळ वस्तूचि आहो।' ही ज्ञानेश्वरांची ग्वाही आहे.' ज्ञानेश्वर आणि तुकोबांनी मांडलेला जीवनमुक्तीचा, आत्मस्वातंत्र्याबाबतचा विचार हा स्त्री-पुरुष या दोघांसाठी एकच, एकसारखा आहे. स्त्रीदेह असणे ही ईश्वराचे स्वरूप जाणून घेण्यामध्ये न सुटणारी अडचण आहे, या विचाराचे बरोबर दुसरे टोक म्हणजे विदेहमुक्ती. येथे देहापेक्षा आत्मा श्रेष्ठ. म्हणजे धारण केलेल्या देहाला नाकारणे. ज्ञानेश्वर या दोन्ही बाजूंनी केलेला अतिरेकी विचार टाळतात.


जववरी देह आहे तववरी साधन।

करुनिया ज्ञान सिद्ध करा।


असे ज्ञानेश्वर म्हणतात. ज्ञान घेण्याचे साधन, माध्यम म्हणून देहाचे महत्त्व ज्ञानेश्वर मान्य करतात. तेथे ते स्त्री-पुरुष असा भेदभाव करत नाहीत. स्त्रियांना याच जन्मी मुक्ती शक्य आहे, हा उदार विचार मांडणारे पुरुष महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक परंपरेत आहेत, हा आजच्या संदर्भात दिलासा देणारा भाग आहे. म्हणूनच वारकरी संप्रदायात रचना करणाऱ्या कवयित्रींची खूप मोठी परंपरा निर्माण झाली. आपल्या परंपरेत स्त्री तमोगुणांचा समुच्चय आहे, अशी एक विचारधारा आहे. स्त्रीच्या कारणे होणारे अनर्थ सांगणारीही एक परंपरा आहे. तसेच


स्त्रीजन्म म्हणवुनी न व्हावे उदास।

साधुसंती ऐसे मज केले।


असे आत्मविश्वासाने सांगणारी जनाबाईंची परंपराही आहे. आपण कोणत्या परंपरेला आपले मानतो, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational