Rupali Shinde

Inspirational

4  

Rupali Shinde

Inspirational

भेटवा भेटवा मज श्रीरंग

भेटवा भेटवा मज श्रीरंग

5 mins
23.1K


स्त्री-पुरुष असण्याच्या शारीर पातळीवरील मर्यादा असतात; पण जाणिवांच्या मर्यादा ओलांडण्याची अमोघ शक्ती मनुष्य प्राण्यापाशीच असते. वारकरी संप्रदायातील संतांनी जाणिवेच्या स्तरावर स्त्रीत्व जाणून घेतले. स्त्रीत्वातील शरीरापलीकडील आंतरिक भाव सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी, समर्पणातील असीम शांतता अनुभवण्यासाठी विराण्या रचल्या.


विठोबाच्या भक्तांना देव हा आपल्यासारखाच एक माणूस आहे, याची जाणीव सगुणभक्तीतून झाली. त्याचे सतत नामस्मरण करत राहिल्यामुळे विठोबा त्याच्या भक्तांच्या जगण्याचा श्वास आणि ध्यास झाला. विठोबाला भेटण्यासाठी, त्याच्याशी बोलण्यासाठी, पाहण्यासाठी, त्याला आपल्यामध्ये मुरवून टाकण्यासाठी, त्याचे रूप आत्मसात करण्यासाठी संत भक्तांनी अभंग रचले. विठोबाला समजून घेण्याचा, त्याचा सहवास मिळविण्याचा अभंग हा एक संवाद होता. विठोबाला आत्मसात करताना माता-माऊली, सखा, बंधू, पिता म्हणून त्याच्याबरोबर सलगी करत संवाद साधणारे अभंग वारकरी संप्रदायातील संतांनी रचले. या संवादात देवाचे देवत्व, कोप होण्याची भीती आणि कृपा करण्याचा, प्रसन्न होण्याचा मोह यांना मूठमाती देऊन निरपेक्ष प्रेमाचे मानवी नाते निर्माण करण्याचा प्रयत्न ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकोबांनी केला. मुक्ताई, जनाई, बहिणाबाई आदी स्त्रियांनी भक्तीला प्रेमनिष्ठेचे, भावबळाचे रूप दिले. त्यामुळे देवाचे देवत्व संपले आणि देवाचे माणूस असणे सिद्ध झाले.

देवाला देवपणाशिवाय मनुष्यरूपात पाहणाऱ्या संतांनी स्वत:ला त्याची प्रेयसी, पत्नी मानले आणि विठोबा आपला पती, प्रियकर आहे अशा नव्या नात्याने संवाद साधला. प्रेयसीच्या भूमिकेत जाऊन प्रियकर ईश्वराशी, विठोबाशी सख्य जोडणाऱ्या अभंग रचनांपैकी एक रचना म्हणजे संतांच्या विराण्या. विराणी म्हणजे विरहगीत. भक्त-प्रेयसीने प्रियकर-ईश्वराचा विरह, वियोग साहताना होणारी वेदना आणि विरहानंतरच्या मीलनाचा आनंद व्यक्त करणारी रचना म्हणजे विरहिणी किंवा विराणी. ज्ञानोबा-तुकोबांनी, नामदेव-एकनाथांनी स्वत:ला विरहिणीच्या - स्त्री रूपात स्वत:ला का घातले असावे? विरही स्त्री होऊन देवाचे सख्यत्व आपण अनुभवले पाहिजे, असे या पुरुष भक्त रचनाकारांना का वाटले असेल? असा प्रश्न मनात येतो.

'पैल तो गे काऊ कोकताहे', 'घनु वाजे घुणगुणा', 'रात्र काळी घागर काळी' या संतांच्या विराण्या भावगीतरूपामुळे आपल्याला आजही आठवतात. एका विरहिणीत वनवासी श्रीकृष्णाने अचानक आलिंगन दिले असता मनाची झालेली अवस्था 'बोलेना बोलो देईना' अशी झाली, हे ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे. ईश्वररूप प्रियकराच्या विरहामुळे व्याकुळ झालेल्या भक्त प्रेयसीचा विरहदाह शमविण्यासाठी फुलांची शेज घालणे, शीतल चंदनाचा लेप लावण्याचे उपाय योजिले जातात; पण होते उलटेच. चंदनामुळे सर्वांग पोळते. सुमनांची शेज अग्नीसारखी दाहक वाटते; कारण मनातील विरहभाव प्रबळ, प्रभावी आहे.

रागावलेल्या, रुसलेल्या प्रियकर ईश्वराला नामदेव प्रश्न विचारतात,


आम्हावरी कारे धरियेला राग।

काय तुझे सांग आम्ही केले।।


या प्रश्नामध्ये प्रेमाचा अधिकार तर जाणवतोच; पण रागावलेल्या प्रियकराने मनातील राग विसरून आमची विरहव्यथा जाणून घ्यावी. आपल्या भक्त प्रेयसीला शांत करावे; कारण तिचे मन विरहाने तप्त झाले आहे.


कामाग्नीने आम्ही जळतो सकळ।

करावे शीतळ अधरामृते।।


एकनाथांनी विरहिणीचे मनोगत मांडले आहे,


युगायुगीं पीडिली विरहिणी।

नाठवी ध्यानीमनी चक्रपाणी।

म्हणोनी वियोगाची जाचणी।


या विरहिणीची विरह बाधा युगानुयुगाची आहे. तिच्या या मनबाधेला उतार पडण्यासाठी संतसंगाची भेट होणे हा उपाय लागू पडतो. दुसऱ्या एका विरहिणीमध्ये विरही प्रेयसी,


वेधला जीव माझा भेटवा श्रीरंग।

सर्व सांडियेला मोह ममता संग।

जीवी जिवलग झाला अनंग।

भेटवा भेटवा मज श्रीरंग।


असा श्रीहरी भेटीसाठी धावा करणारी नाथांची विरहिणी उत्सुकता, आर्तता, अनिवार ओढ, समर्पणाची आस हे सगळे भाव व्यक्त करते. नाथांनी विरहातील भावसौंदर्य जाणून घेण्यासाठी स्वत:ला विरही भक्त स्त्रीच्या रूपात पाहिले आहे, वेधले आहे. विरहिणी, गौळणींची रचना करणारे एकनाथ, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील ऋजुता, रसिकता, भाव आस्वादकता हे सारेच गुण मोठ्या नजाकतीने व्यक्त करतात. ज्ञानेश्वरांच्या विराण्या संयत, अभिरुचीसंपन्न, रस आस्वादक, सौंदर्योत्सव मांडतात. शृंगारातील संयम आणि संवेदनशील बाव जोपासणारे मार्दव आणि माधुर्य त्यांच्या विराण्यांमध्ये आहे. हे सारे गुण व्यक्त करण्यासाठी, त्यातील समरसता आणि उत्कटता यांचा स्वत:लाच पुन:प्रत्यय, पुन्हा एकदा अनुभव घेण्यासाठी ज्ञानेश्वर विराण्यांची रचना करतात. या रचनांचे मूळ अमृतानुभवातील 'प्रियुच प्राणेश्वरी'पाशी आहे, हे विसरून चालणार नाही. वारकरी संप्रदायातील सर्व संत विरहाने व्याकुळ होऊन, भावनेच्या भरात विठोबाच्या हळव्या, भाववेड्या प्रेमापोटी विरही स्त्री झाले, असे म्हणता येत नाही.


स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचे विसर्जन करून स्त्री मनाशी एकरूप होणारे संत, स्त्री-पुरुष समानता मानत होते. म्हणूनच शृंगारातील पुरुषाचे आक्रमक, सत्ताधीश रूप त्यांनी नाकारले आणि स्त्रीच्या समर्पणाच्या इच्छेशी, प्रेरणेशी हे पुरुष एकरूप झाले. स्त्री-पुरुष असण्याच्या शारीर पातळीवरील मर्यादा असतात; पण जाणिवांच्या मर्यादा ओलांडण्याची अमोघ शक्ती मनुष्य प्राण्यापाशीच असते. वारकरी संप्रदायातील संतांनी जाणिवेच्या स्तरावर स्त्रीत्व जाणून घेतले. स्त्रीत्वातील शरीरापलीकडील आंतरिक भाव सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी, समर्पणातील असीम शांतता अनुभवण्यासाठी विराण्या रचल्या.


या विराण्यांना मधुरा भक्तीच्या रूपात पाहिले, तर त्यातून केवळ ईश्वर हाच एक 'पुरुष' आहे. बाकीचे सर्व जीव प्रकृती आहेत. प्रकृतीने पुरुषाशी तादात्म्य (एकरूप) पावून आनंदाचा भोग घेणे, असा 'भोगप्रधान' या शब्दाचा मर्यादित अर्थ व्यक्त होईल. मधुराभक्तीमध्ये विरहिणी आणि प्रियकर यांच्या असमानतेवर आधारित भोग्य-भोक्ता असे नाते ईश्वर आणि भक्तांमध्ये निर्माण होते. हे उपभोगप्रधान माधुर्य अनिर्बंध कामप्रेरणेकडे घेऊन जाते. मराठी संतांनी लिहिलेल्या विराण्यांमध्ये शृंगार लालसेतून पुन्हा भक्ती लालसाच निर्माण होते. शृंगाराचे विसर्जन न संपणाऱ्या आसक्तीमध्ये होत नाही. संतांच्या विराण्यांमधून समतेवर आधारीत समर्पणशीलता आणि समर्पित होण्यातून शरीर, मन, चित्ताला लाभणारी निवांत विश्रांतीच व्यक्त होते. हे सारे समजण्यासाठी वारकरी संप्रदायातील संतश्रेष्ठ गोरोबांच्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग जनाबाईने वर्णन केला आहे. तो अतिशय मार्मिक अभंग असा आहे,


दोन्हीकडे दोही जाया। मध्ये गोरोबाची शय्या।

गोरा निद्रिस्त असता। कपट करिती त्यांच्या कांता।

गोरोबाचे दोन्ही हात। आपुल्या हृदयावर ठेवित।

जागा झाला गोरा भक्त। जनी म्हणे त्या निद्रित।


या अभंगात जनाबाईने गोरोबांच्या दोन्ही निद्रित सहचारणींच्या निद्रेचा, झोपी जाण्याचा अर्थ कसा लावायचा, हे कोडे आपल्यासमोर टाकले आहे. येथे गोरोबांच्या सहचारिणींच्या मनात स्पर्श सुखाची ओढ जागी झाली आहे. गोरोबा मात्र झोपले आहेत. ते या साऱ्या बाबतीत अनभिज्ञ आहेत. जाणते नाहीत. त्या दोघींच्या मनातील ओढाळ स्पर्शाला भक्ताच्या शांत, विश्रांत मनाने जगणाऱ्या शरीराने अजाणता (झोपेत असल्याने) दिलेला जिवंत प्रतिसाद मात्र त्यांचे मन शांतविणारा आहे. त्यांना विश्रांती देणारा आहे.

गोरोबांच्या आयुष्यात घडलेला आणि जनाईने सांगितलेला हा प्रसंग आपल्याला थेट शिव-शक्तीच्या समावेशनाची आठवण करून देतो. ज्ञानेश्वरांनी,


जिये प्राणेश्वरीवीण। सीवीहि सिवपण।

थारो न शके ते आपण। सिवे घडली।


असे अमृतानुभवात सांगितले आहे. शिव-शक्ती हे एकमेकांमध्ये मिसळलेले दिसतात. ते एकमेकांवर अवलंबून राहणारे आहेत. शिव आणि शक्तीमधील 'स्व' हा मी आणि दुसरा अन्य असणे, अशी दुभंगलेली, दोन स्वतंत्र भागांमध्ये विभागलेली आणि म्हणूनच एकमेकांकडे संशयाने पाहणारी दृष्टी नाही. शिव-शक्तीचा त्यांच्या तन्मय, एकरूप जाणीवेचा चैतन्यमय आविष्कार म्हणजे हे सर्व विश्व. हे विश्व म्हणजे आपणच आहोत, असे भान हळूहळू विकास पावतो. संतांच्या विराण्या या स्त्री आणि पुरुष यांच्या देहनिष्ठ मर्यादांचे जाणीवपूर्वक केलेले उल्लंघन आहे. देहनिष्ठेकडून आत्मनिष्ठेकडे आणि आत्मनिष्ठेकडून आत्ममुक्तीचा सदेह अनुभव व्यक्त करणाऱ्या या सुंदर कविता आहेत.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational