Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Rupali Shinde

Inspirational

4  

Rupali Shinde

Inspirational

गोणाई राजाई सासू सुना

गोणाई राजाई सासू सुना

4 mins
23.3K


नामदेवांची आई गोणाई आणि पत्नी राजाई यांचे संवाद नामदेवांच्याच अभंगात येतात. त्यातून या दोघींना जाणून घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे फार वेगळे आहे. आपल्या मुलाचे, पतीने असामान्यत्व उशिरा समजलेल्या आणि तोपर्यंत त्याने रूढार्थातील कर्ता पुरुष असावे म्हणून झगडणाऱ्या या स्त्रिया आहेत. ते अभंग वाचताना या दोघी आपल्या वाटायला लागतात.


नामदेवांच्या कुटुंबीयांची नाव आणि नात्यासहीत माहिती जनाईने दिलेली आहे. 'गोणाई राजाई दोघी सासू सुना। दामा नामा जाण बापलेक।' असे म्हणून पुढे चार मुले आणि सुनांची माहिती येते. नामदेवांचे संपूर्ण कुटुंब विठ्ठलभक्तीमध्ये गुंतले होते; पण ती फार पुढची गोष्ट. विठ्ठलाची भक्ती करणे हेच नामदेवांच्या जीवीचे जिवीत. भक्तीमध्ये रमणे, भक्तीमधून आनंदाचा अनुभव घेणे हा जणू त्यांचा स्वभावधर्मच होता. व्यवसाय सोडून, उपजीविकेचे साधन सोडून सगळे लक्ष विठोबाच्या चरणी एकाग्र करणाऱ्या नामदेवांचे, त्यांच्या कुटुंबात स्वागत होण्याचे काहीच कारण नव्हते. उलट भक्तिरसात रमलेल्या आपल्या लेकावर आणि पतीवर टीकेचा सडकून भडीमारच झालेला दिसतो.

नामदेवांच्या अभंगातील त्यांची 'आई गोणाई आणि नामदेव' तसेच 'पत्नी राजाई आणि नामदेव' यांच्यातील संवाद अनेक प्रश्न व आव्हाने निर्माण करणारा आहे. संसाराकडे दुर्लक्ष होते म्हणून कुटुंबातील रांधून जेवू घालणाऱ्या आणि उद्यासाठी चार गोष्टी मागे राखून ठेवणाऱ्या गृहकृत्यदक्ष बायकांची तक्रार, असा मर्यादित अर्थ या संवादामध्ये नाही. भक्त, संघटक आणि अभंगरचनाकार, भावार्थपरायण नामदेवांकडे लक्ष जाणे, त्यांना महत्त्व प्राप्त होणे स्वाभाविक आहे; पण मला नामदेव-गोणाई, नामदेव-राजाई यांच्या संवादातील त्या दोघीजणी खूप जवळच्या, आपल्या वाटतात. त्या दोघीजणी असामान्य व्यक्ती भोवतीच्या सामान्य माणसाच्या इच्छा-अपेक्षांचे प्रतिनिधित्व करतात. त्या चारचौघींसारख्या, साध्या आणि सरळ, मुख्य म्हणजे चुकतमाकत शिकणाऱ्या, म्हणून त्या मला आपल्या वाटतात. नामदेवांचे असामान्यत्व उशिरा लक्षात आलेल्या, म्हणूनच त्यांच्याविषयी उठसूट तक्रारीचा सूर लावणाऱ्या त्या मला आजही घरोघर भेटतात, दिसतात. म्हणून मला नामदेवांच्या अभंगातील त्या दोघींच्या (आई, बायको) अंतरंगात, मनात डोकावून बघावेसे वाटते.

घरात गरिबी आणि त्यात नामदेवांचे भक्तिवेड यांमुळे त्यांची आई, बायको वैतागलेल्या. त्यांचे भक्तिवेड कमी कसे होईल आणि ते घरात लक्ष कसे घालतील, यासाठी या दोन्ही बायका सतत जिवाचा आटापिटा करतात.


गोणाई म्हणे नाम्या राहिलासी उदरी।

तैहुनि मी करी आस तुझी।।


आईच्या मुलाकडून असलेल्या अपेक्षा तरी किती असाव्यात,


सात्रंदिवस लेखी अंघोळीवरी।

तूं मज संसारी होसी म्हणोनि।।


आपला मुलगा मोठा होऊन संसाराला हातभार लागेल, अशा इच्छेने मुलाला वाढविणारी गोणाई; पण तिचा अपेक्षाभंग होतो. हाती टाळ घेऊन विठोबाची आळवणी करणारा आणि


सांडोनि घरदार आपुला संसार।

नाचता विचार न धरिसी।।


असे ती म्हणते. अशी नामदेवाची आई आहे.


मी एक आहे तव करीन तळमळ।

मग तुझा सांभाळ करील कोण।।


सुरुवातीला काळजी करणारी ही आई मुलाला समजावून सांगते. त्याचे उत्तर मात्र ठरलेले,

'नामा म्हणजे गोणाबाई। सर्व सुख याचे पायी।'


मला नामदेव आणि गोणाई-राजाई या दोन स्त्रियांच्या संवादात अधिक रस वाटतो. ज्याला घरामध्ये, कुटुंबात 'आनंदाचे जिव्हार' सापडले आहे, असा माणूस म्हणजे नामदेव. मीठमिरचीच्या, कपड्यालत्यांच्या आणि भाजीभाकरीच्या विवंचनेपेक्षा काहीतरी मोठा अर्थ सापडलेला आहे, असा माणूस म्हणजे नामदेव. जगताना भक्तिवेड जपणाऱ्या माणसाची चराचराशी चाललेली सलगी, तुकोबांच्या भाषेत खेळीमेळी आणि आरती प्रभूंच्या भाषेत 'टाकूनिया घरदार नाचणार नाचणार', अशी भाववृत्ती, ही त्याच्या भोवतीच्या भौतिक सुखाच्या, संसारातल्या आनंदातच जगण्याचा अर्थ शोधणाऱ्या माणसांना कशी कळणार?


बुडविली क्रिया बुडविले कर्म।

बुडविला धर्म पाहा येणे।।

तुझिया नामाचे लागलेसे पिसे।

असोनि न दिसे लोकाचारी।।


ही गोणाईची तक्रार थोडी सौम्यच आहे. राजाईचे, त्यांच्या पत्नीचे शब्द जरा जास्त झणझणीत आहेत.


लावोनि लंगोटी जालेती गोसावी।

आमुची उठाठेवी कोणी करी।।


असा प्रश्न विचारून करवादलेल्या राजाईने केलेली तक्रार आहे,


काय खावे आता असो कोणेपरी।

लाविले दारोदारी विठ्ठलाने।।

उपवास सोसू आता दिस किती।

घालू या पोरास काय आता।।


इकडे नामदेवांच्या वडिलांच्या, म्हणजे दामाशेटीच्या अपेक्षा या अगदी वडिलांच्या असाव्यात तशाच आहेत, 'कुटुंब चालवणे तुज। वृद्धपण आले मज।'


घरातील समस्त मोठ्या माणसांना संसार नेटका करणारा, प्रत्येकाचे क्षेमकुशल विचारणारा, पोटापाण्याचा धंदा नीटनेटका करून दोन वेळच्या अन्नाची चिंता मिटविणारा, बायको-पोरांची हौस मौज करणारा असा कर्ता पुरुष म्हणून नामदेव हवा आहे. सर्वांचे खर्चाचे हवे नको ते बघणारा आणि घराबाहेरील जगात भौतिक स्तरावरील जगण्यात यशस्वी झालेला, रमलेला धडधाकट, दणकट असा पुरुष हवा आहे.


नामदेवांचे भक्तिवेड या चौकटीत बसूच शकत नाही. त्यांनी असे पुरवठादार असण्याला, रूढार्थाने कर्ता पुरुष असण्याला कधीच निरोप दिला आहे. त्यांनी आपल्या मनातच आनंदाचे झाड लावले आहे. हे सगळे हा व्यवहार जगणाऱ्या आणि जपणाऱ्या साध्या बायकांना, तसेच दामाशेटीलाही कसे कळावे! म्हणून मला राजाई-नामदेव तसेच गोणाई-नामदेव यांचा संवाद म्हणजे वेगवेगळ्या अपेक्षा, इच्छांचा शोध दुसऱ्याच्या मनात घेणाऱ्या माणसांचा संवाद वाटतो. भाववेड्या नामदेवांचे मन त्यांच्या बायकोला कळत नाही आणि 'चाळविले उदास बाळ माझे' असे म्हणणाऱ्या गोणाईलाही कळत नाही. मुळात या दोघींचा संवाद हा नात्यांमधील अपेक्षांचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सत्तेचा, हक्काचा आहे. या दोघीजणी नामदेवांना कर्तेपणाकडे, वेगळ्या प्रकारे अहंतेकडे आणि सत्ताकांक्षेकडे, सत्ता गाजविण्याकडे खेचायला बघतात. हो, स्त्रियादेखील सत्ता आणि हक्क गाजविण्याच्या बाबतीत जागरूक असतात. त्या काही दरवेळी पुरुषसत्तेच्या बळी वगैरे नसतात. त्यादेखील पुरुष होऊन सत्ता गाजवितात. मला राजाई, गोणाई या पुरुषसत्तेची जाणीव असलेल्या, सत्तेने नामदेवांवर हक्क गाजविणाऱ्या आणि त्यांच्या आनंदाच्या जिव्हारापर्यंत पोहोचण्याची ताकद नसलेल्या; परंतु सत्ताकांक्षिणी स्त्रिया वाटतात. त्याच्या नजरेतून तिच्याकडे पाहिले, तर तिचे हे वेगळे रूपही दिसते.


माझा नामा मज देई। जीव देईन तुझे पायी।।


हे म्हणणाऱ्या गोणाईला तो विठोबा आपल्या नामदेवाला सहजपणे आणि तो त्याचा हृदयनाथ असल्यामुळे विश्वासाने देऊन टाकतो.


विठ्ठल म्हणे गोणाई। आपुला नामा घेऊन जाई।।

हात धरोनिया गेली। गोणाई तेव्हा आनंदली।।


याला काय म्हणावे? सांप्रदायिकतेच्या पलीकडे जाऊन तिच्या आणि त्याच्या नात्यातले मानवी पदर आपण शोधायला हवेत.

राजाई आणि गोणाईला नामदेवांची सगुणभक्ती, भावभक्ती ही चराचरातील चैतन्याशी संवाद साधणारी आणि आनंददायक आहे, हे उशिरा का होईना समजले. त्या नामदेवांच्या मनात संसाराची आसक्ती जागावी म्हणून विठोबाशी भांडल्या. रुक्मिणीच्या हाती विठोबाला निरोप दिला, की बिघडलेला नवरा आणि पोराला आता नादाला लावू नकोस. त्यांचा 'नामदेव' त्यांना हवा होता आणि नामदेव तर विठोबाशी एकरूप झाला होता.


Rate this content
Log in

More marathi story from Rupali Shinde

Similar marathi story from Inspirational