मागे धांवे हृषीकेशी।
मागे धांवे हृषीकेशी।
संतसाहित्यातील तिच्या रचनांचा लोकव्यवहारात झालेला प्रसार, तिने तिच्या अनुभवांतून रंगविलेले त्याचे चित्र, हे कष्टकरी बाईचे भावविश्व आहे. असा सहृदय, सहानुभावी सहचर तिला आज मिळाला आहे का, हाच खरा प्रश्न आहे.
निर्मिती, आस्वाद आणि प्रसार हे साहित्य व्यवहाराचे तीन महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. मराठी संतसाहित्य आणि लोकसाहित्य यांचे नाते साहित्य निर्मिती व तिचा समाजजीवनात झालेला स्वीकार, प्रसार या दृष्टीने महत्त्वाचा आहे. विठोबाशी एकरूप झालेल्या जनीने तिच्या मनाला, वाचेला आणि जगण्याला लागलेला विठ्ठलाचा छंद अनेक परींनी व्यक्त केलेला आहे. त्याचा प्रसार आणि विस्तार स्त्रियांनी रचलेल्या लोकगीतांमधून झालेला दिसतो. लोकगीते रचणाऱ्या स्त्रिया खेड्यापाड्यात राहणाऱ्या, रूढार्थाने शिक्षित नसलेल्या, बहुजन समाजातील, कष्टकरी आहेत. लोकगीतांमधून या स्त्रियांनी व्यक्त केलेल्या भावभावना त्यांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेल्या आहेत. लिहिणे-वाचणे ठाऊक नसलेल्या कितीतरी अनाम स्त्रियांना समजलेले विठोबा-जनाबाईचे नाते, हा आपल्या समाजाचा सांस्कृतिक इतिहास समाजावून घेण्याचा एक महत्त्वाचा धागा आहे; कारण जनाबाईच्या जगण्याला आत्मसन्मानाचे, स्वातंत्र्याचे, बंडखोरीचे, समतेचे अधिष्ठान (आधारभूमी) होण्याचे काम विठोबाने केले. म्हणून जनाबाईच्या - 'तिच्या' मनातील 'त्याचे' - विठोबाचे स्थान सखा, सहचर, आत्मभाव जाणत्या सख्याचे, सांगातीचे आहे. तिच्या दळणकांडणात मदत करणारा, रानात शेण गोळा करण्यास मदत करणारा 'तो' तिचा सहचर आहे. तिच्या कष्टाचे भार 'तो' हलके करतो. त्याचे उल्लेख जनाबाई अपार कौतुकाने, कृतज्ञतेने करते.
जनी जाय पाणीयासी। मागे धांवे हृषीकेशी।
पाय भिजो नेदी हात। माथा घागरी वाहात।।
हे भक्त आणि ईश्वर यांचे नाते आहेच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ते 'तिचे' आणि 'त्याचे' सहजीवनाचे, सहृदयभाव जपणारे सहचरांचे नाते आहे.
हजारो वर्षांपासून स्त्रीने मनात जपलेल्या आणि प्रत्यक्षात, लौकिक जीवनात तिला अभावानेच मिळणाऱ्या सहचराचे प्रतिबिंब लोकगीतांमध्ये दिसते. कष्टकरी, अडाणी बायकांच्या मनातील, भावविश्वातील त्याचे - पुरुषाचे - म्हणजेच विठोबाचे रूप लोकगीतांमध्ये आढळते. स्त्री-पुरुष यांच्या सहजीवनात त्याचे असणे, किंबहुना तो कसा असावा या संदर्भातील तिच्या इच्छा-अपेक्षांचे रूप लोकगीतांमधून समजते. जनाबाईने अनुभवलेले विठोबाचे रूप भक्त-सुहृदाचे, मैत्रभावाचे आहे. त्याचे लौकिक व्यवहारातील विस्तारीत रूप म्हणजे स्त्रियांच्या लोकगीतातील जनी-विठोबाचे नाते आहे.
लोकगीतांमध्ये जनीचा, तिचा ध्यास लागलेला पांडुरंग आपल्याला दिसतो.
इटेवरी उभा काळ्या घोंगडीचा। येद लागला जनीचा।।
तिच्या ध्यासाने वेडा झालेला तो, तिच्यासाठी किती उदार राणा होतो, याचे बोलके रूप म्हणजे ही ओवी,
पंढरीरायाची जनाबाई बहीन।
देली अळंदी लेहून। दिवाळीच्या चोळीसाठी।।
दिवाळीच्या सणाला पोरक्या जनाबाईला नवे कपडे मिळावेत याची काळजी तो घेतोच; पण तिची अगदी छोटी इच्छा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तो अख्खी आळंदीच लिहून देतो. हा जरा अतिरेकच नाही का? पुढच्या एका ओवीमध्ये स्वत: पांडुरंगच जनाबाईसाठी शिंपी होतो.
पंढर हे गं पूर। माझे माहेर साजनी।
पांडुरंग शिवी चोळी। नामदेवाची गं जनी।।
या ओव्यांमध्ये तिच्या छोट्या अपेक्षांची जाणीव असलेला, त्या छोट्या अपेक्षा तत्परतेने पूर्ण करणारा 'तो' जनाबाईचा हृदयसखा आहे. भक्ताचे, तिचे वेड लागलेला 'तो', तिला जे जे आवडते, ते सारे सारे पूर्ण करण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार झालेला 'तो', जनाबाई-विठोबा यांच्यावर स्त्रियांनी रचलेल्या ओव्यांमध्ये दिसतो. त्याचे असणे म्हणजे तिच्या मनातील इच्छा-अपेक्षांचे, तिच्या भावविश्वातले आणि तिला जाणविणाऱ्या त्याच्या अभाव रूपाचे चित्र आहे.
जनाबाईने कथन केलेले तिचे आणि विठोबाचे नाते देव-भक्ताचे आहे.
नामयाचे घरी। असे दासी जनी।
तिने चक्रपाणि। वश केला।।
करिता कामधंदा। ध्यानी नारायण।
करीत चिंतन। अहोरात्र।।
देखोनिया भाव। तिचा पांडुरंग।
काम करू लागेल। जनीलागी घरी।
दळू लागे हरी। तिजलागी।।
आता जनाबाईचा हा अनुभव भक्त नसलेल्या; पण कष्ट करणाऱ्या संसारातील बाईच्या मनावर कसा कोरला गेला? तिला कष्टाच्या कामात मदत करू लागणारा आणि मुळात तिचे कष्ट जाणून घेणारा, त्या श्रमामध्ये आपलाही सहभाग असावा, असे वाटणारा जाणता सहचर असावा, ही अपेक्षा त्या कष्टाळू बाईने कशी व्यक्त केली आहे, हे पाहण्यासारखे आहे.
येकलीचं जातं। दोघावनी कसं वाजतं।
पिरतीचा पांडुरंग। जनीला दळू लागतं।।
दिवसभर काम करून दमलेल्या जनीला सकाळी दळणासाठी उठावे लागते, म्हणून मग देव तिला उठवीत,
पहाटेच्या दळनाला। तांबडं फुटलं।
देव हाका मार
ितो। उठ जने उजाडलं।।
लोकगीतातील विठोबा म्हणजे 'तो' केवळ जनाबाईला जागे करून थांबत नाही. जनीचे दळण पांडुरंग निसून ठेवतो.
पहाटेचं दळन। निसून ठिवलं। निसून ठिवलं।
इठ्ठल मनीतो। उठ जना उजाडलं।।
त्याही पुढे जाऊन विठोबा दळणाची पाटी तिच्याजवळ आणून ठेवतो.
दळनाची पाटी। उचलितो अंग। सावळा पांडुरंग।
जनीला दळू लागे।।
जनीचा पांडुरंग एवढेच करून थांबत नाही. तो तिचा खराखुरा सोबती, सांगाती आहे. तो तिच्याबरोबर ओव्याही गातो.
गोपाळपुऱ्यात जनाबाईचं जातं।
देव त्यथं वव्या गातं। दळन दळू लागतं।।
घरकामांमध्ये त्याचा - पुरुषाचा सहभाग किती आणि कसा, हा आजही न सुटलेला प्रश्न. घरकाम हे अनुत्पादक काम आहे, ही जाणीव आहे स्त्रीवादी चळवळीनंतरची. घर आणि घराबाहेरचे जग ही विभागणी, श्रमविभागणी हे सारे शोध औद्योगिकीकरणानंतरचे. त्याही पूर्वी शेतीशी जोडलेल्या उत्पादनव्यवस्थेत घरातील आणि शेतातील कष्ट बाईच्या वाट्याला येत होतेच. अशा कष्टप्रद जगण्यातील ताण, शीण आणि कष्टाने त्रासलेल्या शरीर-मनाला विसावा देण्यासाठी तिने जात्यावरच्या ओव्या रचल्या. या ओव्या रचताना रोजच्या आयुष्यात न मिळालेली; पण हवीहवीशी वाटणारी साथ-सोबत तिने ओव्यांमधून रंगवली. तिच्या कामाची, कष्टाची बूज ठेवणारा, तिचे कष्ट मनोमन जाणणारा, तिच्याबरोबर बसून जाते ओढणारा, कष्ट करणारा तो तिने पांडुरंगाच्या रूपात पाहिला. याला काव्यगत न्याय असेही म्हणता येईल. प्रत्यक्षात नाही; पण रचलेल्या काव्यामध्ये, ओव्यांमध्ये कोठेतरी असा आदर्श सहचर असावा, इतकीच माफक अपेक्षा.
जनाबाईचे विठोबासाठी वेडे होणे हे ठीकच; पण देवाला जनीचे वेड लागावे, हे अजब, आक्रीतच! अगदी क्षणभर जनी दिसली नाही, तर विठोबाला करमत नाही.
इठ्ठल मनीती। नाही जना करमत।
मी जातो अंघुळीला। कर धुण्याचं निमित्त।।
बाप रे! विठोबाचे हे प्रेमप्रकरण रंगविले आहे कोणी, तर घरीदारी कष्ट करणाऱ्या आयाबायांनी. म्हणूनच त्यांच्या मनातील तो प्रियकर पुरुष पुरता व्यवहारी आणि चतुरही आहे. तो तिला तुझ्याशिवाय मला करत नाही, हे तर सांगतोच; पण 'मिलने का बहाना' कोणता याचे उत्तरही देतो. मनातील गूज सांगण्यासाठी देव जनीबरोबर चंद्रभागेला जातो आणि तिच्याशी बोलता बोलता तिचे काम करू लागे. तो केवळ तिच्या रूप-गुणाचे, कामाचे (तेसुद्धा क्वचितच) कौतुक करणारा लैला-मजनू, शिरीन फरहाद यांच्या स्तरावरचा रोमँटिक प्रियकर नाही.
व्यवहाराची जाणीव असणारा आणि लोकव्यवहाराची आब राखणारा प्रियकर तिने ओव्यांमधून रेखाटलेला आहे. म्हणून चंद्रभागेवर धुणे धुणाऱ्या जनीशी तो विठोबा गुजगोष्टी तर करतोच; पण त्याशिवाय बोलता बोलता तिचे कामही करू लागतो. आजच्या भाषेत बोलायचे, तर हा त्या दोघांमधील 'क्वालिटी टाइम.' तो पाहून साक्षात निसर्गाचे, चंद्रभागेचे समाधान होत असे.
जना धुणं धुती। इठ्ठल पुढं बसं।
चंद्रभागेला आलं हसं। त्याहीच्या प्रेमाचं।।
एरवी बोलण्याच्या नादात उशीर होईल. मग नामदेवाच्या घरी सगळे ओरडतील ही काळजी जनीने केली पाहिजे; पण तो तिचा हृदयस्थ, आर्त जाणणारा सहचर-सखा असल्यामुळे ही काळजीही तोच करतो. म्हणून तो प्रेमात बुडालेला वेडा प्रियकर नाही. तो व्यवहारी, लोकांची भीड राखणारा आदबशीर प्रियकर आहे. अर्थातच, लोकगीत रचणाऱ्या कष्टकरी अनाम स्त्रीच्या मनातला!
जना गेली धुया। पांडुरंग पिळे करी।
चल जना लवकरी। सासरवास व्हईल घरी।।
धु ण्याचे पिळे वाहून नेणाऱ्या विठोबाच्या, अर्थातच 'त्याच्या' मनात जागा झालेला जनाबाईबद्दलचा सहानुभाव तसा दुर्मिळच म्हणावा लागतो. व्यवहारात क्वचितच अनुभवास येणारा! विठोबा मनोमन विचार करतो,
इठ्ठल सखा मनी। जना माझी का सुकली।
पद्म तळ्यावरी। धुनं धुती एकली।।
असा कष्ट जाणणारा तो खचितच दुर्मिळ. अगदी आजही!
कष्टकरी बायकांनी मनोमन रंगविलेले कष्टाच्या रामरगाड्यात रेखाटलेले, हे स्त्री-पुरुषाचे समजदार नाते. मृगजळासारखे. तिला नाहू माखू घालण्याचे काम विठोबा करतो; कारण तो तिचा नित्यसोबती होता. हे सारे जनाबाईने सांगितले आहेच; पण हाडामांसाच्या, जित्याजागत्या कष्टकरी बायका त्याच्या समजूतदारपणाची परिसीमा रेखाटतात, तेव्हा त्या कल्पनाशक्तीची मदत घेतात. त्या एक अनोखे, जादुई वास्तव रेखाटतात.
जनी बसली नाह्याला। पानी नाही इसनाला।
सावळा पांडुरंग। झरे फोडी पाषानाला।।
तिच्यासाठी आकाशातील चंद्र, तारे आणण्याचे आश्वासन देणारा प्रियकर नंतर बदलतो. हा झाला नेहमीचा अनुभव; पण येथे मनोरथ आहे. मनाची श्रीमंती आहे. म्हणून तिच्यासाठी नहाणीतच थंड पाण्याचे झरे उत्पन्न करणारा 'तो', असा निदान स्वप्नसखा तरी असावा एवढेच. संत साहित्यातील तिच्या रचनांचा लोकव्यवहारात झालेला प्रसार, तिने तिच्या अनुभवांतून रंगविलेले त्याचे चित्र हे कष्टकरी बाईचे भावविश्व आहे. असा सहृदय, सहानुभावी सहचर तिला आज मिळाला आहे का, हाच खरा प्रश्न आहे.