भक्त कुटुंबाचे आर्त
भक्त कुटुंबाचे आर्त


आत्मनिष्ठ, आत्मकेंद्रित मुक्तीच्या आणि मोक्षप्राप्तीच्या मागे न लागता वारकरी संप्रदायाने कुटुंब संवाद घडवून आणला. आत्मविकास साधण्याची, खुला संवाद साधण्याची हक्काची, विश्वासाची जागा म्हणजे कुटुंब, ही जाणीव संप्रदायाने समाजात रुजविली. त्यामुळे तिच्या लेखनासाठी घर-कुटुंब हा अवकाश उपलब्ध झाला आणि घराचा अर्थ बदलला. तिचे घर आणि तिचे लेखन यांचा एकत्र विचार करायला हवा.
निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाई या भावंडांनी तेराव्या शतकाच्या अखेरीस किती तरी नव्या परंपरांची मुहूर्तमेढ रोवली. कवी कुटुंब, कुटुंब काव्य, कवी परिवार, भक्त परिवार, संत परिवार या नवीन परंपरा स्वत:पासून सुरू करणाऱ्या या भावंडांनी गुरू, भक्तमैत्र अशी आणखी एक नवीन सुरुवात केली. या परंपरेत पुढे नामदेव भक्तसुहृद म्हणून एकरूप झाले. निवृत्तीनाथ आणि त्यांच्या धाकट्या भावंडांनी कुटुंब संस्थेला आध्यात्मिक भावबंधनाचे नवे अधिष्ठान दिले आणि आप्त-जिव्हाळ्याला भक्तीचे, निरलस प्रेमाचे, नि:स्वार्थी प्रेमाला निष्काम कर्मयोगाचे आत्मिक, नैतिक पाठबळ दिले. विश्वाचे आर्त जाणण्याची, शोधण्याची आणि ते आचरणामध्ये उतरविण्याची प्रेरणा ज्ञानेश्वरांना घरामध्ये, कुटुंबामध्ये मिळाली. मुक्ताबाईचे 'ताटीचे अभंग' ही त्याची जिवंत खूण आहे.
भक्तियोगाच्या भावनिक आणि नैतिक धाग्यांनी परस्परांशी बांधलेल्या या भावंडांचे नाते जैविक, आत्मिक, मानसिक, वैचारिक अशा सर्व बाजूंनी परस्परांना पूरक, साहाय्यक असे होते. या भावंडांनी त्यांच्यातील भक्त-जिव्हाळ्यातून तेराव्या शतकाच्या शेवटी फ्रेंड, फिलॉसॉफर, गाइड अशा परिपूर्ण मानवी नात्याचा शोध त्यांच्या घरामध्येच घेतला. मित्र, गुरू, मार्गदर्शक या नात्याची एक कौटुंबिक साखळी निवृत्तीनाथ-ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर-मुक्ताबाई, निवृत्तीनाथ-सोपानदेव यांच्याद्वारे आकाराला आली. आई, वडील, अपत्ये, मुलाबाळांच्या एका छोट्याशा जगाला, त्याच्या घर-परिवारापुरत्याच मर्यादित अशा 'मी' केंद्रित जगण्याला आत्मउन्नयनाची व्यापक, सखोल दिशा, बाजू प्राप्त करून देण्याचे काम ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांनी केले. पाठची भावंडे असण्याखेरीज एकाच जीवित ध्येयाने जगण्याचा ध्यास असणे, हे या परिवाराचे वैशिष्ट्य आहे. मीठ-मिरची, भांडीकुंडी, जमा-खर्च अशा प्रापंचिक पसाऱ्यात नसलेल्या, तरीही परस्परांशी आर्त जिव्हाळ्याने बांधलेल्या आणि जगण्याचे एकच एक प्रयोजन असलेल्या भावंडांचे नाते कसे असावे, याचा खूप मोठा आदर्श या भावंडांनी निदान मराठी माणसांसमोर उभा केला. एरवी भाऊबंदकीने ग्रासलेल्या आणि कलहाने दुभंगलेल्या मराठी माणसांनी या परिपूर्ण, एकसंध कुटुंब चित्राकडे जरा जास्तच दुर्लक्ष केले. वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये मात्र आर्त भक्त कुटुंब आकाराला येण्याची परंपरा पुढे चालूच राहिली. संत नामदेवांच्या घरातील, नामदेवांची आई गोणाई आणि पत्नी राजाई यांनी विठोबाची भक्ती केली. शिवाय नामदेवांची मोठी बहीण आऊबाई, लेक लिंबाई, मुले - नारा, महादा, गोंदा, सून लाडाई आणि दासी जनी हे सारेच भक्तीयोगातून आनंद मिळविणारे आनंदयात्री आहेत. अशीच कुटुंब काव्याची समर्थ परंपरा चोखामेळा यांच्या परिवाराने रचली. चोखामेळा यांनी अस्पृश्यतेच्या बंधनापलीकडे जाऊन भावबळावर आधारित भक्तिनिष्ठ जीवन जगण्याची नवीन वाट त्यांच्या कुटुंबाला दाखवली. याच वाटेवर पुढे त्यांची पत्नी सोयराबाई, धाकटी बहीण निर्मला व बंका हे दांपत्य, मुलगा कर्ममेळा हे सर्वजण भक्तियोगनिष्ठ जीवन जगले. या सर्वांनी अभंगरचना केली. तुकोबांनी त्यांचा आणि पत्नी आवली यांचा संवाद अभंगरूपाने व्यक्त केला, गुरू नामदेवाप्रमाणेच. तुकोबांचे बंधू कान्होबांनी अभंगरचना केली. तुकोबांची शिष्या बहिणाबाई शिऊरकर यांचा पुत्र विठ्ठल यांनीही विठ्ठल भक्तीची कुटुंबनिष्ठ परंपरा सतराव्या शतकापर्यंत अखंड चालू ठेवली. या सर्व कुटुंबीयांच्या काव्य रचनेला कुटुंबनिष्ठ भक्तिरचना असे म्हणता येते किंवा कुटुंबातील भक्तीमंडळ असेही म्हणू शकतो.
आता या कौटुंबिक स्तरावरील भक्तिरचनेमध्ये घरातील माणसांबद्दल लळा, जिव्हाळा आहे; पण त्याचबरोबर कर्मनिष्ठ असण्याची, तसेच विवेकशील असण्याची प्रामाणिक आचही आहे. त्यामुळे एरवी व्यवहारात असलेल्या कर्तव्यकठोर असण्याला, कर्मनिष्ठेला चिकटलेला आपपरभाव ओलांडून जाण्याची धडपड, ओढ या कुटुंबनिष्ठ भक्तियोग साधनेत जास्त दिसते. कुटुंबात असण्याचा, माणसाच्या मनाला प्रपंचातील जबाबदाऱ्या पार पाडण्याचा काच आणि भौतिकाच्या पलीकडचे व्यापक शोधण्याची आस, या दोन्ही गोष्टींची जाणीव एकाच वेळी कमी-जास्त तीव्रपणे होत असते. वारकरी संप्रदायातील संत कुटुंबीयांच्या काव्यात आचरणातील सच्चा भाव, प्रामाणिकपणा, निष्ठा, नैतिकता, चराचराशी मनाच्या पातळीवर तादात्म्य पावण्याची प्रत्येकापाशी असलेली शक्ती वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त झालेली दिसते.
वारकरी संप्रदायातील कुटुंबनिष्ठ भक्तीरचनेमध्ये प्रत्येक संताने सर्वस्व अर्पण करताना, स्वत:च्या मर्यादा ओलांडताना त्याला आलेले अनुभव विठोबापाशी मांडलेले आहेत. नामदेव, तुकोबा, जनाबाई विठोबाच्या चरणी सर्वस्व अर्पण करतात. संपूर्ण आयुष्य भक्त म्हणून जगायचे, भक्ती करायची हा स्वतंत्र निर्णय त्यांनी घेतला होता. भक्ती करणे ही त्यांची स्वत:ची परीक्षा होती. स्वत:च स्वत:ने घेतलेली परीक्षा. त्यामुळे भक्ती ही त्यांच्या लेखी नैतिक कृती होती. या नैतिक कृतीसाठी स्वत:च संपूर्ण आयुष्य भक्त असणे, भक्तीमधील सच्चा भाव पणाला लावण्याचे खूप मोठे धाडस या संतांनी घरात, आप्तांच्या सहवासात केले. म्हणून त्यांचा कुटुंबाचा परीघ, कौटुंबिक विश्व मला जास्त महत्त्वाचे वाटते.
या सर्व संतांनी त्यांचा भक्तियोग आपला आपल्यापुरता मर्यादित ठेवला नाही; कारण वारकरी संप्रदायाचा भक्तियोगनिष्ठ कर्मयोग हा विश्वकल्याणाची मागणी करणारा आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायात मठापुरती बंदिस्त भक्तीरचना होणे शक्य नव्हते. वारकरी संप्रदायात संपूर्ण कुटुंबाला भक्तीची गोडी लागते, आत्मोन्नतीची ओढ लागते. ही गोष्ट कुटुंबसंस्थेचा परीघ मोठा करणारी आहे. घरातील बहीण, पत्नी, आई, सून एवढेच नाही, तर कष्टकरी जनाईबरोबर तत्त्वचर्चा होण्याची, तत्त्व आणि आचरणासंबंधी वादविवाद होण्याची, तत्त्व आत्मसात करण्याची प्रचंड मोठी शक्यता निवृत्तीनाथ, नामदेव, तुकोबा या पुरुषांना जाणवली. त्यांनी घरातील नात्यांमध्ये ती स्वीकारण्याची अनुकूल परिस्थिती प्रयत्नपूर्वक निर्माण केली. सहसा चटकन न बदलणारी आपलीच पिढीजात चाकोरी परंपरेनुसार जपणारी कुटुंबसंस्था ही कर्मठ, रूढीप्रिय अशी सामाजिक संस्था आहे. वारकरी संप्रदायातील कुटुंबनिष्ठ भक्तिरचनेमुळे या संस्थेचे आत्मिक उन्नयन झाले. कुटुंबसंस्थेच्या अंतर्गत जगणाऱ्या स्त्री-पुरुषांचे, मुलामाणसांचे आंतरिक परिवर्तन घडवून आणण्याचे कठीण काम वारकरी संप्रदायाने केले. एरवी संपूर्ण कुटुंब विठोबाच्या भजनी लागणे शक्य नव्हते. येथे महात्मा गांधी यांचे 'माझे सत्याचे प्रयोग' आठविणे अगदी स्वाभाविक आहे. मुक्ताबाईचे 'ताटीचे अभंग', राजाई-गोणाईचे खडे बोल, आवलीचे परखड बोल, बहिणाबाईंचे उभे आयुष्य हे सगळे 'सत्याचे प्रयोग'च आहेत. आत्मनिष्ठ, आत्मकेंद्रित मुक्तीच्या आणि मोक्षप्राप्तीच्या मागे न लागता वारकरी संप्रदायाने कुटुंब संवाद घडवून आणला. आत्मविकास साधण्याची, खुला संवाद साधण्याची हक्काची, विश्वासाची जागा म्हणजे कुटुंब, ही जाणीव संप्रदायाने समाजात रुजविली. मुख्य म्हणजे व्यक्तीला आत्मविकास साधण्यासाठी अनुकूल, पोषक परिस्थिती, पार्श्वभूमी कुटुंब देऊ शकते, ही एक नवी शक्यता त्यातून निर्माण झाली. त्यामुळे वारकरी संप्रदायातील निवृत्तीनाथ, नामदेव, तुकोबा, चोखोबा यांचे आप्त, त्यांच्या अभंगरचना आज कमी प्रमाणात उपलब्ध असूनही हे आप्तसंत मला अधिक महत्त्वाचे वाटतात; कारण घरातील एका व्यक्तीला जाणविणाऱ्या संवेदना, भावना, विचारांच्या वेगळ्या मागण्या त्यांनी समजावून घेतल्या. एका व्यक्तीच्या उच्च, वेगळ्या आंतरिक गरजा ऐकण्याची, समजण्याची संवेदनशीलता स्वत:मध्ये निर्माण करण्यासाठी हे कुटुंबीय धडपडले. या धडपडण्यामधूनच ते त्या वेगळ्या मार्गाशी मनाने एकरूप झाले आणि मग तेही विठ्ठलभक्त झाले. हा सारा तपशील अभंगरचनेत फार मोठ्या प्रमाणात आलेला नाही; पण तो ज्या प्रमाणात उपलब्ध आहे, त्यावरूनही आपल्याच आप्तासाठी स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याची ऊर्मी समजू शकते. आपलाच भाऊ, आपलीच बहीण, आपलाच पती उच्च आत्मस्तरावर जगत होता. त्याची आत्मोन्नती हिमालयाएवढी. त्याला आपण ओळखलेच नाही, म्हणून मनाला लागलेली रुखरुखही या भक्तिनिष्ठ कुटुंबकाव्यात सहजपणे व्यक्त होते. त्याचे प्रतिबिंब तुकोबांचा भाऊ कान्होबा, निवृत्तीनाथांचे मुक्ताईबद्दलचे उद्गार यांमध्ये दिसते. म्हणून मग 'अवघे विश्वची माझे घर' असे आवाहन प्रत्यक्षात उतरले.
वारकरी संप्रदायातील कुटुंबीयांची भक्तिरचना डोळस होती. ते अंधानुकरण नव्हते किंवा भोळ्या-भाबड्या माणसांनी केलेले एकमेकांचे अनुसरणही नव्हते. आप्तभाव आणि भक्तीभाव यांच्याकडे कठोर चिकित्सक दृष्टीने पाहण्याची क्षमता या भक्त आप्तांमध्ये होती.
संत जेणे व्हावे। जग बोलणे सोसावे।।
तरीच अंगी थोरपण। जया नाही अभिमान।।
थोरपण जेथे वसे। तेथे भूतदया असे।।
लोकनिंदेमुळे दुखावलेल्या ज्ञानेश्वरांना असा उपदेश मुक्ताईने केला. तुकोबांनी संत कोणाला म्हणू नये याचे परखड विश्लेषण केले आहे.
नव्हती ते संत करिता कवित्व।
संताचे ते आप्त नव्हती संत।।
तुकोबांनी संतांच्या आप्तांना संत म्हणू नये, हे खास त्यांच्या शैलीत खडसावून सांगितले आहे. संत असण्याचा आणि आप्त असण्याचा संबंध नाहीच. संत होण्यासाठी आत्मशोध घेणे अटळच आहे, हे तुकोबा सांगतात. वारकरी संप्रदायातील कुटुंबातील भक्तीरचनेमुळे वारसा जतन करण्याचा, वारसा आत्मसात करण्याचा आणि वारसा पुढे नेण्याचा आदर्श निर्माण केला. वारसदार या शब्दाचे नैतिक बळ वाढविले. वारकरी संप्रदायात केलेल्या तिच्या लेखनासाठी घर-कुटुंब हा अवकाश उपलब्ध झाला आणि घराचा अर्थ बदलला. तिचे घर आणि तिचे लेखन यांचा एकत्र विचार करायला हवा.