मोठी भीती
मोठी भीती


लहानपणापासुन मला भुता खेचरांची जाम भीती वाटायची म्हणजे अजुनही थोडी वाटतेच म्हणा. पण त्या काळात भुताच्या वगैरे गोष्टी सांगितलेल्या ऐकल्या की रात्री हमखास भूत यायचे हो स्वप्ननात आणि ओरडुन मी सगळ्यांना जाग आणायची.
माणूस मेला की त्याच भूत होऊन पिंगा घालतं असे माझे ठाम मत होते. त्यातुन जर एखादेवेळी बाळंतपणात बाई मेली तर तिच म्हणे भूत होतच होतं असं तेव्हा लोक म्हणायचे आणि बालबोध मनाला ही ते पटायचे.
तो एक मराठी सिनेमा "बाळा गाऊ कशी अंगाई "आहे बघा त्यात आशा काळे
सफेद साडी घालुन मेल्या नंतर आपल्या छोट्या बाळाला भेटायला येते. "लिंबोणिच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई " हे अंगाई गीत गाते. तशी बाई रात्रिच्या काळोखात फिरत असल्यासारखी भासायची. कारण रात्री गावात वीज नसल्या कारणाने सगळा काळाकुठं आंधारच. आंधाऱ्या रात्री गावात शांत वातावरण त्या शांततेचा भंग करणारे रात किड्याची किरकिर हवेच्या झोक्या बरोबर पानाची सळसळ आणि लांबून पेटणारी चुढी मग बोबडी वळणारच ना राव. आता सुध्दा लिहिताना अंगावर काटा आला हो.
मी खुप लहान म्हणजे पाच सहा वर्षाची असेन. आईने मला मोठ्या भावाला बोलवून आणायला सांगीतले. भाऊ आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या त्याच्या मित्राच्या घरात होता. दुपारची वेळ होती. जवळ जवळ एक वाजायला आला असेल. दोन घरांच्या अंतरावरच्या रस्त्यावर चिट पाखरु ही नव्हते. मी इकडे तिकडे पाहत चालले होते. माझं लक्ष
उंबराच्या सफेद झाडाकडे गेले. पाहते तर काय त्या सफेद झाडावरून एक काळा कुट्ट माणूस की भूत फक्त लंगोट घातलेला हा हा करुन दात विचकत झरझर उतरत होता. मी ते पाहून जोराने किंचाळले आणि खाली बेशुध्द होऊन पडले. माझ्या आवाजाने दोन्ही घरातली माणसे धावत बाहेर आली. त्यात भाऊ ही होता मला उचलुन घरी आणले तोंडावर पाणी मारल्यावर मला शुध्द आली. मी काय झाले ते घाबरत सांगीतले. पण कोणीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही. खरंच तेथे माणूस होता की माझ्या डोक्यातले भूत मला माहीत नाही. पण आजुनही ते दृष्य नजरेत येते. ही भीती अजुन ही कुठेतरी आहे.
किती तरी वर्ष झाली , शव पाहिले की भीतीच वाटायची. रस्त्यावरुन "राम नाम सत्य है " असे म्हणत शव घेऊन जाणारे बघितले की मी मनात "बजरंग बली की जय "असा धावा करायचे.
आता मी वयाने मोठी झाले . भुतावर विश्वास नाही पण एक भीती वाटते ती म्हणजे माणूस नावाच्या विक्षिप्त माणसाची.