Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

SAMPADA DESHPANDE

Thriller


3  

SAMPADA DESHPANDE

Thriller


मनमोहिनी - भाग १

मनमोहिनी - भाग १

15 mins 224 15 mins 224

चेतन साईटवर हजर झाला. त्याचं अकाउंटंटच काम होतं. नावाला गोंडस पद पण खरंतर त्याला मुनीमगिरी करायची होती. जे पडेल ते काम करायचं होतं. मंदीमुळे त्याची मल्टि नॅशनल कंपनी मधली नोकरी गेली होती. म्हणून नाईलाजाने त्याला आर्किऑलॉजिकल साईट वरची नोकरी धारावी लागली होती. राजस्थानजवळ एका खेड्यापासून ३० किलोमीटरवर वाळवंटामध्ये एका रात्री प्रचंड वादळ झालं. पूर्ण वाळू ढवळून निघाली आणि खोलवर असलेल्या काही अवशेषांचा भाग उघडा पडला. गावातल्या लोकांनी पोलिसांना खबर दिली. मग तो भाग पुरातत्व खात्याकडे सोपवला गेला. उत्खनन सुरु झाले तसे हे काम मोठे आहे हे पुरातत्व विभागाच्या लक्षात आले. जवळ जवळ एक मोठे शहर मिळण्याची चिन्ह दिसू लागली. तस त्यांनी स्टाफ वाढवायचा निर्णय घेतला आणि तिथे चेतनची नियुक्ती झाली. तो साईट वर आला तेंव्हा तिथला उकाडा आणि रुक्षपणा पाहून हैराण झाला. तिथल्या मॅनेजरनी त्याला त्याची राहायची जागा दाखवली. तो तात्पुरता निवारा होता. पण एक नशीब कि सगळ्या सोयी होत्या निदान माणसाच्या बेसिक गरजा पुऱ्या कारण्याइतपत. त्याच्या छोट्या खोलीत टॉयलेट-बाथरूम होतं, एक छोटा सिंगल बेड, कपाट आणि टीव्ही होता. जेवण करण्याची सर्वांची सोय एका मोठ्या हॉलसारख्या पत्र्याच्या खोलीत होती. जेवण पण यथातथाच होतं. दुसऱ्या दिवशी त्याचं काम चालू झालं. इतक्या उकाड्यात कमी सोयी असताना लोक इतके वेड्यासारखे कसे काम करू शकतात याचं त्याला आश्यर्य वाटत होतं. आर्किओलॉजिस्टची एक मोठी टीम त्या साईटवर काम करत होती. ते स्वतःला कामात पूर्ण झोकून देत होते. शारीरिक गैरसोयींकडे त्याचे लक्षही नव्हते. त्यांना फक्त संशोधनात रस होता.


अशीच एक दिवस जेवताना चेतनची गिरीश बरोबर ओळख झाली. गिरीश महाराष्ट्रातला होता. तो आर्किओलॉजिस्ट होता. एकाच वयाचे असल्यामुळे चेतन आणि गिरीश यांची छान मैत्री झाली. गिरीश त्याला रोज नवीन किस्से सांगायचा. त्यांनी लावलेले शोध, कार्बन डेटिंग करून ते कसा कालखंडाचा शोध लावतात. पूर्वीच्या काळी आताच्यापेक्षा कितीतरी सुधारित संस्कृती होत्या, या आणि अशा अनेक गोष्टी. चेतनला त्याचा कंटाळवाण्या कामात खूप उत्साहित करत असत. तो रोज रात्री गिरीश भेटायची आतुरतेने वाट बघत असे. चेतनला येऊन आता जवळ जवळ सहा महिने झाले. त्याची अनेक लोकांशी ओळख झाली. आता त्याला तिकडचे आयुष्य अंगवळणी पडले. मग एक दिवस त्यांच्या मॅनेजरनी सांगितले कि साईट बघायला राज्याचे मुख्यमंत्री येणार आहेत. मग एकाच गडबड उडाली. सर्वांवर कामाचा ताण पडला. सगळी कागदपत्र, अकाउंट्स व्यवस्थित करण्यासाठी स्टाफ झगडू लागला. साईट वर एक सिनियर संशोधक होते, त्यांचा नाव प्रोफेसर गुप्ता. त्यांनी सर्व स्टाफ ला कामाची माहिती देण्याचे ठरवले म्हणजे समजा पाहुण्यांनी काही प्रश्न विचारले तरी सगळे उत्तरे देऊ शकतील. मग त्यांनी सर्व सिनियर ऑफिसर्सची मीटिंग घेतली. ते म्हणाले," अजूनपर्यंत आपण काय काम करतोय हे फक्त ठराविक माणसांनाच माहित आहे. संशोधन करणाऱ्या व्यक्ती सोडल्या तर बाकीचे फक्त आखून दिलेलं काम करत आहेत. आपण काय आणि कशावर काम करतोय हे मला सर्वाना सांगणं गरजेचं वाटत आहे. कारण इतक्या महिन्यांनी प्रथमच आम्ही काही निष्कर्षांपर्यंत येऊन पोहोचलो आहे. अजूनपर्यंत आपण रामायण महाभारत यातल्या कथा ऐकत आलो आहोत. त्यातली युद्ध , त्यात वापरली गेलेली शस्त्रास्त्र, विमाने हे आपल्याला निव्वळ दंतकथा वाटत होते परंतु गेल्या काही वर्षांमध्ये सापडलेल्या काही पुराव्यांच्या आधारे या दंतकथा नाहीत हे सिद्ध झाले आहे.


आपल्याकडच्या प्राचीन ग्रंथांमध्ये अनेक दिव्य अस्त्रे बनवण्याचे विधी वर्णले आहेत. महाभारत काळामध्ये पांडवांच्या इंद्रप्रस्थ राज्यात मयासुराने बनवलेला मायामहाल आपल्याला खोटा वाटतो परंतु आजकाल चीनमधले काही विडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यात त्यांनी फरशांमध्ये वाहत असलेलं पाणी, ज्वालामुखी असे अनेक इफेक्ट दिलेले आपल्याला खरे वाटतात. हीच कला हजारो वर्षांपूर्वी भारतात अस्तित्वात होती हे मात्र आपल्याला खोटं वाटतं. आपल्याकडील ग्रंथात अशा अनेक चमत्कारिक जडीबुटींची माहिती आहे ज्यांनी अवकाशगमन सिद्धी प्राप्त होतात, किंवा ज्यामुळे माणूस अमर होतो. माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे कि आपले पूर्वज किती प्रगत होते. तर आता हे शहर जिथे आपण काम करत आहोत, आमच्या टीमने या शहराचा कालखंड जाणण्यासाठी याचे कार्बन डेटिंग केले तर साधारणपणे पंधरा हजार वर्षांपूर्वीचा कालखंड असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. या शहराचा विस्तार लक्षात घेता हे राजधानीचे शहर असावे. गावाच्या मधोमध राजवाडा आणि देवतेचे मंदिर आणि सभोवती घरे असावीत. प्राथमिक तपासणीतून आम्ही असा निष्कर्ष काढला आहे की या गावाची रचना अंडगोलाकार असावी. सर्वात मोठा महाल अर्थातच राजाचा आणि बाकी सर्वांची घरे त्यांच्या हुद्द्याप्रमाणे असावी. हा अंदाज आम्ही साधारण एक महिन्यापूर्वी केला होता. पण आता गावाच्या एका टोकाला अजून एक मोठा महाल सापडण्याची चिन्हं दिसत आहेत. तो कोणाचा असावा अंदाज करता येत नाही. अजून तो अर्धवटच बाहेर आला आहे. सर्वात व्यवस्थित शाबूत असणारी हीच वस्तू असावी. कारण यातून काही भांडी जी वेगळ्याच धातूची आहेत, तसेच काही भिंतींवर काढलेली भित्तिचित्रे अजूनही चांगल्या अवस्थेत आहेत. जेंव्हा तो महाल पूर्णपणे उघड होईल तेंव्हा त्या कालखंडातली अनेक रहस्ये आपल्यासमोर उघड होतील अशी आशा आहे. जितके उत्खनन झाले त्यातूनही आपल्याला अनेक भांडी शस्त्रे, काही अर्धवट अवस्थेतले पुतळे अशा अनेक गोष्टी सापडल्या आहेत. ज्यावर अजून संशोधन चालू आहे. माझ्या मते मी पुरेशी माहिती दिली आहे. चला आता सर्वजण उद्याच्या तयारीला लागूया." त्यांचे हे भाषण ऐकल्यावर का कोणास ठाऊक चेतन ला असे वाटत होते कि ते समाधानी नाहीत. त्यांना अजून कशाचीतरी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री येऊन सर्वांच्याच कामाचे कौतुक करून गेले. दिवस भराभर पुढे सरकत होते.


एक दिवस असाच गिरीश चेतनला म्हणाला," अरे या रविवारी मी तुला साईट बघायला घेऊन जाईन. जरा बघ तरी आम्ही काय काय शोधलंय ते !" चेतनलाही उत्सुकता होतीच. मग रविवारी ते दोघे साईट वर गेले. साईटवर एक गेल्यावर चेतन अवाक झाला. इतका मोठा शोध लागला होता. चेतननी मनापासून गिरीश आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले. गिरीशला मूठभर मास अंगावर चढल्यासारखे वाटले. तो उत्साहात त्याला सगळी माहिती देऊ लागला. "हे अवशेष दिसतात ना? तो फक्त खालचा भाग आहे तोही पंचवीस फूट उंच आहे म्हणजे ती वस्तू किती उंच असेल विचार कर. आमचा अभ्यास असं सांगतो कि हे देवतेचं मंदिर असावं कारण त्याची रचना तशी आहे. त्यावेळी सुमारे एक हजार लोक त्याच्या सभामंडपात बसू शकत असतील. आणि हि मोठी वस्तू शेजारी दिसतेय ना ? तो एक राजवाडा असावा. इकडे ये. त्याच्या काही भिंती अजून शाबूत आहेत. त्यावरची भित्तचित्रे बघ अजूनही त्यांचे रंग किती सुंदर आहेत! या चित्रांवरून आपल्याला त्यावेळच्या जीवनपद्धतीबद्दल थोडाफार अंदाज येतो. हे राजधानीचे शहर असावे. इथले लोक खूप समृद्ध असावेत. त्यांच्या वास्तू पांढऱ्या रंगाच्या असाव्यात. आता मी तुला एका गूढ वास्तूपाशी घेऊन जाणार आहे. ती संपूर्ण काळ्या रंगात असावी . बाकीच्या शहराशी हि वास्तू विसंगत वाटते." मग ते एका मोठ्या वास्तूच्या अवशेषांजवळ गेले. ती वास्तू गिरीशला जरी विचित्र वाटली तरी चेतनला ती खूप आकर्षक वाटली. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला एखाद्या जागेबद्दल ओढ वाटू लागली. मग ते आत गेले. " चेतन जरा जपून हं ! इथे अजून काम चालू आहे अर्धी वास्तू अजून बाहेर आली नाही. त्यामुळे कुठे हात लावू नकोस. रेती आपल्यावर कोसळून आपण गाडले जाऊ." गिरीशने सूचना दिली. इतक्यात त्याला फोन आला. तो बोलत बोलत जरा दूर गेला. इकडे चेतन उत्सुकतेने सगळीकडे फिरू लागला. इतक्यात त्याला रेतीखाली अर्धवट गाडलेले कपाट दिसले. ते त्या वाड्याच्या कोपऱ्यातले कपाट असावे. ते काळ्या रंगाचे होते. चेतन तिकडे गेला.ते बंद कपाट होते. चेतनला त्यात काय असेल याची उत्सुकता लागली. शेवटी त्याने जवळचा एक दगड घेऊन दार तोडले.दार उघडून बघतो तर काय एका सुंदर स्त्रीचा धातूचा पुतळा होता. तो पुतळा जरी धातूचा असला तरी घडवणाऱ्याने त्यात प्राण ओतला होता. ती स्त्री अप्रतिम लावण्यवती होती. तिच्यावरून नजर हटत नव्हती. तिला त्याने मनात नाव देऊन टाकले "मनमोहिनी" इतक्यात त्याला गिरीशच्या हाका ऐकू आल्या. तो त्याला शोधत होता. तो तिच्या कानात बोलला," मी तुला लपवून ठेवतो हं ! तुला माझ्याशिवाय कोणी बघता कामा नये." त्यानी परत ते कापत बंद केले. ते जणू तुटलेच नव्हते असे अखंड राहिले.  


चेतन रूमवर आला पण मन तिकडेच विसरून आला. त्याला सतत तिचीच आठवण येत होती. बरं हे कोणाला सांगूही शकत नव्हता. बोलला असता तर सगळे त्याला हसले असते कि तो एका पुतळ्याच्या प्रेमात पडला आहे. एका रात्री तो झोपला असताना त्याला कोणीतरी हाक मारल्यासारखे वाटले त्यानी बाहेर जाऊन पहिले तर चंद्राच्या उजेडात ती उभी होती. तिच्या अंगावर शुभ्र वस्त्रे होती. मोजक्याच अलंकारात तिचे सौंदर्य खुलून दिसत होते. जणू चंद्रच जमिनीवर उतरला आहे असे वाटत होते. ती खुणेनी त्याला बोलवत होती. तो तिच्या मागे गेला. ती चालत चालत निघाली आणि एका सुंदर महालात शिरली. तोही तिच्या मागे गेला. महाल खूप सुंदर होता. हंड्या-झुंबरे जणू सोन्याची उधळण करत होते. सगळीकडे फुलांचा मंद सुवास होता. सर्वत्र मूल्यवान वस्तू होत्या. त्यांच्या रचनेतही सौंदर्यदृष्टी दिसत होती. मंजुळ संगीत कानावर पडत होते. ते वाजवणारे कसलेले वादक वाटत होते. जणू स्वर्गातच आलो असे त्याला वाटत होते. या सर्वापेक्षा स्वर्गीय सौंदर्य होते तिचे. तिच्यापुढे सगळेच फिके वाटत होते. तो तिच्यामागे अंतःपुरात गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला जाग आली तेंव्हा तो त्याच्या रूमवर होता. अंगात किंचित कणकण होती. अशक्तपणा जाणवत होता. तरीही तो कामावर गेला. रात्री जेवताना त्यानी गिरीषजवळ आडून आडून चौकशी केली त्याला अंदाज घ्यायचा होता कि तो पुतळा सापडला का? तो महाल पूर्णपणे बाहेर आला पण त्या पुतळ्याबद्दल कोणीच काही बोलले नाही. ते खोदकामातून बाहेर आलेल्या वस्तू लोकांना पाहण्यासाठी मांडून ठेवत. त्यानी एक छोटे म्युझियम बनवले होते. लोक लांबलांबून तिकीट काढून त्या वस्तू पाहायला येत. त्यामधून मिळणाऱ्या पैशांमुळे सरकारवरचा या प्रकल्पाचा आर्थिक भार थोडा कमी होत होता. चेतन तिकडेही जाऊन आला. त्या वस्तूंमध्येही त्याला तो पुतळा दिसला नाही. त्याला हायसे वाटले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या महालात काहीच सापडले नाही. तो पूर्ण रिकामा होता. इकडे रोज रात्री चेतनच्या त्या सुंदरीशी भेटीगाठी चालू होत्या. तो सुखात आकंठ बुडाला होता. दिवसोंदिवस त्याची प्रकृती बिघडत चालली होती. तो आता जेवणही रूमवर मागवत असे. त्याची अन्नावरची वासना उडत चालली होती. त्याला फक्त मनमोहिनी आणि तिचा सहवास इतकेच हवेहवेसे वाटत होते. चेतन भेटत नाही म्हटल्यावर गिरीश एक दिवस रूमवर आला आणि त्याचा अवतार पाहून हादरला," अरे मित्रा! काय अवतार झालाय तुझा ? इतका आजारी होतास तर बोलवायचास ना ! किती तगडा गाडी तू ? पार वाळून गेलास. आता मी तुझं काही ऐकणार नाही आपण डॉक्टरांना दाखवायचं. " गिरीश काळजीने म्हणाला. चेतन हसून म्हणाला," काही नाही जरा इथलं जेवण मानवत नाही बस. होईन काही दिवसात बरा. उगाच कशाला डॉक्टर वगैरे." चेतनला तिच्यापासून कोणत्याही कारणांनी लांब जायचं नव्हतं. तो नाहीच म्हणत राहिला,पण त्याची तब्येत पाहून घाबरलेला गिरीश काहीच ऐकायला तयार नव्हता. त्यांनी तातडीने चेतनच्या घरच्यांना बोलावून घेतलं. ते येईपर्यंत साईटवर असलेल्या डॉक्टरना दाखवून घेतलं . त्यांनी प्रथमदर्शनी चेतनला ऍनिमिया झालाय असे निदान केले आणि त्याला शहरातल्या चांगल्या डॉक्टरना दाखवावे असेही सांगितले. तात्पुरत्या रक्तवाढीच्या गोळ्या दिल्या. चेतनला काही करून तिथेच राहायचे होते. त्याला मनमोहिनीची ताटातूट सहन होणार नव्हती. काही झालं तरी तो तिथेच राहणार होता.गोळ्यांनी फारसा फरक पडत नव्हता. चेतन पार अंथरुणाला खिळला होता. पण रोज रात्री त्याच्यात एक वेगळीच शक्ती संचारत असे. मनमोहिनीच्या सहवासासाठी तो आतुर होत असे. तीन दिवसांनी त्याचे वडील आणि मोठा भाऊ आले. चेतनची अवस्था पाहून त्यांच्या डोळ्यात पाणीच आले. ते येतानाच सगळी सोय करून आले होते. त्यांनी तातडीने चेतनला अँब्युलन्स मधून विमानतळावर नेले. त्याचे रूमवरचे सामान आवरायला गिरीशने मदत केली. आपला मित्र अशा अवस्थेत जाताना पाहून त्याला रडू येत होते. चेतन अर्धवट शुद्धीत होता, तो सारखा " मनमोहिनी ! मनमोहिनी " असे बोलत होता. चेतनला मुंबईला आणून रुग्णालयात दाखल केले. पण उशीर झाला होता. मुंबईत आणल्याच्या चौथ्याच दिवशी चेतनची प्राणज्योत मालवली. गिरीशला समजल्यावर त्याला खूप मोठा धक्का बसला. चेतनच्या जागेवर एक नवीन माणूस नेमण्यात आला.काळ कोणासाठी थांबत नाही हेच खरं.


गिरीश मात्र चेतनच्या आठवणींनी बेचैन व्हायचा. रात्री जेवायला आल्यावर ते दोघे जेवायचे ती जागा पाहिल्यावर त्याला चेतनची प्रकर्षानी आठवण व्हायची. त्याला चेतनचे शेवटचे दिवस आठवत होते. तो आजारी पडल्यावर जेंव्हा गिरीश त्याला भेटायला गेला तेंव्हा चेतन एका वेगळ्याच जगात असल्यासारखा वागत होता. तो 'मनमोहिनी' असं काहीसं बोलत होता. तो एखाद्या मुलीच्या प्रेमात तर पडला नव्हता ना ? पडला असला तरी इतकं आजारी पाडण्यासारखं काय होतं? तिथे साईटवर अनेक मुली होत्या गिरीश त्यांना ओळखत होता. त्या सगळ्या आर्किओलॉजिच्या विद्यार्थिनी होत्या. गिरीशला सगळ्यांची नावे माहिती नसली तरी त्यातली कोणी इतकी सुंदरही नव्हती कि चेतन तिच्या प्रेमात पडावा. जरा चौकशी केल्यावर त्याला समजलं कि त्यातलं कोणाचंच नाव 'मनमोहिनी', 'मोहिनी' किंवा त्याच्या जवळ जाणारं सुद्धा नव्हतं. तसही त्यांनी चेतनला कोणत्याही मुलीशी बोलताना कधीच पाहिलं नव्हतं. बाहेरची कोणी मुलगी यायचा प्रश्नच नव्हता. कारण गेटच्या आत बाहेरच्या व्यक्तीना प्रवेश नव्हता. मग मनमोहिनी कोण? या प्रश्नानी त्याचा डोकं पोखरलं जात होतं. मग हळू हळू बारकाईने विचार केल्यावर त्याच्या लक्षात यायला लागलं कि ज्या दिवसापासून तो साईटवर चेतनला घेऊन गेला होता त्यानंतरच त्याची तब्बेत बिघडू लागली होती. हा योगायोग होता कि खरं होतं माहित नाही पण त्याने खोलात जाऊन शोध करायचा असं ठरवलं. गिरीशने त्या सगळ्या ठिकाणांना भेट दिली. राजवाडा, देऊळ कुठेच त्याला असं काही विशेष वाटलं नाही. आपलं काहीतरी चुकतंय का ? चेतन नक्की एखाद्या बाहेरच्या मुलीला तर भेटत नसेल ना ? आपण चेतनला पूर्णपणे ओळखले नाही का? पण समजा एखाद्या बाहेरच्या मुलीला तो भेटत जरी असेल तरी इतका आजारी कशाने पडला ? इथले डॉक्टर त्याच्या अंगात रक्तच नाही असे का म्हणाले? असे अनेक विचार त्याच्या मनात येऊ लागले. मग तो त्या काळया महालाकडे गेला. जसजसा तो महाल जवळ येत होता तसतसे गिरीशला जाणीव होत होती कि आपला शोध इथंच संपणार आहे. त्या भागातले वातावरण दूषित होते. मागच्या वेळी आपल्याला हे कसे जाणवले नाही ? त्याला नवल वाटत होते. मग त्याला आठवले कि मधेच तो चेतनला सोडून फोन वर बोलण्यासाठी बाजूला गेला. तेंव्हाच काहीतरी झाले असणार. तो आल्यावर चेतन गडबडला होता. गिरीशला त्या ठिकाणी जायची अचानक खूप भीती वाटू लागली. मग तिथे साईटवर काम करणाऱ्या काही मुलांना घेऊन तो महालात गेला. त्यांनी त्या सर्वांना काही वेगळे सापडते का बघा असे सांगितले. तसेच सावधपणे राहण्याच्या सूचनाही दिल्या. फिरत फिरत तो महालाच्या एका कोपऱ्यात गेला. तिथे वड्याच्या अगदी कोपऱ्यात त्याला एक कपाट दिसले. त्यालाही नाही त्याच्याबरोबर एक विजय म्हणून मुलगा होता त्याने पहिले. ते वड्याच्या भिंतींप्रमाणेच काळे होते. जणू भिंतीचाच एक भाग आणि त्या भागात खूप काळोखही होता. विजयकडे हाय पॉवर टॉर्च होती त्यामुळे तो ते कपाट पाहू शकला. मग गिरीशने आपल्या वरिष्ठांना फोन करून सूचना दिली. सगळे जमून ते कपाट बाहेर काढायचा प्रयत्न करू लागले. ते काही केल्या निघेचना. मग सर्वानी मिळून त्याचे दार तोडले. आत बघताच ते कपाटाचे दार नसून ते एका खोलीचे गुप्तद्वार असल्याचे त्यांना दिसले. सगळे सावधपणे आत गेले. ती साधारण १० बाय १० ची खोली असावी. बहुतेक रिकामीच होती. त्यात जाताच गिरीशची नजर एका पुतळ्यावर पडली. तो एका स्त्रीचा पुतळा होता. त्यानी आपल्या वरिष्ठांना तो पुतळा दाखवला. मग सर्वानी तो बाहेर आणायचा निर्णय घेतला. काळोख पडू लागला होता आणि ती छोटीशी खोली बाकी रिकामीच दिसत होती. मग सर्वानी मिळून तो पुतळा बाहेर आणला. अपेक्षेपेक्षा खूपच जड होता. तो पुतळा साईट वर आणल्यावर गिरीशने नीट त्या पुतळ्याकडे पहिले. दिव्याच्या उजेडात तो पुतळा लखलखत होता. तो एका अप्रतीम लावण्यवतीचा होता.तिला पाहताच त्याच्या मनातही तेच नाव आले "मनमोहिनी". आपल्याच विचारांनी तो दचकला. चेतन म्हणत होता ती मनमोहिनी हीच का ? असली तर चेतनला ती कशी दिसली ? आणि त्याच्या आजारपणाचा या निर्जीव पुतळ्याशी काय संबंध ? एकामागोमाग एक प्रश्न त्याच्या मनात येत होते. त्याच्याकडे एकाचेही उत्तर नव्हते. त्या पुतळ्याभोवती एक गूढ वलय असल्याचे त्याला जाणवत होते. त्याला तिच्या आसपासही फिरकायची भीती वाटत होती. मग तो तिथून निघून आपल्या खोलीवर आला.


आठवडा लोटला, तो पुतळा अजून म्युझियममध्ये ठेवण्यात आला नव्हता. त्याचा अभ्यास करण्यासाठी एक खास टीम येणार होती. तो मिळाल्याचेही कुठे जाहीर केले नव्हते. गिरीश काही दिवसांसाठी त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी म्हणून गावी गेला होता, तो १० दिवसांनी परत आला. त्याला साईटवर अँब्युलन्स दिसली. तो घाईने काय झालं म्हणून बघायला गेला तर त्याला विजय आजारी असल्याचे समजले. तो जाईपर्यंत अँब्युलन्स विजयला घेऊन निघून गेली. मग संध्याकाळी तो साईटवरच्या डॉक्टरांना जाऊन भेटला आणि विजयच्या आजारपणाविषयी चौकशी केली. तेंव्हा त्याला समजले कि विजयही त्याच आजाराचा बळी झाला ज्याचा चेतन झाला होता. हे काहीतरी वेगळे प्रकरण आहे याची त्याला जाणीव झाली. त्या पुतळ्याचे काहीतरी रहस्य आहे ते शोधून काढलेच पाहिजे असे त्याला वाटले. साईटवर सगळे काहीतरी संसर्गजन्य रोग पसरलाय असे म्हणत होते. ज्याची लागण आधी चेतन आणि मग विजयला झाली. गिरीशने हे सगळे जवळून पाहिले होते. त्यामुळे त्याला असे काही बिलकुल वाटत नव्हते. पण त्याच्यात शोध घेण्याची हिम्मतही नव्हती. त्याला त्याचा जीव प्यारा होता. मग जरा विचार करून त्याच्या मनासमोर नाव आले मनोहर गुरुजी. त्याच्याच गावात राहणारे . काशीवरून पौरोहित्याची पदवी घेऊन आलेले. पण ते कोणाकडे पूजेला जात नसत. कोणाकडे "वेगळा" प्रॉब्लेम असला कि लोक त्यांना बोलवायचे. सध्या सरळ भाषेत पछाडणे, भुताटकी वगैरे असे प्रकार असले कि लोक त्यांनाच बोलवायचे. गावात लोक त्यांना खूप मानायचे. गिरीशच्या वडिलांचे ते खूप जवळचे मित्र होते. गिरीशला त्यांची या क्षणी प्रकर्षाने आठवण झाली. त्याने ताबडतोब त्याच्याशी संपर्क साधायचे ठरवले. रात्री त्याने फोन लावला,"गुरुजी मी गिरीश. प्रभाकर शितोळेंचा धाकटा मुलगा. मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं."मनोहर गुरुजी हसले," मी तुझ्या फोनची वाटच बघत होतो. बोल कधी येऊ तिकडे?" 


चेतन आणि विजय या दोघांना झालेल्या आजाराचा संबंध साईटवरचे मजूर अमानवी शक्तींशीसुद्धा जोडत होते. ते घाबरून चालणार नव्हतं. त्यामुळे मजुरांच्या समाधानासाठी साईटवर पूजा करूया असे गिरीशने प्रोफेसर गुप्तांना सांगितले. खरंतर त्यांचा या कशावरच विश्वास नव्हता. पण मजुरांना दुखावून सुद्धा चालणार नव्हतं म्हणून त्यांनी परवानगी दिली. हि सर्व जबाबदारी त्यांनी गिरशवर सोपवली. आपोआपच मनोहर गुरुजींचा तिकडे येण्याचा मार्ग मोकळा झाला. मजूरही खूष झाले. लवकरच मनोहर गुरुजी तिकडे आले. साईटच्या परिसरात आल्यावरच त्यांना वाईट शक्तीची जाणीव झाली. हि शक्ती खूप पुरातन आणि प्रभावी आहे हेही त्यांना समजले. त्यांची सोय गिरीशच्या रूमवरच केली होती. रूमवर आल्यावर जेवण वगैरे झाल्यावर रात्री गिरीश म्हणाला,"गुरुजी तुम्हाला काही जाणवले का? कदाचित हा माझ्या मनाचा भ्रमही असेल. पण इथे काहीतरी वेगळे आहे असे जाणवते. इथले वातावरण दूषित वाटते. मी यापूर्वीही अशा अनेक साईट्स वर काम केलंय. एकेकाळी संपन्न असलेली हि नगरे काही नैसर्गिक कारणाने जमिनीखाली गाडली जातात. इथेही एकेकाळी संसार सजले असतील, घराच्या अंगणात मुले खेळली असतील, गाई,गुरांच्या हंबरण्याचे आवाज गावात घुमले असतील. असा विचार करून मन उदास होते. हे नगर जे आम्हाला सापडले आहे ते नैसर्गिक कारणाने गाडले गेले नसावे. असे वाटते. मला कोणत्याच ठिकाणी इतके तीव्रपणे जाणवले नसेल इतके इथे जाणवत आहे.” मनोहर गुरुजी हसून म्हणाले," मला या परिसरात आल्या आल्या त्या शक्तीची जाणीव झाली. ती कोणती आहे माहित नाही. मी कोणताही अंदाज बांधत नाही आणि त्या शक्तीला कमीही लेखत नाही. जे काही आहे तो खूप शक्तिशाली आहे. मला तो पुतळा दाखवायला घेऊन चल मग बघू काय होतंय ते. आता तू झोप." दुसऱ्याच दिवशी गुरुजींनी साईटवर पूजा केली. त्याचा प्रसाद सगळ्यांना दिला. बिचाऱ्या भोळ्या मजुरांना आनंद झाला. आता आपल्यावर काही संकट येणार नाही याची त्यांना खात्री वाटू लागली. प्रोफेसर गुप्तांनी सुटकेचा निश्वास सोडला. आता तरी त्यांच्या कामात व्यत्यय येणार नव्हता.   


दोन दिवसांनी त्या पुतळ्याचा अभ्यास करायला सिनियर आर्किओलॉजिस्टची एक टीम येणार होती. त्यामुळे त्यांची व्यवस्था करण्यात गिरीश व्यस्त होता. मनोहर गुरुजींनी त्याला सांगून ठेवले होते कि त्या टीमबरोबरच त्यांना त्या पुतळ्याजवळ घेऊन जा. त्यांना जवळून त्या पुतळ्याचे निरीक्षण करायचे होते. हे दोन दिवस त्यांनी त्या नागरातले इतर अवशेष पाहण्यात घालवले. पुतळा ठेवलेल्या जागी किंवा सापडलेल्या जागेपासून ते दूरच राहिले. का कोणास ठाऊक त्यांच्या मनात एक धाकधूक होती. आपल्याला कशाची भीती वाटते आहे हेच त्यांना कळत नव्हते. शेवटी ते पुतळा बघायला गेले. त्या पुतळ्याला मिळालेल्या वस्तूंमध्ये विशेष महत्व दिले गेले होते. तो पुतळा आता म्युझियमच्या मधोमध ठेवला होता. मुळात तो सुंदर होता आणि त्याची शोभा वाढवण्यासाठी त्यावर लाईट्स सोडण्यात आले होते. गुरुजींनी संपूर्ण फिरून तो पुतळा पहिला. शिल्पकाराने जीव ओतून हा पुतळा बनवला असावा. ती देखणी होती परंतु तिच्या चेहऱ्यावर मवाळ भाव नव्हते. तिच्या डोळ्यांमध्ये एक प्रकारचा उद्दामपणा होता. असेच त्या पुतळ्याचा अभ्यास करायला आलेले लोकही असेच बोलत होते. मग गुरुजी त्याच्यात सामील झाले. ते सगळेचजण बारकाईने बघत होते. तो पुतळा साधारणपणे दीड ते दोन हजार वर्षे जुना असावा. तो शुद्ध चांदीत बनवला असावा. तो भरीव असावा असा त्यांनी प्राथमिक तर्क केला. तरीही ते समाधानी नव्हते. त्यांचं असं म्हणणं होतं कि त्याबरोबर काहीतरी मिळायलाच हवे. जसे काही भूर्जपत्रे किंवा त्या पुतळ्याबद्दल माहिती सांगणारे काहीही असायलाच हवे. मग सर्वानी पुतळा सापडलेले ठिकाण बघायला जायचे ठरवले. गुरुजीही त्या टीमसोबतच गेले. ती छोटीशी खोली ज्यात पुतळा सापडला ती सर्वांनी पहिली. ते बघेपर्यंत गुरुजींनी संपूर्ण महाल फिरून पहिला. त्या महालाच्या काळ्या रंगाचे त्यांना आश्यर्य वाटले. मग टीमचा शोध सुरु झाला. त्या खोलीतला इंच नि इंच ते बघत होते. शेवटी त्यांच्यातला एक जोरात ओरडला. सगळे धावत गेले. इतक्याशा खोलीत गिचमिड जाणवत होती. त्या खोलीत शोध घेताना चुकून टीममधल्या एकाचा हात लागून भिंतीतली एक गुप्त कळ फिरवली गेली होती आणि एका छोट्या तिजोरीचा दरवाजा उघडला गेला होता. समोर गणपतीचे चित्र होते आणि त्याच्या आत ताम्रपत्रावर देववाणी भाषेत लिहिलेली कागदपत्रे होती. मनमोहिनीचे रहस्य उलगडणार होते. जसा त्या माणसाने गणपतीचा फोटो दूर केला, तसे म्युझियममध्ये असलेल्या पुतळ्याच्या चेहऱ्यावर क्रूर आणि रागीट भाव आले. पण ते बघायला तिथे कोणीच नव्हते...

(क्रमशः)


Rate this content
Log in

More marathi story from SAMPADA DESHPANDE

Similar marathi story from Thriller