Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

SAMPADA DESHPANDE

Thriller


3  

SAMPADA DESHPANDE

Thriller


मनमोहिनी - अंतिम भाग

मनमोहिनी - अंतिम भाग

16 mins 220 16 mins 220

मागील भागात चेतनला एक पुतळा सापडतो. एका अतिशय सुंदर स्त्रीचा तो तिला 'मनमोहिनी' असे नाव देतो. परंतु काही काळाने तो गुढरित्या मरण पावतो. आर्किओलॉजिस्ट च्या टीमला एक पुतळा सापडतो तसेच त्याची माहिती असलेले ताम्रपट सुद्धा मिळतात. पुढे ……………………………………….


देववाणी हि अत्यंत दुर्मिळ अशी भाषा. तिकडे जमलेल्या कोणालाच ती येत नव्हती. सगळे कुजबजु लागले. मग मनोहर गुरुजी सगळ्यांना म्हणाले, "माझ्या गुरूंनी ही भाषा मला शिकवली आहे. ते म्हणाले होते कि एक ना एक दिवस हि तुझ्या कामी येईल. बहुतेक तो एक दिवस आजचाच असावा. जर तुमची परवानगी असेल तर मी याचं भाषांतर करून देऊ शकतो." ते सर्वजण नावाजलेले आर्किओलॉजिस्ट होते त्यांनी आपापसात विचारविनिमय करून गुरुजींना एका अटीवर भाषांतर करायची परवानगी दिली. ती अट म्हणजे त्यांनी त्या सर्वांसमोर बसून भाषांतर करायचे. ती अट गुरुजींनी मान्य केली. दुसऱ्या दिवशी सकाळपासून भाषांतर चालू करायचे ठरले. ते ताम्रपट त्या लोकांनी ताब्यात घेतली. रात्री रूमवर गेल्यावर गिरीश म्हणाला,"गुरुजी काय वाटतं तुम्हाला काय असेल त्यात?" गुरुजी म्हणाले,"मलाही उत्सुकता आहे. ताम्रपट पाहून उद्या संध्याकाळपर्यंत भाषांतर पूर्ण होईल असे वाटते. फार नाहीतर फक्त त्या पुतळ्यासंबंधी माहिती असावी असे वाटते. तू जास्त विचार करू नकोस. उद्या सकाळी तू तुझ्या नेहेमीच्या कामाला जा. खूप रात्र झाली आहे झोप आता. दुसऱ्या दिवशी गुरुजी भाषांतर करू लागले. संध्याकाळी त्यांनी सर्वाना एकत्र बोलावले होते. मजुरांना यापासून लांबच ठेवण्यात आले होते. संध्यकाळी सगळे उत्सुकतेने जमले. गुरुजी म्हणाले," आता तुम्ही जे ऐकणार आहात ते फार पुरातन आहे.


“त्या राज्याचं नाव अशोकपूर होतं. जिथे आपण आता उभे आहोत. इतर राज्यांप्रमाणेच सुखी समाधानी राज्य. त्या राज्याच्या राजाला एक दुःख सलत होते ते म्हणजे त्याला आपत्य नव्हते. तो राजा गणेशभक्त होता. तो आणि त्याची राणी नित्य नेमाने गणपतीच्या देवळात जाऊन आले गाऱ्हाणे देवाला सांगत. अश्रू ढाळत. सगळे उपाय, नवस सायास करून झाले. राजा-राणी दिवसोंदिवस हताश होऊ लागले. अशातच एक दिवस राणीला दिवस गेले. गजाननाने त्यांची हाक ऐकली. राजाने गणपतीची मोठी पूजा बांधली. राज्यभर उस्तहाचे वातावरण पसरले. यथावकाश राणीने जुळ्या बालकांना जन्म दिला. एक मुलगा तो जणू पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे गोरा देखणा आणि एक मुलगी ती मात्र काळी तरीही सुंदर. राजाला दोन्ही बालकांना पाहून अतिशय आनंद झाला. त्याने संपूर्ण राज्यात मोठा उत्सव केला. मुलाचे नाव चंद्रकेतु आणि मुलीचे चंद्रलेखा ठेवले. हळूहळू मुले मोठी होऊ लागली. चंद्रकेतु राणीचा विशेष लाडका होता. ती त्याला जवळ घेऊन लाड करत असे. चंद्रलेखा मात्र काळी म्हणून राणी तिचा धिक्कार करत असे. राजा मात्र दोन्ही मुलांना सामान वागणूक देत असे. दोघांनाही त्याने उत्तम शिक्षण दिले. जेंव्हा जेंव्हा चंद्रलेखा बाहेर जात असे तेंव्हा लोक तिच्या काळ्या रंगाला पाहून नाक मुरडत. याचे तिला खूप वाईट वाटत असे. आपल्या पित्याप्रमाणेच तीही गणेशभक्त होती. तो रोज गणपतीला म्हणायची,"बाप्पा कारे मला असा रंग दिलास? सगळे माझा राग करतात. मलापण आईसारखी गोरी कर ना रे !"


हळूहळू तिने बाहेर जाणे सोडले. ती तिच्या खोलीतच गणपतीच्या मूर्तीची पूजा करू लागली. तिच्या मनात रंगाबद्दल एक न्यूनगंड निर्माण झाला. ती अबोल राहू लागली. फक्त गणपतीच्या भक्तीत ती दिवस घालवत असे. राजा तिला खूप समजावत असे," अगं बाळा ! रंगावर काय आहे ? तू किती सुंदर आणि गुणी आहेस! तुझ्याइतकी गोड पोरगी या जगात नाही. चल पाहू बाहेर." ती काहीतरी कारण सांगून वेळ मारून नेत असे. अशातच राजाने तिचे लग्न करायचे ठरवले. राजा तिला समजावत होता कि तिला नक्की खूप चांगला राजकुमार येईल. चंद्रलेखाही आपला भविष्याच्या स्वप्नात रमली. नक्की एखादा राजकुमार आपल्याला पसंत करेल याची तिला खात्री पटली. मग तिला दाखवण्यासाठी वेगवेगळ्या राजकुमारांच्या तसबिरी आणल्या. त्यातला राजकुमार सूर्यकांत तिला खूप पसंत पडला. तिने राजाला त्याबद्दल कळवले. राजा खूष झाला. त्याने ताबडतोब शेजारच्या राजाला निमंत्रण धाडले. राजकुमारासोबत तो आला वाजतगाजत तोफांच्या सलामीने त्यांचे स्वागत झाले. चंद्रलेखा सजून नटून समोर आली. राजाने आपल्या मित्रांसमोर चंद्रलेखा आणि राजपुत्र सूर्यकांत यांच्या विवाहाचा प्रस्ताव ठेवला. राजकुमार सूर्यकांत म्हणाला,"माफ करा महाराज तुम्ही जरी माझ्या वडिलांचे मित्र असाल तरी मी तुमच्या काळ्या मुलीला स्वीकारून माझे आयुष्य काळे करू इच्छित नाही. मी काळ्या रंगाचा तिरस्कार करतो." असे बोलून तो निघून गेला.


चंद्रलेखा या त्याच्या बोलण्याने खूप दुखावली. ती धावतच तिच्या महालात गेली. आणि रडू लागली. तिचे त्या राजकुमारावर मन जडले होते. आता आपण कोणाशीही लग्न करायचे नाही हा तिनी निश्चय केला. दुसऱ्या दिवशी ती एकटीच जंगलात निघून गेली. मन मानेल तसे भटकू लागली. तिचे चित्त सैरभैर झाले होते. थकून शेवटी ती एका झाडाखाली बसली. डोळ्यात पाणी आणून म्हणाली,"हे गजानना काय वेळ आणलीस माझ्यावर? काय पाप केलं मी म्हणून हा काळा रंग दिलास मला?" "चू चू चू अजूनही त्या देवाचाच धावा करतेस ज्यानी तुला इतके दुःख दिले?" चंद्रलेखानी आवाजाच्या दिशेनी पहिले. एक काळ्या कपड्यातली जख्ख म्हातारी बाई तिला बोलत होती.चंद्रलेखा म्हणाली, मग काय करू? तुझ्याकडे काही उपाय आहे का?" ती म्हतारी हसून म्हणाली, " आहे ना ! मी तुला अप्सरेसारखी सुंदर गोरीपान बनवीन. पण त्याबदल्यात तुला तुझ्या देवाला सोडावं लागेल आणि माझ्या देवाची पूजा करावी लागेल." "कोण आहे तुझा देव?" चंद्रलेखानी विचारले. "ते नंतर सांगीन आधी तयार आहेस का बोल?" ती म्हातारी म्हणाली खरंतर तिला चंद्रलेखाचे उत्तर माहित होते. "म्हणशील ते करायला मी तयार आहे." चंद्रलेखा निश्चयाने म्हणाली. ती म्हातारी हसून म्हणाली," मग उद्या संध्याकाळी या जागी ये. येताना आधी तुझ्या खोलीतली गणपतीची मूर्ती नदीत सोडून ये." चंद्रलेखाने ते मान्य केले. ती म्हातारी तिच्यासमोरून नाहीशी झाली.


मग दुसऱ्या दिवशीपासून चंद्रलेखा रोज जंगलात जाऊ लागली. ती म्हातारी तिला निरनिराळे पूजाविधी शिकवू लागली. दिवसोंदिवस चंद्रलेखाचा रंग उजळू लागला. सगळेच ते पाहून आश्चर्यात पडू लागले. चंद्रलेखा स्वतःला तासंतास आरशात न्यहाळात असे. तिच्या रूपाची कीर्ती सगळीकडे पसरू लागली. देशोदेशीच्या राजकुमाराच्या मागण्या तिला येऊ लागल्या. चंद्रलेखा सुखाच्या आकाशात विहरत होती. एक दिवस ती म्हातारी तिला म्हणाली ," सगळे विधी झाले आता एक शेवटचा विधी. इतके दिवस आपण जी पूजा केली ती तुझ्या रक्ताची आहुती देऊन केली. जसे जसे तुझे रक्त माझ्या देवाला दिले, तसा तो तुला सुंदर बनवत गेला. आता तुला आपले मानवत्व द्यावे लागेल." "म्हणजे मला समजले नाही. " चंद्रलेखा म्हणाली. "हे बघ तू तुझा देव सोडलास. त्याऐवजी सैतानाला देव मानलेस, आता तू मानवत्व सोड तुला चिरतरुण करण्याचे वचन मी देते. नाहीतर जे मिळाले आहे ते परत कर . परत पहिल्यासारखी काळी आणि तिरस्करणीय हो. बोल काय निर्णय आहे तुझा?" चंद्रलेखाला आपले सौंदर्य परत करायचे नव्हते. मग त्याबदल्यात तिला मानवत्व द्यावे लागले तरी तिची तयारी होती.


मग एका काळ्या रात्री तिने आपले मानवत्व देऊन पूर्णपणे सुंदर झाली. तिला दर आमावस्येला एका तरुणाचे रक्त प्राशन करायचे होते. तरच ती जिवंत राहू शकणार होती. ती राज्यात आली तिने. आल्या आल्या तिला राजाने निरोप धाडला. ती आल्यावर तो म्हणाला," बाळ ! गजाननाच्या कृपेने तू सुंदर झालीस. तू गजाननाची भक्त आहेस. तो उशिरा देतो पण भरभरून देतो. त्यानेच तुला माझ्या आयुष्यत आणले. मी फार भाग्यवान आहे कि तुझ्यासारख्या देवभक्त आणि सालस मुलीचा मी पिता आहे. आज मी तुला एका खास कारणासाठी बोलावले आहे. राजकुमार सूर्यकांतनी तुला मागणी घातली आहे. झाले गेले विसरून तू त्याच्या मागणीचा विचार कारावास असे वाटते. ये इकडे बोल त्यांच्याशी." पडद्याआडून राजकुमार बाहेर आला, तो तिच्यासमोर गुढगे टेकून बसला आणि म्हणाला," हे सुंदरी माफ कर मला माझी चूक झाली. मी तुझा अपमान करायला नको होता. परंतु आता माझे तुझ्यावर मन जडले आहे. कृपया माझा आणि माझ्या प्रेमाचा स्वीकार कर." चंद्रलेखाने त्याला हाताला धरून उठवले व लाजत त्याच्या प्रेमाचा स्वीकार केल्याचे वडिलांना सांगितले. राजा अतिशय आनंदित झाला. त्याने ताबडतोब लग्नाची तयारी सुरु केली. दोनच दिवसांनी आमावस्या होती. सूर्यकांतच्या प्रेमाचा स्वीकार करताना चंद्रलेखाच्या चेहऱ्यावर उमटलेले क्रूर भाव कोणीच पहिले नाहीत. अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी सूर्यकांतचे रक्त शोषलेले प्रेत त्यांच्या राज्याबाहेर सापडले. सर्वत्र एकच हाहाकार मजला. चंद्रलेखाने दुःखी असल्याचे नाटक करून स्वतःला महालात कोंडून घेतले. मग असेच प्रत्येक आमावस्येला एका तरुणाचे रक्त शोषलेले प्रेत सापडू लागले. एक दिवस राजपुत्र चंद्रकेतु राजाकडे आला त्याने या सर्वांचा चंद्रलेखाशी संबंध असल्याची शंका बोलून दाखवली.


त्यांनी चंद्रलेखा रोज रात्री महालातून गायब होऊ लागली तेव्हा तिच्या मागे गुप्तहेर सोडले होते. ती जंगलात जाऊन काही निषिद्ध विधी करते असे त्याला समजले होते. राजालाही चंद्रलेखामधला बदल कळत होता. मग एक दिवस राजाने चंद्रलेखाला बोलावले . तिचा तिच्या पित्यावर जीव होता. ती त्यांची आज्ञा मोडू शकत नव्हती. मग राजा तडक तिला घेऊन गणपतीच्या देवळात गेला. तिला गणपतीसमोर नेऊन म्हणाला,"बाळ तू काही वाईट करत नाहीयेस ना? ये गणपतीच्या पायावर डोकं ठेऊन मला सांग." जशी चंद्रलेखा गाभाऱ्यात जाऊ लागली तसे गाभाऱ्याच्या उंबरठ्याची एक अग्निरेखा तयार झाली. चंद्रलेखा मागच्या मागे फेकली गेली. तिने तिच्या देवाचा त्याग केला होता. तसेच देवानेही तिला नाकारले होते. राजा काय ते समजून चुकला. त्याने ताबडतोब त्याच्या गुरूंकडे दूत धाडले. पत्रात त्यांना सगळ्या परिस्थितीची कल्पना दिली. दुसऱ्या दिवशी आमावस्या होती. राजाने पहारा ठेवला. चंद्रलेखाला तिच्या महालात बंदिस्त केले. राजा शांत झोपला, राजकुमार चंद्रकेतूने पहाऱ्याची जबाबदारी घेतली होती. दुसऱ्या दिवशी राजाला जाग आली ती राणीच्या आक्रोशाने. राजा उठून धावत गेला तर राजपुत्र चंद्रकेतूचे प्रेत चंद्रलेखाच्या महालाबाहेर सापडले. त्याचे संपूर्ण रक्त शोषले होते. आता चंद्रलेखा गावाबाहेरील महालात राहायला गेली. तिने महालाला संपूर्ण काळा रंग दिला होता. इकडे काही दिवसातच हिमालयात तापासाठी गेले राजाचे गुरु राज्यात आले. त्यांना निरोप मिळाला नव्हता. एका आंतरिक प्रेरणेने ते राजाला भेटायला आले होते. ते येताच राजाने त्यांचा आदरसत्कार करून दुःखी मनाने त्यांना सर्व हकीगत सांगितली. गुरूंनी समाधी लावली. त्यांना सगळी हकीगत समजली. ते म्हणाले,"राजा! ती अतिशय प्रभावी शक्ती आहे. जिची राजकुमारी सेवा करते आहे. माहित नाही माझे तप यासाठी पुरे पडेल कि नाही. परंतु मी तिला पूर्णपणे नष्ट करू शकणार नाही. तसेच त्याचबरोबर तुझे राज्यही नष्ट व्हायचा धोका आहे बोल मी विधी सुरु करू का ? एकदा सुरवात केली कि मागे हेतू शकत नाही. "राजा म्हणाला," गुरुजी जर निरागस लोक वाचणार असतील तर माझे राज्य माझ्यासकट नष्ट झाले तरी हरकत नाही.


दुसऱ्याच दिवशी राजाने राज्य रिकामे करायला सुरवात केली. हळू हळू सर्व लोक स्थलांतरित होऊ लागले. काळ्या महालात असणाऱ्या चंद्रलेखाला याची कल्पना नव्हती. कोणी ना कोणी तरुण तिच्या रुपाला भाळून तिच्याकडे येणारच होता. याबद्दल ती निःशंक होती. राज्य रिकामे झाले. राजाने आपले सेवक, पहारेकरी, दासी यांनाही योग्य मानधन देऊन पाठवून दिले. राणीलाही तिच्या माहेरी पाठवले. आता राज्यात फक्त राजगुरू, राजा आणि चंद्रलेखा बाकी राहिले. गुरूंनी पूजेची तयारी सुरु केली. इकडे काळ्या महालात राजकुमारी आपले रूप आरशात न्याहाळत होती तेंव्हा तिला एक आवाज आला," अगं मूर्ख मुली ! आधी आरशात बघणं थांबव. तिकडे तुझ्या विनाशाची तयारी चालू आहे." चंद्रलेखानी वळून पाहिलं तर ती म्हातारी उभी होती. चंद्रलेखा हसून म्हणाली," म्हातारे ! कशाला काळजी करते माझ्यासोबत सैतानदेव असल्यावर मला कसली चिंता ?" म्हातारी म्हणाली," हो ना ? मग आपल्या देवाच्या पूजेची तयारी सुरु कर. मी सांगते तुला. दोन दिवसांनी आमावस्या आहे. तोपर्यंत ती पूजा संपन्न झाली पाहिजे नाहीतर तुला मरण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. 


राजगुरूंबरोबर बोलल्यावर राजाला चंद्रलेखा आणि चंद्रकेतूच्या जन्मानंतर केलेली भविष्यवाणी आठवली. राजजोतिषाने चंद्रकेतुचा तरुणपणी अपमृत्यू सांगितला होता. तर चंद्रलेखा हे राज्य सांभाळेल असे सांगितले होते. भविष्यातून आलेल्या देखण्या तरुणाशी तिचा विवाह होईल. तो तरुण राज्यावरचे संकट दूर करेल. असे भविष्य वर्तवले होते. परंतु हे काहीतरी विपरीत होत होते. असे का झाले ?,राजजोतिषाचे भविष्य का खोटे ठरले राजा विचार करत होता.   


इकडे राजगुरूंनी तयारी सुरु केली होती. आपल्याला यश मिळेल कि नाही याबाबत ते साशंक होते. म्हणून त्यांनी खबरदारीचा म्हणून एक दुसरा मार्ग तयार ठेवला होता. संधी एकाच मिळणार होती, त्यात चूक म्हणजे सैतानाची कायमची गुलामगिरी. त्यांनी दुसरा उपाय म्हणून चंद्रलेखाची चांदीची मूर्ती बनवून घेतली होती. तो उपाय करायची वेळ येऊ नये हीच इच्छा असे त्यांना वाटत होते. सर्व तयारी झाल्यावर ते म्हणाले,"राजा आता आपण तयार आहोत जर आपण यात यशस्वी झालो नाही तर आपल्याला प्राणत्याग करावा लागेल नाहीतर आपण कायमचे सैतानाचे गुलाम होऊ. विधी चालू करण्याआधी मी चंद्रलेखाला कसे नष्ट करायचे तो उपाय तसेच तिची संपूर्ण कहाणी या ताम्रपत्रांवर लिहून एका गुप्त जागी ठेवणार आहे, त्यावर श्रीगणेशाची मूर्ती ठेवणार आहे, जेणेकरून सैतान व त्याचे हस्तक त्याला हात लावू शकणार नाही. जर कधी तिने परत कहर माजवला तर तिला काबूत करून नष्ट करायचा उपाय यात आहे. आपल्याबरोबर हे नगर जमिनीच्या पोटात जाईल. चल गजाननाचे समरण करून आपल्या विधीला सुरवात करू या. "अजून एका ठिकाणी एक अघोरी यज्ञ आरंभला होता. सैतानाला प्रसन्न करण्याचा यज्ञ." आणि गुरुजी बोलायचे थांबले. "बस इतनाही? उपाय क्या है असे काबू मे लाने का?" प्रोफेसर गुप्ता बोलले. या गोष्टीमुळे हे हादरून गेले होते. "असे झाले तर ती हडळ साईटवरच्या सगळ्यांना मारून टाकेल आणि तिच्या रूपाने जगावर संकट ओढवेल." गिरीश घाबरून म्हणाला. "मला वाटतं ती शेवटची काही पानं नष्ट करण्यात आली असावीत. चंद्रलेखाने कोणत्यातरी माणसाला भुरळ पाडून ती नष्ट करायला लावली असावीत. हा फक्त एक तर्क आहे."


गुरुजी म्हणाले. "पण मग ती पूजा सफल झाली का ? चंद्रलेखाला राजगुरूंनी हरवलं का ?" आर्किओलॉजिस्ट टीम मधल्या एकाने विचारले. गुरुजी म्हणाले," आता इथेही तर्क करावा लागेल. चंद्रलेखा आणि राजगुरू दोघेही शक्तिशाली होते. परंतु इथे राजगुरू चंद्रलेखाला मारण्यात अपयशी ठरले असावेत. ते फक्त तिला पुतळ्यात कैद करण्यात यशस्वी झाले असावेत. हाच त्यांच्याकडे असलेला दुसरा पर्याय होता. त्यांनी तिला पुतळ्यात कैद करून त्या छोट्या खोलीत बंद केलं आणि त्या खोलीवर काही बंधने घालून ठेवली. या उत्तखननामुळे ती मंत्रांची बंधने तुटली आणि चंद्रलेखा काही काळासाठी पुतळ्यातून मुक्त होऊ लागली. तिने माणसांचे रक्त पिण्यास सुरवात केली. आता काही महिने असेच करत राहिली तर ती तिच्या पूर्णरूपात येईल आणि जगावर मोठे संकट येईल. ती सध्या पुतळ्याच्या बंधनात आहे तोपर्यंतच काहीतरी करता येईल." "फिर करो कुछ. गुरुजी इसका इलाज आपही कर सकते हो." गुप्ता हात जोडून म्हणाले."मी प्रयत्न करिन नक्की. थोडा वेळ द्या." गुरुजी हात जोडून म्हणाले. त्यांनी आपल्या बॅगमधून एक गणेशाची मूर्ती काढली. ती हुबेहूब त्या काळ्या महालात सापडलेल्या मूर्तीसारखीच होती. गरुजींच्या गुरूंनी त्यांना दिली होती," वेळ आल्यावर हि मूर्ती बाहेर काढ तीच तुला मदत करेल." असे त्यांनी सांगितले होते. ती त्यांच्या गुरूंकडे कशी आली हे त्यांनी विचारले नव्हते. फक्त ते रोज नियमाने त्याची पूजा करत होते. जेंव्हा त्या काळ्या खोलीत त्या मूर्तीचे चित्र पाहिल्यावर 'ती' वेळ आली हे त्यांना समजले होते.


त्यांनी ती मूर्ती काढून पूजा केली. समोर मांडलेल्या बैठकीवर तिला ठेवले, त्यांच्या गुरूंनी सांगितलेला मंत्र म्हटला आणि डोळे मिटून घेतले. त्यांना सांगण्यात आले होते कि त्या मूर्तीतून साक्षात गजानन येऊन बोलतात, परंतु ते प्रकट असताना कोणीही त्यांना पाहू नये कारण त्यांचे तेज सामान्य माणसाच्या दृष्टीस नाही, डोळे घट्ट मिटून घ्यावेत. जर कोणी हे पहिले तर तो मानव तात्काळ आंधळा होऊन मृत्युमुखी पडतो. गुरुजींनी डोळे घट्ट मिटून घेतले होते. तरीही खोलीत पसरलेले तेज त्यांना जाणवले. गजानन प्रकट झाले होते. गरूजीनी मनात धरलेली इच्छा त्यांना जाणवली व त्यावर करायचा उपायही त्यांना समजला. एखादी वीज चालून जावी तितक्या सेकंदात हे सगळं झालं. गुरुजींनी डोळे उघडले तेंव्हा समोरील मूर्तीही अंतर्धान पावली होती. याच कामासाठी ती त्यांना देण्यात आली होती. मग गिरीश शेजारच्या खोलीत झोपला होता. गुरुजींनी त्याला बोलावून आणले. मग ते म्हणाले," गिरीश चंद्रलेखाला थांबण्याचा उपाय मला सापडला आहे. जर ह्या सगळ्या गोष्टी आधीच रोखल्या असत्या तर हि वेळच आली नसती. राजकुमार सुर्वाकांतने जर चंद्रलेखाचा अपमान केला नसता तर ती त्या म्हातारीच्या आहारी गेली नसती. पण ते विधिलिखित होतं, सूर्यकांतचा मृत्यू अटळ होता. आता जे विधिलिखित नव्हतं ते आपल्याला बदलायचं आहे. त्यासाठी मला तुझी मदत लागेल. बोल आहेस तयार ?" गिरीश म्हणाला," पण ज्या गोष्टी भूतकाळात घडून गेल्या त्या कशा बदलणार?" गुरुजी हसले," भूतकाळात जाऊन. आता मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐक, तुझ्या एका निर्णयावर बरंच काही अवलंबून आहे." मग गुरुजींनी त्याला सर्व सांगितले.


हे ऐकून गिरीशचे डोळे विस्फारले तो म्हणाला," समजा यासाठी मी नाही म्हणालो तर ?" गुरुजी म्हणाले ," तो तुझा हक्क आहे बेटा. तू नाही म्हणालास तरी मला जावेच लागेल. गजाननाचे कार्य आहे. त्यात मला खारीचा वाटा उचलायला मिळतोय हे माझे भाग्य." दुसऱ्या दिवशी गुरुजींनी तो काळा महाल खाली करून साफ करून घेतला. कोणतेही मजूर किंवा कोणीही तिकडे फिरकले नाही पाहिजेत अशी ताकीद गुप्ता साहेबांना दिली. मग त्यांनी पुतळा सांपडलेल्या खोलीत आपले आसन मांडले. ते खोलीचा दरवाजा बंद करणार इतक्यात गिरीश समोर येऊन बसला," या जगाला वाचवण्यासाठी माझाही खारीचा वाटा उचलू दे . मी तयार आहे." गुरुजींनी पाणावलेल्या डोळ्यांनी त्या उमद्या तरुणाकडे पहिले. मग त्यांनी त्या खोलीचा दरवाजा बंद केला. " हे बघ गिरीश आपण भूतकाळात हस्तक्षेप करणार आहोत. तेंव्हा जे काही करशील ते जपून. आधी आपण फक्त निरीक्षण करणार आहोत. मग आपले रूप उघड करणार आहोत. मी आता आपल्या दोघांच्या हाताला एक बंधन बांधणार आहे. जेणेकरून आपण भूतकाळात एकत्र राहू आपली ताटातूट होणार नाही. हा काळा धागा आपल्याला एकत्र ठेवेल. आता डोळे मिटून घे."


गिरीशला एका प्रचंड वावटळीत सापडल्याचा भास झाला. मग हळूहळू सगळे शांत होतं गेले. डोळे उघडले तर समोर अशोकनगर पूर्वीच्या दिमाखात उभे होते, सुंदर आणि रेखीव. या सर्वांशी विसंगत होता तो काळा महाल. ज्याच्या समोर ते उभे होते. मग गुरुजींनी हळूच इशारा केला. ते महालाच्या एका खिडकीतून डोकावत होते. ती अमावस्येची रात्र होती. चंद्रलेखा आरशासमोर उभी होती तिची बळी घेण्याची रात्र. इतक्यात मागे ती म्हातारी आली. आणि चंद्रलेखामध्ये सामावून गेली. मग चंद्रलेखा महालात आली. तिथे सुंदर हंड्या झुंबरे लावली होती. वादक मधुर वाद्य वाजवत होते. चंद्रलेखाची वाट बघत एक कोवळा तरुण बसला होता. तिनी त्याला हाताने इशारा केला आणि त्याला अंतःपुरात घेऊन गेली. हे सगळं पाहणाऱ्या गिरीशला राग अनावर झाला होता. गुरुजींनी त्याला एका झाडाखाली नेले.," अहो ती म्हातारी चेटकीण चंद्रलेखाला फसवते आहे. हे नीच कृत्य ती म्हातारी करते आहे. शरीर चंद्रलेखाचे वापरते आहे." गिरीश रागाने म्हणाला. गुरुजी म्हणाले," हेच आपण चंद्रलेखाला पटवून द्यायचे आहे. " मग दुसऱ्या दिवशी चंद्रलेखा जंगलात फिरायला गेली होती. इतक्यात एका वृक्षावर वेटोळे घालून बसलेल्या एका प्रचंड अजगराने तिच्यावर हल्ला केला. ती त्याच्याशी झगडत होती. आपला मृत्यू आला असे तिला वाटले आणि अचानक तिच्या तोंडून निघाले," वाचव रे गजानना." तेवढ्यात झाडामागून गिरीश बाहेर आला त्याने हातातील तलवारीने त्या अजगराला जखमी केले, अजगराने वेटोळे सोडताच त्याने चंद्रलेखाला मुक्त करून त्या महाकाय सापाचे दोन तुकडे केले. चंद्रलेखा म्हणाली," आपले आभार आपण माझा जीव वाचवला आपण कोण आहेत?" इतक्यात झाडामागून गुरुजी बाहेर आले," ते म्हणाले ," हे राजकुमार गिरीशसेन आणि मी त्यांचा राजगुरू दूरच्या देशातून आलो आहे. त्यांचे राज्य शत्रूने जिंकले. आता त्यांना कोणीच नाही. कुठेतरी वनात राहून जगतो आम्ही. " चंद्रलेखा म्हणाली," मग आपण माझ्या महालात चला. माझा पाहुणचार घ्या. माझा खूप मोठा महाल आहे. आपण माझा जीव वाचवला आहे. माझ्या आतिथ्याचा स्वीकार करा." "कशाला ? आम्हला मारून रक्त प्यायला ? तुझे सगळे प्रताप आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेत." गिरीश चिडून म्हणाला. चंद्रलेखा चपापली" नाही हो ! मी नव्हते तशी. मी गणपतीची भक्त होते. काळी होते म्हणून लोक माझा धिक्कार करायचे. मला आवडलेल्या राजपुत्राने मला नाकारले म्हणून सूड घेण्यासाठी मला हे पाऊल उचलावे लागले. माझा सगळ्या जगावर राग होता. मी कोणालाच आवडत नव्हते." गिरीश म्हणाला," स्वतःच्या चुकांचे खूप चांगले समर्थन करता येते तुला. एका राजपुत्राने नारकरले तेंव्हा तू असा का विचार केला नाहीस कि तोच माझ्या योग्य नव्हता, कारण तो बाह्य रुपाला महत्व देत होता. वाट का पहिली नाहीस ? तुझं मन तर सुंदर होतं ना ? मग इतकं मोठं काय झालं ज्यामुळे तू सैतानाला तुझं मानवत्व अर्पण केलंस?" "बोलणं सोपं असतं राजकुमार . कृती कठीण असते." अचानक आलेल्या आवाजमुळे सगळे दचकले." मागे ती म्हातारी उभी होती," बोला राजकुमार जर हि मुलगी काळी असती तर तुम्ही तरी स्वीकारली असती का पत्नी म्हणून?" गिरीश बोलला," नक्कीच स्वीकारली असती. कारण माझ्यासाठी तिचं मन सुंदर असणं जास्त महत्वाचं असतं. राजकुमारी आणि तू असं का म्हणतेस कि तुझ्यावर कोणीच प्रेम करत नव्हतं. तुझे वडील, तुझा भाऊ यांनी तुझ्यावर कधीच प्रेम केलं नाही का ? आठव." चंद्रलेखाला तिच्या भावासोबत घालवलेले क्षण आठवले. तो सगळ्यांपासून तिचे सारखं रक्षण करायचा. कोणी तिला काळी म्हटलं कि त्यालाच जास्त राग यायचा. तिचे वडील त्यांचा तर ती जीव होती. त्यांच्या आठवणीने तिच्या डोळ्यात पाणी आलं. चंद्रलेखा आपल्या हातातून जात आहे हे समजल्यावर ती म्हातारी म्हणाली," हे बघ राजकुमारी. त्यांचं काही ऐकू नकोस. तुला तुझं ते पूर्वीच रूप परत हवंय का ? आठव जरा लोक तुझ्याकडे बघून कसं नाक मुरड्याचे ते. तू आता चिरतरुण होणार आहेस आता मागे फिरलीस तर सगळंच गमावशील."


गुरुजी म्हणाले ,"हो चंद्रलेखा आता मागे फिरलीस तर या म्हातारीला तुझं शरीर कसं मिळेल. ती तुझ्या शरीरात प्रवेश करून तुझ्या आत्म्याला काढून टाकणार आहे. म्हणजे तिचं हे जीर्ण शरीर तिला सोडता येईल. तिने सैतानाशी हाच करार केला आहे. ते तुझं शरीर तिला देऊन तिला चिरतरुण करणार आहेत." म्हातारी उसळून म्हणाली," नाही त्यांचं ऐकू नकोस. ते खोटं बोलत आहेत. विचार या राजकुमाराला तू काळी झालीस तर तुझ्याशी लग्न करून हा इथे कायमचा राहील का ?" चंद्रलेखानी प्रश्नार्थक नजरेनी गिरीशकडे पहिले. गिरीश म्हणाला ," हे राजकुमारी जर तू सैतानाची साथ सोडणार असशील तर मी कायमचा तुझा होऊन राहायला तयार आहे." गिरीशने तिचा हात धरला आणि तो निघाला. ती म्हातारी आक्रोश करत त्यांच्या मागे निघाली. गिरीश तिला घेऊन गणपतीच्या देवळात आला. तिथे तिचे वडील आणि राजगुरु होते. गिरीशने गणपतीपुढील कुंकू उचलले आणि तिच्या कपाळावर लावून म्हणाला," या गजाननाच्या आणि येते उपस्थित असलेल्या सर्वांच्या साक्षीने मी तुला माझी पत्नी मानत आहे. " त्याने असे करताच ती म्हातारी जोरात किंचाळली आणि जागीच जळून भस्म झाली. म्हातारीचा मृत्यू होताच सैतानाचा पृथ्वीवर प्रवेश करायचा दुवा नष्ट झाला होता. पृथ्वी सुरक्षित झाली होती. ती नष्ट होताच चंद्रलेखाच्या शरीरातून काळ्या रंगाचा धूर निघून नाहीसा झाला. चंद्रलेखा पूर्वीप्रमाणेच काळी झाली. गिरीश तिच्यासमोर गुढगे टेकून बसला आणि म्हणाला," हे सुंदरी ! तू माझा पती म्हणून स्वीकार करशील का ? मि स्वतःला भाग्यवान समजेन." चंद्रलेखाने लाजून होकार दिला. मग गिरीश तिला हाताला धरून गाभाऱ्याकडे निघाला. दारात ती अडखळली. तिला मागची आठवण झाली. आताही देवाने आपल्याला नाकारले तर ! तिच्या मानत आले. पण तसे काहीच झाले नाही. गिरीश आणि तिचा विवाह संपन्न झाला. विवाह सोहळा झाल्यावर गिरीश चंद्रलेखाला म्हणाला," राजकुमारी आजपासून मी तुझे चंद्रलेखा नाव बदलून 'मनमोहिनी ' असे ठेवत आहे. तुझ्या सौंदर्याला हे नाव शोभून दिसेल. तुझी हरकत नाही ना ?" चंद्रलेखाला नाव खूप आवडले हे तिच्या चेहऱ्यावरूनच दिसत होते.  

 

गुरुजींची निघायची वेळ झाली. गिरीशला कायमचे तिकडे राहावे लागणार होते. पण जगाच्या भल्यासाठी तो भूतकाळात राहायला तयार झाला. निघताना गिरीशने त्याच्या हातावरचे बंधन तोडले. गुरुजींना वाकून नमस्कार केला, गुरुजींच्या डोळ्यात पाणी तरळले," बाळ ! तुझे बलिदान जरी कोणाला कळले नाही तरी मी कधीच विसरणार नाही. गजानन तुझे भले करेल. निघताना गुरुजींनी राजगुरुंकडे पाहिले. त्यांना राजगुरूंचा चेहरा अगदी हुबेहूब त्यांच्या गुरूंसारखा दिसला. तेही गुरुजींकडे पाहून गूढ हसले. गुरुजी त्या छोट्या काळ्या खोलीत आले. मंत्र म्हटला आणि डोळे मिटून घेतले. गुरुजी कोकणातल्या त्यांच्या घरी होते. सगळे संपले होते.


“राजस्थानजवळ एक गाव सापडले. उत्खननात खूप गोष्टी सापडल्या. एक राजधानीचे शहर असावे, शहराबाहेर एक काळ्या रंगाचा महाल पडीक अवस्थेत सापडला.” टीव्हीवर न्यूज चालू होत्या. गुरुजी पाहत होते. त्यांना गिरीशची आठवण झाली. आता त्या साईट वर चेतन आणि विजय असणार नव्हते कारण त्यांचा मृत्यू निश्चित होता. गिरीश त्याच्या मनमोहिनीबरोबर सुखाने संसार करत असेल. गुरुजींनी डोळे पुसले आणि टीव्ही बंद केला.

(समाप्त)                                             


Rate this content
Log in

More marathi story from SAMPADA DESHPANDE

Similar marathi story from Thriller