मी डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी बोलतेय
मी डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी बोलतेय


नमस्कार! ओळखलंत का मला?? बरोबर मी डॉ. सौ आनंदी गोपाळ जोशी. भारतातील पहिली स्त्री डॉक्टर... तुम्हाला असा प्रश्न पडला असेल न की मी आज इथे का आलीय? तुम्हाला सगळ्यांना माझी कहाणी माहितेय, पण तरीसुद्धा मी आज तुमच्यासमोर ती पुनःच मांडायला आलेय.
असं म्हणतात की परिसाचा स्पर्श झाल्याने लोखंडाच सोनं होतं हे कितपत खरंय ते मला नाही माहीत,पण एवढं मात्र माहितेय की आमच्या ह्यांच्यामुळे माझ्या आयुष्याचं सोनं झालं.
माझ्या माहेरी मुलींना शिकण्यासाठी मनाई च होती, कारण रूढी परंपरांना च धरून चालणारं कुटुंब होतं माझं. मुलींना शिकवणं हे त्या काळी पाप मानलं जायचं. बाईने चूल आणि मूल करायचं एवढंच तिला घोटून घोटून सांगितलं जायचं. पण या जगात अश्या ही काही व्यक्ती असतात ज्यांना काळाच्या पुढचा विचार करण्याची देणगी लाभलेली असते! पण अशी माणसं फार कमी असतात, योगायोगाने माझं लग्न अशाच एका चमत्कारिक माणसाशी झालं, ज्यांचं नाव गोपाळ जोशी. (आज पहिल्यांदाच ह्यांच नाव घेतलं मी) खरंतर पहिल्या भेटीतच मला जाणवलं होतं की हा माणूस हा काहीतरी वेगळा आहे, कारण ह्यांना मला शिकवायचं होतं.. हट्टी, तिरसट, व मनाचा थांगपत्ता न लागणारे असे माझे हे.... स्त्रियांविषयी त्यांच्या मनात कायमच तळमळ होती..
मी शिकले सवरले डॉक्टर झाले ते ह्यांच्यामुळेच.. डॉक्टर होण्याचा निर्णय म
ाझा होता तरी सुद्धा निर्णय घेण्याइतकी बुद्धिमत्ता, विदवत्ता व धाडसीपणा मला ह्यांनीच दिलाय.
मला शिक्षण घेताना अडचणी यायला नकोत म्हणून वेळप्रसंगी ख्रिस्ती धर्माचा सुद्धा स्वीकार करण्यास ह्यांनी पुढाकार घेतला,पण मला तो निर्णय मान्य नव्हताच, मला माझ्याच धर्मात राहून शिक्षण पूर्ण करायचं होतं. हं आता थोडा हट्टीपणा मी त्यांच्याकडून च शिकले होते...
मी परदेशात गेले, रात्रंदिन अभ्यास केला, खरंतर परदेशातील वातावरण मला नाही सहन झालं, पण ह्यांच पत्र वाचलं कि पुन्हा उर्मी यायची. आणि मग अभ्यासाला लागायचे.. अथक परिश्रमानंतर मी डॉक्टर झाले... मी डॉक्टर झाले कारण ह्यांनी मला शिकवलं, मी डॉक्टर झाले कारण ह्यांनी मला तिथपर्यंत जाण्यासाठी अभ्यास करण्याच धैर्य दिलं...
मी आज तुम्हाला हे का सांगतेय कारण आपण नेहमी म्हणतो प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते,पण आपण हे ही लक्षात घ्यायला हवंय की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागेही पुरुष असतोच.. तो पुरुष मग बाप असेल,भाऊ,नवरा,सासरा कोणीही असू शकतो.आजच्या मुली शिकतात मोठ्या होतात खूप छान वाटत त्यांच्याकडे बघून...अश्याच छान छान शिका आणि साऱ्या जगात स्त्री शिक्षणात अग्रेसर असलेला देश आपल्या भारताला बनवा, हेच सांगायला मी आलेय...
चला,फार वेळ घेतला मी तुमचा, निघते..