प्रिय माझ्या मना
प्रिय माझ्या मना


प्रिय माझ्या मना, आज मी अगदी मनापासून ठरवलंय, तुझ्याशी बोलायचं.. बघ ना, दिवसभर हजारो लोकांशी आपण बोलतो पण स्वतःशी बोलायला मात्र विसरून जातो, कदाचित आपण स्वतःला तितकं महत्व देत नाही का?.. पण तुला खर सांगू, दिवसभर जगाशी जरी आपण बोललो पण स्वतःशी नाही बोललो की अक्षरशः काहीतरी missing आहे असं वाटतं..
आज मी ठरवलंय तुझे आभार आणि तुझं कौतुक ह्या पत्राद्वारे मी करणार आहे. का माहितेय,कारण तू माझ्याशी कधीच खोटं बोलत नाहीस...तू माझं सगळं म्हणणं आधी ऐकून घेतोस व त्यानंतर तुझी प्रतिक्रिया देतोस,आणि त्याबद्दल मी तुझे कधीच आभार नाहीत रे मानले.. खरंच चुकलं माझं.. नकारात्मक विचारांच्या गर्दीतून तू मला नेहमी वाचवत आलायस ना.. तू मला नेहमी सत्याची बाजू घ्यायला लावतोस, असं म्हणतात की ज्याचा आपल्या मनावर ताबा असतो तो सम्पूर्ण जग जिंकतो हे विधान कितपत खरंय नाही माहीत ,पण मी इतकं मात्र नक्की सांगू शकते की जो आपल्या मनाशी प्रामाणिक आहे तो व्यक्ती कधीच दुःखी नाही होऊ शकत...
तुला माहितेय ना मना, मी तुला कायमच वाईट विचारांपासून, वाईट गोष्टींपासून लांब लांब ठेवलंय, कोणीतरी असं म्हणलंय की शरीर साबणाने स्वच्छ करता येतं पण मन कशाने स्वच्छ करायचं? त्यावेळेस तू आतून बोललास मला की चांगल्या विचारांनी मन शुद्ध होतं, अगदी झऱ्याच्या खळखळून वाहणाऱ्या पाण्यासारखे नितळ मन होऊ शकतं... तुला माहितेय न मी तुझ्याशी दिवसातून कमीत कमी एकदा तरी बोलतेच.. बोलते म्हणण्यापेक्षा मी तुला सल्ले विचारते आणि तू मला योग्य मार्गदर्शन करतोस...अगदी ड्रेस कोणता घेऊ इथपासून ते आज अभ्यास कोणत्या विषयाचा करू इथपर्यंत तू कायमचं मला योग्य सल्ले देत आलायस, आणि तुझं ऐकल्यामुळे कायमच मला त्याचा लाभच झालाय....
तुला खरं सांगू मना, तू मला सगळ्यात जास्त ओळ्खतोस.. अर्थात तू माझं मन आहेसच पण त्याहून सगळ्यात जवळ असलेली मैत्रिणीच्या स्वरूपात आहेस...तू मला माणुसकी शिकवतोस, जेव्हा जेव्हा मी हतबल होते तेव्हा तेव्हा तू मला उभारी देतोस, ही वेळही जाईल हे वाक्य तर सारख तूच सांगतोस ना मला?सत्यनिष्ठ, कर्तव्याशी प्रामाणिक रहायला आपल्या ध्येयासाठी अडून राहायला तूच शिकवल ना मला?
तुला माहितेय,मी जेव्हा लहान होते तेव्हा आई बाबा आजी सगळेजण तुझ्यावर खूप चांगले संस्कार करायचे, आणि त्याच संस्कारांचं रूपांतर आज विचारांत झालंय हे सगळं तुझ्याच मुळे झालंय ना रे...
डोळे आपल्याला हे सुंदर जग दाखवतात, हृदय आपल्याला जिवंत ठेवतं, पायामुळे आपण उभारू शकतो,धावू शकतो ,नाचू शकतो,शरीरातील प्रत्येक अवयव हा माणसासाठी तितकाच मह
त्वाचा तर आहेच पण आपण या सगळ्यामध्ये मन नावाचा एक घटक विसरून जातो ,बरोबर ना?
खरंतर लहानपणी मनावर केलेले योग्य संस्कारच माणसाला एक आदर्श नागरिक बनवतात..त्यामुळं त्यावरती खूप विचारपूर्वक संस्कार करायला पाहिजेत ..मनामुळे भावना आहेत,मनामुळे च ओठावर हसू आहे डोळ्यात पाणी येतं ते कोणामुळे? त्या भावनांमुळेच ना? एवढं सगळं असूनही आपण त्याचे आभार कधीच मानत नाही... खरतर शरीरातील प्रत्येक अवयवांशी प्रेमाने एक मिनिट का असेना संवाद साधवाच.. त्यांना म्हणावं की अरे बाबांनो, तुम्ही माझ्यासाठी जे काम करताय ते अमोल आहे,तुमच्या उपकारांची परतफेड मी कधीच नाही करू शकणार ..........
आणि दिवसातील एक अर्धा तास तरी आपण स्वतःच्या मनाला वेळ द्यायला पाहिजेच... त्याशिवाय का ते तंदुरुस्त ,निरोगी राहील.??
हे माझ्या मना मी तुला प्रॉमिस करते की मी दररोज तुला नक्की वेळ देईन आणि तू असाच चांगल्या विचारांनी सकारात्मकतेने बहरत जावो हीच प्रभूचरणी प्रार्थना
उगीचच का समर्थ रामदासांनी लिहलय ह्या ओळींनी खरंच आयुष्याचं कृतार्थ होईल....
मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे....
मना वासना दुष्ट कामा न ये रे। मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥ मना सर्वथा नीति सोडूं नको हो। मना अंतरीं सार वीचार राहो
मना पापसंकल्प सोडूनि द्यावा। मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥ मना कल्पना ते नको वीषयांची। विकारे घडे हो जनी सर्व ची ची नको रे मना क्रोध हा खेदकारी। नको रे मना काम नाना विकारी॥ नको रे मना सर्वदा अंगिकारू। नको रे मना मत्सरु दंभ भारु। मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे। मना बोलणे नीच सोशीत जावें॥ स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे। मना सर्व लोकांसि रे नीववावें
नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे। अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥ घडे भोगणे पाप ते कर्म खोटे। न होतां मनासारिखें दु:ख मोठे
मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी। जितां बोलती सर्वही जीव मी मी॥ चिरंजीव हे सर्वही मानिताती। अकस्मात सांडूनिया सर्व जाती।।
मना सर्वथा सत्य सांडूं नको रे। मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे॥ मना सत्य ते सत्य वाचे वदावे। मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें॥
खरंच मनाची सुंदरता ही शरीराच्या सुंदरतेपेक्षा अधिक आहे,आणि त्यासाठी मनाशी चांगल्या गोष्टीचा संवाद साधणे गरजेचे आहे... बरोबर ना?? चला फार च वेळ घेतलाय मी तुमचा, आता नाही वेळ घेणार, राम राम निरोप घेतो मी आता......
कळावे ,
तुझंच शरीर