मी आणि सांगण्यासारखे बरेच काही
मी आणि सांगण्यासारखे बरेच काही
मी... आणि सांगण्यासारखे बरेच काही
– गिरीश
---
आठवणींचा प्रवास
आपल्याकडे नेहमी सांगण्यासारखं काहीतरी असतं — पण आपण व्यक्त होत नाही.
भूतकाळातील क्षण, घडलेल्या घटना, काही हरवलेली ठिकाणं — या सगळ्यांचा विचार आला की मनात शब्द उसळतात, व्यक्त होत नाहीत.
हे व्यक्त होणं खूप महत्त्वाचं असतं.
संवाद — नात्यांची जीवरेखा आहे.
आजकाल मात्र संवाद कमी झालाय.
मैत्री तुटते, विवाह टिकत नाहीत — कारण एकच, संवादाचा अभाव.
जुना महाद्वार रोड आणि वाईकरांचा वडा
आज मी महाद्वार रोडवर गेलो होतो.
फडकेंचं होमिओपॅथीचं दुकान दिसलं आणि एकदम आठवलं —
कोल्हापुरातला पहिला “मोठा वडा”, ज्याला आता जंबो वडा म्हणतात!
वाईकरांचा वडा — फक्त दोन रुपयांत इथेच मिळायचा.
पण आता वाईकर नाही, आणि त्यांच्या वड्याचा मागमूसही नाही.
आताच्या पिढीला “वाईकर हॉटेल” हे नाव माहीतही नाही.
लक्ष्मीपुरीच्या चवी
घिसाड गल्लीच्या सुरुवातीला एक छोटे हॉटेल होते —
तिथे आम्ही पापडी-कांदा, गोड खाजा आणि बालुशाही खात असू.
आज त्या जागेवर गेलं तरी ठिकाण ओळखता येत नाही.
शारदा कॅफेत आता अमेरिकन भेळ नसली, तरी कोबीवडा अजून मिळतो —
आणि तसा कोबीवडा कोल्हापुरात दुसरीकडे कुठेच नाही!
खत्री स्वीट मार्ट म्हणजे आमचं सणाचं ठिकाण.
पतिशा — माझी आवडती बेसन वडी.
अलिकडे विचारलं, “पतिशा आहे का?”
तर मालक हसत म्हणाले — “आता तो काळ गेला, पदार्थ बदलले!”
हरवलेली आईसक्रीम्स आणि बदलता काळ
तृषाशांतीमध्ये केशरी आईसक्रीम मागितलं,
तर तरुण मालकच विचारतो — “ते कुठलं आईसक्रीम?”
एकेकाळी शेजारी ड्युक्समध्ये पण केशरी आईसक्रीम आणि लस्सी मिळायची.
आता दोन्ही काळाच्या पडद्याआड गेलंय.
पुरोहित स्वीट मार्ट, उडपी हॉटेल — आठवणींचा तुकडा आता फक्त नावापुरता उरलाय.
सुभाष रोडवरील डॉ.जाधव हॉस्पिटल समोरचे एक छोटेसे हॉटेल. आत जाताना पांढराशुभ्र शर्ट घातलेले पन्नाशीचे हसतमुख मालक दिसायचे आणि हॉटेलच्या नावाप्रमाणेच समाधान वाटायचे. हातापाशी असलेले फडके घेउन काउंटर पुसायचे. टेबल रिकामे झाले की स्वच्छ.
त्या मालकांच्या स्वच्छतेचा आग्रह, त्यांच्या वागण्यातील आपुलकी —
आजच्या प्लास्टिकच्या खुर्च्यांत सापडत नाही.
रविवारचा बाजार आणि चविष्ट ठिकाणं
बिंदू चौकातून रविवार बाजारात जाताना
चंदू डेअरीचा चक्का.
जैन बस्तीतील केशर,
दीपक चिवडा आणि ओ.के. सलून — सगळं काही “कोल्हापुरी”चं वैशिष्ट्य.
पार्वती हॉटेलमधला सुक्यातल्या रश्श्याचा स्वाद अजून आठवतो.
कॉमर्स कॉलेजसमोर कटवडा मिळणारे पार्वती हॉटेल ही आमची खास जागा होती.
पेरीना, कोझी कॉर्नर आणि ते दिवस
पेरीना आईसक्रीम पार्लरमधला तो काळ —
मेन्यूवरील प्रत्येक फ्लेवर खायचाच असा हट्ट!
फेमिला नावाच्या फिरत्या गाड्यांवरचं आईसक्रीम —
त्या गाड्या जणू आमच्या आठवणींच्या गल्लीतून फिरतात अजूनही.
कोझी कॉर्नर बारमध्ये एकदा राजकीय चित्रपटाचे दिग्दर्शक भेटले होते.
त्यांच्याशी बोलून आम्ही भारावून गेलो!
शहराच्या कोपऱ्यांतील सुगंध
पद्मा-शाहू टॉकीजच्या समोरील पाणीपुरी गाड्या अजून आहेत,
पद्मा गेस्ट हाउस अजूनही तग धरून आहे.
म.प्र. चौकातील कोल्हापूर हॉटेलमधलं मुर्ग मुसल्लम — पहिल्यांदा तिथेच चाखलं होतं.
अम्रत हॉटेल म्हणजे आमचं कौटुंबिक ठिकाण.
जेवण झालं की लक्ष्मीपुरी पोलिस स्टेशनजवळच्या शर्मा कोल्डड्रिंक हाऊसमध्ये
मॅलो-जॅलो खाणं आणि गोविंद विड्याचं पान घेणं — ही संध्याकाळ पूर्ण होत असे.
कॉलेजच्या आठवणी आणि सुगंधी भजी
सायन्स कॉलेजसमोरचं प्रभात,
आणि पुढचं मिलन हॉटेल — तिथल्या कांदा भजीचा सुगंध अजून जिभेवर आहे.
भजी मिळण्याची वाट पाहणं हेच त्या काळचं रोमँस होतं!
आज जागा रिकामी दिसली की आत जाण्याची इच्छाच होत नाही,
पण मन मात्र म्हणतं — “जुने मित्र जमू देत, आणि ती भजी पुन्हा खाऊया!”
कोल्हापूर ते सोलापूर — चवींचा प्रवास
लकी स्टोअर्स, अशोक हॉटेल, चोरगे मिसळ,
वरुणतीर्थ वेसचा लोणी डोसा, विठाई, पुडाची वडी —
प्रत्येक ठिकाण म्हणजे एक कथा.
घाटगे-पाटील इंडस्ट्रीजजवळचं हॉटेल —
तिथलं चिकन, अंडा मसाला आणि शेवटी गरम जिलेबी!
कोल्हापुरात इडली-सांबारची ओळख करून देणारा समर्थ,
आणि सोलापुरात सकाळी स्टँडवरील इडली आणि शाकाहारी थाळीत मिळणारे छोटे पुरणाचे वडे—
या दोन्ही शहरांनी “जिभेचा संस्कार” घडवला.
चव – आठवणींची
आज विद्यापीठ शाळेजवळचे चाटवाले अजूनही आहेत,
पण चव बदललीय, भाव वाढलाय, आणि लोकांची घाईही.
पण त्या काळच्या साध्या, मनमिळाऊ गप्पा आता मिळत नाहीत.
अशा या आठवणींच्या, चवींच्या, आणि जिभेच्या चोचल्यांच्या गोष्टी सांगत बसलो की —
जाणवतं, अजून किती काही सांगण्यासारखं आहे...
सध्या थांबतो.
गिरीश
