Jyoti gosavi

Classics

3  

Jyoti gosavi

Classics

महाराष्ट्राच्या निर्मितीत

महाराष्ट्राच्या निर्मितीत

3 mins
165


अहो मुळात कोणत्याच गोष्टीच्या निर्मितीमागे स्त्री असते, ती भक्कम पाठिंबा देते तेव्हा ती गोष्ट पुढे जाते.आणि महाराष्ट्राच्या निर्मितीत, म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, जडणघडणीमध्ये स्त्रियांचा वाटा मोलाचा आहे.

अगदी जेव्हा महाराष्ट्र नव्हता, परंतु मराठा साम्राज्य होते, त्याची सुरुवात करणारे "छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या जडणघडणीमध्ये अर्थात जिजामाता, त्यांच्यापासून आपली सुरुवात होते.


त्यानंतर कित्येक स्त्रिया या हळूहळू उदयास आलेल्या आहेत.आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे.राजकारण म्हटलं तरी म्हणजे जुन्या काळातलं येसूबाई आहेत ,ताराराणी आहेत ,अहिल्याबाई होळकर आहेत .

 राणी लक्ष्मी ही पण महाराष्ट्रातील जरी झाशी किंवा मध्य प्रदेश त्यांचं राज्य असेल तरी, राणीलक्ष्मी पहिल्या "तांबेकुलवीरश्री ती नेवाळकरांची कीर्ति "होत्या.


सामाजिक बांधिलकी आणि सुधारणा यामध्ये सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे ,पंडिता रमाबाई, शिक्षण क्षेत्रात आनंदीबाई जोशी ,अगदी त्या काळात फॅमिली प्लॅनिंग या विषयावर ती स्त्रियांना लेक्चर देणाऱ्या परिसंवाद घडवून आणणाऱ्या आणि फॅमिली प्लॅनिंग ची साधने देणाऱ्या शकुंतलाबाई परांजपे

तीनही सावरकर बंधूंच्या पत्नी ,ज्यांनी इंग्रज राजवटीत पोटावरती बॉम्ब बांधून गरोदर असल्याचे भासवून इकडून तिकडे नेऊन दिलेले आहेत.

शिवाय सामाजिक सुधारणा म्हणाल तर रत्नागिरीमध्ये त्या काळात महार मांग चांभार या जातीच्या स्त्रियांना एकत्र बोलावून हळदीकुंकवाचे कार्यक्रम करणे, आणि जातीय वाद मिटवण्यात मदत करणे.सहभोजन आयोजित करणे यासाठी एकटा पुरुष काही करू शकत नाही.त्यांच्या स्त्रियांचा देखील तितकाच सहभाग होता.

 


एकूणच गेल्या चार दशकांतल्या स्त्रियांच्या विविधांगी कामगिरीचे दर्शन अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. स्त्रियांनी परकीयांशी संघर्ष केला. परकीयांच्या अहंकाराशी आणि तुच्छताभावाशी संघर्ष केला. त्यांनी स्वकीयांच्या संकुचित अन्याय्य दृष्टिकोनाशी संघर्ष केला, अंध रूढीप्रथाशी संघर्ष केला. त्यांनी दडपणे झुगारली, अनिष्ट बंधने नाकारली, त्यांनी राजकीय हक्क मिळवले, सार्वजनिक क्षेत्रात संचार करण्याची मुक्तता मिळवली. साहित्य, कला, कायदा, शिक्षण, आरोग्य, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये आश्चर्यकारक कर्तृत्व गाजवले. आई, बहीण, मुलगी, पत्नी, भावजय या नात्यांची जबाबदारी सांभाळत समजुतीने काम करता करता सहकारी म्हणून, सखी म्हणून, सुजाण नागरिक म्हणून त्या जगल्या. पुरुषविरोध आणि सत्ताकांक्षा याऐवजी सहृदयता आणि सामाजिक दायित्वाची जाण त्यांनी प्रकट केली.


 शिक्षणाच्या प्रारंभकाळात नाना क्षेत्रांत धडाडीने काम करू लागलेल्या अनेक स्त्रियांनी दाखवलेले सामाजिक भान फार मोलाचे होते. स्वतःची प्रगती करून घेत असतानाच इतरांसाठी मदतीचा हात पुढे करण्याची जाणीव प्रकट करणाऱ्या स्त्रियांमध्ये ताराबाई मोडक, गोदावरी परुळेकर, अनुताई वाघ, बाया कर्वे, पार्वतीबाई आठवले, गंगुताई पटवर्धन अशी पुष्कळ नावे घेता येतील. कुणी बालशिक्षणाचे सकस प्रयोग केले, कुणी आदिवासींच्या विकासाचे कार्य केले, कुणी अनाथ, असहाय्य, गरजू स्त्रियांना आधार दिला. 

लाटणे वाली बाई म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अहिल्याताई रांगणेकर, आणि मृणाल गोरे.

तळागाळातल्या समाजाच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या आणि मूलभूत मानवी हक्कांसाठी लढा देणाऱ्या मेधा पाटकरसारख्या झुंजार कार्यकर्तीपर्यंत ,या सर्वांच्या कार्यामागच्या निश्चयाचा, समर्पणभावनेचा आणि कणखरपणाचा वारसा येऊन पोचला आहे.


सार्वजनिक जीवनात सर्व क्षेत्रांत आत्मविश्वासाने आणि हिरिरीने पुढे सरसावलेल्या कर्तृत्ववान स्त्रियांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक विकासाला जसा हातभार लावला तसाच सांस्कृतिक विकासालाही लावला आहे. जेव्हा शिकणे हेच बाईसाठी पाप मानले जात होते तेव्हा लिहिणे किंवा गाणे किंवा नाचणे यांचा तर विचारच करता येणे शक्य नव्हते. केवळ स्त्रियांनाच कलांचे दरवाजे बंद होते असे नव्हे, तर सभ्य पुरुषांनीही गाणे-बजावणे, नाटक करणे निषिद्धच होते. तरीही लोकनिंदेचा स्वीकार करत हळूहळू स्त्रियांनी तीही क्षेत्रे आपल्या कर्तृत्वाने गाजवली.


हिराबाई बडोदेकर, मोगुबाई कुर्डीकर, केशरबाई केरकर, बाई सुंदराबाई अशा प्रारंभीच्या गायिकांनी सभ्य स्त्री-पुरुषांमध्ये गाणे पोचवले आणि नंतर मंगेशकर घराण्याने त्याच्यावरती कळस चढवला कला म्हणून गाण्याला आणि कलांवत म्हणून गायिकेला प्रतिष्ठा मिळवून दिली. आकाशवाणीच्या प्रारंभाला बाई सुंदराबाईकडे संगीत विभागाचे प्रमुखपद आले आणि नव्या युगाची नांदीच झाली असे म्हटले पाहिजे. मालिनी राजूरकर, शोभा गुर्टू,वीणा सहस्त्रबुद्धे, प्रभा अत्रे, किशोरी आमोणकर आणि आशा भोसले, लता मंगेशकर यांसारखी नावे मराठी संगीतात सन्मानाने आज स्थिरपद झालेली दिसतात.


शांता आपटे, हंसा वाडकर, वनमालाबाईंपासून चित्रपट क्षेत्रात अभिनय आणि दिग्दर्शनाची स्वतंत्र मोहर उमटवणारी नावे, नूतन तनुजा शोभना समर्थ स्मिता पाटील, सई परांजपे, माधुरी दीक्षित यांच्यापर्यंत घेता येतात आणि नाट्यक्षेत्रात तर फक्त ज्योत्स्ना भोळे किंवा जयमाला शिलेदार किंवा विजया मेहता किंवा भक्ती बर्वे किंवा प्रतिमा कुलकर्णी मुक्ता बर्वे यांचीच नावे घेऊन थांबता येणार नाही एवढी स्त्रियांची मोठी कामगिरी नजरेत भरते.


राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर नृत्याचे आंतराष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळवणाऱ्या कथकनर्तकी रोहिणी भाटे किंवा भरतनाट्यमच्या पारंपरिक शैलीचा प्रतिभाबळाने विकास घडवणाऱ्या सुचेता भिडे- चापेकर यांचे ऋण वर्तमान तरुण कलावतींवर मोठेच आहे. काशीबाई कानिटकर, , ताराबाई शिंदे, बहिणाबाई चौधरी, लक्ष्मीबाई टिळक आणि मालतीबाई बेडेकरांपासून इरावती कर्वे, दुर्गा भागवतांपर्यंत योगिनी जोगळेकर अनेक लेखिकांनी साहित्यक्षेत्राला जी वैचारिक आणि भावनिक समृद्धी दिली


त्याला तोडच नाही अशा अनेक मान्यवर स्त्रियांनी महाराष्ट्राचे सांस्कृतिक सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक राजकीय जीवन समृद्ध केले आहे त्यांना शतशः प्रणाम आणि आजच्या महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics