Namita Dhiraj Tandel

Drama Horror Thriller

4.1  

Namita Dhiraj Tandel

Drama Horror Thriller

मधुचंद्र - एक परतीचा प्रवास

मधुचंद्र - एक परतीचा प्रवास

9 mins
233


अखिलेशच्या बंगल्यावर त्याच्या पंचविसाव्या वाढदिवसाची पार्टी ठेवण्यात आली होती. सगळा ऑफिस स्टाफ टेरेसवर पार्टी एन्जॉय करत होता. "अनघा जरा इकडे ये." अखिलेशच्या आईने अनघाला आवाज दिला.


अखिलेशची आई अनघाला खाली घेऊन आली आणि म्हणाली,"मला तु सून म्हणुन पसंत आहे. तुझ काय म्हणणं आहे माझ्या अखिलेश बद्दल?"


आपल्याला अखंड माया करणारी आई मिळणार. शिवाय अखिलेश सारखा जोडीदार म्हणजे दुधातली साय. अखिलेशच्या लग्नाची मागणी ती देखील खुद्द आईने दिलेली ऐकुन तिच्या डोळ्यातील आनंदाअश्रु थांबायला तयार नव्हते. कारण तिचे आईवडील लहानपणीच देवाघरी गेले होते. काकाच्या घरी ती वाढली होती. ती खाली वाकून आईच्या पाया पडणार इतक्यात आईनेच तिला गच्च मिठीत पकडले."मग मी तुझा होकार समजायचा ना."आईं हसतच व्यक्त झाली.अनघाने लाजत होकारार्थी मान हलवली. आई अनघाला गच्चीवर घेऊन आली.


अनघा मेहनती, हुशार, बिनधास्त व मनमिळाऊ स्वभावाची होती. प्रत्येकाला तिच्याबद्दल कौतुक असायचं. पाच वर्षापासुन ती अखिलेशच्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये गाईड पदावर कार्यरत होती. अनघावर असणाऱ्या एकतर्फी प्रेमाची कबुली अखिलेशने आईबाबा समोर केव्हाच दिली होती. त्यांना देखील अनघा पसंत होतीच. मात्र अचानक आजारपणात बाबांचे निधन झाले. दुःखद अशी दोन वर्ष पलटून गेली. अखेर वाढदिवसाचे अवचित्य साधुन आईने अनघाला लग्नाची मागणी घातली.


दुसऱ्याच दिवशी आई व अखिलेश लग्नाची बोलणी करायला अनघाच्या घरी आले. "सोन्याहून पिवळं असताना कोणी कसं नाही म्हणेन. शिवाय अनघा खुश तर आम्ही खुश." असं म्हणत काकांनी लग्नाला संमती दिली.


महिनाभर लग्नाची धावपळ सुरूच होती. शेवटी लग्न घटिका समीप आल्या आणि लग्नाचा कार्यभाग उत्तमरित्या पार पडला. दुसऱ्या दिवशी अनघा आणि अखिलेशला माहेरी घेऊन जाण्यासाठी तिच्या माहेरची माणसं येणार होती. पण देवीचे दर्शन घेतल्याशिवाय कोणी कुठेही जायचे नाही. असे आईने ठामपणे सांगितले. तिघेही लग्नाच्या दोन दिवसानंतर गावी जाण्यासाठी निघाले. गावी पोहचत नाही एवढ्यात अखिलेशला ऑफिस मधुन फोन आला. खुपच महत्वाचं काम आलेलं होतं. आणि ते अखिलेश शिवाय पुर्ण होऊ शकणार नव्हतं.


"आई!ऑफिस मध्ये महत्वाचं काम निघालेलं आहे. काय करू?" अखिलेशने आईला विचारणा केली.


आई म्हणाली, "नको जाऊस.. असं पण दोन दिवसांचा प्रश्न आहे. दोन दिवसांनी आपण मुंबईला परत जाणारच आहोत ना. तेव्हा कर की, ते काम."


"अगं अनघा! खुप महत्वाचं काम आहे. तु सांग ना आईला." अखिलेश हळुच अनघाच्या कानात जाऊन कुजबुजला.


आईची समजुत काढत अनघा म्हणाली,"आई ! जर अखिलेश आता निघाले तर उद्या दुपार पर्यंत परत येतील. अखिलेश येशील ना रे लवकर?" अनघा डोळ्यांनी आईकडे इशारा करत अखिलेशला म्हणाली.


"हो! हो! येईल ना लवकर." अखिलेश उत्तरला.


" लवकर ये रे बाळा." आई काळजीच्या स्वरात बोलली.


अखिलेशची जाण्याची इच्छा बिलकुल नव्हती. पण तरीसुद्धा तो तसाच कंटाळत उठला आणि गाडीमध्ये जाऊन बसला. अनघाला फ्लाइंग किस देत म्हणाला," हा गेलो आणि आलोच बघ!"अनघाने त्याला बाय केले आणि हसतच घरात आली.


हातात झाडू घेऊन तिने साफसफाई करायला सुरुवात केली. संपुर्ण व्हरांडा साफ करून मग घराच्या मागच्या बाजुला गेली. मागे आंब्याच्या झाडांच्या वाडीत शिरली. चालत असताना दुरूनच तिला कोकिळेचा मंजुळ स्वर कानावर पडला. तशी ती त्या आवाजाच्या दिशेने चालु लागली. जशी जशी चालत होती तसा तसा तो आवाज तिला पुढे पुढे घेऊन चालला होता. जणु त्या आवाजाने तिचे भान हरपत चालले होते. इतक्यात शांत परिसरात दुरूनच आईचा आवाज कानावर आला. तशी अनघा माघारी आली. जाताना मागे वळुन वळुन पाहत होती. कारण त्या ठिकाणी एक वेगळ्याच प्रकारची शांतता तिला जाणवली.


"आंब्याच्या झाडांची किती मोठी वाडी आहे ना. कोकिळेच्या मंजुळ आवाजाच्या दिशेने पुढे पुढे चालत राहिले. माझे मलाच कळले नाही." अनघाने आईला सांगितले.


"बाळा! असं एकटं एकटं कुठे जाणे योग्य नाही."


"आई! मी आपल्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये गेली पाच वर्षांपासून गाईडच काम करते आहे. त्यामुळे मला इथे तिथे भटकत फिरायची सवय आहे. मला नवीन ठिकाणी भेट द्यायला खुप आवडतं." अनघा बिनधास्त व्यक्त झाली.


" तो वेगळा भाग आहे गं. अजुन तुझ्या अंगावरची पिवळी हळद उतरली नाही म्हणुन बोलले. तुम्हा नवीन पिढीच्या पोरांना काही कळतच नाही बघ."


"ठीक आहे आई! अशी चुक पुन्हा करणार नाही."


संपुर्ण दिवस दोघींचा वेळ कामात निघुन गेला. रात्रीच्या जेवणानंतर सगळं काही आवरून झालं. अचानक अकराच्या आसपास लाईट गेली. भयाण अशी शांतता सगळीकडे पसरली. मोबाईलचा टॉर्च ऑन करून अनघाने देवा जवळचा दिवा लावला. काही वेळाने दारावर टकटक आवाज झाला.


आई मोठ्याने ओरडतच म्हणाली, " कोण आहे रे इतक्या रात्री?"


बाहेरून दबक्या स्वरात आवाज आला.. "मी आई! मी अखिलेश."


अनघाने धावतच जाऊन दरवाजा उघडला."अरे अखिलेश! हा गेलो आणि आलोच म्हणाला होतास ना. इतक्या लवकर आला देखील. पण आपली गाडी कुठेय? गाडी दिसत नाहीये?"


नको जाऊस हे मी अगोदरच म्हणाले होते. तुम्ही कधी मोठ्या माणसाचं एकतील तर शपथ." आई पटकन बोलून गेली.


"अरे हो! हो! गाडी गावाच्या बाहेर बिघडली. गाडी दुरुस्ती करणारा कोण सापडतो का. ते शोधत फिरत होतो. पण कोणी सापडले नाही. म्हणून गाडी तिथेच ठेवली. उद्या सकाळी बघु काय ते."


अनघा म्हणाली,"तुला भुक लागली असेल. काय खाणार सांग?

"उशीर झाला आहे. लाईट पण गेली आहे. काही करत बसू नको. फक्त एक ग्लास दूध दे. " अस म्हणत तो खोलीत निघुन गेला.


अनघा एका हातात दूध आणि एका हातात मेणबत्ती घेऊन खोलीत आली. दुध पिऊन झाल्यावर अखिलेशने फुंक मारून मेणबत्ती विझवली. थंडीचा गारवा अन् त्या शीतल रात्रीच्या शुभ्र चांदण्याचा प्रकाश बेडरूम मध्ये येत होता..


त्याने तिचा हात हातात घेतला. मिठीत घेत म्हणाला,"कशी आहेस तू?"


बरी आहे. पण तुला काय झालंय? असं काय विचारतोय?"


माझ्या पासून एवढासा दुरावा देखील तु सहन करू शकत नाही का?"अनघा लाजत त्याच्या चेहऱ्याकडे पाहत बोलली.


"इतकी वर्ष मी तुझ्याशिवाय कशी काढली माझे मलाच माहिती आणि आज आपल्या पहिल्या मधुचंद्राचा मिलनाचा दिवस किती काळा नंतर आला." तो तिला न्याहाळत होता.


"एवढी वर्ष स्वतःहुन मला कधी विचारले नाहीस. लग्नाची मागणी देखील आईने घातली." अनघाने मनातलं बोलून दाखवलं.


"ह्या दिवसाची मी गेली क्रित्येक वर्ष वाट बघत होतो. तुझ्या हळदीच्या पिवळ्या देहाला स्पर्श करून आज मी खरं सुखावलो."त्याच्या केविलवाण्या नजरेने अनघाला घायाळ केले.


तशी तिने त्याला मिठी मारली. चंद्र रात्रीच्या प्रकाशात दोन तारे एकमेकांच्या प्रेमामध्ये मंत्रमुग्ध होऊन गेले. शीतल प्रकाशातील सुख उपभोगुन अनघा सुखावत झोपी गेली. मात्र तो जागाच होता. तिच्या बंद डोळ्यांना स्पर्श करत बोलत होता. शुक्राची चांदणी लांबुन चंद्र रूपाला न्याहाळत असते. त्या चंद्राला भेटण्यासाठी आतुर असते. काही कालावधी नंतर एक क्षण असा येतो. तेव्हा त्या चंद्र कोरीवर जाऊन ती चांदणी चमकत सुखावते. आज मी क्षण भरासाठी शुकाची चांदणी होऊन राहिलो. परतीच्या प्रवासास मुक्त संचार करण्यासाठी मोकळा झालोय.


सकाळच्या प्रहरी अनघाच्या डोळ्यावर सोनेरी किरणे आली. डोळे चोळत ती अंथरुणातून उठून खाली आली. अखिलेश आणि आई दोघेही चिंतेने तिच्याकडे पाहत होते.


"अरे काय झाले?"अनघाने त्याना प्रश्न केला.


अखिलेशने तिला जवळ घेतले. आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. आईने अखिलेशला ईशारा केला की, काही बोलू नकोस. अनघाने ते पाहिले.," तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात. सांगा ना काय झालंय ते?" अनघा कावरीबावरी झाली होती.


अखिलेश म्हणाला,"मी काल रात्री इथे नव्हतोच."अनघा हसली.."


तु नव्हता तर काय तुझं भुत होतं? कशाला उगाच नाही ती मस्ती करतोय. आणि आई. तुम्ही पण ह्याच्यासोबत माझी मस्ती करताय. अखिलेश काल रात्री तर आपण!!!" असं म्हणत ती गालातल्या गालात लाजली.


"अनघा! तो मी नव्हतोच. कारण मी काल रात्री मुंबईला पोहचलो. गेल्या गेल्या आधी काम पुर्ण करुन घेतलं. तुम्हाला फोन लावण्याचा प्रयत्न केला. पण फोन नॉट रीचेबल येत होता. पहाटे उठलो. तसाच निघालो. इकडे पोहचल्यावर आई मला म्हणाली. तु आता गाडी घेऊन आलास.. तर मग वर कोण आहे? तेव्हा धावत वर जाऊन खिडकीतून पाहिले तर तु एकटीच गाढ झोपलेली दिसली.." हे ऐकून अनघा चक्कर येऊन पडली.


तशी अखिलेशची धावपळ सुरू झाली. गावातील प्रख्यात मांत्रिक बोलावण्यात आले. मंत्र.. तंत्र.. होमहवन करण्यात आले. घरामध्ये सगळ्या खिडक्या दरवाज्यावर मांत्रिकाने मंतरलेल्या पुड्या बांधल्या गेल्या. सकाळ पर्यंत अनघाला घराबाहेर सोडायचे नाही असे मांत्रिक स्पष्ट सांगुन गेले.

रात्रीचे बारा वाजुन गेले तशी अनघा शुद्धीवर आली. तिने बघितले तर अखिलेश आणि आईला झोप लागली होती. काल घडलेला प्रकार नक्की होता तरी काय?मधुचंद्राच्या पहिल्या रात्री हे माझ्या सोबत असं का घडावं? त्याच्याशी साधलेला तो आगळा वेगळा असा संवाद. रात्रभर रोमांचित स्पर्श देऊन मला एकरूप करणारा. तो होता तरी कोण? ह्यामागे काहीतरी गुढ गुपित आहे. ह्याचा मला शोध घ्यायलाच पाहिजे. खुप साऱ्या प्रश्नांनी तिच्या डोक्यात थैमान घातले होते. आता तिला फक्त त्याला भेटण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली होती.


रहस्य जाणुन घेण्यासाठी ती हळुच घराबाहेर चोर पावलांनी पडली. गावामधील एकांतातील घर. व्हरांड्यातील मिणमिणता बल्ब.. रात किड्याचा किर किर आवाज. दुरूनच कुत्रे भुंकत असल्याचा आवाज येत होता. मात्र तिच्याकडे भितीचा जरा देखील लवलेश नव्हता. उलट तिची पाऊले त्या रहस्याचा उलघडा करण्यासाठी पुढे पुढे पडत होती. चालताना अंगावरून अचानक अनैसर्गिक वाऱ्याचा झोत तिला स्पर्श करून गेला. आणि पुन्हा त्याच कोकिळेचा मंजुळ स्वर तिच्या कानावर पडला. आवाजाच्या वळणावर ती चालु लागली. आवाजाचा कानोसा घेत ती गावाबाहेरील टेकडी कडे पोहचली.. टेकडीवर जाण्यासाठी पडक्या पायऱ्या होत्या. त्या पायऱ्यांवरून ती वर जुन्या किल्ल्या वर पोहचली. जिथे पूर्वीपासून कोणालाच जाण्याची परवानगी नव्हती. आता ती किल्याच्या मुख्य प्रवेश दाराच्या आतमध्ये शिरली. अगदी कालच्या रात्री सारखे शुभ्र चांदणे सगळीकडे पसरले होते. आतमध्ये अफाट झाडे वाढलेली होती. त्या झाडावर मोठे मोठे वटवाघूळ फिरत होते. इतक्यात एक साप तिच्या पायाजवळ आला तशी ती मागे झाली. पाय घसरून खोलवर अश्या भागात जाऊन पडली. तिच्या हाताला खरचटले. पायाला सुद्धा लागले. ती त्या जखमा बघत उठून उभी राहिली. रात्रीच्या खेळ सावल्यांचा प्रचंड असा अनुभव ती निडरपणे घेत होती.


समोर एका व्यक्तीची तिला पाठमोरी आकृती दिसली. त्याला पाहताच अनघा म्हणाली," कोण आहेस तु?"हट्टा कट्टा. देखणा. पिळदार मिश्या असलेला तरुण तिच्या समोर आला." मला ओळखलं नाहीस मोहिनी? मी देवेंद्र."


"मी मोहिनी नाही. माझे नाव अनघा आहे. माझा आणि तुझा संबध आहे तरी काय?"


देवेंद्रने बोलायला सुरुवात केली.


पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट. तु ह्या गावामध्ये राहत होतीस आणि मी शेजारच्या गावात. मी संगीत विशारद होतो. कॉलेजमध्ये संगीत शिक्षक म्हणुन कार्यरत होतो. तुला माझ्याकडुन संगीत शिकायचे होते. तुझ्या वडिलांनी तुझी आवड जोपासण्यासाठी मला घरीच शिकवायला येण्यासाठी सांगितले. हळूहळू आपली मैत्री वाढली. नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले कळलेच नाही. तू एकुलती एक आणि लाडकी असल्यामुळे तुझ्या बाबांनी लग्नाला होकार दिला. पण ज्या दिवशी लग्न होणार होते त्या आदल्या रात्री काही लोकांकडून माझा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. माझे शरीर ह्या किल्ल्यामध्ये आणुन टाकले. त्यांना वाटले मी माझा प्राण सोडला. पण माझे प्राण शिल्लक होते. दुसऱ्या दिवशी मी कसाबसा गावामध्ये येऊन पोहचलो. आपल्या लग्नाच्या मांडवात तुझ्या आत्याचा मुलगा शिरीष सोबत तु लग्नाचे फेरे घेत होतीस. माझी झालेली हीनदीन अवस्था बघुन सगळे चर्चा करू लागले. इतक्यात तुझे लक्ष माझ्याकडे गेले. तु वेड्यासारखी माझ्याकडे धावत आली. मी घडलेला प्रकार तुला सांगितला.

रडतच

तु मला सांगितलं. "माझ्या नावाने तुला एक चिट्टी आली होती. त्या चिठ्ठी मध्ये असं लिहलेलं होतं की, मी तुझ्याशी लग्न करू शकणार नाही. मला विसरून जा."

नावाची बदनामी नको म्हणुन बाबांनी मला शिरीष सोबत लग्न करायला सांगितले. इतक्यात तुझे बाबा आले आणि बोलू लागले., "मोहिनी हे बघ. तुझे लग्न शिरीष सोबत झालेले आहे. आता तु त्याची पत्नी आहेस. ह्याला विसरून जा. हा थोड्यासाठी म्हणुन वाचला."

रचलेला सगळा कट बाबांचा होता हे उघडकीस आले. तु तुझ्या बाबांना रडतच प्रश्न केला. "का तुम्ही असे वागलात ? काय चुकी होती आमची? त्यावर त्यांनी उत्तर दिले." तुझ्या प्रेमासाठी मी होकार दिला होता. परंतु मला हे लग्न कधीच मान्य नव्हतं. कारण लग्न बरोबरीत करायचं असतं. आपण कुठे? आणि हा साधा शिक्षक कुठे? प्रेमात तुला त्याने अडकवले ना म्हणुन काट्याने काटा काढायचा होता. पण कोणाला समजुन द्यायचा नव्हता. तशी तु संतापाने उठून उभी राहिली आणि म्हणाली, ह्यासाठी कोणाचा जीव घ्यायचा का? भरधाव स्वयंपाक खोलीत जाऊन दार लावून घेतलं आणि स्वतःला जाळुन घेतलेस. त्याच क्षणी तुझ्या बाबांना हृदयविकाराचा झटका आला. ते मांडवात मृत्युमुखी पडले.


"मग तु? तुझ काय झालं?" अनघा थरथरत्या स्वरात म्हणाली.


"मी परत ह्या किल्ल्यावर आलो. काही दिवसांनी तुझ्या विरहात माझा मृत्यू झाला. पण माझ्या आत्म्याला शांती मिळाली नाही. त्यामुळे माझा आत्मा आजपर्यंत असाच भटकत राहिला. कारण अतृप्त होतो ग मी तुझ्याशिवाय. कालच्या रातीला तृप्त झालो. ह्याच दिवसाची वाट बघत होतो की, एक दिवस तु मानवी देहात येऊन मला मुक्त करणार. तेव्हा तुझ्यावर पहिला अधिकार माझाच असणार. चल एकत्र मुक्त होऊया."


अनघाचे भान देखील हरपले. ती त्याच्या सांगण्याप्रमाणे त्याच्या मागे चालत गेली. जणु त्याने सगळं काही सांगताना तिला भुरळ घातली असावी.


"ये...माझ्यासोबत ये.." असं म्हणत म्हणत देवेंद्र अनघाला किल्याच्या वरच्या कोपऱ्यावर घेऊन आला. तिकडून अखंड खोलवर पर्यंत घाट आणि झाडी दिसत होती.. त्याने तिच्याकडे बघितले. तिला मिठीत पकडत म्हणाला परतीच्या प्रवासाची वेळ आली. अन् किल्याच्या खालच्या दिशेस झेप घेतली.


पहाट झाली. पक्ष्याचा किलबिलाट सुरू झाला होता. सोनेरी कोवळे सूर्य किरणे निसर्गाला स्पर्श करण्याच्या तयारीत होती. इतक्यात अखिलेश, मांत्रिक आणि काही गावकरी अनघाचा शोध घेत किल्ल्याकडे पोहचले. त्यांना किल्ल्याच्या कडेवरून खालच्या बाजूस झाडावर काहीतरी टांगल्यासारखे दिसत होते. खालच्या दिशेला सगळे गेले. झाडावर अनघा टांगती पडली होती. सगळ्यांनी एकमेकांची मदत घेऊन तिला उतरवले. अखिलेशने अनघाच्या हृदयाचे ठोके कान लाऊन तपासले. ती जिवंत होती.


तितक्यात मांत्रिक मोठ्याने ओरडत बोलला, "सुटला तो. मुक्ती मिळाली त्याला. तो परत येणार नाही. मंत्र बोलायला सुरुवात केली. झोळीतुन राख काढली. अनघा आणि अखिलेशच्या अंगावर पाखडली.


अनघाने जेव्हा डोळे उघडले तेव्हा ती घरी होती. तिचे डोके खुपच जड झाले होते. अंगाला खुप इजा झालेल्या होत्या. तिने अखिलेश आणि आईला किल्यावर घडलेला प्रसंग सांगितला. लग्नानंतरच्या दोन दिवसाचा प्रसंग तिघांसाठी धक्कादायक ठरला होता. ठरल्याप्रमाणे देवीचे दर्शन घेऊन ते मुंबईसाठी रवाना झाले.


सत्य म्हणावे की स्वप्न. ह्या बुचकळ्यात अनघा सारखीच पडत होती. रात्रीच्या चंद्र प्रकाशात देवेंद्रच्या आठवणीची काजवं डोळ्यासमोर उभी करू लागली. काळोखातील खेळ सावल्यांमध्ये देवेंद्रचा आभास शोधू लागली. कारण तिला आता त्याचा सहवास हवा हवासा वाटत होता. 


सुखद प्रवासास जीव वेडावला,

पहिला स्पर्श विसरली नाही..

मज दिलेस तु नवे जीवनदान,

परतीच्या प्रवासास स्वतः मुक्त होऊनी..

अखेरचा मधुचंद्र शृंगारिक ठरला,

माझ्या मनावर तुझाच ताबा राहिला..


(समाप्त)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama