Namita Dhiraj Tandel

Inspirational

3  

Namita Dhiraj Tandel

Inspirational

आठवणींचा मनोदिपक

आठवणींचा मनोदिपक

9 mins
206


आनंदाची पर्वणी असणारी दिवाळी म्हणजे तिमिरातून तेज उजळवणारी सोनेरी पहाट. प्रत्येक जण चार दिवसांत लख्ख दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघत असतो. सुखा मागे दुःख आणि दुःखा मागे सुख अशी जीवनाची घडी बदलत असते. कुणाच्या घरी उत्साहाने भरलेल्या ज्योती असतात. तर कुणाच्या घरी कधीच परत न येणाऱ्या माणसांच्या आठवणींचा मनोदिपक मिणमिण करत असतो. 


दिवाळी पहाटेच्या प्रहरी फटाक्यांच्या होणाऱ्या आतिषबाजीने आरतीला जाग आली. झाडलोट करून झाल्यानंतर तिने आंघोळीसाठी गरम पाणी काढले. केसावरून पाणी घेताच क्षणी तिला प्रचंड रडू कोसळले. दिपकच्या आठवणीने हुंदके देत आयुष्यात पहिल्यादांच तिने रडत अभ्यंगस्नान केले. 


गतकाळातील दिवाळीच्या सोनेरी आठवणीत ती हरवली. बाल वयापासून ते लग्न होई पर्यंत आई केसाला नारळाचे दूध लावायची. सर्वांगास सुगंधी उटणे लावून गरम पाण्याने अभ्यंगस्नान घालायची. जेव्हा लग्न झाल्यानंतर माहेराहून सासरी आली. तेव्हा तिचे वय वर्ष अठरा वर्ष पुर्ण झाले होते. सासरी आल्यावर पहिल्या दिवाळीला तिला आईची खुपच आठवण आली होती. माहेरच्या आठवणी डोळ्यांत साचवत पहिल्यांदाच तिने आई शिवाय एकटीने अभ्यंगस्नान केले होते.


लाल रंगाची खणाची साडी नेसून साजशुंगार करून ओल्या केसांना रुमाल गुंडाळून ती देवपूजा करायला बसली. देवपूजा झाल्यानंतर सासू व सासऱ्याच्या पायावर नतमस्तक होत तिने आशीर्वाद घेतला. तेव्हा सासूबाई म्हणाल्या,"माझा मुलगा आता तो तुझा नवरा. ह्या वर्षी पासुन त्याच्या अंगाला उटणे लावण्याची जिम्मेदारी तुझी.


""इश्श.." म्हणत ती तिकडून लाजतच पळाली होती. त्यानंतर प्रत्येक दिवाळीला ती दिपकच्या अंगाला उटणे लावत गेली. दोघांची एकही दिवाळी एकमेकां शिवाय कधीच चुकली नाही. दिपक वर्षातून एकदा दिवाळी सणाच्या निमित्ताने तिला चार दिवसाच्या चार साड्या घेऊन द्यायचा. लक्ष्मीपूजनच्या दिवशी सरप्राइज गिफ्ट म्हणुन एखादा सोन्याचा दागिना घेऊन यायचा. पुजा करायच्या अगोदरच तो दागिना घालण्यासाठी तिच्यापुढे हट्ट धरायचा. 


ती नेहमी त्याला समजवायची," कुठलही नवीन वस्तु घरी आणल्यावर प्रथम देवाकडे ठेऊन त्यावर हळद, कुंकू ,अक्षता व फुल वाहून नंतर वापरायची असते."


तेव्हा तो लडिवाळ पणे बोलायचा,"माझी भाग्यलक्ष्मी तर तुच आहेस. तिला ती वस्तु आवडणे महत्वाची आहे."


दिपक भाऊबीजेला त्याच्या बहिणीकडे जाताना आरतीच्या हातात पैसे द्यायचा. "तुझा भाऊ येईल. त्याच्यासाठी काहीतरी भेटवस्तू घेऊन ये. रिकाम्या हाताने त्याला पाठवू नको.."असं सांगुन निघायचा.


दिवाळी संपली की, ऑफिस मध्ये दहा दिवसांची सुट्टी आवर्जून टाकायचा. आई वडील ,आरती व मुलाला घेऊन फिरायला जायचा. त्याचे म्हणणे असे होते की," वर्षभर सगळेच काम करत असतात. पण दिवाळी येण्याअगोदर पासूनची साफसफाई ते दिवाळी संपल्यानंतरची आवराआवर करून घरातील स्त्री सदस्य खुप थकलेल्या असतात. चार दिवसाच्या दिवाळी सणासाठी खुप मेहनत घेतात. वर्षभरात जास्तीत जास्त कामाचा गाढा ह्या दिवसांत त्यांच्याकडून ओढला जात असतो. त्यामुळे त्यांचा त्राण घालवण्यासाठी आठवडा भर त्यांना आराम म्हणून फॅमिली पिकनिकचा प्लॅन.


घर आणि कुटुंबासाठी राबणाऱ्या स्त्रीयांच्या भावनांची कदर करणे आवश्यक आहे. स्त्रिया घरातील कामं करणार नाही तर कोण करणार? असे म्हणणारे काही पुरुष स्त्रीयांच्या इच्छे पुढे कानाडोळा करतात. पण घरातील स्त्री सदस्यांचा त्राण लक्षात घेऊन गृहलक्ष्मीला आनंदी ठेवण्यात काही पुरुष मनापासुन झटत असतात. अश्या वेगळ्या विचारसरणीचा दिपक होता.


मात्र कोणाला माहिती होते की, इतक्या वर्षात एकत्र जगलेले ते खास क्षण शेवटचे ठरणार होते. मागच्या वर्षीचा दिवाळी सण तिच्या डोळ्यां पुढे येऊन बरसला. आठवणींच्या सरित ती चिंब चिंब होऊन भिजू लागली.


अचानक संकटी वादळ यावं त्याप्रमाणे मार्च २०२० मध्ये कोरोना नावाच्या विषाणूने जगभरात थैमान घातले. दिपक ऑफिसचे काम घरातूनच करत होता. बघता बघता मार्च महिन्या नंतर ऑक्टोबर महिना उजाडला. दिवाळी सणाला पंधरा दिवस राहिले होते. आरतीने घराची साफसफाई काढली होती. झाडलोट, जुन्या वस्तु व जुने कपडे काढणे, कपाटातील कपडे व्यवस्थित रचवणे. सगळ्या कामात तो आरतीला मदत करत होता.


आरती त्याला म्हणाली,"अहो राहू द्या. कोण काय बोलेल? बाई माणसांची कामं पुरुष करतो आहे."


त्यावर त्याने उत्तर दिले." दिवसभर घरातील काम करून तु थकतेस. जर माझ्या फावल्या वेळेत मी तुझ्या कामात हातभार लावला. तर काय झालं? देवपूजेत जसे दिपक सोबत आरतीचे महत्त्व आहे. तसेच आपल्या नावाप्रमाणे तेच स्थान माझ्या आयुष्यात तुझे कायम आहे."


"दिपक शिवाय आरती अपूर्णच. तुमच्या असण्याने माझे आयुष्य संपन्न आहे." लाजतच ती व्यक्त झाली होती.


घरातील लाईट, कंदील व सजावटी करून झाल्यावर तो फराळाचे पदार्थ बनवायला देखील मागे पडला नाही. करंजीत पुरण भरून कडा करणे. लाडू वाळण्यापासून ते चकल्या तळे पर्यंत त्याने फराळ करायला चांगलाच हातभार लावला होता.


आई चेष्टा करतच बोलून गेली होती,"घरातील पुरुष आता हलवाई झाले म्हणायचे. रात्री जागून मला कधी फराळ बनवायला मदत केलीस नाहीस."


मोबाईल मधला बहिणीच्या नवऱ्याचा चकल्या तळतानाचा फोटो दिपकने आईला दाखवला व हसतच चेष्टेचा स्वरात बोलला होता,"हा बघ ताईचा घरगडी. तुझा लाडका जावई. ह्याला तर दुकान टाकायलाच सांगितलं पाहिजे."


आई लगबगीने उत्तरली होतो," स्टेटस ठेवण्यासाठी त्याने ते सोंग केलंय. ताई एकटीच राबत असते बिचारी. काही कामाचे नाही जावई बापू. माझा लेक तेवढा गुणाचा गं बाई." असं म्हणत दिपकच्या डोक्यावरून हात फिरवत आईने कडकडा बोटं मोडली होती.


दिवाळी सणाचा उत्साह घरभर पसरला होता. सगळ्यांत जास्त उत्साह दिपकचा होता. घरभर दिव्यांची आरास चार दिवसपर्यंत तोच लावत होता. प्रकाशमान झालेले घर पाहून सारखा म्हणत होता. "घरातील सगळे दिपक ह्या दिपककडे बघून कसे आनंदाने तेवतात आहे ना. सगळे एकत्र उत्साहदायक वातावरण निर्माण करतात ना. कुटुंबाचे देखील तसेच असते. सगळे एकत्र असले की, मनाकडून मनाकडची लख्ख तेजोमय दिवाळी साजरी करतात. एकमेकांप्रती असणारा जिव्हाळा हीच खरी दिवाळी आपलेपणाची.."


प्रत्येक क्षण जणू तो भरभरून जगून घेत होता. फटाके फोडण्याच्या कार्यक्रमात लहान मुलांसोबत तो अगदी लहानगा झाला होता. "काय अगदी लहान मुलांसारखे वागतात तुम्ही? आरती त्याला बोलुन गेली.


"अगं! मज्जा करायला वय लागत नाही. मनातून लहान असणं महत्वाचं असतं. शिवाय फटाके म्हणजे उत्साहाचे प्रतीक. अग्नी देवताच ती. फटाक्याची आतिषबाजी अमावस्येच्या काळोख्या रात्रीला मंत्रमुग्ध करते. दिवाळीच्या चार दिवसांत सोनेरी अग्नी विविध फटाक्यांच्या स्वरूपात किती आकर्षक दिसते. प्रत्येकाने याचा आनंद लुटायचा पाहिजे. तु सुद्धा ये." असं म्हणत त्याने तिच्या हातात फुलबाजा सोपवला होता.


दिपकच्या म्हण्यानुसार तिने दोन फुलबाजे दोन्ही हातात घेतले. त्याच्या सोबत आरतीने सुर लावले. "दीन दीन दिवाळी. गाई म्हशी ओवाळी" म्हणत दोघं खळखळून हसले होते.


"ह्या कठीण काळात आपण दिवाळी सारखा सण जल्लोषात साजरी करतोय. दुःख फक्त एकाच गोष्टीचं वाटते आहे की, यंदा आपण बाहेर फिरायला कुठेच जाऊ शकणार नाही. पुढच्या वर्षी ना आपण विदेश यात्रा नक्की करू." दिपकने मनातली भावना आरती पुढे व्यक्त करून दाखवली होती.


आरती चिंता व्यक्त करत बोलू लागली. "आपण एवढी वर्ष नियमित बाहेर फिरायला जातो. यंदा नाही गेलं तर काय झालं? पुढच्या वर्षी अजुन परिस्थिती किती बिकट असेल कुणाला माहिती? आणि विदेश यात्रा नको रे बाबा. तो कोरोना तिकडूनच तर इकडे आला आहे. एवढ्या महिन्यात केवढी लोक मरण पावली. दिवाळी सारख्या शुभ दिवसांत त्यांच्या कुटुंबावर दुःखाची दरड कोसळून पडली आहे. कशी असेल त्याच्या घरातील परिस्थिती?


दिपकला कविता, शायरी बोलायची खुप आवड होती. प्रसंगानुसार एखाद्या कवीच्या कवितेमधील ओळीद्वारे तो व्यक्त व्हायचा. विं.दा. करंदीकरांच्या कवितेतील ओळी आठवत दीपक बोलू लागला. "भीतीला कवटाळून बसलं तर संकटी परिस्थितीशी सामना करू शकत नाही. अश्यावेळी संकटाला तोंड देऊन त्यावर मात करायला शिकायचे. काय होईल? कसे होईल ह्या गोष्टीचे चिंतन करत बसू नये. सकारात्मक विचारांची ज्ञानज्योती तेवत ठेऊन त्या "संकटासही ठणकाहून सांगावे, आता ये बेहत्तर."


कोरोनाचे संकटी सावट सगळ्यांना हादरून टाकणारे होते. पण संकट काळात मिळालेली साथ सोबत ही विलक्षणीय घडीच होती. संसाराची घडी व्यवस्थित राहण्यासाठी एकमेकांच्या मनाचा जपुन सांभाळ करणे नेहमीच आवश्यक ठरते. दोघां मधील एक व्यक्ती निघुन गेली की, आयुष्याची घडी विस्कळीत होऊन जाते. विस्कळीत झालेली घडी कुणाला आवडते का? नाही ना. नंतर सोबत राहतात त्या फक्त चांगल्या वाईट कडू गोड अश्या आठवणी. त्यासाठी जेवढे क्षण एकमेकांसोबत एकत्र जगता येतील. तेवढे क्षण एकत्र दिलखुलास जगून घ्यावे. कारण कुठला दिवस कोणाचा शेवटचा असेल सांगता येत नसते.


आभाळभर पसरणाऱ्या रंगीत फटाक्यांच्या रोषणाईकडे आरतीचे लक्ष वेधले. तिला संकटी पावसाची आठवण झाली. प्रेमस्पर्शी असणारा पाऊस तिच्यासाठी आयुष्यभराचे दुःखद प्रसंग ठेऊन गेला होता.


पावसाळा दिपकला खुप आवडायचा. रिमझिम गिरे सावन त्याचं आवडतं गाणं होतं. पावसाळ्यात चिंब होऊन भिजण्याचे सुखद क्षण तो आरती सोबत गेट वे ऑफ इंडियाला जाऊन अनुभवायचा. मात्र लॉकडाऊन मध्ये "गेट वे ऑफ इंडिया ना सही. पर अपनी गच्ची सही." असं म्हणत तो जबरदस्ती कोसळणाऱ्या पावसात आरतीला घेऊन गेला होता.


"तुम्हाला काही कळतं की नाही? नको त्या वेळी नको ते सुचतं. एवढे महिने झाले जीवाला जपतो आहे. शुल्लक कोरोनाचे निमित्त होऊन जीव जायची वेळ यायची." चिडत ती त्याचा हात झटकत खाली निघुन गेली होती.


"हे शेवटचं. यापुढे कधीच तुला पावसात भिजायला चल म्हणुन सांगणार नाही." दिपक निरागसपणे तिला बोलुन गेला होता.


जेवढा रोमँटिक तेवढीच खेळाडू वृत्ती. त्याला पावसात हॉलीबॉल खेळायला खुप आवडायचे. जुलै महिन्याच्या अखेरीस पाऊस कोसळत होता. रविवारी सुट्टीच्या दिवशी बिल्डिंग मधील मित्र मंडळी सोबत तो हॉलिबॉल खेळत होता. थोडसं छातीत दुखते म्हणत घरी परतला. घरी आल्यावर आरती कडे पिण्यासाठी पाणी मागितले. पाणी प्यायला नंतर हातातला ग्लास खाली पडला. आरती पाहायला म्हणुन बाहेर आली. तर तो खुर्चीवरून खाली जोरदार आदळला होता. त्याचे आई वडील व मुलगा आकांत करत होते. आरतीने धावपळ करत बिल्डिंगच्या मित्रांच्या मदतीने त्याला हॉस्पिटल मध्ये नेले. परंतु नेई पर्यंत सगळं काही संपलं होतं. हृदयविकाराच्या झटक्याने आरतीचा दिपक मालवला होता.


बरेच दिवस त्याच्या छातीत दुखत होते. अँसिडिटी मुळे दुखत असावं. असं समजुन तो अँसिडीटीच्या गोळ्या घ्यायचा. तर काही घरगुती उपाय करायचा. कारण डॉक्टरकडे त्याला जाण्याची खुप भीती वाटत होती. कारण काळच तसा होता की, डॉक्टरकडे गेलेला माणूस घरी येईल की नाही हे सांगता येत नव्हते. अंतिम पायरीवर त्याचा तो कधी येऊन पोहचला हे त्याचे त्याला देखील कळले नव्हते.


त्या दिवशी शेवटंच कपाळी लावलेलं कुंकू पुसल गेलं. पुन्हा कधीही न लावण्यासाठी. मंगळसूत्र देखील ओढून काढलं. हिरवा चुडा फोडताना आयुष्याचा जणू चुरडाच झाला होता. प्रत्येक वर्षी दिवाळी सणाच्या हक्काच्या रंगीबेरंगी साड्याची जागा सफेद साडीने घेतली होती.


साडीच्या पदराने डोळे पुसत ती भूतकाळातुन बाहेर आली. हाताची ओंजळ करून मनोसोक्त अश्रु ढाळून घेतले. सफेद साडीत ओल्या केसांना रुमाल गुंडाळून ती देवपूजा करायला बसली. नेहमीच्या सवयीनुसार सासू सासऱ्याना नतमस्तक झाली.


"जगभर रोषणाई असली तरी, माझे आयुष्य दिपक शिवाय कायम अंधारमय राहील. मात्र त्यांच्या नावाचा उजेड माझ्या मनाकडे कायम तेवत राहील. मनाकडून मनाची दिवाळी कायम लख्ख प्रज्वलित असेल." दिपकच्या स्मरणाने तिघांच्या डोळ्यातील अश्रू थांबायला तयार नव्हते.


सासूबाई डोळ्यांत आसवे दाटत बोलू लागल्या. "तुझा नवरा तो माझा मुलगा. भाग्यलक्ष्मी म्हणायचा ना तुला. घराच्या लक्ष्मीने आजच्या दिवशी रडलेल त्याला तरी आवडेल का? सणा सुदीला सफेद रंगाचे कपडे घातलेले मला आवडत नाही. तर त्याला तरी आवडले असते का? चार दिवसाच्या चार रंगीत साड्या तर तुझ्या हक्काच्या आहेत. नटु नकोस पण साजेशी तयारी कर." म्हणत सासूबाईंनी तिच्या हातात चार रंगीत नवीन साड्या आणि छोटे सोन्याचे मंगळसूत्र दिले.


आरतीला गहिवरून आले. तिच्या मुखातून शब्द फुटत नव्हते. सासूबाईंनी तिला पोटाशी कवटाळले." करंदिकरांच्या कवितेच्या ओळी दिपक नेहमी म्हणायचा ना. त्यातील ओळ तुझ्यासाठी. नजर रोखुनी नजरे मध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. पतीच्या निधनानंतर सफेद साडीत स्त्रियांनी वावरण्याचा काळ आता राहिला नाही. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवघरातील लक्ष्मीच्या मूर्तीला आपण पुजतो. घरातील सून म्हणजे लक्ष्मीचं रूप. विधवा झाली म्हणुन काय झाले? तिचे देखील पुजन करणे तितकेच महत्वाचे आहे. नेहमी गळ्यात हे मंगळसूत्र परिधान करत जा. बिना नवऱ्याची बाई बघितली की, बाहेरच्या पुरुषांच्या नजरा हेरलेल्याच असतात." आत्मविश्वास देऊन परिस्थितीला लढण्याची ताकद सासूबाई आरती मध्ये जागृत करत होत्या.


"जसं दिपक भरभरून आयुष्य जगत होता. तसचं आयुष्य मला जगायचे आहे. तुमचा सांभाळ करणे माझे कर्तव्य आहे आणि आजची पिढी उद्याचे भविष्य असणाऱ्या माझ्या मुलासाठी मला खचून चालणार नाही. त्याच्या भवितव्यासाठी मला आता आई सोबत त्याचे वडील देखील व्हायचे आहे. एकलेपणाची खंत बाजुला ठेऊन आपल्यातील दैवी शक्ती एकवटत नेहमी म्हणत राहावे. असे दांडगी इच्छा ज्याची. मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर...." सासूबाईंनी आरतीला दिलेल्या आत्मविश्वासामुळे ती खंबीर होत चालली होती.


**********************************


म्हणतात ना आई वडील गेल्या नंतर मुलं पोरकी होतात. तसंच पतीच्या निधना नंतर स्त्रिचे जीवन देखील असेच काही असते. पूर्वी सतीप्रथा, मुंडण करण्यात येते होते. काळ बदलला असला. तश्या प्रथा होत नसल्या. तरी तिच्यावर सामाजिक बंधन लादून तिच्या इच्छाचे मुंडण केले जाते. आकांशाची आहुती देऊन तिच्या स्वप्नांची सतीप्रथा केली जाते. पती गेल्या नंतर स्त्रीला मान दिला जात नाही. सुखद कार्या प्रसंगी ती विभक्त दिसण्यात येते. कोपऱ्यात उभं राहून डोळ्यातील पाणावलेल्या कडा खुप काही सांगुन जात असतात. नवरा गेला म्हणुन तिचे आयुष्य संपते का? सन्मान नको मायेचे चार शब्द पुरेसे असतात तिला. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational