अस्तित्वाचा स्वीकार - भाग १
अस्तित्वाचा स्वीकार - भाग १
कॉलेजचे तिसरे वर्ष.. पंकज आणि आरोहीच्या प्रेमाच्या तारा जुळल्या. दिसायला सुंदर.. देखणी.. गोरी पान.. नाकी डोळी छान.. तिला मॉडेलिंगची खुप आवड होती. कॉलेज मधून तिने कॉलेज क्वीनचा ताज देखील मिळवला होता. पंकज देखील कमी नाही. तर चॉकलेट बॉय म्हणून फेमस होता. कॉलेज विश्वा तले प्रेम दोघं हसत खेळत एन्जॉय करत होते.
पाच वर्षांनी शिक्षणाच्या प्रवासा नंतर दोघं एम ए ची पदवी घेऊन चांगल्या गुणांनी पास झाले.
काही वर्षापूर्वी पंकजच्या वडिलांना हृदय विकाराने देवाज्ञा झाली होती. ते सरकारी कर्मचारी होते. त्यामुळे आज ना उद्या त्याला अनुकंप तत्वा वर सरकारी नोकरी शंभर टक्के मिळणार होती. तर आरोहीला मॉडेलिंग मध्ये करियर करायचे होते.
दोघांनी आप आपल्या घरी प्रेम प्रकरण उघड केलं. आरोहीच्या घरात पंकजला सगळे ओळखत होते. त्यामुळे तिच्या घरातून कोणी त्याला नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र पंकजच्या आईला आरोही नापसंत होती. जेव्हा पंकजने आरोहीची भेट होणारी सून म्हणत आईशी घडवून आणली. तेव्हा आईने कहरच केला. "मॉडेलिंग करणाऱ्या मुली संसार करायच्या लायकीच्या नसतात. वाटेल ते कपडे घालून लोकां समोर शरीर प्रदर्शन करणारी सून मला नकोच. हिच्याशी लग्न करायचे असेल तर माझ्या प्रेताला देखील हात लावायला कधी येऊ नकोस.." आई डोळ्यांतून आग ओकत होती.
जड अंतःकरणाने आरोही घराबाहेर पडली. पंकजला म्हणाली,"आज पासून आपले मार्ग वेगळे आहेत. कुणा मुलाला त्याच्या आईशी दूर करणे. हे माझ्या संस्कारात बसत नाही. तुझ्या आईच्या पसंतीने लग्न कर.." म्हणत रडतच तिने तिथून काढता पाय घेतला.
त्यानंतर आरोहीने कधीच पाठी वळून भूतकाळाला पाहिले नाही. स्वतःला मॉडेलिंग क्षेत्रात व्यस्त करून घेतले. पंकजला बाबांच्या जागेवर सरकारी नोकरी मिळाली.
आईच्या मनात पहिल्या पासुन स्वतच्या पसंतीची सून आणायची इच्छा होती. तिच्या मना सारखी घर सांभाळणारी.. कमी शिकलेली मुलगी तिला पाहिजे होती. म्हणून कुणा लांबच्या नाते वाईक वहिनीने स्वतःच्या भावाची मुलगी दाखवली. शांत सुस्वभावी अशी सीमा फक्त बारावी पास झालेली होती. गव्हाळ रंगी, लांब नाक, हरिणी सारखे डोळे, नाजूक ओठांची, बांधा मजबूत अशी.. बाकी बाहेरच्या गोष्टीचे तिला काही ज्ञान नव्हते. घर एके घर अशी मुलगी होती. आईला जास्त शिकलेली सून आणायची नव्हती. "गावकडाच्या मुली दिसायला अश्याच असतात." असं म्हणत आईने सीमाला झटकन होकार दिला.
नवरी कडची मंडळी घाई करायला लागली. म्हणून ब्राह्मणा कडे पत्रिका दाखवून लग्नाचा मुहूर्त काढण्यात आला. दोघांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वेळ मिळाला नाही. असे पण आईच्या इच्छे पुढे पंकजला काही बोलण्याची इच्छा राहिली नव्हती. कारण त्याच्या मनात आरोहीचे स्थान कुणी दुसरी मुलगी घेऊ शकणार नव्हती. त्यामुळे आईच्या पसंती नुसार त्याने लग्न करायचे ठरवले होते.
लवकरच सनई चौघडे वाजले. लग्न अगदी थाटात पार पडले. लग्नाच्या रात्री पंकज खोलीत आला. सीमा देखील सगळं आवरून खोलीत आली. तो सीमा येण्याची वाट रोखून बसला होता. ती पलंगावर बसल्या बरोबर तो उठून उभा राहिला.
"आईच्या मना विरुद्ध मला जायचे नव्हते. माझ्या आयुष्यातून आरोही गेली असली. तरी मनातून ती कधीच जाणार नाही. आपण जो पर्यंत एक मेकांना समजून घेत नाही. तो पर्यंत एका छता खाली आपण एकमेकांसाठी अनोळखी आहोत." दुःख व्यक्त करत त्याने जमिनीवर चटई टाकून अंथरूण केले. पाठ फिरवून तो झोपून गेला.
सीमा मात्र पार गार पडली होती. कारण तिची कथा काही निराळीच होती. तिला देखील काही सांगायचे होते. पण अश्याने वातावरण गरम होण्याची शक्यता होती. म्हणून तिने त्या रात्री संयम बाळगला.
(क्रमशः)
