Pradip Warade

Comedy Drama Romance

4.3  

Pradip Warade

Comedy Drama Romance

मैत्री की प्रेम ? भाग 4

मैत्री की प्रेम ? भाग 4

7 mins
501


दिसत नसलं तरी संदेशला बराच मार लागलेला होता. त्याला बेडवर झोपवल्यानंतर "संदेश काही खाणार का?" असं विचारल्यावर "फक्त थोडं गरम करून दूध दे." असं त्याने सांगितलं. अगदी दोनच मिनिटात त्यांना ते पिऊन सुद्धा घेतलं आणि झोपी गेला. माझ्या मनातले प्रश्न मात्र मनातच राहिले. त्याची अशी अवस्था बघून काही विचारण्याची इच्छासुद्धा झाली नाही. रात्रभर मी त्याच्या पायाजवळ बसून विचार करू लागले. अचानक झ्वाइगची पत्नी आठवली आणि मग जाणवलं, 'काही असो आपण संदेश च्या सोबत राहायला हवं!' पण तो तरी असं का वागतो? त्यानं कसाही वागलं तरी तो माझा पती आहे सात जन्म त्याचं आणि माझं नातं आहे हे मला विसरून कसं चालेल? तिकडे संदेश देखील विचार करत होता नेमकं काय ते त्यालाच माहिती...

सकाळी त्याला जाग आली तेव्हा त्याच्या पायावर डोके टेकवून मला झोपलेलं त्याने बघितलं आणि बराच वेळ मला जाग येण्याची वाट बघत राहिला. हालचाल देखील करत नव्हता, चुकूनही माझी झोपमोड होऊ नये याची कदाचित तो काळजी घेत असावा. मी जागी होते पण त्याचं माझ्याकडे असं बघणं मला खूप प्रेमळ आणि आनंद देणारं वाटतं होतं...तेवढ्यात त्याच्या फोनवर मेसेज टोन वाजली आणि एक क्षणही विचार न करता त्याचा पाय त्याने तीव्र वेगाने काढून घेतला आणि माझे दोन तीन केस तुटले गेले तसे मी जोरात ओरडले. आवाज ऐकून सासुबाई देखील आल्या आणि संदेशला विचारलं "काय रे काय झालं? " "काही नाही." मग मला विचारलं? काय सांगावं ते कळेना? मी आजूबाजूला बघितलं पायाजवळ ग्लास पडलेला दिसला म्हटलं "ग्लास पायावर पडला म्हणून ओरडले" असं सांगत आई समोरून कसेबसे निसटले....

अशात यांना काय झाले तेच मला कळत नव्हतं. घरात शांत शांत राहत होते. बर माझ्या नजरेस नजरहि मिळवत नव्हते. कदाचित जरा तब्येतीमुळे असं करत असतील, असं वाटलं आणि म्हणून मग मी तो विषय तिथेच सोडून दिला....

आज संध्याकाळी भाजी मार्केटला आल्यानंतर एका ठिकाणी सुंदर शेवगा दिसला. तिथल्या मावशींना विचारलं "शेवगा कसा दिला?" त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणाल्या "आवं मॅडम तुम्ही हिकडं कसकाय आज सासूबाई नाही आल्या व्हयं?"

"नाही ना, सरांची तब्येत जरा खराब आहे म्हणून त्या घरीच थांबल्या आहेत." "हावं व बया! लै लागलं का वं सर ला? लय मारलं वं गावात तेह्यला...कोण हुतं काय म्हाईत?"

"मारलं...?" मी म्हणाले

"मला वाटलं...बर बर काय न्हाय... बोला शेवगा किती करू .... एक किलो करते..."

तिने जरी बोलणं टाळलं असलं तरी मला त्या शब्दांनी पार खचून गेल्यासारखं झालं. नेमकं काय झालं असेल? कोणी मारल असेल? काय करावे? काहीच सुचेना...शेवटी अमोद ला कॉल केला; त्यांनीदेखील टाळाटाळ केली....मग मी त्यांना विचारलं माझी शप्पथ आहे तुम्हाला, नेमकं काय झाले ते सांगा? आता त्यांच्याकडे पर्याय नव्हता म्हणून त्यांनी बोलायला सुरुवात केली, " काल प्रियंकाचा भाऊ आणि त्यांच्या गावातील काही लोक आले होते दोघांनाही कदाचित माहिती नसेल. हे दोघे जेंव्हा भेटणार होते अगदी त्याच वेळी त्यांनी रंगेहात पकडलं... प्रियंका काही न बोलता तिथून निसटली पण संदेश मात्र त्यांच्या तावडीत सापडला म्हणून हा सगळा राग संदेश वर निघाला. "

"पण मग तुम्ही तरी मला सांगायचं ना?"

"कसं सांगू मला इकडे आड तिकडे विहीर असं होतंय संदेशने मला तुमच्या संसाराच्या नावाने शपथ दिली होती पण जीव वाचला तर संसार वाचेल म्हणून आता सगळं सांगितल."

"कधीकधी आपण अशा संकटात सापडतो की ज्यावेळी ना आपले कामी येतात ना अनोळखी?

अशा वेळी डोळे बंद करून त्या देवाला आठवूण स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न आपण करतो ना तेव्हा कळतं आपण खरे आस्तिक की नास्तिक?"

आता मात्र मला सगळं असह्य झालं होतं तरी स्वतःला सावरून मी खंबीर पणे उभं राहण्याचा निर्णय घेतला. अमोदने मला सांगितलं की संदेश आता समजवण्याच्या पलीकडे गेला आहे. तरीही माझं मन मात्र तयार होत नव्हतं.

जो कभी मेरी खामोशी समझा करते थे

आज मेरे अल्फाज कहां समझते,

जो मैं नजर ना आनेपर मुरझा जाते थे

आज नजर मिलाकर यहाँ मुरझते...


आजची सकाळ अतिशय प्रसन्न भासायला लागली. कितीतरी दिवसांनी मी अशा पद्धतीने फ्रेश मूड ने घरात वावरत होते, त्याला कारणही तसंच घडलं होतं.

परवा सगळं समजल्यानंतर घरी आल्यावर मी जेव्हा शांतपणे विचार करत होते, तेवढ्यात एक पुस्तक हातात पडलं. ते म्हणजे "ही वाट एकटीची" व. पु.काळे यांचे लिखाण कुणीही अलगद त्यांच्या लिखानाच्या प्रेमात पडावं असं ...

"उच्च भावनांचे आणि उदात्त विचारांचे पाणी जोरात आले तरच मनातील तुषारांचे सिंचन होते..." हि कादंबरी म्हणजे बाबीच्या भावनिक समुद्रात पोहण्याची आवड निर्माण करणारी कथा...

एका नवीन ताज्या आणि शुद्ध समाजात जन्म घेण्याची इच्छा व्यक्त करत मृत्यूलाही कवटाळायला तयार होणारी बाबी...

तिला वाचल्यापासून एक नवीनच चमक माझ्या चेहऱ्यावर दिसत होती. म्हणूनच स्वतःलाच आरशात बघून माझच मला कौतुक वाटतं होतं. मी मनोमन ठरवलं होतं काहीही झालं तरी संदेशशी आज बोलणारच...

संध्याकाळी संदेश आल्यावर मस्तपैकी आलं घातलेला चहा घेऊन त्याच्या समोर उभी राहिली. "चहा कसा झाला ते सांगा बरं ?" असं म्हणत चहाचा कप पुढे केला. "बापरे! काय विशेष आज? बरं ठीक..." एक घोट घेताच तो बोलला "वा! वा! मस्त...खूप दिवसांनी आज असा चहा पिला.अगदी आपण नवीन नवीन भेटल्यावर बनवायची तसा वाटला..."

ते ऐकून मला पण खूप भारी वाटलं... मग मनात ठरवलं. आज काही झालं तरी बोलू मूडपण चांगला दिसतोय स्वारीचा. सगळी हिम्मत एकवटून मी बोलण्यासाठी तयार झाले होते तेवढ्यात मागे रेडीओ वरती गाणं सुरु झालं

"कुछ ना कहो, कुछ भी ना कहो

क्या कहना है, क्या सुनना है

मुझको पता है, तुमको पता है

समय का ये पल थम सा गया है

और इस पल में कोई नहीं है

बस एक मैं हूँ, बस एक तुम हो

कुछ ना कहो, कुछ भी ना कहो..."

आणि मी जमवलेली हिंमत एका क्षणात संपायला लागली तेव्हा परत स्वतःला सावरून बोलले, "अहो ऐका ना! मी काय म्हणते?"

"बोल ना! तुला बोलायला माझी परमिशन कशाला पाहिजे? बिंदास्त बोल..."

"तुम्ही वेगळं वाटून घेऊ नका पण मला प्रियंका आणि तुमच्याबद्दल सगळं काही कळलंय आणि मागे गावात झालेल्या मारहाणी बद्दल पण भाजीवाल्या मावशीकडनं सगळं समजलं, मी काय म्हणते तुम्ही पुढे काय ठरवलंय ते मला माहित नाही. पण मला असं वाटतं की माझं सुख तुमच्या आनंदात आहे. त्यामुळे जर तुमचा आनंद तिच्या सोबत असेल तर माझी परवानगी आहे, मी तिला सांभाळून घेईल. आपण सर्व सोबत राहण्यासाठीहि माझी काही हरकत नाही आणि हे पटत नसेल तर....आपलं बाळ किंवा मी जर तुम्हाला जड वाटत असेल तर मी त्यासाठीहि सुद्धा तयार आहे पण तुमची हि अशी घुसमट मला बघवत नाही. आजकाल तुम्ही घरात खूप शांत शांत राहता, व्यवस्थित बोलतही नाही असं वाटतं मी ज्याच्यावर प्रेम करायची हा तो संदेश नाहीच आहे, त्यामुळं मला पूर्वीचा तो संदेश परत पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे."

"अरे! काय हे? तू काय वेडी झालीस का? तुला कोणी काय भरवलंय मला माहित नाही.पण एक लक्षात ठेव संशय म्हणजे नात्याला लागलेली कीड असते एकदा का त्याने नात्याच्या घरात प्रवेश मिळवला की नात संपलच म्हणून समज. गावात जे काही घडलं ते फक्त एका गैरसमजेतून घडलं होतं आणि त्यांनी माझी माफी पण मागितली आणि प्रियंका बद्दल म्हणशील तर ती माझी फक्त विद्यार्थिनी आहे बाकी काही नाही. तू काही पण विचार करणे सोडून दे असं म्हणत, माझ्या कपाळावर किस करून निघून गेले..."

"आमचं नातं एवढं बिघडलंय की त्याला मला काही मन मोकळे सांगावसं पण वाटत नाही. तो काही मान्य करायलाच तयार नाही. आता तू सांग मी काय करायला हवं?"

"अच्छा! अस आहे होय.चालतंय, पण तू टेन्शन नको घेऊ."

"अरे ! असं कसं नको घेऊ... कधी कधी वाटतं सरळ सगळं संपवून टाकावं, पण बाळाकडे बघून परत माघार घेते..."

"अरे वेडी झालीस का तू? तू तर एकदम बेफान मुलगी होती. तुला ते आठवतंय का दहावी मध्ये असताना नम्रताची विजय नावाच्या एका मुलाने छेड काढली होती, तुला तिने जो मुलगा दाखवला - विजय म्हणून त्यावेळी विजय आणि मयुर असे दोघे जण सोबत होते. तेंव्हा विजय समजून तू त्या मयूरच्या कानशिलात लावली होती आणि मयूर विचारात पडला कि," मी हिला अजून बोललो पण नाही तरी हिला कस काय कळलं की मी हिच्यावर लाईन मारतो ते? " काही न बोलता तो निघून गेला नंतर तुला नम्रताने माहिती सांगितल्यावर तुला आश्चर्य वाटलं होतं की "मयूर ने तरी मला सांगायचं की तो तो नाही जो मी समजतेय..." 

"अरे आठवतंय की! मी काहीही वेड्यासारखं करायची मागचा पुढचा विचार न करता बिनधास्त मारली होती .." असं म्हणत दोघेही खूप हसले...

खरं सांगू तू अशीच हसताना भारी वाटतेस...

ज्यावेळी मयुरने मला सगळं सांगितलं होतं तेव्हापासूनच तुझ्या याच डॅशिंग स्टाईल वर मी फिदा झालो होतो आणि ठरवलं होतं की आपली मैत्रीण बनण्याच्या लायकीची हीच आहे.

"पण ऐक ना! आता जशी हसते आहेस तशीच हसत राहा! तुझ्या तोंडी हि अशी हरण्याची भाषा शोभत नाही. आपण नक्कीच यावर उपाय काढू...

बाय द वे इतक्या वर्षानंतर भेटून खूप छान वाटलं!आणि हो लहानपणीपासूनची आपली हि मैत्री आहे आज जरा म्हातारी झालेली असली तरीही त्यामधल्या भावना कधीही बदलणार नाहीत.

"इतिहास साक्षी आहे प्रेम जेंव्हा संभ्रमाच्या काळ्याकुट्ट अंधारात स्वतःला हरवून बसतं अगदी त्याचं वेळी मैत्री प्रकाशवाट बनून प्रेमाला खेचून आणते तू बिनधास्त रहा! मी बघून घेतो पुढे काय करायचं ते..."

असं म्हणत त्यानं निरोप घेतला पण अजूनही मी त्याचं वाटेकडे बघत उभी होते विचारमग्न की विचारशून्य? देव जाणे! ...

काय प्रतीक, अनिका आणि संदेशचा संसार वाचवू शकेल? उर्वरित पुढील भागात मैत्री की प्रेम? भाग 5 मध्ये


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy