मैत्री की प्रेम?भाग 5
मैत्री की प्रेम?भाग 5
प्रतीक विचार करत होता, "काहीहि झालं तरी अनिका ला यातून बाहेर काढायला हवं." तिच्या तोंडी असली हरण्याची भाषा त्याने पहिल्यांदाच ऐकली होती. शाळेत असताना किती सकारात्मकता लिहायची ती! तिने लिहिलेल्या त्या ओळी आठवल्या,
युंही निकल जायेंगेे मुष्कीलभरे पल
हर अंधेरे के बाद सवेरा होगा कल
फिर जिंदगी में खुषहाली करेगी राज
बस थोडी उम्मीद तो कर ले आज...
हनुमान जसं शक्ती हरवून बसला अगदी तसंच काहीसं अनिकाच झालंय. आता आपल्यालाच जामूवंत बनायला हवं आणि तिला तिच्या शक्तीची आठवण करून द्यायला हवी...
नेमकं काय करता येईल ? याचा सगळा प्लॅन तयार केल्यानंतरच त्याला रात्री झोप लागली.
दोन दिवसात प्रतीकने प्रियंका ची बरीच माहिती जमा केली. तिची फॅमिली, कॉलेज, शाळा, मित्रा मैत्रिणी आणि सोबतच तिच्या आई वडिलांची देखील सर्व माहिती त्याने मिळवली होती.
एक दिवस प्रियंकाच्या कॉलेज समोर एका कॉफी शॉप मध्ये प्रतीकने एका मुलाला शोधून काढले. त्याचं नाव विशाल. तो प्रियंकाचा चांगला मित्र वाटत होता. म्हणून त्याच्या प्रत्येक हालचालीवर प्रतीक बारीक नजर ठेऊन होता. अवघ्या दोनच दिवसात त्याला विशाल बद्दल बऱ्याच गोष्टी सापडल्या ज्यावरून त्याच्याकडून सगळी माहिती भेटेल.
एक दिवस त्याने विशालला पकडलेच. त्याला अशा काही गोष्टी सांगितल्या आणि दाखवल्या की विशालला सर्व खरं खरं सांगावं लागलं.
मग शेवटी विशालला त्याने प्रियांकाला कॉल करायला सांगितला.प्रियंकाला ही त्याच कॉफी शॉपमध्ये बोलावलं. प्रतीकने ठरवून दिल्याप्रमाणे विशालने प्रतीकची ओळख एक मित्र म्हणून करून दिली आणि प्रियंकाची ओळख करताना तो बोलला, "ही प्रियंका माझी गर्लफ्रेंड." ते ऐकताच प्रियंकाने त्याच्याकडे रागाने बघितलं...
विशाल लगेच बोलला, "अग टेन्शन नको घेऊ. तो आपला खास मित्र आहे आणि खूप हुशार आहे. याची आपल्याला खूप मदत होईल तुला त्या प्रतीकच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी. आपल्याला या प्रॉब्लेम मधून बाहेर काढण्यासाठीच तो आपल्याकडे आला आहे. याला तू सगळ बिनधास्त सांगू शकते."
हे ऐकल्यानंतर प्रियंका जरा रिलॅक्स झाली. तरी थोडावेळ ती प्रतीकच्या सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होती आणि जेव्हा लक्षात आले यापासून काही धोका नाही.
तेव्हा तीने बोलायला सुरुवात केली, "खरं तर आमची घरची परिस्थिती जरा बेताचीच आहे, म्हणून माझं शिक्षण काही शक्य होईल अस वाटतं नव्हतं. पण मला शिक्षणाची खूप जास्त आवड ते बघून आईने मला सांगितलं की "तू असं काहीतरी कर की तुला पैशाची व्यवस्था पन होईल आणि अभ्यास पण होईल" हे सांगण्यामागचा तिचा उद्देश नेमका काय होता ते मला काही कळलं नाही. पण त्याच काळात संदेश सरांची भेट झाली. एक दिवस वर्गात असताना बऱ्याचदा ते माझं लक्ष नसताना माझ्याकडे बघायचे हे मला जाणवायचं पण आमची नजरानजर झाली की तेंव्हा मात्र ते नजर दुसरीकडे वळवायचे. मी काय आता एवढीही दूधखुळी नव्हते. मला पण त्यांच्या डोक्यात नेमकं काय चालू असेल? हे लक्षात आलं म्हणूनच विशाल आणि मी मिळून हा प्लॅन बनवला आणि त्या प्लॅनच्या माध्यमातून शिक्षण होईपर्यंत सरांना याच पद्धतीने बोलत राहायचं आणि खुश ठेवायचं. जेणेकरून माझ शिक्षण बंद पडणार नाही. सुरुवात इथून झाली पण हळूहळू एक एक गोष्ट वाढत गेली सर माझ्यात अजुनच गुंतत गेले. त्यांनी माझ्या वरती शिक्षणाव्यतिरिक्त देखील भरपूर खर्च करायला सुरुवात केली. मी नको म्हणत असताना बऱ्याच गोष्टी मला दिल्या जसं की गाडी, सोन्याची चैन वगैरे. सुरुवातीला मलाही हे सगळं नको होतं पण नंतर वाटायला लागलं,
जब किस्मत छप्पर फाड के दे रही हो
तो हमें उससे मुकरना नही चाहिए...
तसं तर हे सगळं सुरळीत चाललं होतं आणि गिफ्ट च्या माध्यमातून अश्या गोष्टी जर मिळत असतील तर कुणाला नको वाटतील. पूर्वी सर म्हणायचे माझी फॅमिली आहे त्यामुळे या नात्याला आपल्याला खूप पुढे नेता येणार नाही. यावरून मी सुद्धा खुश होते की आपल्याला पुढे काही धोका नाही म्हणून....पण गेल्या काही दिवसांपासून अचानक त्यांना काय झाले काय माहिती ते माझ्या फारच मागे लागले आहेत. सारखं लग्नाबद्दल बोलत असतात. म्हणतात माझ्या बायकोला काही प्रॉब्लेम नाही, आपण लग्न करूयात, कुठेही निघून जाऊ आणि तेही वाटत नसेल तर माझ्याच घरात राहिली तरी तिची काही हरकत नाही असं म्हणते ती...असल्या भलत्यासलत्या गोष्टी बोलायला लागलेत मला तर काहीच समजत नाहीये काय करावं? मी आईला विचारलं तर आई म्हणते, "तू तुझं बघ, मला नको सांगू....मी काय तुला असा पर्याय निवडायला नव्हतं सांगितलं..."
तेव्हा मला विशाल ने तुमच्या बद्दल सांगितलं आणि म्हणूनच मी इथे आले...
प्रतीक:- बरं तुझ्या वरती संदेशनि किती खर्च केला असेल साधारण आत्तापर्यंत?
प्रियंका:- सुरुवातीला माझी अपेक्षा फक्त शिक्षणाबद्दल होती पण सगळे गिफ्ट्स वगैरे मिळून आतापर्यंत दोन - तीन लाख रुपये किंवा त्याहूनही जास्त झाले असतील.
प्रतीक :- अरे पण उगाच कुणी कुणावरही एवढा खर्च करत का? तुझ्या बद्दल त्याच्या मनात नक्कीच काहीतरी फिलींग असतील... काही नाजूक भावना असतील...त्या भावनांचा तरी विचार कर...
प्रियंका :- कसल्या भावना घेऊन बसले तुम्ही? त्यांचं वय किती माझं वय किती? बर ते सगळं असलं तरी दिसायला तरी धड आहे का? कोणत्या मुलीकडे बघून काय विचार करतील सांगता येत नाही... अशा माणसावर सोबत कोण संसार करणार...?
बर तेही सगळं ठीक होतं पण जो आपल्या बायकोचा नाही होऊ शकला तो मला काय प्रेम देणार?
आणि मी तशीही काहीहि असलं तरी फक्त विशालचीच होते, आहे आणि विशालचिच राहणार... त्याच्यावर माझं मनापासून प्रेम आहे...
हे सगळ ऐकून झाल्यावर प्रतीकने विशाल कडे बघितलं आणि "सांगू का?" असा डोळ्यानेच इशारा केला... तेव्हा त्याने नजर झुकवत "प्लीज नको ना!" असं नजरेनेच इशारा केला...
तेवढ्यात प्रतीक बोलला "अरे! ऑर्डर तर द्यायचीच राहिली.ते ऐकून विशाल म्हणाला,"मी देतो की ऑर्डर" आणि चटकन तो ऑर्डर द्यायला निघून गेला. तेवढ्याच वेळात प्रतीक ने प्रियंकाला सांगितले, "मला तुला काही तरी दाखवायचं आहे."असं म्हणत त्याने विशाल आणि तनया यांचे नको त्या अवस्थेतील सगळे फोटो प्रियंकाला दाखवले आणि सांगितलं,
"आता काहीच रिऍक्ट करू नको, शांत रहा...."
"आणि हो एक गोष्ट कायम लक्षात ठेव आयुष्यभरासाठी - पृथ्वी गोल आहे एखाद्याच्या वाट्याचं प्रेम हिसकावून तुला आयुष्यात खरं प्रेम कधीच भेटू शकणार नाही, ऊर्जा अक्षयतेच्या नियमाप्रमाणेच जगातील प्रेम कायम अक्षय्य राहणार एकीकडे खड्डा होईल तेंव्हा कुठेतरी पर्वत बनणार हे तितकाच शाश्वत सत्य..."
तेवढ्यात विशाल तिथे कॉफी घेऊन आला. तिघेही शांततेत कॉफी घेतात. आपलं काम झालं याची खात्री पटताच प्रतीक ने 'चला निघूया' असं म्हंटल आणि खुर्ची मागे सरकवत निघण्यासाठी उठला. प्रियंका आणि विशाल ही दोघे हि निघाले. तेवढ्यात अचानक खाडकन असा आवाज आला बघतो तर काय ! प्रियंकाने विशालच्या कानाखाली जोरदार चपराक मारली आणि जोरात बोलायला लागली, "अरे! तुझ्यासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावलं होतं अगदी शरीर आणि अब्रू सुद्धा... कधी काय होईल? याची भीती न बाळगता तुझ्या प्रेमाखातर किती काय काय केलं? आणि तु मला हे फळ दिलंस. एव्हाना विशालला सगळं लक्षात आलं होतं. विशाल आणि प्रियांका दोघेहि खाली मान घालून उभे होते....
प्रतीक तिथून निघाला आणि थेट संदेश शाळेसमोर पोहोचला. अनिका कडून त्याने अमोदचा नंबर मिळवला आणि त्याला कॉल करून सांगितलं, " मी प्रतीक बोलतोय अनिका चा मित्र! तुम्ही संदेश सरांना घेऊन शाळेच्या समोर असलेल्या कॉफी शॉप येऊ शकता का जरा अर्जंट बोलायचं होतं? "
येतो की, लगेच घेऊन येतो...
अमोद आणि संदेश दहाच मिनिटात कॉफी शॉप मध्ये पोहोचले. ते समोर आल्यानंतर अमोदने संदेश आणि प्रतीकची ओळख करून दिली.
प्रतीकने सांगायला सुरुवात केली, "आता जास्त टाइम पास न करता, माझ्याकडे असलेल्या काही व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत ज्या तुम्हाला जरा उपयोगी ठरू शकतील. व्हिडिओ प्ले केला जेवढे काही प्रियंका बोलली होती तिच्या एक्सप्रेशन सहित सगळं प्रतीकने मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलं होतं... तिथे जो काही घडलेला प्रकार विशाल, प्रियंका आणि त्यांचे सर्व प्लॅन्स सारं काही मोबाईल मध्ये रेकॉर्ड झालेलं होतं... एकन एक शब्द रेकॉर्ड होता ते सगळं बघितल्यानंतर संदेश ला स्वतःची चूक लक्षात आली . आपण केवढे चुकलो याबद्दल त्याला स्वतःचीच किळसं वाटायला लागली... अशा अवस्थेतहि अनिका माझ्या सोबत किती प्रेमाने वागली. तिचे ते प्रेमळ शब्द आठवून त्याला अश्रू अनावर झाले....
काहीही न बोलता, कॉफीसुध्दा न घेता तो घाईघाईने घरी गेला....
"अनिका अनिका अनिका!" असं म्हणत त्याने घरात एन्ट्री केली... "काय झालं? " म्हणत अनिका तशीच पिठाणे माखलेले हात घेऊन बाहेर आली. ती दिसताच संदेशने मागे पुढे ना बघता तिला कपाळावर, गालावर, हातावर, मानेवर किस करायला सुरवात केली आणि रडत रडत, "सॉरी सॉरी सॉरी... मी खूप वाईट वागलो.... Extremely सॉरी " म्हणत तिला घट्ट मिठी मारली... तिला काही समजायच्या आत त्याच्या मागोमाग प्रतीक आणि अमोद भाऊजी तिथे पोहचले आणि प्रतीकच्या नजरेत तिने बघितलं तेंव्हा तिला तिच्या सगळ्यांना प्रश्नांची उत्तरे मिळाली.....
तेवढ्यात मागे रेडिओवर
मंद आवाजात गाणं वाजायला सुरुवात झाली...
मेरी ज़िन्दगी सवारी
मुझको गले लगाके
बैठा दिया फलक पे
मुझे खात से उठाके
तेरे जैसा यार कहाँ
कहां ऐसा याराना
याद करेगी दुनिया
तेरा मेरा अफ़साना
तसा मैत्री की प्रेम हा वाद बराच जुना...
पण खरं म्हंटलं तर आज पुन्हा सिद्ध झालंय,
प्रेम बंधन म्हणजेच मर्यादा घेऊन येतं जिथे मैत्री अमर्याद असते...
प्रेमात कुठला का असेना कधी ना कधी किंचित तरी स्वार्थ डोकावतोच याउलट मैत्री निःस्वार्थ असते...
प्रेम झाडावरील हिरव पान असेल तर त्याला अन्न पुरवणारं हरितद्रव्य म्हणजे मैत्री...
प्रेमालासुध्दा ज्याच्यावर असते खात्री तीच असते खरी मैत्री...
कथा कशी वाटली? तुमचा अभिप्राय कंमेंट द्वारे नक्कीच कळवा...
सोबतच जर तुमच्याकडेही काही विषय असतील तर नक्कीच सुचवा, मी प्रयत्न करेल त्या विषयांवरती लिहिण्याचा...

