लॉटरी
लॉटरी
" केशवला 25 लाखाची लॉटरी लागली ?? "
हे वाक्य ज्याच्या त्याच्या तोंडातून ऐकताच ऐकणारा अगदीच थक्क होवून जात होता . आश्चर्याने तोंडात बोट जात होते आणि सोबतच एक अश्रू हि ओघळत होता ...
ही बातमी त्या छोट्याश्या गावात हाहा म्हणता पसरली . केशवची बायको आणि मुले मात्र या बातमीपासून अजूनही दूरच होते . त्यांचे दुःखाचे कड आत्ताशी जरा ओसरू लागले होते . त्यांनी अजूनही आपले घर सोडले नव्हते .
नामा , केशवचा जवळचा मित्र भर उन्हाचा धापा टाकत केशवच्या मुलाला हाका मारत त्याच्या घरात शिरला . त्याला असं अचानक आलेलं बघून घरातले त्याच्या तोंडाकडे बघू लागले . केशवच्या बायकोने शैलाने मुलीला पाणी आणायला सांगितले . नामा पाणी पिऊन जरा शांत झाला आणि म्हणाला ,
" वहिनी , तुम्हाला काहीच कळले नाही का
अजून ? "
शैला त्याच्याकडे बघत नकारार्थी मान हलवत म्हणाली , " काय झालं भाऊजी ? "
नामा म्हणाला , " अहो आपल्या केशवाला 25 लाखाची लॉटरी लागली आहे . सकाळी टीव्ही वर सांगितले . ती लोकं संध्याकाळी सगळी माहिती घ्यायला येणार आहेत ."
शैला आणि तिची मुले हे ऐकून स्तब्ध झाली . ही बातमी ऐकून त्यांना हसावं की रडावं तेच कळेना .
त्यांची अवस्था जाणून नामा म्हणाला , ' वहिनी खरं तेच सांगतो आहे ."
केशवचे तिकिटाचे वेड सारा गाव जाणत होता .सगळे त्याला समजवायचे की हा नाद चांगला नाही .
बक्षीसाच्या नादात तिकिटासाठी केशव किती पैसे घालवायचा हे बघून बरेच जण त्याला ओरडायचे सुध्दा .पण त्याने कधी ऐकले नाही .हे तिकीट पण त्याने नामाला बळजबरी पैसे देवून काढून आणायला सांगितले होते . त्याने दहा तिकिटे काढायला लावली होती पण नामाने त्याला तिकिटं संपली म्हणून फक्त दोनच आणून दिली होती आणि त्याचं नशीब म्हणजे त्यातलेच एक लागले होते .
केशवने अगदी हॉस्पिटल मध्ये जातानाही त्याचा नाद सोडवला नाही . " आजाराला पैसे नाही म्हणून दुखणं अंगावर काढलं बाबाने आणि त्यातच संपला पण आज हे असं कसं विपरीत घडलंय बघा .
" नामा बोलता बोलता रडू लागला . थोडं शांत होत म्हणाला ," शेवटच्या क्षणी केशव मला म्हणाला होता , " बघ ह्यावेळी मला नक्की बक्षीस मिळेल ."
त्याला मी म्हणलं ," अरे तुझा जीव वाचला तर त्या बक्षीसाचा फायदा , "
तेव्हा मला म्हणाला , " अरे आता मला नाही झाला तर माझ्या बायका पोरांना तर
होईल ." तेव्हा त्याला ओरडुन मी गप केले होते पण बघा आता त्याचच म्हणणं खरं झालं "
सगळे जण केशवच्या आठवणीने अश्रू ढाळत होते .
एक महिन्यापूर्वी केशव हे जग सोडून निघून गेला होता . घराची जबाबदारी सगळी त्याच्यावर होती , पदरी १२ आणि १० वर्षाची दोन मुले . शैला त्याला हातभार लावत होती . रिक्षाच्या उत्पन्नावर या कुटुंबाची जमेल तशी गुजराण चालू होती . पैश्याची ओढ केशवला तहान भूक विसरून सतत फिरता ठेवत होती . या लॉटरीच्या वेडापायी त्याने खुप पैसे घालवले होते . आजवर त्याला कधीच त्याचे नशीब अजमावता आले नाही आणि आज अचानक त्याच्या मागे देवाने त्याचे स्वप्न पूर्ण केले होते . केशवला आपल्या मुलांची उपासमार होऊ नये असे वाटायचे म्हणून तो हा सोपा मार्ग जवळ करत होता पण त्याचा हा मार्ग देवाला जणू मान्यच नव्हता . बक्षीस मिळालेले पैसे बघण्याचे भाग्य त्याच्या नशिबात नव्हते .
संध्याकाळी सरकारी अधिकारी आले त्यांना नामा जवळ असणारे तिकीट दाखवले , त्यांनी नंबर पाहिला आणि शैलाजवळ बक्षिसाची रक्कम सुपुर्द केली .
शैला हात जोडून , भरल्या डोळ्यांनी आभाळाकडे पाहात म्हणाली , " तुमचं स्वप्न तर पूर्ण झालं पण तुम्ही असताना हे झालं असतं तर तुम्हाला आनंदाने वेड लागलं असतं . पैसा तर हवा आहे पण मला तुम्ही सुध्दा हवे होता . आज या क्षणाचा मला आनंद तर आहे पण यासाठी तुम्हाला मात्र आमच्या पासून खुप लांब जावं लागलं . पण मनात हे समाधान आहे की शेवटी उशिरा का असेना पण आपली ददात संपली . तुमच्या इच्छेप्रमाणे आता या पैशातून मी आपल्या मुलांचे उज्वल भवितव्य नक्की घडवेन . "
