लॉकडाऊन ची धग
लॉकडाऊन ची धग
दिवस मावळून तांबडं कवा फुटलं ते कळलं बी नाय, मोठं मोठाल्या इमारतीच्या आडान लाल तापलेला सूर्यनारायण हळूहळू डोकं वर काढत होता. पहाटेपासून दूध, वर्तमानपत्र आणि भाजीपाल्याचा व्यवसाय करुन पोट भरणाऱ्या माणसांची धावपळ चालली होती.
जवळनच जाणाऱ्या रेल्वे रुळावरचा खडखडाट कानावर पडत होता. टेशनच्या शेजारीच उभारलेल्या घरातनं सखाराम भायर पडला . दारातच रोवलेल्या पत्र्याच्या आडोशानं चार तांबी अंगावर वतुन घेतलं. तवर पारीन चहा आणि तेच्या बरोबरच जेवणाच्या डब्याची पीशवी हातात दिली. सोम्या आणि गंगी अजून झोपलीच हुती. घोटभर चहा पिऊन पोरांकडं एक नजर टाकून लगबगीनं सखारामन रेल्वे स्टेशन गाठलं.
आठ वाजताची लोकल पकडून कसबस लोंबकळत लोंबकळत सखाराम रोजच्या स्टेशनवर उतरला आणि दहा पंधरा मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या कारखान्यात लगबगीनं कामाला गेला.
कष्टाचं काम असलं तरी सखाराम लई प्रामाणिक त्यामुळं मालकाची विशेष मर्जी.
" हम दो हमारे दो "... असा सुखाचा संसार सुरु होता. महिन्याला मिळणाऱ्या आठ- नऊ हजाराच्या पगारात घर खर्च भागवून चार पैशाची बचत करत गावाकडलं घर बी सखाराम सांभाळत हुता.
सगळं कसं आटोपशीर चाललं हुतं.
पण एकाएकी अवती भावतीच आजारपण वाढत गेलं आणि कारखाना बंद करायची सरकारची ऑर्डर आली.
सुखी संसारात कालवाकालव सुरु झाली. गावाकडं जायाचं रस्त बी बंद झालत.
आता करायच काय आणि खायाचं काय ? ह्यो एकच प्रश्न सख्या आणि पारी समोर आवासून उभा राहिला.
मालकाची विशेष मर्जी असल्यामुळ दिड दोन महिन्याच राशन आणि पाच एक हजार रु. मालकानं सखाराम ला पुरवलं होत. आता हेच्या पेक्षा मालक तरी बिचारा काय करणार.
रोज कानावर पडणारा रेल्वे रुळावरचा खडखडाट बंद झालता. गल्लो गल्ली, रस्त्या रस्त्यावली माणसं गायब झालती. येष्टया, मोटारी, रिक्षा, हातगाड्या सगळी सगळी चाक थांबली हुती.
या सगळ्या स्मशान शांततेच नांव होत.
लॉकडाऊन...
काबाडकष्ट करुन पोट भरणार्यासाठी मात्र हा
लॉकडाऊन...
म्हणजे कोंडमारा म्हणावा असाच होता.
पारी दाल्ल्याला म्हणाली..
आव कवा संपायचा ह्यो लॉकडाऊन...
घरातल राशन तर संपत आलंयच, पण खुलीच भाडं, लायटीच बिलं, उधार उसनवारी... आणि
अगं अगं पारे.. तू म्हणतीस ते समदं खरं हाय पण.. आजार लई गंभीर हाय...आपल्या पोराबाळा साठनं काळजी तर घ्यावीच लागलं.
त्यात आई गावाकडं आजारी हाय हे ऐकून माझ्यातर पोटात गोळाच आलाय बघ.
असं म्हणत सखाराम दारात जावून डोक्याला हात लावून विचार करत बसला.
दोन महिन्याचा कोंडमारा सोसून सखाराम आता बैचैन झालता. काय करावं सूचना..
शेजारच्या आलम चाचाच वय झालत.
तेची बंद पडलेली हातगाडी घेऊन सखारामन गल्लीतनं फिरून भाजीपाल्याचा व्यवसाय चालू केला.
तांबडं फुटायला पुलाखाली जायचं आणि भाज्याच पाचुंद बांधून आणायचं..
तीन चार तास गल्लीतनं फिरून ती भाजी विकायची ह्यो दिनक्रम आता सखारामनं आता पत्करला होता.
उद्याच्या भाजीच बाजूला काढून. घर खर्चा पुरतं पैक शिल्लक राहत हुतं...
महिनाभर भाजीपाल्याचा व्यवसाय करता करता भाजी देणाऱ्याची तोंड ओळख झालती.
तेन कानावर घातलं..
हाताला काम मिळलं पर... तुला पटणार हाय का बघ...
लॉकडाऊन मध्ये सगळं बंद असताना हाताला काम मिळणार म्हटल्यावर सखाराम ला धीर आला..
काम आणि कुठं हे समदं ऐकल्यावर सखारामच्या चेहरा गंभीर झाला..
पण काम स्वीकारण्या शिवाय दुसरा मार्गच न्हवता..
हातगाडा बंद केला आणि त्याच चाचाची जुनी सायकल आता सखाराम नं इकत घेतली.
पारी ला काम मिळाल्याचा सांगावा सांगितला...
तशी पारीबी खुष झाली..
बरं उद्यापासून लवकर डबा करते त्यो घेऊन कामावर जावा एवढंच ती म्हणाली आणि दिवळीतल्या देवाला पाया पडली.
न्हवऱ्याला नवीन काम मिळालं हुतं. पर
त्या बिचारीला कुठं ठावं व्हतं कसलं अन कुठलं काम ते.
सखाराम कामाच्या काळजीनं आणि पारी काम मिळाल्याच्या आंनदान पोरास्नी घेऊन झोपी गेली.
दिस उजाडला दारातच रोवलेल्या पत्र्याच्या आडोशाला सखारामनं चार तांबी अंगावर वतुन घेतल.
तवर पारीन चहा आणि तेच्या बरोबरच जेवणाच्या डब्याची पीशवी हातात दिली. सोम्या आणि गंगी अजून झोपलीच हुती. घोटभर चहा पिऊन पोरांकडं एक नजर टाकून धन्यानं लगबगीनं सायकल वर ढेंग टाकली आणि बघता बघता सायकल रस्त्याच्या दिशेन धावू लागली.
सखाराम रोजच ह्या येळ ला घराबाहेर पडायचा
पण रोजच्या कामावर न जाता तेची पावलं आज भलतीकडच वळली होती. आपल्या पोटाची आणि खाणार्या चार तोंडाची तेला काळजी तर हूतीच त्या शिवाय गावाकडं म्हाता म्हातारी आणि बाकीची माणसं बी होतीच.
सखारामचं हातच व्हतं ते काम बंद पडलं होत. तीन महिने जुन्या मालकाच्या आणि कुणाच्या तरी भरवशावर कसबसं दिस काढून नुकतंच त्यो नवीन कामावर हजर झाला होता. जोखमीचं काम असलं तरी हाताला काम मिळाल्यामुळं त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. दिवसभर काम करुन सखाराम घरी परतला पर पुढल्या न्हाय तर मागल्या दारानं...
येताना लई दिवसांनी का होईना पण हातांतन आणलेल्या खारी, पाव आणि फरसण्याची पिशवी पोरांनी हरकून काढून घेतली.
पोरास्नी काय ठावं येळ आणि काळ.
सोमा चौथीला तर गंगी दुसरीला पण गेल्या चार महिन्यापसन लॉकडाऊन मूळ शाळेची सोडचिठ्ठी घेतलेली.
तीन चार महिन्यापासून सुरु असणाऱ्या
लॉकडाऊनन सार जन जीवनच विस्कळून गेलंत.
सखाराम कामाला असणारी एम.आय.डी.सी . बंद झालती. शासनान घालून दिलेल नियम पाळत दोन तीन महिने गप्प बसून राहिलेल्या सखाराम ची आता घालमेल होत होती.
आठ दहा वर्षांपासून काबाड कष्ट करुन घर आणि आपलं गांव सांभाळणाऱ्या सखारामनं बायको पोरांच्या काळजीनं चार घास पोटाला मिळतील असं एक काम मिळवलं होत.
काम तस लई जोखमीचं...
पर.. केल्याशिवाय दुसरा कंचा मार्चच न्हवता.
लॉकडाऊन कवा संपल, फॅक्टरी कवा चालू होईल आणि चालू झालीच तर कामावर परत बोलावतील हेचा काय नेम नव्हता. कुठं पातूर वाट बघत बसायची म्हणून सखारामनं जोखमीचं असलं तरी बी.. लई ईचार करुन काम धरलं होत.
बायका पोरांच्या काळजी पोटी त्यो दिवसपाळीलाच जायचा..
दिसा मागून दिस जातं राहील पंधरा वीस दिसांनी सकाळच्या पारी न्हेल्याला डबा तसाच माघारी आलेला बघून रात्री भांडी घासताना पारीनं इचारलं..
आता गं बया.. आव डबा तसाच हाय की.. खाल्ला न्हाईसा व्हयं..
अगं आज कामाचा लोड लईच हुता बघ त्यामुळ डब्याकड लक्षच न्हाय गं.
सखाराम सकाळी डबा घेऊन जायचा पर एकांदा दिस तुकडा पोटात जायचा बी न्हाई..
कामच तेवढं मरणाच...व्हतं..
बाहेर सगळीकडं लॉकडाऊन असला तरी सखारामनं पत्करलेल्या कामाला खरंच मराण न्हवतं..
रात झाली चोघांनी बी जेवण केली.
पोरं लगोलग झोपी गेली.
तस पारी अन सखाराम बी जमिनीवर कलांडली..
पर सखाराम ची झोप काय लागत न्हवती
लागणार तर कशी कामच तस जोखमीचं व्हतं.
एक झाल कि.. दुसर..तिसरं.. चौथं..
मोकळा श्वास घ्यायला सुधिक उसंत मिळत न्हवती अशी आठ दहा तासाची ड्युटी...जीवावर बेतल्याली...
घराकडं आल्यावर बी तेच ते सार रातभर डोळ्यासमोर दिसायचं.. बायको आणि पोरांच्या काळजीनं काळीज थरथरायच..
पर सांगायचं कुणाला आपलंच दात आणि आपलंच ओठ..
लॉकडाऊनची धग सोसवना म्हणून हि धग सोसायची येळ आल्याली दुसर काय..
तांबडं फुटायला अजून वकूत हुता तवर कुणीतरी दार ठोठवलं..
अर्ध्या झोपतनच डोळं चोळत चोळत सखाराम ताड्कन उठला आणि दार उघडलं...
खाल्या गल्लीतला रामा दारात हुभा...
रामा म्हणजे महानगरपालीकेच्या शववाहिकेवरचा ड्रॉयव्हर...
मुडद बघून कवा हातपाय गळल न्हाईत पर..
पहाट पहाट दारात उभ्या असणाऱ्या रामाला बघून मातुर सखारामच हातपायच गळलं...
पारीला कळायच्या आत दार वडून घेतलं आणि रामाला पल्याडला बोळात न्हेऊन दमानं सखाराम बोलाय लागला...
रामा येणारच हुतो कि समशानात..
घराकडं कशाला आलास.. माझ्या बायका पोरास्नी म्हायती न्हाय म्या कुठं कामाव जातुया ते...
सखातात्या समदं खरं हाय.. पर परवा रात पाळीला कामाला हुता त्यो कांबळ्याचा गोंदा धाप लागून खोपटातच मरून पडलाय...
काय सांगतूयास रामा.. तुला वर्दी आलीय काय.
व्हयं.. मला गाडीवर हजर हुयाला निरोप आला तस तुला उठवायला आलुया.. रातच्यानं मड ताटल असलं बघ..सखातात्या आपल्याला जाया पायजे बघ..
पल्याडल्या बोळातल सगळं बोलणं आतल्या पारीनं ऐकलं आणि आपला धनी.. पोटापाण्यासाठी मडगेटात मडी जाळायला जातुया हे कानावर पडताच पारीच्या अंगच पाणी पाणी झाल...
गोधडीत डोस्क घालून झोपलेल्या लेकरांकडं बघून तीच्या डोळ्यातन ठीप गळायला लागलं हुतं..
तू हो म्होरं म्या पाठोपाठ आलूच अस सांगून सखाराम गुमान दार उघडून आत आला तर पारी हातरूणातच बसून ढळा ढळा रडायला लागल्याली..
पारीला समदं समजलंय हे सखाराम च्या लक्षात आलं...
तस सख्यान बी पारी ला कवटाळली आणि म्हणाला..
सहा महिन झालं ह्यो आजार काय कमी हुईना आणि हाताला काय काम मिळना म्हणून हे काम पत्करलंय बघ पारी...
अगं हि लॉकडाऊन ची धग सोसण्या परास त्या चित वर जळणाऱ्या मड्याची धग बरी..
निदान ती
....पोटाला तरी खाऊ घालत्या....
....पोटाला तरी खाऊ घालत्या....
