Sandeep Jangam

Comedy

3  

Sandeep Jangam

Comedy

ललित बंध...फडकं ।

ललित बंध...फडकं ।

7 mins
169


का हसलात हो ? म्हणजे फडकं ही हसण्या सारखी क्षुल्लक वस्तु आहे असंच तुमचं हि म्हणणं ना ? बाकी दोष तुमचा नाही म्हणा ! मला सुध्दा अगदी कालपर्यंत असंच वाटत होतं . फडक म्हणजे टाकाऊ वस्तू असं मीहि समजत होतो. कितीदा तरी आम्हा नवराबायकोचे भांडण केवळ फडक्यावरून झालेलं आहे . 

स्वयंपाक घरातल्या शेगडी जवळ नेहमी एक दोन फडकी ठेवायची आमच्या सौ. ची सवय ! मला मात्र त्या फडक्याचा भारी किळस यायचा. त्याचं ते कळकट नि मळकट रूप पाहिलं की घृणा वाटायची . मी आपला ती फडकी चटकन फेकून तरी द्यायचो नाही तर सरळ सरळ त्यांची रवानगी बंबात करायचो !


एकदा आमच्या सौ. न माझ्या फाटक्या विजारीचं एक छानस फडकं काढून ते तिनं नेहमीच्या तिच्या सवयीप्रमाणे शेगडी जवळ ठेवलं. एकदोन दिवसच झाले असावेत त्या तिच्या नव्या फडक्याला ! कारण ते फारसे मळलेलं दिसत नव्हतं. सौ. बाथरूममध्ये धूण घूत होती. मला जरा लवकर बाहेर जायची घाई होती म्हणून मी स्वतःच वाढून घेऊन जेवायला बसलो. जेवणात मला दूध हवं होतं म्हणून शेगडी वरचं दूधाचं भांडं त्या फडक्यानं धरून मी दूध ओतून घेत होतो. इतक्यात ते फडकं नेमकं माझ्या हातातून निसटून ताटात पडलं. माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली. अगदी रागाने लालबुंद होऊन तणतणत थेट सौ. धूणं धूत होती तिथं गेलो ..

"काय तुला डोकं बी हाय का न्हाय ?" 

मी तिच्यावर कडाडलो, 

तशी ती एकदम बाबवरुन उठली. 

"म्हणजे झालं तरी काय असं ?" 

तिच्या प्रश्नाला सरळ उत्तर देण्याच्या अवस्थेत नव्हतोच मुळी मी ! 

काय झालं म्हणून काय विचारतेस ? 

अग तुझ्या त्या लाडक्या फडक्यानं सारा घोटाळा केला ? 

तिला काही बोध झाला नाही म्हणून ती उत्सुकतेने पण भीत भीत बोलली, 

"नव्हे असं घडलं तरी काय ?" 

या तिच्या खुलाशाचा प्रती प्रश्न ऐकून 

"म्हणे झाले तरी काय ?" मी तिला रागावलो आणि पुन्हा चांगला दम भरला "जर या पुढं स्वयंपाक घरात तुझं ते फडकं मला दिसलं तर ध्यानात ठेव. कितीतरी दिवसांनी मी आपल मनसोक्त जेवत होतो आणि तुझं ते फडकं ताटात पडावं ? आता जेवण बंद !" 

मी निर्णय जाहीर केला आणि रागारागाने हात धुवून बाहेरच्या बेडवर येऊन पडलो. 

तिनं पुन्हा पुन्हा विनंती केली . 

पण मी तिला दाद दिली नाही. 

शेवटी त्या घटनेची शिक्षा म्हणून ती सुध्दा त्या दिवशी जेवली नाही.


तेव्हा पासून मात्र आपल्या त्या फडक्यांना ती फारच जपायला लागली. माझ्या दृष्टीला पडू नये अशी नेहमी खरबदारी घेऊ लागली. ते जर चुकून नजरेस पडलं तर त्याचा निकाल तर लागायचाच पण तिचा सुध्दा उध्दार व्हायचा. त्या दिवशीच्या घटनेपासून कसलं ते फडकं म्हणून माझ्या दृष्टीस पडू दिलं नाही. तिनं ! मी बऱ्याच वेळा बारकाईने पाहिलं पण मला ते फडकं नेहमीच्या जागी कुठं दिसलं नाही. मी थट्टेने कधी कधी तिला विचारीत असे "काय ग, तुझं ते लाडकं हल्ली कुठं दिसत नाही बरं ?" त्यावर ती किंचीत हसून म्हणे " तुमचं आणि त्याच वाकड आहे ना ?" म्हणून ठेवलय असंच कुठं तरी लपवून" मी तिला चिडवायचो. 

"काही हरकत नाही ! तू त्याला आपली चांगली ट्रंकेत घालून ठेव ?" 

त्यावर ती चिडायची आणि म्हणायची 

"मी ते ट्रंकेत ठेवीन नाहीतर लॉकरमध्ये ठेवीन तुम्हाला आवडत नाही ना ? मग त्याची आठवण कशाला ?" 

त्यानंतर बरेच दिवस तिचं ते फडकं मला दिसून आलं नाही.


आज सकाळीचीच घटना. आमचे चिरंजीव युवराज महापराक्रमी पोर आहे ! नको ते प्रश्न विचारून सारखा सतावित असतो ! म्हणून मी दटावणी देऊन अभ्यासाला बसवीत होतो. एवढ्यात आमच्या घरमालकांनी हाक मारली 

"अहो सर एक काम करणार काय ? 

" मी त्यांना आत बोलावीत म्हटलं ..

"आत तरी या खरं ! काय काम करू .

" नाही हो फार वेळ झालाय. माझं काम म्हणजे असं की मला एकदोन फडकी पाहिजेत ?

" त्यांनी फडक्याचं नाव काढताच मला झेंडू फुटला पण राग मनात दाबून टाकीतच हसत बोललो. "काय राव माझी चेष्टा करता होय ?

'' "छे! छे! खरंच मला दोन फडकी पाहिजेत.चेष्टा नव्हे ?" 

त्यांचा आग्रह चालूच होता. सर तुम्हाला फडके मागतो म्हणून गंमत वाटली असणार पण खरंच दोन फडकी पाहिजे. आमच्या घरातील सारी फडकी खलास झाली बघा, म्हणून विचारतोय .

"मी न राहून विचारलं" पण त्यांची एवढी जरूरीच काय ? 

त्यावर त्यांनी खुलास केला. "सर, आम्ही मिस्त्री लोक तुम्हाला माहितच आहे की आमचा सारा खेळ इंजिनच्या खिळ्या मोळ्याशी आणि तेल पाण्याशी ! तर त्या कामात पुसण्या पासण्या करीता फडकी लागतात. हात स्वच्छ करायचं झालं तर वाटेल त्या प्रकारचा साबण लावा नी काय वाटेल ते करा काहीही उपयोग होत नाही. परंतु हाताला थोडसं ऑईल लावलं आणि एखाद्या फडक्यानं स्वच्छ हात पुसला की काम फत्ते ! 

" त्यांचा हा खुलासा ऐकून मी चाटच पडलो, मनातल्या मनात फडक्याची महती पटत चालली होती. पण सौ. च्या समोर मला ती गोष्ट कबुल करायची नव्हती !

“बरं बरं थांबा तुम्हाला हवी तेवढी फडकी आणून देतो." 

असं म्हणून गोठोड्यातली ७-८ फडकी मी त्यांच्या समोर आणून ठेवली. मनात म्हटलं ही घरातील पीडा जाऊ दे. 

त्यावर ते म्हणाले, "अहो एवढी कशाला ? घरात असू द्या की ४-२ साठ्याला." 

त्यांची ही काटकसरपाहून मला हसूच आले. 

पुरे पुरे १-२ फडकी ते ठेवून गेले. 

ती फडकी मी तिच्या अंगावर फेकून दिली आणि माझ्या कामाला लागलो हा पणं काहीही म्हणा पण फडक्याचे महात्म्य मला पटत चालले होते.

हे मात्र नक्की..


गेल्या आठवडयातील घटना मी बाहेरून आलो . तोच चिरंजीवांनी पतंग करून देण्याविषयी तगादा लावला. कसेबसे दोन घास खाल्ले आणि चिरंजीवाच्या सेवेला रूजु झालो. पतंगाचे कागद

कातरुन ठेवले. त्याला लावायच्या काड्या ब्लेडने घासून मी सारख्या करती होतो, तो पठ्ठा

माझ्या समोर फतकल मारूनच बसला होता.

त्याची तोंडाने अखंड बडबड सुरू होती. नकळत माझ्या उजव्या हातातील ब्लेड डाव्या हाताच्या बोटावर गेले आणि बोट खसकन कापले. रक्ताची

चिळकांडी उडाली "अगं आई गं?" मी ओरडलो. त्यामुळे सौ. हातातल काम टाकून धावत आली. रक्त पाहून ती पण घाबरली. मात्र प्रसंगावधान राखून तिनं पटकन त्यावर हळद बसविली.


परत स्वयंपाक घरात जाऊन त्या फडक्याची एक चिंधी काढून बोटाला घट्ट बांधली. रक्त थांबलं आणि चिरंजीवांचा पतंगही थांबला. 

मी बेड वर पडून राहिलो. माझं लक्ष कशातही लागत नव्हते. बोटाकडं पहायचं नि 'हाय, हाय' करायचं ! परंतु त्या पेक्षाही मला कौतुक वाटलं होतं ते जखमे वरच्या फडक्याचे कारण मी ज्याचा तिरस्कार करीत होतो ते फडकेच आज उपयोगी पडले होते. त्याने जणू मला खजीलच केले होते. घरात एवढे सारे म्हणून कपडे होते, पण जखम बांधायला उपयोगी पडलं ते केवळ फडक । 


त्याच वेळी मला नेमकी द्रौपदीची आठवण झाली. केवळ चिंधी मुळेच द्रौपदी कृष्णाची लाडकी बहीण झाली होती. हे कथासार देखील चटकन आठवलं आणि मग मी त्या चिंधी कडे पाहून आणखी खजील झालो. माझा गर्व नकळत गळायला लागला आणि फडक्या बद्दल अभिमान वाटायला लागला. जिथे जिथं म्हणून सौ. ने फडकी ठेवली होती तिथे नजर भिरभिरायला लागली आणि त्या सगळ्या फडक्यांबद्दल सहानुभूती वाटायला लागली. दुसऱ्या दिवशी सौ. ने जखम सोडून धुतली आणि परत मलमपट्टी करून नवी चिंधी बांधली. 

ती ड्रेसिंग करताना मला हसू येत होते.


त्यावर ती हसत हसत म्हणाली "बघितलात ना त्या फडक्यावर इतका राग होता ? तुमचा पण शेवटी त्याचाच उपयोग झाला ना ?

" मला हसत हसत मान डोलवावी लागली. 

पुढे चार पाच दिवस रंगीबेरंगी अशा फडक्यांची मलमपट्टी चालूच होती. त्या निमित्ताने सौ. च्या गाठोड्यातील असंख्य आकाराची आणि असंख्य प्रकाराची फडकी मी पाहिली, तेव्हा तिनं जीवापलीकडे जपून ठेवलेल्या त्या ठेव्या बद्दलची माझी सहानुभूती अधिकच वाढली.


माणूस एक हट्टी प्राणी म्हणतात ते खरंच .

दुसरी बाजू पहायची तसदीच घ्यायची नाही. केवळ त्या फडक्यावरून मी सौ. बरोबर कितीतरी भांडलो. पण आता मलाच त्याचा पश्चाताप व्हायला लागलाय. फडकं अगदी क्षुल्लक वाटणारी वस्तु पण केवढी महत्वाची कामं करते. खुर्ची, टेबल, फोटो, कपाट झाडायचं म्हटलं की प्रथम फडकं हवं! दारे खिडक्या तावदाने पुसायची तर फडके शोधा ! रेडिओ आरसा आणि सायकल यांचे काम तर फडक्याशिवाय चालतच नाही. पण एवढंच काय ? काळेकुट्ट बूट पॉलिश करायचे तर फडके अगोदर तयार ठेवावे लागते. पेनमध्ये शाई भरण्यासाठी फडके हवेच. फडकं म्हटलं की घरातल्या आजीबाईची हमखास आठवण होते. तिने कसली कसली फडकी बांधून ठेवलेली असतात ती फडक्यातच ! तसं फडकं हे प्रत्येकाच्या खिशात असावं लागतंच. अर्थात त्याचा उपयोग कोण कशासाठी करतो तो भाग वेगळा ! पण निदान सर्दी पडशाच्या वेळी तरी फडकं खिशात हवंच. लहान पोरांना घेऊन फिरायला बाहेर पडताना "अगं एक लहानसं फडकं दे राजूचं नाक फार येतय." अशी मागणी घरातून आपण करतोच. 


अहो आठवा जरा....

कोरोना काळात तोंडाला फडक बांधल नाही तर कुठे प्रवेश देखील मिळत नव्हता.. हो हो मला माहिती आहे त्याला मास्क म्हणतात. पणं शेवटी काय ते देखील एक फडकच ना... फकत तोंडाला नीट झाकता यावं याकरिता कानाभोवती दोऱ्यान घट्ट बांधता येईल अशी केलेली व्यवस्था.

हा पणं या फडक्यान कित्येकांचे प्राण वाचवलेत बर का..


म्हणजे जळी स्थळी, काष्टी पाषाणी फडक हे हवंच. तुमचे कपडे नि वस्त्रे कितीही भारी असोत तिथं फडकंच उपयोगी ठरतं आणि तुमचं भारी वस्त्र निकामी ठरतं. बाकी काही म्हणा पण फडकं ही एक अत्यंत उपयुक्त वस्तू खरीच ! तेव्हा पासून मी सौ.ला फडकं कुठंही ठेवायचं स्वातंत्र्य दिलंय. शिवाय शेगडी वरच्या भिंतीला एक खिळा मारून दिला आणि तिथं एक फडके कायमच ठेवून दिलंय. इतकंच काय पण मी माझा बैठकीच्या खोलीत कपाटाच्या बाजूला खिळा ठोकून त्याला दोरा बांधलाय आणि एक फडकं कायमचं टांगून ठेवलंय. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy