Sandeep Jangam

Others

4.0  

Sandeep Jangam

Others

मराठी भाषा गौरव दिन -गौरव मराठी भाषेचा..*

मराठी भाषा गौरव दिन -गौरव मराठी भाषेचा..*

4 mins
215


आईचे दूध हा जसा जीवनाचा पाया आहे तशीच आईची भाषा हा शिक्षणाचा पाया आहे. मराठी ही आमची आईची भाषा अर्थातच मातृभाषा आहे. मातृभाषेतून शिक्षण हा प्रत्येक मुलाचा जन्म सिद्ध हक्क आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या जुलमा विरुद्ध बंड पुकारले आणि स्वराज्य स्थापन केले. संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानाचा खजिना कडी कुलुपातच ठेवलेल्या देववाणी संस्कृतला आव्हान दिले आणि अमृताला पैजेवर जिंकणाऱ्या मराठी भाषेत भगवान श्रीकृष्णाची गीता सांगितली. तीच ती ज्ञानेश्‍वरी. तिच्यात भाषेचे माधुर्य व विचारांचे सामर्थ्य आहे. 


ज्या मराठी भाषेने संस्कृत भाषेचा किमान दोन हजार वर्षांच्या मक्तेदारी चा किल्ला सहज जिंकला ती मराठी भाषाच महाराष्ट्रात शिक्षणाची माध्यम झाली पाहिजे. आईचे दूध जसे सहज पचते व अंगी लागते तसेच मुलांना मातृभाषेतून शिक्षण सहजासहजी उमजते व अंगी लागते. जगात असा एकही शिक्षणतज्ञ नाही की, जो मातृभाषेत शिक्षणाची शिफारस करीत नाही. 

इंग्रजी भाषेतून शिक्षण घ्यायचे म्हणजे विषयही धड समजत नाही आणि भाषाही आत्मसात होत नाही. आजचे शिक्षण परीक्षार्थी आहे. यामुळे विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त गुणांसाठी आटोकाट धडपड असते. त्यासाठी घोकंपट्टी चालते. गाईड व क्लास ही या पद्धतीची पोरे आहेत. त्यातच दुर्दैव असे की, महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मुला मुलींना घालण्याचे पेव फुटले आहे. त्यामुळे मुला-मुलींचे नुकसान होत आहे की कसे हे सांगू शकत नसलो तरी फारसा फायदा होणारा नाही हे मात्र ठामपणे सांगू इच्छितो. 


मराठी भाषेत ज्ञानरुपी अमृताच्या पाणपोयाच आहेत. महाराष्ट्राचे युगपुरुष राजेछत्रपती शिवाजी महाराज यांचे एकेक वाक्य म्हणजे शिलालेखच आहे. 

मुद्रा भद्राय राजते | माझे राज्य प्रजेच्या कल्याणासाठी आहे. स्वराज्य व्हावे ही श्रीं ची ईच्छा आहे. ज्ञानोबा, तुकोबा, विनोबा, नामदेव, एकनाथ, रामदास अशा थोर संतांनी तर आयुष्याच्या प्रत्येक अंगाचा विचार केला आहे. विचारांचा हा वाहता झराच आहे. 


संत ज्ञानेश्वर म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठा चमत्कार. ज्या संस्कृत भाषेची मक्तेदारी हजारो वर्षाहून अधिक काळ सुरू होती त्या संस्कृतची मक्तेदारी अवघ्या अठरा वर्षांच्या ज्ञानेश्वरांनी मोडली व मराठी भाषेत श्रीकृष्णाची भगवद्गीता सांगितली. 


मराठी भाषेची थोरवी सांगताना ते म्हणतात... 

माझा मराठाची बोलू कौतुके | 

परी अमृतातेही पैजा जिंके |

ऐसी अक्षरे रसिके | मेळविन. 


समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा आलेख ज्या मराठी भाषेतील अवघ्या दोन पंक्तीत सांगितला ती मराठी भाषा अमर आहे. 

निश्चयाचा महामेरु | बहुत जनांसी आधारु | 

अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी. 


महाराष्ट्रातील मना मनावर अधिराज्य करीत असलेले संत तुकाराम महाराज आपल्या कधीही भंग न पावणाऱ्या अभंगात मराठी माणसाचा बाणा सांगताना म्हणतात.. 

भले तरी देऊ कासेची लंगोटी | 

नाठाळाचे काठी हाणू माथा || 

मायबापाहुनी बहु मायावंत |

करू घातपात शत्रूहुनि ||


महाराष्ट्राचे श्रेष्ठ नाटककार श्रीपाद कृष्ण उर्फ तात्यासाहेब कोल्हटकर यांनी तर मातृभूमीबद्दल च्या उत्कृष्ट प्रेमाचे दर्शन दोनच पंक्तीतून अप्रतिम असे घडविले आहे जे गीत महाराष्ट्र गीत म्हणून सर्वांच्या ओठी परिचित आहे... 


बहु असोत सुंदर संपन्न की महा |

प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा ||


आपण स्वतः ज्यावेळी भाषेबाबत विचार करीत असतो त्यावेळी आपल्या लक्षात येते की, भाषेत अस्सल इतिहास आहे. इतिहासाचा अभिमान व आनंद लोकांच्या भाषेतच मनाला भिडतो व चेतावतो. 


'हे राज्य व्हावे ही श्रीं ची ईच्छा, श्रीमंतयोगी, 'आधी लगीन कोंढाण्याचे - मग रायबाचे, या वाक्याचे भाषांतर जरूर करता येईल पण या वाक्यांमागे दडलेल्या प्रेरक इतिहासातील चैतन्य हे परकीय भाषेत येणार आहे. या वाक्यामधील प्रत्येक शब्दा शब्दा मध्ये एक रोमांचकारी इतिहास दडला आहे.


भाषा ही जशी इतिहासाची वाहक आहे तशीच ती संस्कृतीची ही वाहक आहे. संत तुकोबांचे अभंग हा महाराष्ट्राचा स्वभाव आहे. समर्थ रामदास यांचा दासबोध म्हणजे संस्कारी संसाराची दीक्षाच आहे. शेक्सपियरशी स्पर्धा करणाऱ्या आमच्या नाटककार पंचकाच्या आणि त्यांच्या महान नाटकांचा आस्वाद मराठी भाषेतच घ्यावा लागतो.


राज्यातील सर्व नेत्यांना निवडणुकीच्या प्रचारा प्रसंगी आपला प्रचार हा ज्या त्या भाषेतच करावा लागतो ना... जसे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेतच प्रचार सभा गाजवल्या जातात, तर कर्नाटकात निवडणूक प्रचारासाठी कानडी भाषाच लागते ना.. तिथे मराठी असून चालणार नाही मग असे असताना समाजातील पांढरपेशा वर्गाने अशी खोटी समजूत का पसरवली आहे की, इंग्रजी भाषेशिवाय पुढे जाताच येत नाही.. उलटपक्षी इंग्रजी माध्यमातून शिकल्याने मराठी माणूस मागे पडतो, त्याला धड इंग्रजीही येत नाही व ज्ञान मिळणे तर दूरच.. 


महाराष्ट्राचे शिल्पकार नामदार यशवंतराव चव्हाण म्हणतात... राज्य मोठे असो वा लहान असो शासनाचे, शिक्षणाचे, व्यवहाराचे माध्यम म्हणून त्या राज्याच्या भाषेचाच स्वीकार झाला नाही तर लोकशाहीला अर्थ नाही. भाषावार प्रांतरचना याच साठी केली गेली आहे की, लोकांच्या भाषेतच कारभार होऊन सामान्य जनता व राज्यकारभार यांच्यात सामंजस्य येईल.


मायबोलीतून शिक्षण हेच सर्वोत्तम असे शिक्षण आहे. कारण मायबोलीतील विषय उत्तम पद्धतीने समजतो आणि लक्षात राहतो परभाषेतील शिक्षण ही निव्वळ घोकंपट्टी आहे. विषय समजत नाही की धड ध्यानात राहत नाही. प्रत्येक राज्यातील लोक त्यांची त्यांची भाषा शिकतात कारण त्यांना नोकरी हवी असते. भाषेचे महत्त्व आजच्या बाजारी दुनियेत ज्ञाना भोवती नव्हे संस्कृती भोवती नव्हे तर नोकरी-धंद्या भोवती फिरते आहे. आज मराठी भाषिकांचे राज्य आहे. 


या मराठीची थोरवी गाताना कवी माधव ज्युलियन म्हणतात... 


मराठी असे आमुची मायबोली 

जरी आज ही राजभाषा नसे 

नसो आज ऐश्वर्य या माउलीला 

यशाची पुढे दिव्य आशा असे 

जरी पंचखंडात ही मान्यता घे 

स्वसत्ताबळे श्रीमती इंग्रजी

मराठी भिकारीण झाली तरीही 

कुशीचा तिच्या तीस केवी त्यजी !!

 

मराठी असे आमुची मायबोली 

अहो ज्ञानदेवीच देखा खरी 

हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू 

वसे आमच्या मात्र ही मंदिरी 

जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापे 

हिला बैसवू वैभवाच्या शिरी !!


Rate this content
Log in