sandeep jangam

Comedy

4.0  

sandeep jangam

Comedy

गावगाडा

गावगाडा

12 mins
430


शिर्पा नाना गडी तसा दांडगा... पैशानं आणि मनानं बी लई श्रीमंत...पायात करारा वाजणार कोल्हापुरी पायतान, पांढरं शुभ्र धोतराची दुटांगी, तीन बटणाचा सदरा, तेच्यावर काळा कोट, हाताच्या मनगटावर बांधलेलं दोनचार गंड दोर, ह्या पिळदार मिश्या, आणि कोल्हापुरी पायतानाला शोभल असा डोईवर भरजरी पटका. हा आणि आवाज म्हंजी काय इचारू नका... हे हे हे एकांद्याला हाळी मारलीरे मारली की गडी म्हणा, बाई म्हणा, पोरगं म्हणा हातातलं काम टाकून लगोलग धावून आलंच म्हणा.. 


असं हे रांगड व्यक्तिमत्व तुमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं म्हटल्यावर..आता तुमच्या लक्षात आलंच असलं शिर्पा नाना म्हंजी गावचं सरपंच... शि. ला. पाटील...

 शि. ला. पाटील...म्हणजे 

शिर्पा लालासाहेब पाटील.... 

आणि गावाचं नांव... संबळवाडी... 


साडेतीन हजार उंबऱ्याच आणि पाच एक हजार डोकीचं नदी काठाला वसलेलं गांव म्हणजे संबळवाडी. 


जुन्या बांधकामाचा दगडी वाडा, फूटभर उंचीचा हुंबरा, पाच फुटाची चौकट अन वाकून आत गेल्यावर भारतीय बैठकीचा प्रशस्त राजदरबार, लोड काय तक्क्या काय, सरपंचांच्या बैठकीच्या मागल्या बाजूला दोन काळवीटाची तोंड तेच्या शेजारच्याच भीताडावर खुटीला अडकवलेली पिस्तूल  येणाऱ्या जाणार्यासनी प्यायच्या पाण्याची कासांडी, वरल्या माडीवर जायला जिना आणि जिन्याच्या खाली धान्यांन आणि भुईमुगाच्या शेंगांन भरल्यालं हौद. घरातल्या दिमतीला पाच सहा गडी ह्यो रुबाब सगळा चालल्याला. 


डेप्युटी, तलाठी, ग्रामसेवक बाकीची पंच कमिटी समदी वाड्यावरच आल्याली. तीन तासाच्या सिनेमा चालावा तशी व्हयं नाह्य, व्हयं नाह्य म्हणतं रंगल्याली सगळी चर्चा थांबली आणि सरते शेवटी यंदा " ग्राम स्वछता अभियानात " सहभाग घ्यायचा यावर एकमत झालं. गावात दवंडी पेटवायच ठरलं तस तुकातात्या उठून उभा राह्यलंच. दवंडी द्याच काम हेच्या कड... 


ऐका हो ऐका... 

संबळवाडी च्या ग्रामस्थांनो... 

कान देऊन ऐका.... ऐका हो ऐका... 

यंदाच्या वरसाला शासनाच्या ग्राम स्वछता अभियानात आपल्या संबळवाडीन सहभाग घ्यायच ठरलं हाय..हो.. तवा.. उद्या सकाळी ठीक 9:00 वाजता समद्यांनी गावं चावडीवर जमा हुयाच आहे...हो.... 

ऐका हो ऐका... 


चावडी पासन दंवडी ला सुरुवात केल्याली.. पाटलाचा वाडा, देसावळ्याची गल्ली, महादेव मंदिर, म्हसुदी, मराठी शाळा, टेकावल्या तालमी पसन, हरिजन वाडा करत गावतळ्याच्या वाटन दवंडी देत देत तुकातात्या परत चावडीव येऊन थांबला. 


दुसरा दिस उजाडला 9 वाजलं गावसभेचं टायमिंग झालं तस बाया माणसं गोळा व्हायला लागली. कोण डेरीला दूध घालायला आल्याली किटल्या घेऊन तशीच चावडीव हजर, महिला मंडळाची गर्दी जणू काय दारूबंदी करायची असल्यावानी बायांनी चावडीचा डावा कोपरा भरून गेलता. उजव्या बाजूला सारी बापय आणि मधी म्हातारी कोतारी जमल्याली, गावातली तरणीबांड पोरं फुडल्या कडला जणू काय आर्केस्ट्रा बघायला आल्या सारखी समदी गोळा झाल्याली. 


सरपंच, डेप्युटी, तलाठी, ग्रामसेवक बाकीची पंच कमिटी सगळी हजर होतीच अन गावं सभेला सुरुवात झाली. विषय एकच " ग्राम स्वछता अभियान ".तलाठ्यांनी शासनाकडून आलेल पत्रक वाचून दाखवलं, ग्रामसेवकांनी तेच महत्व पटवून दिलं, पोलीस पाटलांनी आपलं मत मांडल, तंटामुक्तीच्या अध्यक्षांनी बी भाषण ठोकलं, महिला मंडळानी पण अभियानाला पाठींबा दिला, गावचं आधारस्थंभ असणाऱ्या युवक मंडळांनी पण सहकार्य करायच ठरवलं.. आणि सरते शेवटी सरपंच शिर्पा नानांनी आपल्या भाषणात " ग्राम स्वछता अभियान " ला उस्फुर्त पणे पाठींबा दिल्याबद्दल सर्वांच आभार मानून गावसभा संपन्न झाली. 


गावसभेत झाल्या चर्चेप्रमाणं ग्रामपंचायत च्या वतीने कमिट्या केल्या, काम नेमून दिली आणि सगळ्यास्नी कामाला लावल. प्रत्येकजण नेमून दिलेलं काम प्रामाणिकपणे करायला लागला. 


ग्रामसभेत एक ठराव झाल्याला अन तेचा दुसऱ्याच दिवशी पांडबा ला इसर पडल्याला. ह्यो आपला दिवस उजाडायलाच गावच्या येशीवरन हालत डुलत हालत डुलत आल्याल.


लगोलग वर्दी वाड्यावर पोहोचली.. 

पांडबान गावात दारू पिली... 

पांडबान गावात दारू पिली... 

बातमी कानावर आली तस... 

शिर्पा नानांनी दोन चार गडी धाडलं आणि पांडबाला उचलून वाड्यावर आणलं... 


गावात दारू बंदी असताना दारू पिऊन ग्राम सभेत झालेल्या ठरावाला पांडबान हरताळ फासलेला सरपंचांनी खात्री केली. 


बरं काही पटवून देण्याच्या आणि चार चांगल्या गोष्टी सांगायच्या नादात पांडबा काय न्हवता. 

तेची गाडी कवा चढतीला कवा उतारतीला.. कवा चढतीला कवा उतारतीला.. 


आर पांडबा आपल्या गावात दारू बंदी करायचा काल ठराव झालाय हे लगेच विसरलास काय... 

सरपंच... म्या दारू प्यायलेलो न्हाय... 

आजाबात न्हाय... 


आर पांडबा दिस उजडायला सगळ्या गावानं बघितलंय तुला पिऊन आलेलं.. 


मग म्या कवा न्हाय म्हन्तुय...मी दारू पिऊन आलोय...पर शेजारल्या खोतवाडीतनं.. 

आपल्या गावात दारू बंदी हाये हेचा इसर मला अजाबात पडलेला न्हाई... कारण मी ह्या गावचा एक सुजाण नागरिक हाये... म्या गावात दारू प्यायलेलो न्हाईच, तवा माझ्या सारख्या प्रतिष्ठित माणसावर असं खोटं नाट केलेलं आरोप म्या खपवून घेणार न्हाय... 


पांडबाची हि सगळी रामकथा ऐकून सरपंचानीच आपला निर्णय बदलला. गावांतून हिंडून गावचा नूर पालटण्या पेक्षा हेला गुमान हेच्या घरात नेऊन सोडा म्हणून फर्मावलं.. 

तस दोघां चोघांनी गणपती उचलावा तसा पांडबा ला उचलला आणि घरात नेऊन विसर्जित केला. 


गावात दारू बंदी आहे म्हणून शेजारच्या गावांतन पांडबा पिऊन आला होता. त्यामुळ सरपंच शिर्पा नानांना पण पांडबावर जास्तीची काही कारवाई करता आली नाही. असो.. 


ग्रामपंचायतीत जायचं टाइम झालं होत. ग्राम स्वछता अभियानात सहभाग घेतल्यामुळे आता सर्वांचीच जबाबदारी वाढलेली होती. 

दारूबंदी बरोबरच, गावतळ्याची स्वछता, तालमीच्या शेजारी कुस्ती आखाडा, घरोघरी संडास, सार्वजनिक मुतारी, गावातल्या पुरातन मंदिराची किरकोळ डागडुजी, अतिक्रमण हटवून रस्त्यांच रुंदीकरण, शेताकड जाणारी पाणंद, म्हसणगेटाची शेड उभारणी, डिजिटल शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्य सुविधा देण्यावर भर, समद्या गावातल्या, गल्ली बोळाची रंगरंगोटी, अशा विविध विकासकामावर भर आणि मूल्यांकना साठी येणाऱ्या मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते थाटा माटात होणारा उदघाट्न सोहळा असा भरगच्च कार्यक्रम सरपंचाच्या डोळ्यासमोर दिसत होता. 


गावातन फेर फटका मारतच सरपंच पंचायतीत आलतच. आर आवरा आवरा कोतवाल उठा गावतळ्याकडं जायचं हाय... 

असं म्हटल्याबरोबर पंच कमिटी उठली गावतळ्याच्या स्वच्छतेच काम कुठपर्यंत आलंय त्या पाहणीवर सगळी मंडळी गेली. 


कमिटीत तीन डोकी मात्र जरा अचाट वात्रट हूतीतच... असत्यात अशी दोन चार.. आणि असायलाच पाहिजेत.. 


गाळ काढून, जास्तीत जास्त पाण्याचा साठा करुन संपूर्ण गाव या तळ्यातील पाण्यावर हिरवंगार झालेलं पहायच होत.


लगोलग तसाच समदा पंच मोर्चा तालमीत गेला आणि ठोकं ठोकं शड्डू ठोकणार गावातल् उघडबंब पैलवान बघून चावडीवल गडी काय आत जात्यात व्हयं... तेंच काय आत जायाचं धाडस होईना.. शिर्पा नाना मातुर आत गेलं तस आठ दहा पैलवानानी शिर्पा नानांना लवून नमस्कार केला आणि एक एक शड्डू बी ठोकला... तस अचाट आणि वात्रट असणारी रामा, शिवा, गोविंदा हि तीन डुकी अंदाज घेतं घेतं आत घुसली तशी दोन चार पंचबी हळूच आत शिरलंत. नव्यानं बनवीत असलेल्या आखाड्याची पाहणी केली. कठड्याची उंची आणि मातीचा पोत बघून काय बाय सूचना करुन... आत गेल्याल मंडळ बाहेर आलं आणि मग बाह्यरली त्यात मिसळली. 


चावडीवन आदेश काढल्यालाच हुता घरोघरी संडास असल्याशिवाय कुठलाबी दाखला मिळणार न्हाय त्यामुळं जेच तेन स्वतः ची संडास ची सोय करायची लगबग चालवल्याली. पर सार्वजनीक मुतारीचा प्रश्न मात्र पंचायतीनं सोडवायचा हुता. मराठी शाळेच्या भोवतालच्या कुंपणा बाहेर रिकाम्या जागेत महिला आणि पुरुष यांच्यासाठी दोन अधिक दोन अशा चार मुताऱ्यांच बांधकाम चालू होत. चावडीतला रामा पल्याडन आल्याल बघून सखाराम कोतवालनी इचारलं... रामा तिकडं काय कराय गेलतास तस रामा म्हणल गावभर फिरून फिरून लई लागलीती जरा उदघाटन करुन आलो.... उदघाटन..


चावडीपसल्या पुरातन महादेव मंदिर गाभाऱ्याची डागडुजी आणि रंगवा रंगवी चालू होती.. रामा उदघाटन करुन आलता.. तवा तेला बाह्यरच थांबवून सगळी कमिटी आत गेली नमस्कार केला महादेवाला साकडं घातलं... तस गुलाब तात्या म्हणाले नवीन घाटी मी आणून देतो.. तेंची बुकात नोंद घेतली आणि कळसाची रंग रंगोटी बघून पंच मोर्चा नदी वाटन येऊन पोहोचला ते थेट मडगेटात... 


तस गोंद्या रामाला म्हणाल उदघाटन करायची लई हौस हाय न्हवं.. आता कर की उदघाटन... कर की कर.. तस रामा कुंपणाच्या बाहेर पळालं...गवंड्याच्या हातातली काम झाली की तारच्या कुपना च्या जागी इट बांधकाम करायच आणि दोन हजार लिटर पाण्याची टाकी बांधायचं ठरवलं.. 


आणि समदा गलका जाऊन पोहोचला त्यो मराठी शाळेत.. शाळेतली आता बोर्ड काढून तिथं पडदे उभा करायचं ठरलं होतं हा.. पडद म्हणजे तुमच्या मनात आलय तसंल काय नाही बर का..? पडदे लावायचं म्हणजे खडू आणि फळ्या चा नातेसंबंध विस्कटून टाकायचा. आणि त्या पडद्यावर सगळं कसं आपोआप येणार आणि ते पोरं वाचणार.. 


तोवर आमचं ग्रामसेवक म्हणालं आव शिरपा नाना त्याला " डिजिटल शाळा " म्हणायचं... डिजिटल..


हा आता शाळा न भरताच आणि परीक्षा न हुताच पोरं पुढल्या वर्गात जायला लागलेत सगळ्याच शाळांच निकाल 100% लागल्यात ती गोष्ट वेगळी आहे. आव कोण म्हणतंय शैक्षणिक दर्जा खालावला इथं तर गुणांचा पाऊसच पडलाय. हा पण या गुणांचा गारवा मात्र भवितव्याची चिंता वाढवीणारा आहे हेही नक्कीच. 


असो मंडळी डिजिटल शाळा उभारणी च्या प्रोजेक्ट बाबत हेडसरांबरोबर चर्चा करत असताना मधीच शिवा म्हणाला आमचं पोरगं तेवढं वरल्या वर्गात ढकला मास्तर...


शिवाचं पोरगं म्हंजी एक नंबरच आडदांड सातवीत नं आठवीत आणि यंदा आठवीत नं नववीत गेल्याल...शाळेचा आणि हेचा कायम काडीमोड झाल्याला.. पर शिवा म्हंजी शिर्पा नानांचा विश्वासातला आणि जवळचा माणूस त्यामुळे हेच पोरगं कायम वरच्या वर्गात चढवल्यालं हायचं.... 


शिवाचं बोलणं ऐकून हेडमास्तरच म्हणालत हे काय आता वर्षाला सांगायला लागतंय व्हयं.. अहो ह्यो रीतिरिवाज तर कायम ठरलेला आहेच. 


गावान " ग्राम स्वछता अभियाना " ला साजेशी अशी काम करवून घेतलेली होती. आणि 3 जानेवारी हि कमिटी यायची तारीख ठरली. आठ दिवसावं तारीख येऊन ठेपलेली. 


आता पाहुण्यांच्या आगत स्वागतासाठी पंच कमिटीची मिटिंग भरली. 

ग्रामसेवक साहेबांनी कमिटीसंदर्भात आलेलं पत्रक वाचलं. पाच जणांच्या समितीत तीन पुरुष आणि दोन भगिनींचा सहभाग हे आता समद्यास्नी कळालं. 


3 जानेवारी चा दिस उजाडला सकाळी ठिक 9:00 वाजता आगमन आणि मग पुढील कार्यक्रम... 


गावाच्या पल्याड नदी... तवा पुलावरन स्वागताची तयारी केलेली होती.. 

पाहुण्यांच आगमन येशीवर झालं सरपंच शिर्पा नानांच्या सौभाग्यवती रखमा काकू आणि महिला मंडळ आरतीच ताट घेऊन पुढं झाल्या.  

कमिटीतल्या पुरुषासनी गुलाल तर बायास्नी हळदी कुकु लावून महिला पंचानी स्वागत केलं. हारतुर्यांनी सजवलेल्या बैलगाडीत कमिटी मेंबर्सनी चढविल...आणि सुरु झाली स्वागत मिरवणूक... 

मराठी शाळेतली हाफ चड्डीवली पोरं आणि दोन येण्यास्नी लाल रेबन्या बांधलेल्या पोरी दुतर्फा उभा तेच्या मागोमाग लेझीम, झांझपथक, भजनी मंडळ आणि मग समस्त ग्रामस्थ असा लवाजमा चालू लागला. 


रांगोळ्याच्या पायघड्या, फुलांची उधळण, लेझमी चा मराठा मोळा बाज आणि झांझपथकाच्या निनादात खिलार बैलजोडी चालली होती तवर हुतात्मा चौकात रामा, शिवा, गोविंदान लवंगी फटाकड्याची पाच हजाराची माळ लावली. ताड ताड ताड आवाजानं खिलार उधाळलं म्हणता बाई गाडीतन पडता पडता वाचल्या.. हा पडल्या न्हाईत. पर पुढल्या खिलार जोडीच्या प्रवासाला त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि बाई गाडीतन उतरून पायी पायी चालू लागल्या...दुसऱ्या बाईंचं बी बैल गाडीत बसायचं धाडस झालं न्हाय... 


गावातल्या डीरी जवळ स्वागत मिरवणूक आली. हि डेरी बघा तुका देसावळे सरकारांची म्हणजे विरोधी पार्टीची तरीबी तेनी मिरवणूक दारात आल्या आल्या पाहुण्यांच स्वागत करायच म्हणून जे भोंगा दिला ते भोंग्याच्या आवाजानं परत एकदा खिलार जोडी उधाळली म्हणता हूर्रर्रर्रर्र आता मात्र समद्यांची पळता भोई थोडी झाली. कमिटीतल्या पाच मेंबर मधल्या दोन महिला आधीच उतरल्या हुत्या बाकी तीन पुरुषांची पण आता हौस चांगलीच भागलेली त्यांनी पण खिलार जोडीला राम राम ठोकला आणि पायीच जाण पसंद केलं.. 


आज ग्राम स्वछता अभियानासाठी गावात पाव्हणं येणार आहेत हेचा पांडबा ला नेहमी प्रमाणे इसर पडल्याला. ह्यो आपला दिवस उजाडायलाच खोतवाडीतनं हालत डुलत हालत डुलत आल्याल. पाहुण्यांची स्वागत मिरवणूक जशी नेमकं चावडी जवळ आली तस पांडबान कमिटी समोर लोटांगणच घातलं.


पांडबान कमिटी समोर लोटांगण घाततेल शिर्पा नानांनी बघतल्या बरोबर ' केला ईशारा जाता जाता.... ' सरपंचाचा ईशारा मिळताच गणपती उचलावा तसा दोघा चौघांनी पांडबाला अलगदश्यान उचलला शाळेच्या खोलीत न्हेऊन डांबला... 


चावडीजवळ कमिटी मेबरांच ग्रामस्थांच्या वतीने शाली, फेट, हार, तूर, पेढ वगैरे देऊन आदर स्वागत केलं गेलं. 


चहा पानाचा कार्यक्रम उरकला मग मेंबर निघाले मूल्यांकना च्या मुख्य कामगिरी वर... गावचा परिसर लई मोठा.. तवा सरपंच म्हणाले चालून चालून थकायला व्हुईल.. तवा... 


असा नुसता शबूद तोंडातनं आल्या बराबर बाई साहेब... उठल्या काय झालं तरी मी त्या बैल गाडीत बसणार नाही.. 


अर्रर्रर्रर्र देवा आता पडलं का कोडं... 

ठिक ठिक आहे मॅडम.. नका तुम्ही काळजी करू... व्हीआयपी ट्रीटमेंट.. ची व्यवस्था आहे.. व्हीआयपी


शिर्पा नानानी सखा हवालदार ना हाळी दिली.. सखाराम मेजर.. तुमची उघडी जीप आणा बघू... सखाराम हवालदार आर्मी रिटायर माणूस.. आदेशाच लगोलग पालन झालं.. 

जीप चावडीसमोर हजर... तवर रामा, शिवा आणि गोद्यांन गणपतीच्या डेकोरेशन मधल्या कागदी फुलाच्या माळा आणून जीप सजवून बी टाकली.. 


आव गावातल्या गल्ली बोळातन रांगोळ्या काय फुल काय इचारू नका... मराठी शाळेतली हाफ चड्डीवली पोरं आणि दोन येण्यास्नी लाल रेबन्या बांधलेल्या पोरी दुतर्फा उभा तेच्या मागोमाग लेझीम, झांझपथक, भजनी मंडळ आणि मग समस्त ग्रामस्थ असा लवाजमा ज्या त्या नेमून दिलेल्या ठिकाणी हजर... 


गावतळ्या पसन सुरुवात झाली... पाणीसाठा करुन गावात हरितक्रांती करण्याच्या उद्देशानं गाळ समदा उपसल्याला... जीप चालविणार सखाराम हवालदार आर्मी रिटायर.. चांगला रस्ता कवा दिसलाय व्हय.. डोंगर कपारीतन गाडी चालवायचा लई नाद.. चांगल्या रस्त्यानं न जाता गाळ उपसून कळसूबाईच्या ढीग लावल्याला... आणि त्यातनच गाडी घातली... पहिल्या चढालाच बाईंची कंबर सलाकली....मेले मेले मेले म्हणतं जीपतन बाह्यर आवाज आला.. तसा कंबर धरून मॅडम खाली शीटव बसल्याच.. संगतीला दुसऱ्या बाईसाहेब पण हुत्या.. विचारपूस करत त्याबी शीट वर बसल्या... गावातळ बघायचा पहिलाच डाव सखा हवालदारनी हाणून पाडला.. 


पहिला जीपच तोंड माग फिरवा कमरत कळा भरल्यात बाईंच्या... फिरवा फिरवा माघारी फिरवा.. असं म्हणत शिर्पा नानांनी जीप थेट तालमीकडं घ्याला सांगितली... 


नेटाकं नेटाकं दहा पंधरा पैलवानांच्या शड्डूच्या आवाजानं तालमीचा परिसर घुमाय लागल्याला तालीम जवळ ईल तस कमिटीतल पुरुष सदस्य बी जरा गांगूरनच गेलत... दारात जीप जशी हजर झाली तस आतलं लंगुट घातल्याल पैलवान स्वागताला बाहेर आलंत... जीपतल्या मॅडमनी स्वतःहून डोळं झाकून घेतलत तर पुरुषांच डोळं आपोआप झाकलंत.. आव पैलवानचं नेटाकं.... कमिटी मेंबर नी सरपंचानाच विनंती केली... पैलवान बघूनच आमचं डोळं दीपलत तेंव्हा तालमीत आत जायचं काही काम नाही.. आमी आलो असतो पण महिला सदस्य आहेत तेंव्हा आतलं दर्शन नसलं तर चालतंय.... 

ठीक आहे मंडळी असं म्हणतं सरपंचानी जीप महादेव मंदिराकड वळवायला सांगितली.. 


आता मंदिराकडे मार्गस्थ व्हायचं म्हणजे गावातल्या मुख्य रस्त्यावरून जीपचा प्रवास सुरु झाला... 

गावातल मूल्यमापन करायला पहिल्यांदाच पाहुणे आले होते... त्यामुळं तेंच्या स्वागताला गल्लोगल्ली सुवासिनी आरतीच ताट घेऊन उभ्या होत्या... दारातनच ओवाळणी सुरु झाली.. कुणी जीप च्या फूड पाणी घालतंय.. कोण उदकाडी लावतय.. कुणी नारळ फोडतंय.. कुणी साखर वाटतय.. कुणी फुल उदळतय... समदी कशी लगबग चालली हुती... 


अखेर महादेव मंदिर आलं... पाहुणे जीप मधन उतरले... कमिटी चेअरमनी पायजमा काढून मंदिरात सर्वप्रथम प्रवेश केला आणि चार फुटाची चौकट वलांडून आत गाभाऱ्यात गेलत तसा टाणकन आवाज आला...अजून बाकीची कमिटी मेंबर आत यायचीच हुती... तवर एकच गलका उठला. गुलाब तात्यान नवीन दिलेली घाटी...पाहुण्यांच्या शुभहस्ते घाटीच पूजन करुन वर उचलून बांधायची होती तवर अर्ध्यावर बांधली होती पण ते गुरवानं पाहुण्यांना गाभाऱ्यात येताना सांगायचं राहून गेलत त्यामुळे आत वाकून आल्या आल्या अर्ध्यावर बांधलेल्या घाटीला टक्कुरं थडकून पाहुण्यांच्या कपाळावर टेंगाळ आलं.. वाजवून नसना का पर टेंगळानं पाहुण्यांच स्वागत केलं. ग्राम दैवत शंभू म्हादेवाच दर्शन घेतलं... सरपंच शिर्पा नानांनी पहिल्या नंबर च बक्षीस गावाला मिळावं म्हणून साकडं घातलं... 


आणि जीपन तोंड केलं ते मराठी शाळेच्या दिशेनं शाळेच्या गुणवत्तेचा टक्का वाढला पाहिजे म्हणून डिजिटल शाळा करण्याच्या संकप्ल पूर्तीचा शुभारंभ पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला... गावातल्या शाळेत समदी पोरं व्हरांड्यात आणून बसवल्याली आता शाळा मोबाईलवर भरणारी हुती तेची प्राथमिक माहिती देण्यासाठी जिल्ह्याहून आलेल्या साहेबांच भाषण सुरु झालं अर्ध ऐकलं न्हाय ऐकलं तस शिवाचं पोरगं मधीच उठल आणि म्हणाल साहेब तुमचा व्हाट्सअप नंबर द्या व्हाट्सअप नंबर...


शिवाचं पोरगं आज्या म्हंजी एक नंबरच आडदांड सातवीतनं आठवीत आणि यंदा आठवीतनं नववीत गेल्याल...शाळेचा आणि हेचा कायम काडीमोड झाल्याला.. पर शिवा म्हंजी शिर्पा नानांचा विश्वासातला आणि जवळचा माणूस त्यामुळे हेच पोरगं कायम वरच्या वर्गात चढवल्यालं हायचं.... 


चटकन पुढं हून शिवानं पोरग्याला एक धपाटा हाणला आणि खाली बशीवला... 

तस जिल्ह्यावल्या साहेबांनी विचारलं बाळ तुला माझा व्हाट्सअप नंबर कशाला हवा ते मला समजल म्हणजे तुला नंबर सुद्धा देता येईल. 

आता सायबांनी एवढ्या प्रेमानं विचारलं म्हटल्यावर आज्या फरूड ताटल्या वाणी ताटलं आणि उठून म्हणाल... हेडमास्तर पान खाऊन पचा पचा थुकत्याला व्हिडीओ पाठवायला... 


सगळ्या व्हरांड्यात एकच हशा उसळला आणि हेडमास्तरांनी खाल्याल्या पानाचा तोबरा लगोलग पाचकन बाहेर पडला आणि पहिल्या लाईनत बसल्याला सद्याच तोंड रंगवून रिकामा झाला. 


आलेल्या कमिटीन आणि जिल्ह्याच्या साहेबानं ह्यो रंगारंग कार्यक्रम बघितला तसा समदा गावाचा नूरच पालटून गेला.. 

जाहिर कार्यक्रमानंतर विभागा अंतर्गत बैठक आणि बैठकी मध्ये हेडमास्तरांना ताकीद दिली गेली आणि जीप पाणंदी मार्गान म्हणसगेटाकडं रवाना झाली.. 


स्मशानभूमीतली शेड उभारणी आणि भोवतालच्या कपौंड ची पाहणी सुरु होती तवर रामा म्हणलं नव्या कंपौंड च्या गेटाच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फीत कापून उदघाटन झालंच पाहिजे...


आता स्मशानभूमीच उदघाटन म्हंटल्यावर पाहुण्यांच्या अंगावर काटा आला.. कारण असलं ईपरीत उदघाटन कवा कुणी केल्याचं ऐकिवात न्हवतं.. तवर लालफीत, कात्री आणि नारळा ची जुळणा झालीच... 

न्हाय न्हाय म्हणतं ग्राम स्वच्छता अभियान च परीक्षण करायला आलेल्या कमिटी चे पाहुणे पुढं झाले.. 

पर पाव्हणं लई हुशार... 

गावच प्रथम नागरिक म्हणून ह्यो उदघाटनाचा मान सरपंचांचा असं म्हणतं तेनी शिर्पा नानास्नी आग्रह केला.. आता मातुर झाली का पंचायत... रामाकडं डोळं वटारून बघतच सरपंचांनी उभ्या उभ्यान नारळ वाढवला अन फीतबी कापली. 


मडगेटातनं आत गेल्यावर आणि कोण काय बोललं हेचा नेम न्हवता तवा फितवर भागवून समदा गलका परत न्हावकीतनं पोहोचला नव्यानं बांधलेल्या सार्वजनिक मुतारीच्या सर्कल पाशी... आता तिथं रामा तोंड उघडणार तवर सरपंचांनी लालभडक डोळ्यांनी एक नजर रामावर टाकली...तसा.. रामान अर्ध्यावर उघडलेल्या तोंडाचा जबडा गापकन मिटविला...  तवर विरोधी पार्टीचा गोंद्या म्हणाल.. आता नंबर आमच्या डेप्युटींचा .. आर संडास मुतारी त कसला आलाय नंबर म्हणतं डेप्युटीनं गोंद्या च्या पाटीत एक बुक्की हाणली... तशी 

सारा गावगाडा पालथा घालत अखेर मिरवणूक चावडीच्या दिशेनं मार्गस्थ झाली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy