sandeep jangam

Tragedy Thriller

4  

sandeep jangam

Tragedy Thriller

ओझं

ओझं

8 mins
496


दिवस मावळतीला आला तशी लाडाबाईने पुढे पसरलेली सतरा रंगाची चिरगुट आवरली. चिंध्या गोळा केल्या, गठळ बांधल. दोऱ्याच्या गुंडीत सुई टोचली. हे समदं कसं तीन सावकाशीन केलं आणि मग भुईला हाताचा रेटा देऊन.. ' बया बया गं, असं करीत ती बसल्या जागची उठली. आता उठता बसता पोटाचं ओझं लईच जड झालं होतं. या खेपेला लाडाबाईला पोट जरा जास्त च आलं होतं. 

पुढे वाकून बघितलं तर आपलं पाय दिसू नयेत इतकं. 


अंगणात न उठून खोपटात शिरताना लाडाबाई आपल्याशीच म्हणाली.. पोट जरा जास्तच आलंय हया खेपला. 

....आणि लगोलग भीतीन तीच काळीज लकलकल. सुकून कोळ झालेल्या ओठान ती आपल्याशीच पुटपुटली. 

" जुळबिळं हुतय का काय ? नक रे, परमेश्वरा नक बाबा. '

या शब्दामागोमाग तीन धीरगंभीर माणसा सारखा सुस्कारा सोडला. बाळतपणाला लागतील म्हणून गोळा केलेल्या चिरगुटाच गठळं भितीवरच्या खुंटीला टांगलं. आणि छातीवर हात ठेवून, जमिनीकडे टक लावून ती जागच्या जागी उभी राहिली. 


पुलाच्या आडोशानं वसलेल्या ह्या गलिच्छ वस्तीत समदा गोंधळ चालला होता. नाना तऱ्हेचा उद्योग करून माघारी फिरलेली माणसं मोठमोठ्याने बोलत होती. पोरं बाळ खेळत होती, कुणी रडत होती. बाया वसा वसा बोलत होत्या. समदा कसा कालवा चालला होता. 


उंचच उंच पुलाच्या पायापाशी वसलेली ही वस्ती एखाद्या भिंतीच्या आडोशाला बसलेल्या गलिच्छ डुकरीणी सारखी वाटत होती. सांड पाण्यात डुंबत बसलेल्या लेकुरवाळ्या डुकरीणी सारखी वसाव्यात तशा झोपडपट्ट्या वसल्या होत्या.


पुलावरून वाहणाऱ्या गर्दीच्या लोंढ्याला महापूर आला होता माणसं, रिक्षा, मोटारी, ट्रक हातगाड्या सारख्या वाहत होत्या, आणि कानाला नको नकोसा वाटणारा सारखा आवाज येत होता.


लाडाबाईच्या मनात ईचार आला, 

आपली ही कितवी खेप ? आणि आठवण

करकरूनही तिला काही आठवना. एकीकडे सांजच्या पारी भाकरी टाकण्यासाठी पीठ बघत होती, डब उलथ पालथ करत होती, बाहेर जाऊन लाकड आणत होती, चुलीला पेटत घालण्यासाठी काड्याच डबडं शोधत होती आणि एकीकडे म्हणत होती ; 

' सात का आठ..? आठ कशी..? सातच.. '


शेवटी तिच्या डोक्यात फार गोंधळ उडाला. सगळ्या खोपटात धूर झाला, तशी ती सगळं सोडून बाहेर आली आणि चिखलाचा गोळा पडावा, तशी गपकण खाली पडली अन हातपाय पसरून बसली.. दोन्ही हाताचा आधार देऊन नीट आठवू लागली..

हिशेब काही केल्या लागता लागेना.. ! 

लागावा तरी कसा..? एक पोर पोटातन आलं ते गेलेलच.. एक पोरगी दहा दिवसांची झाली आणि एकाएकी गप्प झाली.. एक मध्येच नासलं.. पोरगा का पोरगी ते देवालाच ठावं.. 

दोन जगली.. नाम्या आठ वर्षाचा झाला अन रुसून निघून गेला. तेचा पत्ता आजवर न्हाई. जगण्याला आता सात वर्ष झाली खडकीला कुठं हाटेलात लागलाय म्हण..कधी येत न्हाई, जात न्हाई. 


हि किती झाली ? एवढीच का सगळी ? आन सोनी ऱ्हायलीचं की.. ' तेरा वर्षाची झाली आणि एक दिशी कुण्या बाब्याचा हात धरून निघून गेली. काय त्येचं नाव ? कायबी असू द्या मूडद्याच, काय करायचं हाय मला ? 

 

लाडाबाईला काय बाय जुन्या आठवणी येऊ लागल्या. चिरगुटाच गठळ उपशीत बसावं तशी ती आठवणी उपशीत राहिली. काळीज सारखं लकलकू लागलं. दोऱ्याच्या गुंडीचा गुंता व्हावा, तसा मनामध्ये सगळा गुंता झाला. डोळे बारीक करून लाडाबाई गुंता सोडवू लागली. 


तेवढ्यात गावातली फेरी पुरी करून सोमा माघारी आला. सोमा म्हणजे तिचा न्हवरा. गंजलेल पत्र, धा ठिकाणाहून गोळा केलेल्या फाटक्या तुटक्या विटा, तरटाच तुकड, काळ्या कुचक्या फळ्या, असलं काय बाय सामान गोळा करून चिमणीनं बांधाव, तसं बांधलेल्या खोपटाकडं सोमा सांच्या पारी माघारी आला होता. 


दारोदार हिंडून जमा केलेली रद्दी त्या बोहाऱ्याच्या दुकानात घातली होती. बंडीच्या खीशात दहा-वीस रुपये आणि खांद्यावर तांगडीन जड झालेलं पोतं घेऊन तो आपल्या घराकडं आला अंगणात येताच त्यान खांद्यावरचं पोतं टाकलं आणि बायकोला काळजीन विचारलं,.. का ग बसलीयास..? 


दाल्ला आलेला बघून लाडाबाईन गुंता तसाच आवरला. बया बया देवा माझ्या रं.. ! म्हणतं हाताचा धीर देत सावकाशीनं उठली आणि पोट सावरत आत गेली. कपाळावरचा झिंज्या सावरत ती चूल फुंकू लागली. सोमा वाकून आत गेला. अंगावरचा कोट खुंटीला अडकवला. शेणानं सारवल्याला त्या भुईवर ठेवलेलं डिचकभर पाणी पोटात रिता करता झाला. आणि बोलता झाला. 

मग काय करायचं..? 

लाडाबाईंन दचकून विचारलं, 

कशाचं..? 

तसा सोमा उत्तरला... बाळंतपणाच...? 

लाडाबाई चकार न बोलता बिचारी चूल फुकत राहिली. 

मग डोस्क्यावरची टुपी काढून केस खाजवीत सोमाच बोलायला लागला.. 


' मी अजून तपास केला बग.लई सुयीचं पडलं ते. एक डाव आत गेलं की दवाखान्यात न सगळं मिळतंय. दवापाणी, होय, नाय. खाण्यापिण्याकडं तर लई ध्यान देत्यात बघ. काम न्हाई, धाम न्हाई . निवांत पोराकड बघावं आनं दिस काडावं... 

आं.. अगं म्या काय म्हणतुया तुजा काय ईचार. 


लाडाबाई काही बोललीच नाही. 

नुसती.. हूं म्हणाली.. आणि गप्प झाली.


बाळातपण आता तोंडावर आलं होत त्यामुळं सोमा पार गडबडून गेला होता. कारण तो आता पार खंगला होता. डोक्याचे केस पिकलेले, दात पडलेले, खोकला झाला होता, हातापायातलं बळ ही गेलं होतं. शरीरानं थकला, म्हणजे माणूस जसा मनानी थकतो तसा सोमा पार थकला होता. आज पातूर त्यानं सगळं धकावून नेलं होतं. पण आता काही जमत नव्हतं. रद्दी-पेपरचा अन डबा-बाटल्यांचा धंदा करून मिळणार तरी काय, आणि पोटाला खाणार तरी काय....? 

हातावरच पोट...त्यात अठराविश्व दारिद्र्य.. 


सोमाचं म्हणणं होतं, की लाडबाईनं एखादी बारीक सारीक चोरी करावी आणि तुरुंगात जावं. तिथं सगळं बाळातपण व्यवस्थित होईल. बेताबेतानं ही गोष्ट त्यांन बायकोच्या कानावर घातली होती. 

पर लाडाबाईला हि वाट एकदमच भलती वाटली. हा बारीकसारीक चोऱ्या तीन कधी केल्या नव्हत्या, असं नाही, पण त्याला गुन्ह्याचे स्वरूप नव्हतं. तुरुंगात जायाची पाळी आली नव्हती.

आवं गरिबी पोटाला आली म्हणून काय झालं.? माणसानं का अब्रू सोडावी...? 


बायको काहीच बोलना.. तवा सोमा तिला पटवून द्यायला लागला.. 

' अगं आता पावसाळा तोंडावर आला. झोपडं गळलं.आत समदं राडीराड हुईल.आपल्यापाशी  

हातपाय पांघरायला धड कांबरुनं न्हाईत. तुझं खायापियाच लई हाल हूतील बगं. 


आज-काल वलवाळलं सुद्धा मिळण्याची मुश्किल हाय.. बर बाळातपणात काय आजार झाला, कमी जास्ती, व्हयं न्हाय झालं तर काय करणार आपण.? म्हणून म्हणतो हे बरं हाय..! कुठ आता आपुन भाऊबंदकीत ऱ्हायलोय, तवा अब्रू जाईल, म्हणाव..? आणि आपण येळ पडली तर हात पसरून भीक मागतोयचं की, तवा आता अब्रूला कशाला जपाव. गं.? आं.. 


लाडाबाई चूल फुकून फुकून थकली होती. 

ती कायबी बोलली नाही. बिचारी दोन भाकरी टाकायच्या तयारीला लागली. तसा सोमा उठला आणि हातपाय झाडत तरातरा बाहेर अंगणात येऊन दोन पायावर बसला.

खिशातनं बिडी काढून त्यांन ती पेटवली आणि कडक धूर छातीत घेतला. 

तस आलेल्या खोकल्याच्या उसळीसरशी त्यान दोन चार शिव्या बी हासडल्या...!

' ह्यो खोकला एक... धड बिडी बी वडू दिना.. !


थापलेल्या दोन भाकरी, सकाळचा भाताचा ढिकुळं अन राहिलेला कोरड्यास खाऊन दोघबी झोपी गेली. 


लाडाबाईंची मात्र पार झोप उडाली हुती. तीन तरटावर पडून रात्रभर इचार केला. कसा असलं त्यो तुरुंग.. तिथं हाता पायात बेड्या घालतील, दंडुक्यान मारतील, मग काय करावं..? बाळातपणा साठी चांगल्याचूंगल्या बाया माहेरी जात्यात, नात्यागोत्याच्या माणसांकडे जात्यात. आन आपण हे इपरीत कसं करावं ? 

बाळात व्हायला तुरुंगात कसं जावं ? 


तिला सगळी भीती वाटू लागली. कैचीत सापडलेल्या सारखी तिची अवस्था झाली. परमेश्वरान ह्यातनं सोडवाव म्हणून ती डोळ मिटून प्रार्थना करता करता तिची झोप कवा लागली ते कळलंच न्हाय. 


तांबडं फुटलं तशी ऊन डोईवर याच्या आत माघारी यायच्या काळजीनं लाडाबाई खांद्यावर पोतं टाकून खोपटा बाह्यर पडली. आणि चांगली वस्ती गाठून हिंडू लागली. 


डब्ब बाटल्या घेणार... हाय का काय मोकळं डब्ब बाटल्या..


अशी हाळी देत लाडाबाई पोटाचं ओझं सावरत सावरत गल्लोगल्ली हिंडत व्हती. सकाळच्या पारी गावातल्या डिरित दूध घालायला येणाऱ्या जाणाऱ्यांनी रस्त फुलून गेलं होत. उन्ह माथ्यावर चढल तस हळूहळू रस्त्यावर शुकशुकाट झाला आज लाडाबाईंन मनात विचार केला हुता. 

समोरच एक बंगला बघून ती थांबली. मोठा श्वास घेऊन तीन धीर केला आणि फाटकातन आत घुसली. आतलं आवार मोकळं दिसत हुतं. कुत्रे बित्र न्हायतर एकांदा रखवालदार हाय का याचा अंदाज घेतला आणि इकडे तिकडे बघत चांगल्या धीट चोरासारखी ती खिडकीतनं आत डोकावली.

बंगल्यातला त्यो बाहेरला सोपा बघून ती हुरळून गेली. चांगला चुंगलं सामान मांडल्याल, मोठं मोठ्याला खुर्च्या मांडलेल्या खाली गालिचा कपाटात रंगीबेरंगी पुस्तक, रिडिव, टीव्ही आन काय बाय काय बाय. पर त्या खूलीत कोण बी न्हवतं. समोरच्या दारावरचा पडदा हालत हुता. 


लाडाबाईनं कान देऊन सावज घेतला. कुणाचं बोलण बी ऐकू येत नव्हतं. नवरा कामावर गेला असावा, पोरंबाळं शाळेला गेली असतील आणि बंगल्याच्या बाईसाहेब दुपारच्या निवांत निजल्या असाव्यात. 

असा कयास बांधून.. लाडाबाईन परत एकदा पाठमोर वळून आपणाला कुणी पाहत नसल्याची खात्री केली आणि खिडकी सोडून दाराकडं वळली.. दरवाजातन हळूच आत शिरली. उचलाय जोगी वस्तू कुठली ती न्याहाळू लागली. रेडिव हुता पर त्यो दडवायचा कुठं आणि तेच वझं कवा सांभाळायचं हा विचार तिच्या मनात चटकन आला. लाडाबाईला काय खरीखुरी चोरी करायची न्हवती. नुसतं तस दावायचं होत आणि पकडलं जायचं होत.... लाडबाईन परत घरभर नजर टाकली. 


बया बया..! ह्यो तांब्या हाय की !

 बाजूच्या लहान टेबलावर की चांदीचा तांब्या आणि भांड होतं देव कार्याला काढलेल असावा

आणि तसंच ठेवायचं राहून गेला असाव.


मग मांजराच्या पावलाने लाडाबाईन चुटदिशी तांब्या भांड उचललं, काळीज धाडधाड उडायला लागलं. शेवटी धाडस करुन तांब्या भांड पोत्यात घातलं ती घरा बाहेर पडली. आणि व्हतं तस दार वढून घेतलं. तरीबी आतल्या बाईसाहेब काही जाग्या झाल्याच न्हाय आणि लाडबाईची चोरी पकडली गेलीच न्हाय. 


आता काय करावं. ह्या इचारान लाडाबाई गोंधळून गेली. 

चोरी तर केली. ती बी भर दिवसा. 

पण तिची चोरी पकडणार तिथं कुणीबी न्हवतं. 


काय गं बया हे ईपरीतच झालं. आता काय करावं का जावं असचं तांब्या भांड घेऊन... अशा विचारात लाडाबाई झपाझप फाटकाकडं चालू लागली एवढ्यात पाठी मागन आवाज आला... 

ए ए बाई... थांब थांब पळतीस कुठं..? 

असं म्हणतात माळ्या सारखा दिसणारा माणूस आला. आल्यासरशी त्यांना गप्पकन लाडाबाईचं मनगटच धरलं. 


आं ए ए बाबा हात का धरतुयास ? म्या काय केल ? 


काय केलंस ते बघितलय मी. घरात शिरल्यालीस. चल मुकाट्यानं बाई साहेंबांकडं. 

असं म्हणतं माळ्यान लाडाबाईला ओढत ओढत पुन्हा दारापाशी आणली. 


बाईसाहेब आओ बाईसाहेब... 

कोण आहे.. असं म्हणतं बंगल्याच्या मालकीण बाई दारात आल्या आणि म्हणाल्या.. 


कोण आहे... 

मी माळीबुवा पल्याडच्या बंगल्यातला. हि बाई तुमच्या घरातनं बाहेर पडताना म्या पाहिलंय. तवा तुमचं काय चोरीला गेलंय का बघा.. 


असं म्हटल्यावर दाराला आतून कडी घालायची राहून गेल्याची आठवण बाईसाहेबाना झाली. भीतीची सनक छातीत शिरली. 

तोवर माळ्यान लाडाबाईच पोतं हिसकावून घेतलं ओतलं तर त्यातन तांब्या भांड निघालच. 


माळीबुवा न लाडाबाईची चोरी आता पकडली गेली होती. 


अगं सटवाई भर दिवसा घरात शिरू लागलीस व्हयं. बरीच दिसतीस की. म्या बगतच हुतो पल्याडच्या कुंपणातन सगळं.. दिव का दोन टोल.. का न्हेऊ कचेरीत असं माळीबुवा म्हणताच... 

बाईसाहेबांनी तांब्या भांड हातात घेतं डबाबाटली वालीकडं न्ह्याहाळून बघितलं. 


लाडाबाईच डोळं पाण्यान डबडबल होत. 

हात पाय भीतीनं थरथरत होत. 

पटकूर नेसलेली, केसांत खंडीभर धुरळा भरलेली लाडाबाई पांढरी फट पडली हुती.


लगीन होऊन आठ वर्ष झाली, तरी बंगल्याच्या मालकिणीला अद्याप तरी मुलं बाळ झालं न्हवतं. ह्या बाईचं पोट बघून तीला दया आली. दोन जीवाची हाय, बिचारी ! तुरुंगात गेली तर लई हाल हूतील तिचं ! परिस्थिती मूळ केली असलं चोरी ! होतो मोह माणसाला... 

मालकीण बाईनं काळजीन विचारलं.. 


काग कितवा महिना...? 

लाडाबाईचा अश्रूंचा बांध फुटला.. 


रडत रडतच ती म्हणाली 

दिस भरल्यात... बगा माझं बाईसाब.. 

दिवसात हाय मी.. बाई पाया पडते तुमच्या नका मारू मला.. ! पुन्हा अशी चूक न्हाय करायची. 


गप्प रडू नकोस.. आम्ही काही चौकीत नाही नेत तुला... आणि मारत पण नाही.. गं.. !


माळी बुवा सोडा तीला... जाऊ दया.. दोन जीवाची हाय.. 

लई उपकार झालं बगा.. पुन्हा न्हाई अशी करायची... असं म्हणतं हात जोडत जोडत लाडबाईन सुस्कारा टाकला अन माग न बघता, धापा टाकीत टाकीत, पोट सावरीत तीन सरळ आपलं खोपाट गाठलं. आणि येऊन भुईवर निपचित पडून राहिली. 


दिस उतरतीला येऊन सांच्या पार होत आली तसा सोमा पण माघारी आला. 

तवा लाडाबाई पाय पसरून अंगणात बसल्याली दिसली.. 

तसा सोमा म्हणाला.... 


मग काय गं काय ठरवलंयस तू...? 

तसा लाडाबाईचा परत एकदा अश्रूंचा बांध फुटला आणि मोठं मोठ्यानं धाय मोकलून रडत रडत लाडाबाई म्हणाली.... 


धनी मी झाडाच्या आडुशाला बाळात हुईन, 

आन नदीच्या पाण्यात पोरगं धुइन. 

पर जेलात न्हाई जायाची.. 

जेलात न्हाई जायाची.. धनी... 

जेलात न्हाई जायाची..


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy