Sandeep Jangam

Thriller

3  

Sandeep Jangam

Thriller

रणसंग्राम पावनखिंडीचा

रणसंग्राम पावनखिंडीचा

32 mins
456


महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्य साधारण महत्व असलेला किल्ला म्हणजे पन्हाळागड वेगवेगळ्या काळात दोन वेळा राजधानीचा मान मिळालेला हा किल्ला आजही नांदता आहे. कोकण व घाटमाथा यांच्या सरहद्दीवर असणाऱ्या या किल्ल्यावर पाहण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. पर्यटनाखेरीज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खाणा खुणा आजही हा गड अंगाखांद्यावर खेळवत आहे. कोल्हापूरपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेला हा गड आजही भक्कमपणे उभा आहे.

शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकीर्दीत म्हणजेच इ. स. पूर्व तिसऱ्या शतकात पन्हाळगड बांधण्यात आला. हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता. याचे पहिले नाव ‘पन्नग्नालय’. पराशर ॠषींनी इथे तपश्चर्या केली म्हणून हा किल्ला ‘पराशराश्रम’ या नावानेही ओळखला जात असे. या किल्ल्यावर असलेल्या तळ्यात फुलणाऱ्या कमळांमुळे याला ‘पद्मालय’ असे ही म्हटले जाई. ब्रह्मदेवाने या डोंगरावर तपश्चर्या केल्यामुळे पुराणात याचा उल्लेख ‘ब्रह्मशैल’ किंवा ब्रम्हगिरी म्हणून ही उल्लेखला आहे. शिलाहर राजा भोज पन्हाळा किल्ला ही राजधानी होती. देवगिरीच्या यादवांकडून पराभव झाल्यावर हा किल्ला यादवाच्या ताब्यात गेला. यादवांनंतर १४८९ मध्ये पन्हाळा किल्ला विजापूरकरांकडे गेला. इ.स. १६५९ मध्ये अफजल खान वधानंतर १८ दिवसातच शिवरायांनी हा किल्ला घेतला. २ मार्च १६६० मध्ये किल्ल्यास सिध्दी जौहरचा वेढा पडला. सिद्दी जौहरच्या वेढ्यानंतर महाराजांनी हा किल्ला विजापुरकरांच्या ताब्यात दिला. पण १६७३ मध्ये कोंडाजी फर्जंदांबरोबर सैन्य पाठवून भेदनीतीचा उपयोग करून महाराजांनी तो किल्ला पुन्हा ताब्यात घेतला.

अशा या सुखं दुःखाच्या अनेक आठवणींचा जिवंत साक्षीदार असणाऱ्या या किल्ले पन्हाळगडाच्या पायथ्याशी बारा बलुतेदारांपैकी एक बलुतेदार म्हणून ओळख असणाऱ्या जंगम घराण्यामध्ये माझा जन्म झाला हे मी माझं परमभाग्य समजतो. साल होत 1660 ( जुलै ) नुकताच आषाढ महिना सूरु झाला होता.. सकाळची प्रहर,,विरळ धुक्यांची चादर नाहीशी होत होती.. सज्जाकोठीवर कोवळी उन्हाची साज चढत होती.. आणि याचं सज्जाकोठीच्या पायथ्याला सिद्धी जोहरच्या अदिलशाही विजापुरी सरदारांचे शामियाने हिरवाईत दडले होते.

सिद्धी जोहरच्या शामियाना वरच हिरवं आदिलशाही निशाण वाऱ्यान फडफडत होत. नौबती वाजत होत्या. सिद्धीच्या मुख्य शामियान्या भोवती इतर सरदार आणि उमरावांचे छोटे छोटे डेरे थाटले होते. घोडदळाची फिरती गस्त दिसत होती. गस्तीतल्या समशेरी कोवळ्या उन्हानं तळपत होत्या. जणू काही साऱ्या पन्हाळगडाला आम्ही आदिलशाहीन कवेत घेतल्याच निष्ठावून सांगत होत्या.

इकडे थंडीच्या कडाक्यात सुद्धा सज्जाकोठी वरचा हिंदवी स्वराज्याचा भगवा निशाण ताठ मानेन फडफडत होता. सकाळच्या प्रहरातसुद्धा चुहूबाजूला मशाली जळत होत्या. पन्हाळ्याचे किल्लेदार त्र्यंबकराव भास्कर यांच्यासोबतच लिंबूकांतीचे धिप्पाड देहाचे बाजीप्रभू देशपांडे, त्यांचे बंधू फुलाजीप्रभू देशपांडे, संभाजी जाधव, विठोजी काटे, हैबतराव बांदल, गंगाधरपंत, रायजी बांदल यांसारखी विश्वासातली दहा-बारा मानकरी बांदल मावळ्यांना सच्चाकोटीवर खलबतासाठी बोलवल होतं.

सच्चाकोटी नावाच्या या इमारतीत बरीच यवनी खलबत घडल्याचा इतिहास साक्ष देतो आहे. छत्रपतींच्या निधनाची शोकवार्ता शंभूराजांना समजली ती याच वास्तूत.. या सह्याद्रीला गुलामगिरीत ठेवण्यासाठी होणारी कटकारस्थाने या सज्जाकोठीन अनुभवली असतील.

फुलाजीप्रभु हे बाजीप्रभुंचे वडील बंधू असले तरी बाजीप्रभूंच पिळदार शरीर अंगरख्यातून उठून दिसत होते, कपाळी भगवा गंध, काळ्याभोर दाट भुवया,ओठावरच्या जाड मर्द मराठी मिश्या अशा राकट आणि कणखर मावळ्याच व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा अधिकच खुलून दिसत होतं.  आपणा सर्वांना फर्मान धाडून सज्जाकोठीवर का बरे बोलाविण्यात आलं असावं याची आपआपसात कुजबुज चालली होती. 

समोरच विचारमग्न अशा येरझाऱ्या अजून चालूच होत्या. चेहऱ्यावर मात्र चिंता आणि काळजीचे संमिश्र भाव दिसत होते. विशाल कपाळावरच्या आठ्यातसुद्धा शिवगंध स्पष्ट उठून दिसत होता. चाफेदार नाक, काळ्या भुवयां मधील लक्षवेध करणारे ते तेजस्वी डोळे, गव्हाळ कांती, झुपकेदार अशा दाढी-मिशा... मर्द मराठी सौदंर्य खुलवत होत्या. ऐन तिशीच्या तारुण्यात पदार्पण केललं हे मराठा मर्दानी व्यक्तिमत्व म्हणजेच हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज होय.....

राजांनी अंगात जरीबंदीचा सफेद अंगरखा परिधान केला होता. कमरेला दुशेला बांधून त्यात मोत्याच्या मुठीची कट्यार खुपसली होती. राजांनी आज पांढरा जिरे टोप डोईवर चढवला होता. त्याला जरीची काठ होती. जिरेटोपा वरचा मोती राजेपणाच्या आदबीत सुरु असणाऱ्या येरझाऱ्या घालताना हिंदकळत होता.

या तिशीतल्या राजांकडे पाहत..

बाजीप्रभू मनाशीच बोलत होते...

किती कोवळं वय.. पण आचार, विचार किती प्रगल्भ... विचार करण्याची क्षमता आणि बोलण्याची ढब पहिली तर यांचा हात धरणारा तरी अजून जन्मास यायचा आहे असंच वाटतं... शहाजीराजे आणि जिजाऊमाँ साहेबांच्या पोटी जन्मास आलेलं हे पुत्ररत्न म्हणजे महा पराक्रमी...

सदरेवरील खलबतांना प्रारंभ झाला....

जगदंब... जगदंब...

राजे उदगारले तशी निरव शांतता पसरली..

"लढाया, युद्ध फक्त तलवारीच्या जोरावर जिंकता येत नाहीत... योजनाबद्ध पद्धतीने आपण शत्रूची कुवत ओळखून त्याच्यावर फार थोड्या शक्तीने, युक्तीने वार करू शकतो व युद्ध जिंकू शकतो."

शांत डोक्याने विचार करणे महत्वाचं आहे, वेळप्रसंगी पाय कोठे मागे घ्यावा याचासुद्धा विचार करावयास हवा. स्वराज्यासाठी आपण सर्वांनी जगलं पाहिजे.

या सर्व गोष्टी आपणांस समजाव्यात यासाठीच आज सज्जाकोठीत आपणांस बोलावलं आहे.

अफजलखानाला मारून राजे काही आनंदोस्तव साजरा करीत बसले नाहीत. स्वतः चढ्या घोड्या निशी आदिलशाही मुलखावर चाल करत खटाव, मायणी, रामापूर, कलढोण, वाळवे, हळदी, अष्टी ताब्यात घेतली. वडगांव, वेळापूर, औदूंबर, मसूर मार्गे कऱ्हाड पर्यंतचा सारा भु भाग काबीज केला. अवघ्या पंधरा दिवसांत सुपे, तांबवे, पाली, नेर्ले, कामेरी, विसापूर, सावे, उरण, कोळे संबंध मुलुख स्वराज्यात सामिल करुन घेतला होता.

कोल्हापूरच्या लढाईत रूस्तुमेजमान, फाजलखान, मलिक इतबार, फत्तेहखान यांचा पाडावं करत कोल्हापूरवर विजय मिळवून किल्ले पन्हाळगड सुद्धा राजांनी ताब्यात घेतला होता.

राजे बोलतच होते..

माझ्या मावळ्यांनो, सांगायचा उद्देश हाच की रणक्षेत्रात विश्रांती नाही. वेगवान आणि अनपेक्षित अशा हालचालींनी शत्रूपक्षास गारद करण्यामुळेच आम्ही हे सर्व विजय प्राप्त करू शकलो. रणनीती ही अशीच असावी लागते. शत्रूच्या दुर्बलतेचा फायदा हा घ्यावाच लागतो पण हे करीत असताना आपल्या मावळ्यांचे रक्त सांडले जाऊ नये, याचीसुद्धा काळजी आम्हास घ्यावी लागते.

माझ्या मावळ्यांनो आपण सुद्धा या हिंदवी स्वराज्याचे प्रामाणिक शिलेदार आहात. आम्ही जरी राजे असलो तरी आम्ही हे राज्य आपणा सारख्या अठरा पगड जातीच्या आणि बारा बलुतेदारांच्या जीवावर करीत आहोत, आपणा सर्वांच्या सुखा करिता आणि कल्याणाकरिताच या हिंदवी साम्राज्याचा पसारा वाढवत आहोत.

राजे बोलत होते.. बोलत होते..

आणि सर्वजण ध्यान देऊन ऐकत होते...

गेली चार महिने आपण इथे पन्हाळगडावर जणू पारतंत्र्यात अडकून पडले आहोत... जवळ जवळ चाळीसएक हजार सेन्यानीशी तो सिद्धी जोहर आपल्या सहन शक्तीची परीक्षा घेतो आहे. कदाचित आम्ही त्याला कच्या दिलाचे वाटलो असेन...

पण आम्ही कच्या दिलाचे नाही आहोत..

आम्ही डरपोक नाही...

आम्ही सह्याद्री चे सिंह आहोत...

आम्ही असे खचून जाणारे नाही...

गेली तीनशे वर्ष हा सह्याद्री या यवनी सत्तेचे वार अंगाखांद्यावर घेत इथं अखंडपणे उभा आहे आणि त्याचे पुत्र म्हणवणारे आम्ही या चार महिन्यांच्या वेढ्याने कदापिही डगमगणारे नाही.

स्वातंत्र्यरक्षणासाठी आणि हिंदू धर्मंरक्षणासाठी आई तुळजाभवानीचा आशिर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहे. याची आम्हांस पूर्ण जाणीव आहे.

जगदंब.. जगदंब.. जगदंब..

आता काहीतरी योजना आखावीच लागेल मी आपणा सर्व मानकऱ्यांकडून सल्ला मागतो आहे. आपण सर्वजण कुशल कारभारी आहात पर्याय शोधा.. तिकडे शाहिस्तेखान पुण्या जवळ जुलमी अत्याचार करुन रयत लुटत असताना आम्ही कसे इथे स्वस्थ बसू....

आई तुळजाभवानीचा आशीर्वाद प्रतापगडाच्या युद्धात आपल्या पाठीशी होता... तसाच तो यावेळी सुद्धा पाठीशी आहे..

आवेशपूर्ण सवांदा नंतर राजांनी मावळ्यांचा निरोप घेतला आणि तळमजल्याकडे निघून गेले.

सह्याद्रीच्या या सिंहाला चाळीस हजार दुष्टांनी वेढले होते. पण या सिंहाच्या जवळ जाण्याचे धाडस मात्र त्यांचे होतं न्हवते. दुर्जन आहेत म्हणून हा चतुर सिंह त्यांच्यावर हल्ला करण्याचा अविचार करत न्हवता तर आपल्या प्रामाणिक शिलेदारांबरोबर या दुर्जनांवर मात करण्याचा मार्ग शोधत होता.

----------

पन्हाळगडाच्या पश्चिम बाजूला जरा उंचावर असणारा, पिसाट वाऱ्याची संगत करणारा, हिरवी शाल पांघरलेला, पन्हाळगडाच्या चारही दिशांवर नजर ठेवून शत्रूपक्षांच सावज हेरणारा आणि पन्हाळगडाचा पाठीराखा असणारा बलदंड बुरुज.... नांव त्याच पुसाटी बुरुज..

पन्नास ते साठ फूट उंच असणारा एकापाठोपाठ दोन दिसावेत पण प्रत्यक्ष दोन्ही मध्ये मोठा खंदक... पालापाचोळ्यान झाकोळलेला... शत्रू आला की सरळ खंदकात गाढला जाईल अशी व्युव्हरचना..

या पुसाटी बुरुजाची दुसरी ओळख म्हणजे स्वराज्यातील द्रोही गुन्हेगारांचा केला जाणारा कडेलोट...

पावसाची संतत धार, विजांचा कडकडाट सोसाट्याचा वारा याही अवस्थेत शिवरायांच्या धारकऱ्यांचा अन गडकऱ्यांच्या डोळ्यात तेल घालून पहारा सुरुच होता..

होशियार.... जागते रहो.... च्या आरोळीने सार वातावरण भरून गेलं होतं. तटबंदीवरील मावळे इकडून तिकडे, तिकडून इकडे फिरत होते...जंगलात कोल्हेकुई चालू होती, रानकुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज धरकाप उडवत होता.. कडयापारीतून कोसणाऱ्या पाण्याच्या धारा अंगावर शहारे आणत होत्या.

एवढ्यात बुरुजाखालन आवाज येऊ लागला... अर कोण हाय गस्तीला दोर सोडा दोर... आर मर्दा.. सोड की लवकर..

गस्तीवरल्या मावळ्यांना आवाज येऊ लागला.. पण इतक्या मध्यरात्री अन या घनदाट जंगलात कोण कशाला धाडस करतय हे काही कळायला मार्ग न्हवता..

आता सांकेतिक खाणा खुणा सांगणारी शीळ ऐकायला येऊ लागली.. मध्येच कोकीळेचा आवाज आला.. आता इतक्या मध्यरात्री आणि धो धो कोसळणाऱ्या पावसात कोकिळा कशी काय बरं ओरडेल... 

काहीतरी गडबड असल्याचा सांगावा किल्लेदार त्र्यंबक भास्करांपर्यंत पोहोचला.. लगोलग दहा बारा धारकऱ्यांसोबत कील्लेदार पुसाटी बुरुजावर हजर झाले...

गडकरी.. खालून कोणीतरी आवाज देतंय.. दोर सोडा म्हणतंय.. दोर..

गडकऱ्यांनी आज्ञा केली..

मर्द मराठ्यांनो समदी ढाल तलवारी घेऊन तयारीत राहावा...आणि सोडा बघूया दोर..

दोर सोडला.. आणि आदेश दिला गेला दोर धरलास की हलव...दोर हलवला तसा क्षणार्धात वर पण ओढला गेला...

आणि वर आला भगव्या कपड्यातला कुणीतरी पोऱ्या...बोलायलासुद्धा अवकाश न देता.. लगेचच धारकरयांनी जेर बंद केला मुसक्या आवळल्या..

गडकर्यांनी मावळ्यांना शाबासक्की दिली.. तांबडं फुटायला लागलं होतं.. गडावर कुणाला तरी जेरबंद केल्याची वार्ता पोहोचली.. तशी राजांची झोपमोड झाली..

किल्लेदारानी बंदयाला सदरेवर राजांसमोर हजर केल..

किल्लेदार मिशा, कोरलेली दाढी, हातात चांदीच कड, कानात बाळा घालून समोर उभ्या असणाऱ्या गुप्तहेराला राजांनी ओळखलं होतं...

राजांनी आज्ञा केली.. सोडा त्याला....

पर.. राज राज..

किल्लेदार आपण छान कामगिरी केलीत..

पण तुम्हीही याला ओळखू शकला नाहीत अहो स्वराज्यात असं करावं लागत वेषांतर.. 

हा तर आपल्या गुप्तहेर खात्यातील महादेव..

आता तुम्ही निघा.. आम्हाला याच्याशी काही खलबत करायची आहेत.. सदर रिकामी झाली अन..

महादेव बोलू लागला...

राज आऊसाहेबांचा आशीर्वाद राजगडावरून निघालो ते थेट चाफळ मार्गे कोल्हापूर गाठलं.. बिरू धनगरांन आसरा दिला... माझा इरादा मी त्याला बोलून दाखवला.. तसा तेन मला हुबेहूब धनगरच करुन टाकला डोक्यावर पागुट, हातात कड, कानात बाळा, बाराबंदी, पायात पायताण आणि कमरला ह्यो कोयता..

धनगर हुनच सिद्याच्या चोकीत रखवालदाराची नोकरी केली... तीस दिस झालं चाकरी करत करत समदी माहिती गोळा किल्या बघा...

काय काय हाती लागलंय..

बोल बोल महादेवा बोल... राजांच कान गुपित खबर ऐकण्यास उत्सुक झालत..

तसा महादेव धडाधड बोलू लागला...

राज... इंग्रज टोपीकर दर्दी माणसं आणि तोफा घेऊन सिद्धी च्या छावणीत दाखल झालाय..

लवकरच मारा करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्यापाशी लांबच जवळ दिसणार यंत्र बी हाय..

आठ दिवसापूर्वी पुसाटी बुरुजा खाली माझी रखवालदारी ची वर्दी लावली होती तवा पासन गडावर यायचा प्रयत्न करतोय

राज... बुरुजाखाली लई कडक पहारा हाय... मातुर पाऊस धो धो कॊसळाय लागला.. की मेटकरी आसरा हुडकून लांब जात्यात बघा..

हिच वेळ आपण साधायची धो धो कोसळणाऱ्या पावसा सरशी वीज चमकावी तस आपण गडावरून पायउतार व्हायचं...

शाब्बास महादेव शाब्बास..

अगदी अचूक कामगिरी केलीस.. हे घे बक्षीस..

जा तू आता थोडी विश्रांती घे..

असं बोलून राजांनी त्याला रजा दिली..

राजांच गुप्त हेर खात अधिक सक्षम होतं... आणि गुप्त हेर खात्याचे प्रमूख होते बहिर्जी नाईक.

वंश परंपरागत बहुरुपी असलेले आणि नक्कल करणे व वेश बदलविण्यात पांरगत असलेले बहिर्जी नाईक. राजे मोहिमेवर असताना दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरणारे बहिर्जी एकदा त्यांना भेटले. कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत आणि बोलण्यातही वाक्बगार असणारा हा माणूस स्वराज्याच्या नक्कीच कामाला येणार हे महाराजांनी ओळखलं आणि त्यांना त्या गुप्तहेरीच्या कामात रुजू करून घेतले.

बहिर्जी नाईक हे फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, साधू , लाकूडतोड्या, मेंढपाळ असं कुठलही वेशांतर करण्यात पटाईत होते. फक्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातून शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होते.

दुसरा दिवस उजाडून सूर्य अस्ताला जायची वेळ होती धो धो पाऊस कोसळत होता विजांचा लपंडाव सुरूच होता. महादेवाच्या येण्यानं राजांना आधार मिळाला होता. सज्जाकोठीच्या दुसऱ्याला मजल्यावर राजांनी परत सदर बोलावली.

विश्वासू शिलेदारांसमोर विचार मांडला...

आता आम्ही योजना ठरवली आहे. विशाळगडी जाण्याची.

राजांचा महत्वाकांशी स्वभाव, प्रचंड आत्मविश्वास, दूरदृष्टी साऱ्यांनाच माहिती होती. प्रतापगडाच्या युद्धात याचं कटुनीतीचा वापर करुन कुशाग्र बुद्धी वापरून अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला होता..

बैठकीत एकच निरव शांतता पसरली होती...

राजे मात्र बोलतच होते...

बाजी...राजा म्हणवून घेणं सोपं असतं.. पण राजा होऊन या रयतेच्या यातना आम्हाला पाहवत नाहीत रयतेचं रक्त म्हणजे आम्हाला आमचं रक्त सांडल्यासारख होतं..

आम्हाला आमची काळजी जरा कमीच.. पण आमच्या पाठमागे राहणाऱ्यांसाठी जीव अडकतो आहे..

स्वतः पेक्षा रयतेची काळजी घेणारा.. सर्वगुणसंपन्न असा हा शिवाजीराजा आपल्याला राजा म्हणून लाभल्याबद्दल नियतीला सारेजण धन्यवाद देत होते.

येणाऱ्या आषाढ पौर्णिमेस ठराविक मावळ्यांसह पन्हाळगड सोडून विशाळगडी प्रयाण करायचे...

वेढा चुकवून जाण्याचा बेत आहे पण वेळ पडल्यास वेढा फोडूनसुद्धा जावं लागेल...

जमवून आणावंच लागेल आता ही जबाबदारी आपल्या सर्वांवर..

सोबत शिबंदी घ्या, धारकरी घ्या, वाटाडे घ्या आठ दहा दिवसांत सगळी व्यूहरचना करा.

आणि हो एक ध्यानात घ्या... एक मुत्सद्दी हेजीब ( वकील )तयार करा... सिद्धी सोबत चर्चेला पाठवा...

.. बिनशर्त माघार... हो बिनशर्त...शरण येणार.. शिवाजीराजे आपल्या स्वाधीन होणार... आपण फक्त त्यांना अभय द्यावे.. शिवाजीराजे आदिलशहाच्या दरबारी सेवेकरी सरदार म्हणून आजीवन राहतील..

अर्थात... हे सर्व नाटक.. सर्व काही मुहूर्तावर म्हणजेच आषाढ वद्य प्रतिपदेस 13 जुलै 1660 च्या सायंकाळी महाराज शरण येणार हा फतवा सिद्धी पर्यंत पोहोचवायचा ठरला...

शिवाजीराजे आपली योजना सर्वांना सांगत होते...

बाजीप्रभू, फुलाजीप्रभू, गंगाधरपंत, त्र्यंबकराव भास्कर, संभाजी जाधव, विठोजी काटे, हैबतराव बांदल, रायजी बांदलनाईक सारी सारी विचारमग्न झाली आता त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होता तो... वीस कोसावरचा विशाल दुर्ग पूर्वीचा खेळणा आणि आत्ताचा विशाळगड... !

योजना सांगणारी विचारमग्न बैठक सपंवुन राजे तळमजल्याकडे रवाना झाले..

राजांनी ठरवलेल्या गोष्टीत जीवाचा धोका होता, शिवाय शरणागतीचा विचारसुद्धा कुणालाही पटणारा न्हवता.. पण हिच धाडशी योजना राजांना सुखावत होती... धाडस तर रोमा रोमात भरलेलच होतं..

दुसऱ्याच दिवशी रामप्रहरी बाजींनी वाटाड्या आणला...

राज मार्ग ठरला.. पन्हाळगडावरून राजदिंडी मार्गे मसाई पठार.. कुंवर खिंड मधल्या आठ दहा वड्या वस्त्या.. सुकाम्याचा धनगर वाडा... पांढरपाणी... गजापूरची घोडखिंड आणि मग विशाळगड... साधारण वीस कोसाचा प्रवास...

उद्यापसन प्रत्येक रातीला दोन माणसं वेड्याच्या बाहेर पडतील आणि या वाटवर नेमुन दिलेलं काम चोख करतील.. ही माणसं माजी विश्वासातील असणार तेची काळजी तुम्ही करू नका.. ती माणसं आषाढ पौर्णिमेला वाटाड्याच काम करतील आणि गनीम मागून आलाच तर तशी सूचना गंजी पेटवून न्हायतर ऐन पावसात धूर करुन तुम्हाला देतील... दर दोन कोसावर दोन माणसं पेरायची जबाबदारी माझी...

ठरलं तर मग आई तुळजाभवानी वर विश्वास ठेवा ती आपल्या पाठीशी आहे प्रतापगडा च्या युद्धावेळी जशी ती आपल्या पाठीशी होती तशीच...

राजांची योजना आकारास येत होती तस बाजींच्या समोर अनेक प्रश्न उभे राहत होते.

वेढा फोडून जायचे म्हणजे भयंकर जोखीम...

केंव्हाही काहीही घडू शकते..

ऐनवेळी वीज चमकून लख्ख प्रकाश पडू शकतो... गनिमाचा शिपाई भर पावसात आडवा येऊ शकतो.. एखादा हिंस्त्र प्राणी जंगलवाटेत अंगावर आला तर... कोणत्याही क्षणी राजांवर हल्ला होऊ शकतो...

एक ना अनेक शक्यतांनी बाजींचे अंग शहारलं होतं...

दुसऱ्याच दिवशी बाजींनी राजांना निरोप दिला... आज आम्हास एकांत हवा आहे.. तोही लवकरात लवकर... कारण ही तितक्याच.. लवकर स्पष्ट केलं जाईल...

बाजींचा निरोप आणि तोही राजांना...

राजे अस्वस्थ झाले... काय झालं असावं.. विशाळगडी जायचा बेत पटला नाही का बाजींना... बाजींनी असा का निरोप आम्हास धाडावा.. कोणी नजरबाज सिद्धीला मिळाला तर नसेल ना... काही गुपित खलबत सिद्धीच्या गोटात कळाली तर नसेल ना...

असे एक ना अनेक प्रश्न राजांना अस्वस्थ करीत होते... अशाच अस्वस्थ अवस्थेत राजांनी तडक दुतोंडी बुरुज गाठला..

अंगात भगवा अंगरखा, पायात चोळणा, कंबरेला दुशेला बांधला होता पण त्यात आज तलवार न्हवती... डोक्यावर नेहमीप्रमाणे जिरेटोप न्हवता..

चिंतातुर चेहऱ्याने राजे समोर दिसणारा वारणा खोरा न्याहाळत येरझाऱ्या मारत होते. आणि मनात एकच विचार भंडावून सोडत होता....

बाजी का आले नसावेत आज भेटीला...

बाजी... बाजी... बाजी...

एवढ्यात मागून आवाज आला...

मुजरा राजे... मुजरा..

या बाजी या.. आपला निरोप मिळाला.. अन मन बैचेन झाले..

सर्व काही ठिक आहे ना... आपला विशाळगडी प्रयाणाचा बेत तर बदलला नाही ना..

राजे अधीरपणे बोलतच होते.. आणि शांत बाजी उभे होते...

बोला बाजी बोला तुम्ही एकांत का मागितला..

राजे परवा खलबतखान्यात झाल्या चर्चेप्रमाणं काही दगाफटका झालाच तर दुसरी पालखी पण तयार केलीय...

पण बाजी.. नुसती पालखी तयार करुन काय उपयोग.. त्यात बसण्यासाठी कुणी.. जीवाचा धोका पत्करणार..वेळ पडलीच तर प्राण देण्याची तयारी ठेवणार कुणीतरी पाहिजे ना...

बाजी एकदम धीर गंभीर नजरेने म्हणाले..

आहे तो सुद्धा तयार आहे...

भगवा अंगरखा, पायात चोळणा, कमरेला दुशेला त्यात मोत्याच्या मुठेची खोचलेली कट्यार, डोक्यावर भगवा जिरेटोप, त्यात डुलणारा मोत्यांचा तुरा, कपाळी शिवगंध....

छत्रपतींच हे हुबेहूब प्रतिबिंब पाहून... राजे बघतच राहिले.... बाजी अगदी हिरा शोधलात..

होय राजे होय... मुद्दामच तुमचा पौषाख करुन आणलाय शिवाला !..वाटतं येताना साऱ्या गडकर्यांनी मुजरा पण केलाय..त्याच वेळी मी ठरवलं सोंग अगदी चांगल वटवलं आहे... आणि आपली मोहीम बी फत्ते होणार...

शिवा.. होय राजे हा देखील शिवाचं...

पण शिवा काशीद... गडाच्या पायथ्याला असणाऱ्या नेबापूरचा नाभिक समाजातला आपला मावळाच आहे.. हुबेहूब चेहरेपट्टी अंगपीडान पण सारखाच... पण...

पण.. पण.. आता काय.. शिवा काशीद पालखीत बसायला तयार नाही काय...?

असं काव राज तुम्ही बोलताय.. आव ह्यो शिवा जीव द्यायला बी तयार हाय..

शिवा काशीदच आता राजांशी बोलू लागला होता...

हे बाजीदादा म्हणत्यात तुझं सगळं ठिक हाय पर भाषा अशुद्ध आणि वंगाळ हाय... आता आमी गावचं न्हावी.. आम्हाला थोडंच राजा सारखं बोलणं ईल व्हयं.. आमास्नी सवय न्हाय स्वछ बोलायची... तवा हे बाजीदादा आमच्याव नाराज झाल्यात..

शिवा असं म्हणू नकोस..येसाजी कंक, तानाजी मालुसरे, बाजी पासलकर ही आमची लंगोटीयार सवंगडी यांच्यामुळेच आम्हाला सवय आहे या भाषेची...

बाजी तुम्ही नका काळजी करू..

शिवाला पालखीत बसवू आणि काहीही न बोलण्याबद्दल सुचवू... म्हणजे जणू अबोलाच धरायचा..

शिवा तुला माहिती आहे ना सर्व काही...

बघ ही दुसरी पालखी करायची आहे.. नकली राजा बसवून गडावरून पायउतार होण्यासाठी..

राज आताच मुजरा घ्या राज ह्या बाजीदादानी सगळं मला सांगितलंय... तुम्ही सुखरूप बाहेर पडणार आणि मी सिद्धीच्या वेढ्यात जाणार.. मरण समोर असणार माझ्या... येळ आलीच तर ते मरण बी सुखान पत्करीन...राज तुम्ही नका काळजी करू ... तुम्ही स्वराज्याच धनी हाय..

आणि या धन्यासाठी माझ्यासारख्या शिवा न्हावी ला राजाच सोंग करुन मरण आलं तरी मी धन्य धन्य होईन राज... मुजरा घ्या.. राज मुजरा घ्या....

राजांचा उर भरून आला. अशाच रयतेच्या जीवावर आम्ही हे हिंदवी स्वराज्य स्थापले आणि त्यांच्याच बळावर वाढविले आणि अशाच जिगरबाज मावळ्यांच्या साथीने ते आजवर टिकले..

आम्ही विशाळगडी सुखरूप पोहोचू या आशेने जातं आहोत.. पण शिवा तू परत एकदा विचार कर... तूझी मान तलवारीच्या पात्याखाली आहे... आम्ही राजे असलो तरी तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही... तूझी भाषा अस्वछ असली तरी त्यातील विचार किती शुद्ध आहेत.. यावरून.. तूझी उंची आम्हाला जाणवतेय... तू नीट विचार करुन कळवू शकतोस.. रयतेवर जोर जबरदस्ती आणि अन्याय आम्हाला पाहवणार नाही...

राजांचे बोलणे मध्येच थांबवून शिवा क्षणाचाही विचार न करता बोलता झाला...

राज इचार कसला करायचा... बरं नुसता केला न्हवं तर पक्का केला.. म्याच पालखीत बसणार..

पुढचे दोन दिवस राजांनी विश्रांती घेतली खरतर ही विश्रांती राजांनी स्वतः साठी नाही तर कृष्णा या घोडीसोबत दोन दिवस घालवता यावेत या साठी घेतली... कारण मोहिमेचा टप्पा खूप दूरवरचा असला तरी तो या कृष्णा घोडीवरून गाठायचा न्हवता....अनेक मोहिमांमध्ये यशाची साथ देणारी घोडी मात्र या मोहिमेत न्हवती.. घोड्यांच्या टापांच्या आवाजाने गनीम मागावर येईल म्हणून संपूर्ण मोहीम पालखीतून करायची होती.. अधूनमधून राजे या घोडीजवळ जायचे आणि आयाळ कुरवाळत तिच्याशी हितगुज साधायचे ...

याशिवाय याचं दोन दिवसात खलबतखान्यात कुणालाही न कळता अगदी हुबेहूब अशा दोन पालख्या तयार केल्या गेल्या...

पालखी राजांची असली तरी अंधारात शत्रुला कळू नये म्हणून जाणीवपूर्वक पालखीचा रंग हिरवट काळा देण्यात आला होता...

अखेर तो दिवस उजाडला....

आषाढ पौर्णिमा ...

दुपारचा प्रहर सुरु झाला तसे गंगाधरपंत हेजीब हेजीब म्हणजे वकील... हातात पांढरे निशाण घेऊन पन्हाळगडाच्या पूर्वेकडील मुख्य चार दरवाजातून सिद्धीच्या शामियान्याच्या दिशेने गड उतरून... छावणीत दाखल झाले...

गंगाधरपंतांच स्वागत करण्यात आले..

कुरळ्या केसाच्या , आणि धिप्पाड देहाच्या रंगानी काळ्याकुट्ट सिद्धीला गंगाधर पंतांनी पहिल्यांदाच पाहिलं होतं..

सिद्धीच्या शेजारी फाजलखान, रुस्तुमेजमा, बडेखानसाब, आणि बरेचसे पठाणी हुजूर हजर होते.

गंगाधरपंतांनी प्रस्ताव मांडण्यास सुरुवात केली...

हुजूर आमचे राजे आपणांस शरण येऊ इच्छितात तेही बिनशर्त... केवळ तुम्ही त्यांना त्यांच्या जीविताची हमी द्यावी..

अचानक आलेला हा प्रस्ताव ऐकून सिद्धी गोंधळला.... आणि उलटा प्रश्न करता झाला...

तो फिर शिवाजी राजे अभी क्यों नहीं आये...

बराबर... जवळच उभा असणारा फाजलखान पण ओरडला.. हाच फाजलखान जो प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या अफझलखान वधाच्या वेळी ही हजर होता. पण अजूनही अक्कल ठिकाण्यावर आली न्हवती...

मुत्सद्दी गंगाधरपंत बोलते झाले...

राजांना भय वाटते ते या फाजलखानाचे...

आणि आजचा दिवसही चांगला नाही..

उद्या आषाढ वद्य प्रतिपदा... सायंकाळची सुमूहुर्ताची वेळ साधावी असा राजांचा विचार आहे.. शिवाजीराजे उद्याच आपणांस शरण येणार... आपण राजांच्या जीवीताची हमी आम्हांस द्यावी.. आणि आदिलशहांच्या रजामंदीने भविष्यात राजांनी त्यांची चाकरी पत्करून आपले धोरण ठरवावे... असा शरणागतीचा प्रस्ताव आहे...

सिद्धयाचा आंनद गगनात मावेनासा झाला..

आदिलशाहीच्या काळात हुकूमत गाजवणारा.. स्वराज्याचा सवता सुभा मांडणारा...

चंद्रराव मोऱ्यांची जावळी जिंकणारा...

प्रतापराव मोऱ्याला जावळीतून हुसकावणारा..

अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारा..

फाजलखानाला विजापुरी माघारी धाडणारा..

रुस्तुमजमानला कोल्हापूर लढाईत माती चारणारा..

तो.... शि.. वा.. जी.. बिनशर्त शरण येणार...

म्हटल्यावर त्याला आभाळ ही ठेंगणं झालं..

गंगाधरपंतजी... कबूल हैं |

आपकी और राजे शि..वा..जी.. की हर बात हमे मंजुर हैं | कल शाम इसी वक्त इसी जगह पे हम उनका स्वागत करेने के लिए तैयार हैं.. |

ठिक आहे हुजूर.... असं म्हणतं गंगाधरपंत तडक सिद्धीच्या डेऱ्यातुन निघाले आणि गडावर दाखल झाले.

शिवाजी राजे उद्या सिद्धी जोहारखानास शरण येणार.. ही वार्ता सिद्धीच्या डेऱ्यात सर्वत्र जाणीवपूर्वक पसरविण्यात आली.

____________

आषाढ वद्य पौर्णिमा...

गुरुवार 12 जुलै 1660... रात्रीचा पहिला प्रहर सुरु झाला... म्हणजे रात्रीचे ठिक 10 वाजले..

पन्हाळगडावरील हिंदू मुस्लिम बांधवांचे ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या शमशुद्दीन साहेब म्हणजेच साधोबाला, आई तुळजाभवानीला, अंबरखान्यातल्या सोमेश्वरला, तीन दरवाजावरील श्री गणेशाला सर्व देवदेवतांना साकडं घातलं गेलं. हवा तसा मुसळधार पाऊस कोसळत होता.  

धो धो कोसळणाऱ्या सरींच्या साक्षीने..

राजे आणि राजांच्या सोबत बाजीप्रभू, फुलाजीप्रभू, संभाजी जाधव, रायजी बांदल, विठोजी काटे, हैबतराव बांदल यांच्यासह सहाशे बांदल मावळे पन्हाळगडा वरील राजदिंडी मार्गा जवळ उभे ठाकले.

मावळ्यांच्या सुवासिनींनी राजांचे औक्षण केलं. राजकुंकुम तिलक लावला गेला. तेवढ्यात आलेल्या वाऱ्याच्या झोताने आरतीच्या ताटातील निरांजन विझून गेल्या .

भगिनिंच्या चेहऱ्यावर पसरलेली काळजी पाहून राजे उत्तरले....

गेलेल्या दिव्याप्रमाणेच हा गनिमासुद्धा असाच नाहीसा होणार आहे. काळजी नसावी..

राजांचे हे आत्मविश्वासपूर्ण बोलणं ऐकुन साऱ्यांचे चेहरे ऐन काळोख्यात उजळून निघाले.

दोन्ही पालख्यांचे आणि तलवारीच पूजन केलं गेलं, आई तुळजाभवानी ची आरती झाली.

राजांनी बाजी, फुलांजींचा हातात हात घेतला, सर्वांना आदरपूर्वक नमस्कार करुन राजे पहिल्या पालखीत विराजमान झाले.

बाजींनी खाणाखुणा करताच शेजारच्या झुडपातून... नखशिखांत जसे च्या तसे प्रति शिवाजी सर्वांसमोर उभे ठाकले गेले.

राजांच्या आसपास वावरणारे नेहमीचे मावळे देखील आश्चर्यचकित झाले. मग गनिमाची काय अवस्था होईल याची तर खात्रीच पटली.

राजे विराजमान झालेल्या पालखीतून बाहेर आले. शिवाला आलिंगन दिल.. साक्षात मृत्यूला कवटाळणाऱ्या शिवा खरंच तू शूरवीर आहेस. हे हिंदवी स्वराज्य तुला कदापिही विसरणार नाही.

राज माझं जाऊ द्या...आपलं रूप घेवून.. ह्यो शिवा न्हावी खोटा खोटा का असना पर काही घटकेचा शिवाजीराजा झाला.. हेच माझं नशीब.

शिवा काशिदच हे धाडस बघून राजांनी जड अंतःकरणाने आपल्या गळ्यातील कवड्याची माळ शिवाच्या गळ्यात घातली. आणि उरला सुरला शिवा...पण शिवाजी राजा झाला..

राजदिंडीचा दरवाजा उघडला गेला.. राजांची पालखी मार्गस्थ झाली तर प्रतिशिवाजी बनलेली पालखी चार दरवाजाच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली.

भोयांच्या पायांचा आवाज येऊ नये म्हणून मुसळधार पावसाचं आकांडतांडव सुरूच होतं अधून मधून चमकणारी वीज पायवाट दाखवत होती.

शत्रूचे मेटे जवळ येतील तशी कोकिळा गात होती.. सांकेतिक खाणा खुणा यावरच ही मोहीम यशस्वी होणारी होती त्यामुळे सर्वजण सावध होते.. प्रचंड पावसामुळे मेटकरी गायब होता.. शरणागतीच्या फतव्या मूळे..शत्रूचा वेढा ढिला पडल्याची खात्री झाली...

राजांना हेच हवं होतं.. हेजीब गंगाधरपंत यांनी कामगिरी अगदी चोख बजावली होती..

एक एक मेटा पार करुन पालखी मार्गस्थ होतं राहिली.. मुख्य अडसर पार पडत होता..

तर दुसरीकडे शिवा काशीद ची पालखी पश्चिम बाजूने पुसाटी बुरुजाच्या खालून चालत होती.. सोबतीला दहा भोई आणि दहा हत्यारबंद मावळे..

आपण आत आहोत हे सहज दिसावं म्हणून शिवा काशीदने आपला एक हात पालखी बाहेर काढला होता..

सिद्धी जोहरखॉंनचा जावई असणाऱ्या सिद्धी मसूदला त्याच्या नजरबाज खबऱ्यांकडून ईशारा कानी आला होता.... शायद कोई तो भाग रहा हैं |

कोणीतरी वेढा फोडून पळून जातं आहे..

असं कानी येताच सर्व मेट्यांवर पहारा आवळण्यात आला... गेली साडेचार महिने ऊन, वारा, थंडी पावसाची तमा न बाळगता दाट धुक्यात दिलेल्या पहाऱ्याची सगळ्यांना आठवण झाली.. थोडीशी जरी लापर्वाई झाली तरी... आदिलशहाला तोंड दाखवू शकत नाही... या जाणिवेने सिद्धी मसूद मुघली समशेर घेऊन अंगरक्षकांसह जंगलात गस्त घालत होता...

पकडो.. पकडो.. दिन.. दिन.. च्या आरोळ्यांनी आसमंत भरून गेला..

पालखी सोबत असणारे दहा हत्यारबंद मावळे पालखी सोडून पळून गेले.. ठरल्या प्रमाणं मुद्दामच पळाले...

होय पळाले पण लगेचच वेषांतर करुन नजरबाज म्हणून पुढे नियती काय करणार आहे याकडे लक्ष ठेऊन जंगलात लपून राहिले..

उरलेले दहा भोई साक्षात मृत्यू समोर असतानाही राजांची पालखी पुढे पुढे नेतच होते..

अशाच अनेक शूरवीर मावळ्यांच्या पाठींब्यावरच हे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं..

काही क्षणातच काळ्या पठाणी सरदारांनी पकडो पकडो म्हणतं पालखी पकडली....

सिद्धी मसूदला खबर मिळताच तोही आला आपल्या मोघली समशेरीचा पातीन... पालखीची अलवान बाजूला केली...

पाहतो तर काय राजा समान पेहराव धारी...

अरे ये तो सिवाजीही दिखता हैं.. |

पर ये तो शरण आने वाला था... !

अच्छा हुआ पकडा गया..

चलो जल्दी करो...उठा लो राजा को, और चलो सलाबतखानसाहब के पास...

सोबतच्या पठान्याना आदेश फर्मावता झाला.

ऐन मध्यरात्री मध्याच्या नशेत धुंद झालेल्या सिद्धीजोहरखानाच्या कानावर खबऱ्या कडून खबर मिळाली....

हुजूर..ss..शिवाजी भाग रहा था...पर पकडा गया ...

ये परवदिगार, ये अल्ल्हा तेरा लाख लाख शुक्र हैं... ये शि.. वा.. जी.. पकडा गया...

त्याची धुंदी उतरली.. आज्ञा फर्मावता झाला..

मसूद... शि.. वा.. जी.. को अंदर ले आओ..

पांढऱ्या शुभ्र अंगरख्यात कवड्याची माळ हातानी कुरवाळत... राजे शामियान्यात आले.

विजापूरकर आदिलशहाच्या नाकी दम आणणारा, त्याचे किल्ले बळकावणारा, हिंदवी स्वराज्य स्थापणारा, अफजलखानाला यमसदनी पाठवणारा असा हा शिवाजी राजा आज सिद्धी जोहरखानाच्या ताब्यात होता.. गेल्या साडेचार महीन्यांची मेहनत कामी आल्याचा आनंद सिद्धीच्या चेहऱ्यावर खुलून दिसत होता.

शि... वा... जी.... कहा भाग रहे थें |

कल ही आपका हेजीब आया था,,

आप यहाँ बिनाशर्त हमारे हवाले होनेवाले थे... फिर क्या हुआ |

क्या इरादा बदल गया |

सिद्धी प्रश्नांची सरबत्ती करीत होता..

पण राजे शांत होते...

कारण बाजींची आज्ञाच होती. काही झालं तरी तोंड उघडायचं नाही..

एवढ्यात दुसरा हबशी कुर्निस्तान करत शामियानात दाखल झाला...

सलाबतखानसाब...ऊस बाजू पहाडपे बहोतसी मसीहारे दिख रहे हैं... नौबती भी बज रही हैं... शायद इन मरहठठो ने हमला कर दिया हैं... |

शिवाजीराजांनी कूटनीतीचा म्हणजेच गनिमी काव्याचा वापर करत पन्हाळगडाचा वेढा फोडल्याचे सिद्धी च्या लक्षात आले...

तो संतापला...

शेजारीच उभ्या असणाऱ्या भालाधारी सिपाही चा भाला घेऊन तो शिवा काशिदच्या समोर यम बनून उभा ठाकला...

जीवावर बेतलेला प्रसंग शिवा च्या लक्षात आला... आई भवानी माते राजांना यश दे... थोड्या वेळासाठी का होईना शिवाजी राजा होता आलं... यातच मी भाग्यवान समजतो...

असं म्हणतं जगदंबेची प्रार्थना करत शिवा काशीदने डोळे मिटले होते..

इतक्यात एक तीव्र वेदना त्याची छाती भेदून गेली...

शेजारीच उभ्या असणाऱ्या सिद्धी मसुद आणि फाझलखानाच्या मोघली समशेरिंनी शिवा काशिदच्या छाती पोटा वर सपासप वार केले...

शिवाजीराजांच्या सुरक्षेसाठी स्वतः च्या जीवाची पर्वा न करता... मृत्यूशी कवटाळलेला शिवा काशीद धारातीर्थी पडला... स्वराज्याचा मावळा शहीद झाला..

सिद्धी रागाने लाल बुंद झाला होता... त्याने आदेश फर्मावला... इन मरहठठो को मत छोडो.... शिवाजी भाग ना पाये... रात अंधेरी हैं.. लेकिन बहाद्दूर सिपाहीओ तुम ये कर सकते हो.. जाओ ढुंडो उसे...

______________

इकडे काट्या कुट्यानी वेढलेली, गुडघा भर चिखलांनी माखलेली, काळी कुट्ट अंधारलेली वाट... वाटाड्याच्या मदतीने पार करत महाराजांची पालखी आता मसाई पठारावर पोहोचली होती...

उंच आणि विस्तीर्ण पठारा वरून बाजींनी पन्हाळगडाच्या दिशेने मागे वळून पहिले...

बाजींच्या ध्यानात आलं गडाच्या पायथ्याला सिद्धी च्या छावणीत काहीतरी नक्कीच गडबड झाली असणार..

आई तुळजाभवानीला साद घालत प्रार्थना केली....

आई जगदंबे... माझ्या मावळ्या शिवाची रक्षा कर..

प्रहरामागून प्रहर जातं होते.. वाड्या..वस्त्या पार करत.. घोटभर पाणी आणि आलटून पालटून विश्रांती घेत पालखीचे भोई तक्रार न करता पावलं झपाझप उचलत होती...

पांढरेपाणी आले... शत्रूचा अजून तरी काही मागमूस न्हवता.. तरीही अंदाज घेत सर्वांनी पाणी पिले... आता विशाळगड फक्त चार कोस उरला होता... यापुढं अवघड खाजखळग्यांची पार करावयाची होती ती घोडखिंड... पण दिवस वर आला होता त्यामूळे उजेडात ती सहज पार पडेल असा वाटाड्यानी कयास बांधलेला..

राजांच्या पालखीची अलवान बाजूला सरकवत बाजी राजांशी बोलू लागले...

राजे आपल्या नजरबाजांनी काम बिनचोक बजावले आहे.. मागच्या पहाडावर गंजी पेटलेली दिसत नाही.. याचा अर्थ अजून तरी शत्रूला पत्ता लागला नसावा..

अस म्हणतं असतानाच पहाडावर गंजी पेटल्याच लक्षात आले. आकाशात धूर ओकू लागली... शत्रूला आपला सुगावा लागल्याचा

ईशारा झाला..

तसा घोड्यांच्या टापांचा आवाज पण येऊ लागला...

फरसबंदीच्या मार्गानं घोडखिंडीत जायचं आणि

मग विशाळगड जवळ करायचा असा निर्णय झाला...

एवढ्यात दोन मोघली सैनिक फरसबांधि च्या

मार्गावरून येताना दिसलें....

हर हर महादेव म्हणतं.. याचं मार्गांवर त्यांचा निप्पात केला गेला...

ही पुढच्या धोक्याची नांदी होती हे बाजींनी ओळखल...

बाजी राजांच्या पालखीबरोबर धावत धावतच बोलत होते 

"राजे दोन गनीम इथंच गारद केलेत... याचा अर्थ शत्रू जवळच आहे.. आपण तीनशे मावळे घेऊन विशाळगडावर कूच करावी. आम्ही तुमच्या मागून येतोच.. घोडखिंड जवळच आहे... तिथंच आम्ही थांबू...

घोडखिंडीचा मार्ग फारच निमुळता आहे. दोन्ही बाजूला उंच कडे आणि मध्येच घळ आहे. ही घळ पार केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. तीनशे मावळे सोबतीला घेऊन गनिमी काव्याने ही खिंड आम्ही लढवू..

भरपूर वाढलेली झाडी, दगडावर साचलेलं शेवाळ, धो धो कोसळणारा पाऊस, ओढ्याला वाहत पाणी आणि आजूबाजूला असणारा गुडघाभर चिखल या सगळ्यातून या विजापुरी सरदारी सैन्यास पुढे जाणं एवढं सोपं नाही.

गनीम हजारां च्या संख्येने असला तरी गनिमी काव्याने आम्ही त्याच्यावर तुटून पडू.

बाजीं मुसळधार पावसात सुद्धा जोशात बोलत होते. डोक्यावरच मुंडास कधीच पडल होतं. शेंडी लटपटत होती. झाडाझुपडूपातून वाट काढतांना अंगा खांद्यावर उटलेल्या ओरखड्यातून गोठलेले रक्त दिसत होतं. झुपकेदार मिशी विस्कटलेली होती. भिजलेल्या अंगरख्यातून पिळदार शरीर उठून दिसत होतं. कमरेचा काळ्या रंगाचा दुशेला ढिला पडला होता.

बाजींच हे रूप पाहून मात्र राजांना राहावलं नाही. राजांनी पालखी थांबविण्याची आज्ञा केली.

राजे पालखीतून उतरले.

बाजी जरा थांबावे. आम्हाला काही महत्वाची सल्ला मसलत करायची आहे.

पर राज.. गनीम दोन कोसावर आलाय.

बाजी वेळ म्हत्वाची आहे हे आम्हीही जाणतो आहोत. पण आपल्याशी, फुलाजी, हैबतराव बांदल, विठोजी काटे, संभाजी जाधव आणि सऱ्या मावळ्यांसोबत आम्हाला दोन घटका बोलायचं आहे.

पण राज. सल्लामसलत करुन वेळ दवडण्यात ह्यो अविचार आपणासाठी धोक्याचा ठरू शकतो. उरली सुरली वेळ लाखमोलाची आहे...

बाजी बोलत जरी असले तरी....

राजांची विनंती डावलू पण शकत न्हवते...

सर्व मावळ्यांना दिसेल अशा उंच शिळेवर शिवाजीराजे चढले....

माझ्या बांदल मावळ्यांनो.... काल रात्रीपासून या अंधाऱ्या आणि अनोळख्या काळोखात,, धो धो कोसळणाऱ्या पावसात, दऱ्या, खोऱ्यात, स्वतः च्या जीवाची पर्वा न करता धावत आहात... चार मसाहून अधिकचा काळ पन्हाळगडी पडलेला वेढा फोडून विशाळगडी पोहोचणं हे आपलं ध्येय होतं.. जे गाठण्यापर्यंत आपण समीप आलो आहोत.

पण रात्रभर तुम्ही सोसलेला त्रास आणि त्यातून सर्वांच्या चेहऱ्यावर आलेला ताण मी पाहतोय. गनिम जवळ आला आहे. त्यांच्या जवळ घोडे असणार.. त्यात अंधार नाहीसा होऊन दिवस उजाडलेला.. तो भराभर रस्ता कापणार..

तेंव्हा आपण सर्वजण पुढे दोन कोसावर असणाऱ्या गजापूरच्या घोडखिंडीत थांबू. स्वराज्य रक्षणासाठी घनघोर लढाई करू...

मी स्वतः या हिंदवी स्वराज्यासाठी लढाईचा पहिला वार करतो... असे बोलत बोलत राजांनी तळपती तलवारबाहेर काढली आता आता रणांगणाची वेळ आली आहे....

असं म्हणतं आपलं धाडसी रूप मावळ्यांना राजांनी दाखवलं होते...

हजारोंच्या संख्येने चाल करुन येणाऱ्या शत्रूसोबत दोन हात करायला स्वतः घडखिंडित उभे राहून हिंदवी स्वराज्यासाठी प्राण मुठीत घेऊन लढायला राजे तयार झाले...

पण राजांचा हा धाडसी अट्टाहास ऐकून बाजी अवाक झाले... चटकन पुढे येत बाजी म्हणाले...

राजे तुम्ही आमचं ऐकावे... प्रसंग बाका आहे... वेळ तर खूपच कमी आहे... असा अविचार करू नये... आम्ही जरी सहाशे असलो तरी कित्येकांना भारी आहोत...या स्वराज्याचे मावळे आहोत.. ज्या स्वराज्याचे आपण राजे आहात... आपण लढाई करण्याची गरज नाही.. " लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे ".

राजे आपण रायजी नायक बांदल यांच्या सह निम्मे मावळे सोबतीला घेऊन विशाळगडी प्रयाण करावे. राहिलेले बांदल घेऊन मी घोडखिंडीत हा उभा राहतो.

आता आपण यावर सल्लामसलत करू नये. आपण विशाळगडावर पोहोचल्यावर तोफेची इशारत द्यावी. तोफांचा इशारा होताक्षणी आम्ही घोडखिंड सोडून विशाळगड गाठू.

आम्ही मगाशी दोन मोघली सैन्य मारल ते सिद्धी मसूदचा निरोप घेऊन विशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या सूर्यराव सुर्व्यास आणि जसवंत दळव्यास देण्यास निघाले होते. तेंव्हा सावध रहावे. विशाळगडाचा पायथ्यासुद्धा सुरक्षित नाही हे ओळखून रहावे. आपलीच माणसं शत्रूशी हातमिळवणी करुन आपल्या जीवावर उठली आहेत.

आपलीच माणसं आपल्या स्वराज्याशी बेईनामी करत आहेत हे कानावर पडताच राजे क्रोधीत झाले.

आता मात्र कोणी पुढे बोलायला धजावत न्हवते.

बाजींनी विचारपूर्वक केलेली योजना धाडशी आणि तेवढीच कौतुकाची होती.... पण असं असलं तरी बाजी, फुलाजी आणि साऱ्या बांदलांना घोडखिंडीत सोडून जाणे, त्यांच्या मनाला पटणारे न्हवते...

पण.... राजे बोलत होते..

एवढ्यात पुन्हा बाजी राजांना मध्येच थांबवत बोलू लागले..

पण.. वगैरे काही नाही... राजे आपण निघावे. आपण राजे असला तरी मी आपल्याला वयानी ज्येष्ठ आहे.. वयाच्या ज्येष्ठते नुसार मी आपणांस करीत असलेली विनंती ही हवं तर आमचा आदेश समजा पण आता वेळ दवडू नका... आपण विशाळगडी आगेकूच करावी..

राजे निमूटपणे पालखीत बसले... गनीम पाठीवर आलाय.. म्हणजे आमचं रूप घेऊन सिद्धीला सामोरे गेलेल्या त्या मर्द मराठ्या शिवा काशीद चे काय झाले असेल...

हा विचार राजांच्या डोक्यात घोळू लागला...

इकडे बाजींना सोडून जाऊ वाटतं तर न्हवतं.. तब्बल साडेचार महिने चाळीस हजार मोघली सैन्याला घेऊन ऊन वाऱ्याची...थंडी पावसाची तमा न बाळगता वेढा घातलेला सिद्धी आपल्या मागावर येतो आहे... कित्येक हजारात घोडदळ घेऊन.. नंग्या समशेरी नाचवत येणार सैन्य घोडखिंडीत लढणार... बाजी मात्र फक्त तीनशे मावळ्यांना घेऊन छातीची ढाल करुन घोडखिंड उभे राहण्यास सज्ज झाले होते.. केवढं मोठं धाडस... बाजींकडे..

स्वराज्याचा स्वातंत्र्यसूर्य अस्ताला जाऊ नये म्हणून केवढा मोठा त्याग...

आणि समोर... समोर...

विशाळगडाच्या पायथ्याशी सूर्यराव सुर्वे आणि जसवंत दळवी सज्ज असणार...

विशाळगडी पोहोचण्यापूर्वी त्यांच्या सैन्याशी दोन हात करावे लागणार होते...

अशा विचारांच काहूर राजांच्या डोक्यात माजल असताना... पालखी उचलली गेली... आणि बाजींच्या आज्ञे प्रमाणं तीनशे मावळ्यांना घेऊन विशाळगडाच्या दिशेने चालू लागली...

______

दादा योजलेले सर्व काही आतापर्यंत व्यवस्थित पार पडले आहे. आता राजे तेवढे सुखरूप गडावर पोहोचले की ही मोहीमपण फत्ते झाली म्हणायची.... बाजी फुलाजींकडे पाहून बोलत होते...

फुलाजीप्रभू हे बाजींचे वडील बंधू होतं..

तरी सुद्धा रणनीती ठरविण्यात बाजी अधिकच वाक्बगार होते. त्यामुळे थोरले असले तरी फुलाजी सर्व जबाबदारी बाजींवर सोपवून आपण निर्धास्त असतं. भावा भावांचे एकमेकांवर खूप प्रेम होते.

राजांशी तर रक्ताच्या पलीकडचं त्यांच नातं होतं. अनेक मोहिमांचे ते साक्षीदार होते..

आता तीनशे मावळ्यांना घेऊन बाजी घोडखिंडीत उभे ठाकले होते. सर्वांनी थोडी विश्रांती घ्यावी म्हणून बाजींनी सुचवले... पण विश्रांती घेत असतानाच व्यूहरचनेकडे लक्ष द्यावे...

आता आपण शंभर, शंभर, शंभर अशा तीन तुकड्यांमध्ये विभागणार अहोत...

एक तुकडी माझ्या सोबत, दुसरी फुलाजींसोबत आणि तिसरी विठोजी काटे, संभाजी जाधव आणि हैबतराव बांदल यांच्या सोबत....

सगळ्यात पुढच्या तोंडाला मी उभा असेन...

सर्वांनी आपले इट, तलवारी, दानपट्ट, भाले, दुरटे हाताशी ठेवा.

शत्रू किती मोठा आहे. हे सर्वांनी पन्हाळगडावरून पाहिलेलं आहे. असं असलं तरी आपणाला गनिमी काव्याने लढायचंय.

या चिंचोळ्या मार्गातून गेल्या शिवाय त्याला पुढे जाता येणार नाही. म्हणून इथंच गाठायचं..

बाजी बोलत होते... एवढ्यात....

दिन... दिन... दिन अल्ला चा पुकारा कानी येऊ लागला...

सर्वजण सज्ज झाले...

शेजारच्या कड्या कपारित, झाडा झुडपात लपून राहिले..

मोठया शिळे आडून गनीम येताना दिसला..

आणि एकदम आरोळी गुंजली...

हर.. ss...हर. ss...महादेव

हर.. ss...हर. ss...महादेव

सपासप तलवारी चालू लागल्या...

समशेरी फिरू लागल्या..

भाले सुटू लागले...

दाण पट्टे घुमू लागले...

युद्ध सुरु जाहले...

एक एक गनीम मारला जाऊ लागला...

दुसरी तुकडी धावून आली...

सपासप मुंडकी कापली जातं होती..

तशी सैन्याची संख्या देखील वाढतच होती..

एक एक जण जसा गनिमाला संपवत होता... तसा स्वतः ही खाली कोसळत होता... कुणी जायबंदी झालेहोते... कुणाचा हात तर कुणाचा पाय... धडा वेगळा झाला होता... रक्ता मासांचा चिखल आणि ओढ्यातून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह रक्तानं वाहू लागला.

बाजी, फुलाजी दोन्ही हातात समशेर आणि दानपट्टा घेऊन वीज चमकावी तश्या चपळाईने गनिमांवर तुटून पडले होते....

एकाचवेळी आठ आठ गनिमांना ते भुई सपाट करत होते...

तेवढ्यात अणुकुचीदार भाला... एका हबशाने फुलाजींची नजर चुकवत पाठिमागून मारला तो आरपार टोकसकट पुढं आला....

याही अवस्थेत फुलाजी वळून गनिमांवर हल्ल्याचा प्रयत्न करणार... एवढ्यात दुसर्याने या निधड्या छातीवर समशेर चालवली... ती छाती चिरूनच थांबली...

हाता, पायावर, पोटावर, मानेवर दिसलं तिथं सपासप वार होतं होते...

अखेर फुलाजींना वीरमरण आले..

आजू बाजूच्या साऱ्या मावळ्यांच्या समोर घटना घडली तरी कुणी मागे हटलं नाही...

काही मावळ्यांनी आपल्या सरदारांच्या देहाची हेळसांड होऊ नये म्हणून त्यांचा देह बाजूला झुडपात नेऊन ठेवला आणि पुन्हा शत्रूला सामोरे गेले...

घडलेल्या घटनेची काहीच कल्पना नसणारे बाजी मात्र अधिकच त्वेशाने दानपट्टा फिरवत लढत होते.. चेहरा राकट झाला होता... शेंडीचे केस विस्कटून डोक्याच्या हालचालींरोबर सर्वत्र हिंदळत होते... डोळ्यात रणचंडिकेचं रक्त उतरलं होतं... मिशा विस्कटल्या होत्या..

दानपट्टया सारख अवघड वजनी हत्यार चालवून बाजीना थकवा आला होता... पण थांबणार तर ते बाजी कसले.. त्यांनी दानपट्टा ठेवला आणि दोन्ही हातात तलवारी घेऊन गनिमांवर तुटून पडले...

अंगावर अनेक ठिकाणी वार झाले होते.. रक्त वाहत होतं.. असह्य वेदना होतं होत्या..

दगडं फेकणारा पाऊस... आणि झोबणारा वारा...अडथळा आणत होता.. पण प्रयत्नांची शिकस्त सुरु होती... हार हा जणू शब्दच कधी बाजींना माहित न्हवता....

गनिमांशी झुंज देत बाजींच्या मनात अनेक विचार घोंघावत होते ...

त्या शिवा च काय झालं असलं...

राजे गडावर सुखरूप पोहिचले असतील का...

राजांवर काही प्रसंग तरी गुदरला नसेल ना... अजून तोफांची इशारत कशी झाली नाही.. राजांना दिलेलं वचन आपण पाळू शकू का...

काळीच धडाडु लागलं... अंगा खांद्यावर शत्रू सैन्यातील अनेकांनी अनेक घाव घातले होते... पण युद्धकलेत पारंगत असणाऱ्या पराक्रमी बाजींनी हे वार खोलवर होऊ दिले न्हवते हे कसब देखील या रणांगणावर त्यांनी तितक्याच कौशल्यानं हाताळलं होतं...

चढला दिवस उतरतीला आला...

जवळपास गेली दोन प्रहर म्हणजेच सहा तास.. ही घोडखिंड बाजीं आणि मूठभर मावळ्यांनी रोखून धरली होती... पण मागे कुणीच हटलं नाही...

या घनघोर रण भूमीवर एव्हाना सिद्धी मसूद सुद्धा फाजलखानासह पोहोचला होता...

हे युद्ध कौशल्य पाहून तो सुद्धा आश्चर्याने बाजींकडे पाहत होता...

_______

इकडे तीनशे मावळ्यांना सोबत घेऊन राजांची पालखी विशाळगडाच्या दिशेने चालत होती... पायथ्याला सूर्याजी सुर्वे आणि जसवंत दळव्याची माणसं आड येणार याचा वर्तमान हाती लागलं होतं...

त्यामुळे परिस्थितीचा अंदाज घेत घेत घनदाट जंगलातून पालखीची आगेकूच सुरु होती...

आपल्या पालखीत स्वराज्याचे धनी शिवाजी राजे आहेत याची कल्पना होती.

त्यामुळे कोणताही दगा फटका होऊन चालणार न्हवतं... हे या सह्याद्रीचे मावळे ओळखून होते..

आता घोडखिंड बरीच मागे पडली होती... विशाळगड समीप आला होता..

उंच टेकडी पार पडली आणि विशाळगडाच्या मुंढा दरवाजाची पुसटस दर्शन होऊ लागलं...

पण गड चढून जाण्या अगोदर युद्ध अटळ होते याची साऱ्यांनाच कप्लना होती..

वेळ प्रसंगी खूद्द राजे सुद्धा युद्धात उतरणार होते..

पालखीच अलवान दूर सारत राजे विशाळगडा कडे पाहत उदगारले....

जगदंब... जगदंब...

राजांच्या आज्ञेबरोबर पालखी थांबवली गेली... राजे मेण्यातून बाहेर आले...

यापुढे गड चढताना पालखी नेणं धोक्याचं आहे.. आता आपण पालखी इथेच सोडून देऊ..मीही तुमच्या सोबत चालतच येतो..

राजाज्ञे समोर कुणीही काहीही बोललं नाही.. राजांनी म्यान केलेली तलवार हातात घेतली.. मावळ्यांनी राजांभोवती सुरक्षेच कड केलं तस सारेजण झपाझप चालू लागले..

पायथ्या पासून आता फक्त अर्धा कोस दूर गड राहिला होता.. चारही दिशांना खंदक होते... पूर्वेकडील बाजूने मुंढा दरवाजा आता स्पष्ट दिसत होता...याचं वाटेवर सुर्वे, दळवी आणि उमरावांच्या छावण्या असणार याची कल्पना राजांना होती... पण अजून त्यांच्या पर्यंत सिद्धी जोहर चा निरोप मिळाला न्हवता. त्यामळे ते गाफिल असणारा असा राजांनी कयास बांधला...

मावळ्यांना राजे आदेश देत होते... शत्रूला जायबंदी करा... हत्यार ताब्यात घ्या....पण अत्यंत क्रूरपणे कुणाला ठार मारू नका... यातील बरचसे मावळे हे आपल्याच मुलखातील असतील..

राजे संकटात सुद्धा स्वकीयांची काळजी करत होते..

बोलता बोलता राजे थांबले... इशारा झाला. सारेजण गवतात लपले..

पुढे दोन काळ्या पठाणांची गस्त दिसली...

पण मावळ्यांसोबत राजे येतील आपणांवर तुटून पडतील... याची तसूभर ही त्यांना कल्पना न्हवती... ते गप्पा मारण्यात मश्गुल होते...

पण असे असले तरी प्रसंग बाका होता... पाठीमागे घोडखिंडीत सुरु असणाऱ्या युद्धाची कल्पना मावळ्यांना होती...

मावळ्यांनी दोन्ही पठाण्यांवर हल्ला केला आणि एका क्षणात पिंढरीपासून पाय वेगळे झाले... हिरव्यागार गवतात रक्ताच्या लाल चिळकांड्या उडाल्या..

तलवारीच्या पातीने तंबू फाडून मावळे आत शिरले पण कुणीच न्हवतं...

म्हणून गाफिल राहून चालणार न्हवते ..

राजांच्या भोंवती घेराव घालतच सगळे गडाच्या दिशेने धावू लागले.. रिकामा आणि विस्तीर्ण असा प्रदेश.. जरा सबुरीन घेण्याचा सल्ला राजांनी दिला..

इतक्यात एक हबशी सामने आला...

मराठा आया... मराठा आया...अशी आरोळी देत जवळच बेसावध असणाऱ्या इतर रखवालदाराना सावध करता झाला...

सैन्याला केवळ जायबंदी करण्याचा राजांचा आदेश होता... पण युद्धभूमीवर विरोधात उभा ठाकणारा हा शत्रूच असतो.. हे लढणाऱ्या मावळ्यांना ही चांगलंच ठाऊक होतं...

आणि सर्वात महत्वाची काळजी होती ती राजांची...

ते स्वतः या लढाईत उतरले होते...

राजांना गडावर सुखरूप पोहोचवणं हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर होतं..

दीडशे मावळ्यांनी राजांना घेराव घातला तर पुढच्या बाजूला दीडशे मावळ्यांनी रणकंदन सुरु केले..

हिरव्यागार गवताच्या पाती.. रक्त रंजित झाल्या.. अचानक गनिमांनी थेट राजांवरच हल्ला केला... तस शिवाजी राजांनी दानपट्टा चालू केला... दहा पंधरा गनीम क्षणात जमिनीवर कोसळले..

आई जगदंबे.. घोडखिंड सोडून आम्हास तीन प्रहर झाले... बाजी, फुलाजी आणि साऱ्या बांदल मावळ्यांच रक्षण कर... त्यांचे कान तोफेच्या इशारती कडे टवकारले असतील...

निम्मा गनीम कापला आणि स्वतः राजांचे युद्ध कौशल्य पाहून अर्धा गनीम घाबरून लपून बसला होता...

राजांभोवती पुन्हा सुरक्षेचं कड करण्यात आलं..

विशाळगडाचा वेढा फोडून राजे आणि मावळे शत्रूवर चाल करीत करीत होते.

विशाळगडावरून पायथ्याला सुरु असणार रणकंदन दिसत होते.

पण कोणताही ना निरोप..ना आज्ञा.. ना आदेश.. त्यामुळं किल्लेदार झुंझारराव पवार यांना काही नेमका अंदाज बांधता येईना...

तरीही या स्वराज्याच्या किल्लेदाराने आपल्या दोनशे मावळ्यांना हत्यारे घेऊन मुख्य दरवाजावर येण्याचा आदेश धाडला... 

सायंकाळचा प्रहर होता.. आणि..

अशा परिस्थिती मध्ये गड सोडणे धोक्याचे होते. हे ओळखून त्यांनी गडावरील मुख्य दरवाजा अडवून खडा पहारा देणे आणि वेळ पडलीच तर लढाई करणेचा निश्चय केला. मावळ्यांना सावध रहाण्याचा इशारा दिला..

सारे सज्ज झाले...

इतक्यात पलीकडच्या झुडुपातुन.. तीनशे हत्यारबंद मावळ्यांची फौज...

" हर हर महादेव " चा गलका करीत गडाच्या दरवाजापाशी दाखल झाली..

स्वराज्यकर्ते साक्षात शिवाजीराजे आपल्या तीनशे मावळ्यांसह गडावर दाखल झाले....

विस्कटलेला जिरेटोप... मळलेला अंगरखा... अंगा खांद्यांवर झेलेलेले तलवारीचे घाव... त्यामधून ओघळणार रक्त...

या साऱ्या खुणा होत्या राजांच्या विजयाच्या...

यशस्वी झालेल्या त्या मोहिमेच्या...

गेली चार महिने पन्हाळगडी वेढा दिलेल्या सिद्धी च्या हातावर तुरी देऊन राजे विशाळगडी सुखरूप पोहोचले होते..

राजे सामोरे येताच किल्लेदार झुंझाराव पवारांनी राजांना मुजरा केला.. आणि आपल्या हत्यारबंद मावळ्यांना तलवारी म्यान करायला सांगून राजांना मुजरा करण्याचा आदेश फर्मावला.. तसा साऱ्या गडकर्यांनी राजांना मुजरा केला...

राज आल्याचं पाहून सारा गड आनंदि झाला... पण त्यांना घोडखिंडीत घडतं असणाऱ्या युद्धाची कल्पना न्हवती...

आनंदापेक्षा राजांना बाजी, फुलाजी आणि बांदल मावळ्यांची काळजी होती... सार कथानक सांगायची ती ही वेळ न्हवती...

तर वेळ होती तोफेच्या इशाऱ्याची....

झुंझारराव.. क्षणाचाही विलंब न करता मुंढा दरवाजाच्या तोफेला बत्ती द्या...

राजांची अचानक तोफेच्या बत्ती ची आज्ञा ऐकून झुंझारराव गडबडले काय चाललंय कळायला मार्ग न्हवता...

झुंझारराव आमच्या जीवाचं बाजी, फुलाजी तिकडे घोडखिंडीत गनिमाशी लढतातय...

तोफेची इशारत म्हणजे आम्ही गडावर सुखरूप पोहोचल्याचा पोहोचल्याचा सांगावा आहे...

तुम्ही तोफेला बत्ती द्या...

दुसऱ्यांदा आदेश मिळताच राजांचा गनिमी कावा किल्लेदारांच्या लक्षात आला...

मुंढा दरवाजावर तोफ सज्ज झाली...

तोफेला बत्ती दिली गेली...

धडाम.. sss.. तोफ कडाडली.. बुरुजसुद्धा हादरला.. जंगलातील पक्षांचा किलकिलाट.. वांडरांचा चित्कार सुरु झाला..

राजे काळोखलेल्या आकाशाकडे पाहत म्हणाले....

जगदंब... जगदंब.... जगदंब

तोफेची पहिली इशारत बाजींच्या कानावर पडली..

तोवर सिद्धी मसूदने आपला बंदूकधारी बोलावला... टोपीकर इंग्रजांनी दिलेली बंदूक वापरण्याची हिच ती वेळ होती.. हे सिद्धी मसूद ने ओळखले..

दोन अडीच प्रहर झाले तरी युद्ध काही थांबले न्हवते... बाजींचा धिप्पाड देह.. ओलांडून कुणालाही पुढे जाऊ देत न्हवता...

आणि ठो.... आवाज झाला.. खिंडीच्या वर उभे असणाऱ्या मसूदच्या बंदूकधाऱ्याची गोळी बाजींच्या वर्मी लागली...

बाजींचा धिप्पाड देह दोन फूट मागे फेकला गेला... अशा अवस्थेतच इतर मावळ्यांनी त्यांना उचलून फुलाजींच्या देहाजवळ नेले...

हे काय फुलाजीदादा... अरे तू माझ्या पेक्षा मोठा तू कसा धारातीर्थी पडलास.. तुहे हे वीरमरण मी वाया जाऊ देणार नाही... असे म्हणंत म्हणतं बाजी पुन्हा एकदा तलवार हाती घेऊन गनिमांवर हल्ला करण्यासाठी उठण्याचा प्रयत्न करीत होते...

एवढ्यात तोफेची दुसरी... तिसरी.. चौथी.. इशारत झाली...

याचा अर्थ शिवाजीराजे विशाळगडी सुखरूप पाहोचले होते..

रक्ताच्या थारोळ्यात पडलेले बाजी...

मावळ्यांना सांगत होते.. तोफेची इशारत झाली म्हणजे आपली मोहीम फत्ते झाली.. आपली लढाई कामास आली.. आता डोळ्यातील पाणी सोडा.. अजूनही कुणी गनीम वाटत आडवा आला तर तेला कापा... विशाळगडी तुम्ही ही जा आणि राजांना आमचा मुजरा सांगा...

आम्ही आमची जबाबदारी पार पाडली..

राजे प्राण सोडला.. पण खिंड सोडली नाही..

की खिंडीतून पुढे गनीम सोडला नाही...

हात जोडत..जोडत.. बाजींनी अखेरचा श्वास घेतला...

आता ही घोडखिंड...अखेर पावन झाली होती.

मावळ्यांनी बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू यांचे देह शेजारच्या जंगलात उचलून नेले...

त्यांचे सरदार असणाऱ्या बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू या दोघांनी रणभूमीवर देह ठेवला होता... या वीरदेहाची गनिमांकडून विटंबना होऊ नये म्हणून ते वीरदेह विशाळगडावर नेण्याच्या तयारीत होते...

इकडे सूर्यास्ता नंतर गडाचे दरवाजे बंद करण्याचा स्वराज्याच्या शिवशाहीचा शिरस्ता बाजूला सारून खूद्द राजांनी गडाच्या पायथ्याशी पन्नास मावळ्यांच्या चार तुकड्या पाठवून दिल्या..

जायबंदी झालेल्या साऱ्या मावळ्यांना तर आणाच पण मृत्यमुखी पडलेल्यानाही गडावर घेऊन येण्याची हुकुमाज्ञा झाली...

पुष्कळ जखमी मावळे गडावर येत होते... राजे स्वतः मुख्य दरवाजात उभे राहून साऱ्यांची आपुलकीने चौकशी करीत होते...

पण अद्याप बाजी...फुलाजी कुठे दिसत न्हवते आणि कुणी माहितीही देत न्हवते...

अस्वस्थता वाढली.. झुंझारराव बाजी... फुलाजी आमच्या पहिल्या तुकडीतील सरदार.. कदाचित त्यांना काही जास्त जखमा झाल्या असतील... इथे तूप आणून ठेवा...

आम्ही स्वतः त्यांच्या जखमांवर उपचार करू..

सह्याद्रीचा सिंह बाजी, फुलाजींना भेटण्यास आतुर झाला होता.. घडला पराक्रम ऐकण्यासाठी त्यांचे कान आसुसले होते...

दूरवर नजर टाकून राजे पालखीची वाट पाहत होते...

10 वाजले होते.. रात्रीचा पहिला प्रहर सुरु झाला...

दूरवरून येणाऱ्या मशालीं सोबत पालखी दिसू लागली... पण तीचा वेग कमी होता.. कदाचित मावळे दमले असतील.. पायात त्राण उरले नसेल..

पालखी जवळ येईल तशी राजांची अस्वस्थता वाढत होती... अखेर पालखी जवळ आली... निरव स्मशानशांतता.. कुणीही बोलावयास धजत न्हवतं..राजांच्या मनात पाल चुकचुकली.. खूद्द राजांनी पालखीच अलवान बाजूला सारलं..

आणि काळजात धस्स झालं...

श्वास रोखला गेला..

पालखीत रक्तानं न्हालेले बाजी आणि फुलाजी दोघे सख्खे भाऊ एकमेकांच्या मिठीत चिरनिद्रा घेत होते...

त्यांनी स्वराज्याच्या या पोशिंद्यासाठी वीरमरण पत्करले होते..

राजांचा उर भरून आला... साऱ्या मावळ्यांचा कंठ दाटून आला... अश्रुंचे बांध वाहू लागले... सारा विशाळगड हुंदक्यांनी गदगदून गेला...

क्रोधीत झालेल्या राजांनी बाजी, फुलाजी आणि वीरमरण आलेल्या बांदल मावळ्यांवर अंत्यसंस्काराची तजबीज करण्याचा आदेश फर्मावला गेला...

तशी पाताळदरीत चिता रचण्याची लगबग सुरु झाली...

राजांनी थंड पाण्यानी स्नान केले...

भगवी वस्त्रे परिधान केली.. कंठी रुद्राक्ष माळा चढविल्या.. भाळी शिवगंध लावले दोन्ही बाजुंवर भस्म लावून राजे अग्निसंस्कारास तयार झाले...

चिरनिद्रा घेणाऱ्या सर्व वीरांचे देह चितेवर ठेवले होते.. मंत्रपठण करण्यात आले..

रायजी नाईक बांदलांनी.. चितेला मंत्राग्नी दिला...

राजे झुंझाररावांना म्हणाले...

गजापूरची घोडखिंड या साऱ्या बांदल मावळ्यांच्या रक्ताने न्हाऊन निघाली..

शिवा, बाजी आणि फुलाजींच्या धाडसी बाण्यानेच आम्ही आजचा दिवस पाहतो आहोत.

शूर, वीर, धाडसी, पराक्रमी, प्रसंगावधानी मावळ्यांमुळेच आम्ही बंधनमूक्त झालो.

स्वतः च्या रक्तामांसाचा चिखल होऊन सुद्धा स्वराज्याशी प्रामाणिक राहणाऱ्या या बाजी, फुलाजी आणि वीरमरण आलेल्या बांदल मावळ्यांच्या पराक्रमाने गजापूरची घोडखिंड खऱ्या अर्थाने पावन झाली. म्हणून आजपासून यापुढे ती गजापूर खिंड न म्हणता....

" पावनखिंड " या नावाने ओळखली जाईल....

जेंव्हा जेंव्हा आमच्या पन्हाळगडाहून विशाळगडाकडे सुटकेचा विषय निघेल तेंव्हा तेंव्हा या पावनखिंडीचा इतिहास आठवल्याशिवाय ही मोहीम पूर्ण होणारच नाही...याची आम्हाला खात्री आहे...


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller