लोक कथा
लोक कथा


गेल्या ऑक्टोबर महिन्यात अचानक गोव्याला जाणं झालं. मी मंगेशी देवस्थानातच राहायचे ठरवले कारण बरोबर दोन मैत्रिणी ही होत्या.
तो दिवस होता १० ऑक्टोबर आणि त्या दिवशी मुळकेश्वराचा वर्धापन दिन होता. धुळ भेट घेताना भटजींनी वर्धापन दिनाबद्दल सांगीतले आणि आग्रहाने दुपारी महानैवेद्याला हजर राहायला सांगीतले. अनायसे वर्धापन दिन सोहळा पहायला मिळतोय म्हणून मी ही जवळपासच्या बाकीच्या देवळांना भेटी देऊन आरतीला मंगेशीला आले.
सकाळपासून बरेच देव कार्य चालले होते. देवळात गर्दी ही होती. ती नेहमीच असते म्हणा, पण आज बाहेरच्या लोकांना थांबवलं होतं. दुपारची मंगेशाची आरती चालू होती. आतली आरती संपल्यावर भटजी बाहेर आले व त्यांनी मंडपातल्या देवाच्या उजव्या बाजूला असलेल्या मोठ्या खांबाची ही आरती केली. मी तिथून जवळच बसले होते. तेथे देव देवक बसवलंयं का म्हणून इकडून तिकडून वाकुन बघितले पण काहीच दिसले नाही. नुसता खांबा सारखा खांब होता. मला नवल वाटलं कारण एवढी वर्ष मंगेशीला गेलेय पण आज प्रथमच हे बघितले होते. वाटले मुळकेश्वराचे काही असेल पण इथली आरती संपल्यावर सगळेजण मुळकेश्वराच्या मंदिरात गेले. तिथे प्रसाद (महानैवैद्य), आरती, गाऱ्हाणे वगैरे करुन पुन्हा देवळात येऊन देवालयाचे सारे अधिकारी व भटजींनी इथे ही बराच वेळ गाऱ्हाणे घालून सर्वांच्या डोक्यावर पाणी शिंपडले. मला ही धन्य धन्य झाले. कारण बऱ्याच कालावधी नंतर मी असा सोहळा पाहत होते.
दुपारचा महाप्रसाद तर अप्रतिम होता. तीन चार प्रकारचे मिष्ठान्न, पुरणपोळी, गोड नारळाचा रस, साखर भात, खीर, पारंपारिक पदार्थांपैकी खतखते, मुगागाठी, उडदमेथी, तसेच भजी, पुरी वगैरे अनेक प्रकार होते. माझ्या मैत्रिणी जाम खूश झाल्या. गोव्याला एवढा असा प्रसाद! त्या थक्कच झाल्या.
संध्याकाळी मला भेटायला माझे वर्ग बंधू भगिनी माझ्याकडे आल्या होत्या. गप्पा गोष्टी खाणं वगैरे झाल्यावर ती जायला निघाली तेव्हा आम्ही सगळे मंगेशाच्या दर्शनाला देवळात गेलो. माझा वर्ग मित्र रंजन कोरडे मंगेशीलाच बॅंकेत मेनेजर होता, म्हणून त्याच्या ओळखीचे बरेच जण भेटले त्याला. देवळात ही तो भटजी श्री महेश करंडे ह्यांच्याशी बोलत होता. दुपारपासून एक प्रश्न मला सतावत होता तो मी श्री करंडेंना विचारला. "दुपारी देवाच्या आरती नंतर ह्या खांबाला आरती का केली हो?" भटजी करंडेंनी सांगीतलेली गोष्ट तुम्हा कोणाला माहीत आहे का पहा.
पुर्वी म्हणे "नायक स्वामी" नावाचा एक माणूस महादेवाचा परम भक्त होता. त्याची खूप इच्छा होती की एकदा तरी काशी विश्वेश्वराचे दर्शन करावे. तो साधा गरीब माणूस होता आणि त्या करता तो पैशांची व्यवस्था ही करत होता. नियमित तो त्या खांबाला टेकुन बसायचा आणि विश्वेश्वराचे नामस्मरण करायचा. मनात इच्छा आकांक्षा फक्त काशी विश्वेश्वराला जायची. एक दिवस त्या बसल्या ठिकाणी त्यांना काशी विश्वेश्वराचे दर्शन घडले. त्यांना साक्षात्कार झाल्यासारखे झाले. त्यांच्यासाठी श्री मंगेश हाच प्रत्यक्ष काशी विश्वेश्वर असा विश्वास बसला. त्या नंतर नायक स्वामींनी त्याबद्दल काव्य खंड ही लिहिला होता म्हणे.
तेव्हा पासून त्या खांबाला नायक स्वामी स्मरून आरती केली जाते. भटजी म्हणाले ही दंतकथा असावी. विश्वास हवा तर ठेवा नाही तर नका ठेऊ. त्यावर मी म्हटले, "श्री मंगेशाला आम्ही मानतो. तुम्ही पुजा आरती करता, आम्ही ही अभिषेक घालतो. तुम्ही खांबाला आरती करता, मग मी ही विश्वास ठेऊन आजपासून नायक स्वामींना वंदन करीन" असे म्हणून आम्ही सगळ्यांनी त्या खांबाला, म्हणजेच नायक स्वामींना नमस्कार केला.