Bharati Sawant

Others Drama

3.5  

Bharati Sawant

Others Drama

लग्नाचा वाढदिवस ( रोमँटिक कथा)

लग्नाचा वाढदिवस ( रोमँटिक कथा)

7 mins
1.3K



      "अगं कुसुम आज आपल्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस. काय काय करूया दिवसभर?" पंचाहत्तर वर्षांचे रघुनाथराव आपल्या सत्तर वर्षांच्या सौभाग्यवतीच्या सकाळपासून असे मागे लागले होते, जसे की लग्नाचा पहिलाच वाढदिवस आहे. कुसूमताई सुना,मुले नि नातवंडांच्या समोर लाजून चुर झाल्या होत्या. असेच होते रघुनाथराव! पहिल्यापासून सगळ्यांची मने जपणारे, मन कवडेच जणू. त्यांची आई साठ वर्षांची झाल्यावर तिचे मनच वाचले आणि तिला साऱ्या तीर्थक्षेत्रांची यात्रा करून आणली. तिने गेल्याच वर्षी शांतचित्ताने आपले प्राण सोडले. तिच्या हयातीत कधी तिला' मागे सर' असेही बोलले नव्हते. वडिलांच्या माघारी आईने काबाडकष्ट करून शिकवण्याचे मातृऋण मनात ठेवून त्यांनी आईला कधीच दुखवले नाही. लग्न झाल्यानंतर आई आणि पत्नी यांच्यात सुवर्णमध्य साधून, दोघींच्या मनाचा विचार करत दोघींनाही खूष ठेवले. त्यामुळे सासू-सुनेच्या नात्याचे आई मुलीच्या नात्यात कधी नि कसे रूपांतर झाले कुणालाच लक्षात आले नाही. आईला मंडळाच्या बायकांसोबत कुठेही, कधीही जाता येत असे. त्यांनी कधीच बंधन घातले नाही. स्वतः देखील सुट्टीत आईला सगळीकडून फिरवून आणत. पत्नीसोबत चित्रपट नाटकांना जात. आईला स्वयंपाकाचा त्रास नको म्हणून पत्नीला ते स्वतः सर्व कामात मदत करत त्यामुळे तक्रारीला कधीच जागा राहिली नाही.

       रघुनाथराव बँकेत उच्च पदावर अधिकारी होते. पगार पाच आकडी. त्यामुळे पैशाची ददात नव्हती. मुलेही चांगल्या शाळा-कॉलेजात शिकून मोठी झाली. मोठा निलेश कॉम्प्युटर इंजिनियर नि छोटा शैलेश इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर .छोट्याने एमबीए पदवी घेऊन कंपनीत उच्च पदावर स्थान मिळवले. निलेश ही कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होता. रघुनाथरावांची फार इच्छा होती की सगळे कुटुंबीय एकाच छताखाली नांदावे त्यामुळे मुले शिकत असतानाच चांगला पाच खोल्यांचा मोठा बंगला खरेदी केला होता. चार वर्षांपूर्वी निलेशचे मोठ्या थाटामाटात लग्न करून अन्नपूर्णा जणू घरात आणली. सून समीक्षा सर्वगुणसंपन्न नि स्वयंपाकात सुगरण रघुनाथरावांना तिच्या पाककलेचे फार कौतुक होते. तिच्या सार्‍या पदार्थांची ते तोंड भरून स्तुती करत. त्यामुळे समीक्षाला ही मूठभर मांस चढल्याचे समाधान मिळत असे.ती रघुनाथराव नि कुसुमताईंच्या तब्येतीचीही खूप काळजी घेई. दोन मुले( एक मुलगा नि एक मुलगी ) झाल्यावर आजी-आजोबांना स्वर्ग हाती होती आल्याप्रमाणे भासत होते. ते दोघेही सतत नातवंडांच्या अवतीभवतीच असत. त्यामुळे समीक्षा नि निलेशही खुश होते. दोन वर्षापूर्वी शैलेशचे लग्न झाले नि एकुलती एक सोनाली सोनियाच्या पावलांनी उंबरठ्याचे माप ओलांडून प्रवेशली. सोनालीने इंजिनियरींग करून एमबीए पण केले होते. दोघेही कमावती असल्याने रघुनाथरावांनी घरात समीक्षाच्या हाताखाली दिवसभरासाठी एक मोलकरीण ठेवली. समीक्षा निरनिराळे पक्वान्न मात्र स्वतःच्या हाताने करून घरच्या सर्वांना खाऊ घालत होती. त्यातून तिला आनंदही मिळत होता. छोटी सोनालीही तिला जमेल तशी मदत करत होती. त्यामुळे भांडण किंवा कुरबुरीला घरात काही वावच नसे. रघुनाथराव जातीने घरातील सर्वांना हवे-नको पहात असत. 

          कुसुम ताईंनी मात्र घरातील कामातून जरा काढता पाय घेतला होता. त्या म्हणत, "आयुष्यभर घरासाठी राबले आता सुखाचे दिवस सुरळीत जावेत म्हणून स्वतःसाठी जगतेय". पण नातवंडांकडे मात्र खूप लक्ष देत. त्यांचे खाणेपिणे, अभ्यास यावर त्यांची करडी नजर असे .गेल्यावर्षी सोनालीला मुलगी झाली.ती अजून खूप लहान होती, त्यामुळे सोनालीने नोकरीतून रजाही घेतली होती. ती आणि कुसुमताई बाळाकडे खूप लक्ष देत. त्या तिला जास्त काम करू देत नव्हत्या. त्या म्हणत, "सोनाली, तू नोकरीवाली बाई ,रजा संपली की तुला ड्युटीवर हजर राहावे लागेल. स्वतःच्या बाळाला आईची ओढ असते. तू ऑफिसला गेल्यावर आम्ही तुझ्या बाळाला छान सांभाळूच पण तू घरी आहेस तोवर बाळाला आईचे पुरेपूर प्रेम मिळायला हवे, बाळाला आईचा जास्तीत जास्त सहवास हवा. काम करायला मोलकरीण आहे. त्यामुळे तू बाळा- सोबतच जास्त वेळ राहत जा". कुसुमताईंच्या अशा प्रेमळ सल्ल्याने सोनाली भारावून गेली नि म्हणाली, "आई तुम्ही म्हणाल तसे" म्हणुन ती बाळाच्या जास्तीत जास्त सहवासात राहू लागली. पण आज आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस. सण सोहळ्या प्रमाणेच वातावरण होते .रघुनाथरावांच्या हौसेला तरी उधाण आले होते.

       सकाळीच केक कापून त्यांनी सर्वांकडून वाढदिवसाचे अभिष्टचिंतन स्वीकारले होते. मुले, सुना आणि नातवंडे निखळ प्रेमाने त्यांचे कोडकौतुक करत होती. बाबांना आनंद व्हावा असे वागत होती. कुसुमताई तरी त्यांच्याच जवळ बसून होत्या. उठून गेलो तर न जाणे त्यांच्या जीवाला वाईट वाटेल. त्यांच्या आनंदावर विरजण नको. सुना ही सकाळच्या जेवणाच्या जय्यत तयारीला लागल्या होत्या. काय काय पदार्थ बनवायचे याची यादी कालच तयार होती. मोलकरीणकाकू पहाटेला उजाडण्यापूर्वीच आल्या होत्या. पदर बांधून त्या कामालाही लागल्या होत्या. रघुनाथराव त्यांच्याशीही वडिलांप्रमाणेच वागत. त्याही आपल्या घरातील एक सदस्य आहेत त्यामुळे त्यांना मोलकरीण म्हणून वागणूक न मिळता घरातील सदस्य म्हणूनच मान मिळावा याची पुरेपूर काळजी घेत. असे हे रघुनाथराव सर्वगुणसंपन्न ,मूर्तिमंत देवाचाच जणू अंश होते. घरातील सर्व जणांवर त्यांचे अतिशय प्रेम होते आणि त्यांच्यावर ही साऱ्यांची खूप माया होती. आपणास मुलगी नाही त्यामुळे घरात प्रवेशलेल्या सुना या आपल्या मुलीच आहेत अशी त्यांची वागणूक असे. त्याही त्यांचा शब्द पडू देत नसत.बाबांना कोणत्या वेळी काय हवे असते हे दोन्ही सुनांना जणू पाठच होते. त्यामुळे वेळच्या वेळी नाश्ता जेवण नि चहा देण्यासाठी दोन्ही मुली झटत असत.

       कुसुमताई ही दोघींवर आईची माया करत परंतु त्या जास्त वेळ नातवंडांच्या सहवासातच राहत. त्या चमचमीत पदार्थ मुद्दाम टाळत अगदी त्यांना आवडणारे गोड पदार्थ ही त्या खात नसत. त्यांच्या अशा या स्वभावामुळे मुलीही त्यांना जास्त आग्रह करत नसत. परंतु त्या मात्र मुलींना म्हणत, "अगं तुम्ही खात जा मनसोक्त. हे तुमचे खाण्याचे वय आहे .माझी तुमच्या वयाशी तुलना करू नका. या वयात कमी खाणे माझ्या आरोग्यासाठी योग्य आहे .उद्या मला काय झाले तर तुम्हाला धावपळ करावी लागेल त्यापेक्षा मापात खाल्लेले मला , माझ्या वयाला नि तब्येतीला नीट पचेल". अशा बोलण्याने मुली त्यांना माफकच आग्रह करत. तरीही सोनालीला माहीत होते , आईना गोडाची खूप आवड आहे म्हणून बाहेर गेली की त्यांच्या आवडीची मिठाई मुद्दाम घेऊन यायची. मग कुसुमताई तिचे मन मोडत नसत. दोन घास खाऊन घेत. असे हसतेखेळते घर-परिवार जणू दृष्ट लागण्यासारखा होता. त्याला जबाबदार केवळ रघुनाथरावांचा मोकळा स्वभाव. त्यांनी कोणाला कधीच कशाचीही आडकाठी केली नाही त्यामुळे घरात एकमेकाला मानसन्मानाने वागवले जाई. ज्येष्ठांना योग्य तेव्हा सल्ला विचारला जाई. आईला हॉटेलचे जेवण आवडत नसे तर फॅमिलीसोबत हॉटेलला जाताना ते स्वत: आईच्या आवडीचा पदार्थ बनवून ठेवत. त्यामुळे आई खुश नि हॉटेलला जायला मिळते म्हणून पत्नी-मुले ही खुश. फार थोड्या लोकांना असे करायला जमते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे रघुनाथराव. आता सत्तरी ओलांडली तरी त्यांच्यातील रोमँटिकपणा कमी झाला नव्हता .

           लग्नाच्या दर वाढदिवसाला पूर्ण दिवस ते पत्नीसोबत राहात. मग ते सिनेमा, हॉटेल, चौपाटी किंवा नाटकाला जात. पत्नीला सुंदरशी साडी खरेदी करत. अगदी नवविवाहितांप्रमाणे हातात हात घालून चालत. पत्नीच्या चंदेरी केसात मोगर्‍याचा गजरा स्वतः माळत. पत्नी बोलायचीही "काय हा चहाटळपणा! काय म्हणतील मुले सुना आणि नातवंडे? वयाचा अंदाज तरी आहे की नाही?" परंतु रघुनाथराव सर्वांना हाका मारून जवळ बोलवायचे नि मोठ्या आवाजात म्हणायचे," काय रे, मी जे काही करतो ते चूक की बरोबर ?मुले सुना आणि नातवंडे ही पढवल्यासारखी एकाच सुरात बोलायची " एकदम बरोबर बाबा. तुम्ही आमच्यासाठी आदर्श आहात, नि आदर्शच राहणार". सुना नेहमी म्हणायच्या, "आई, तुम्ही किती नशीबवान आहात! बाबांसारखे जीवनसाथी मिळाले तुम्हाला. कोणत्या जन्माची तुमची पुण्याई आहे? आमच्या तरुण नवऱ्यांच्यातही इतका रोमँटिकपणा नाही. त्यांना तसे वागायला जमतही नाही ते बाबा ह्या वयात करून दाखवतात". "यु आर लकी आई". कुसुमताईंना मग अजूनच लाजल्यासारखे होई. आपल्या तरुण मुलां- सुनांनाही जमत नाही नि आपले यजमान त्यांच्या देखत एवढे रोमँटिक वागतात. आतून त्यांनाही कुठेतरी बरे वाटायचे पण वयानुरुप त्यांना लाजिरवाणेही वाटायचे.सुनांनी प्रशंसा केली की त्या गोड लाजून मान वळवायच्या. आजच्या वाढदिवशी त्या खुश होत्या. आज त्यांच्या लग्नाला पन्नास वर्षे झाली होती. खेळकर वातावरण तसेच स्वच्छंदी स्वभावामुळे दोघेही अगदी आरोग्यदायी होते. कोणतेही रोगविकार त्यांच्या आजुबाजूला फिरकलेही नव्हते. पथ्यपाणी पाळुन त्यांनी पहिल्यापासून तब्येतीची काळजी घेतल्याने दोघेही तंदुरूस्त होते. आता मात्र रघुनाथराव खूपच रंगाला आले. त्यांनी साऱ्यांना हाका मारून जवळ बोलवले. सुन नि मुलांना आज रजा काढायला सांगितले. नातवंडांना शाळेला दांडी मारायला सांगितले. इतरांना कळत नव्हते बाबांच्या मनात आहे तरी काय? पण तरीही सर्वांनी मोबाईलवरून ऑफिसला रजेविषयी कळवून टाकले. आता बाबा अजूनच खुश झाले. त्यांनी निलेशला मोठी गाडी काढायला सांगितले.

         आज मुलांनीही ठरवले बाबा जे काय सांगतील ते निमूटपणे काहीच प्रश्न न करता ऐकायचे. सर्व छान तयार झाले कुसुमताईंना आज त्यांनी लग्नातला जरतारी मोती भरलेला शालू नेसायला सांगितले. त्यांनी ही शेरवानी घातली. सगळेजण गाडीत बसले आता मात्र निलेशने विचारले, "बाबा, गाडी स्टार्ट करू का? कुठे जायचे आहे सांगाल का?" बाबा गालात हसत म्हणाले गाडी चालू कर मी गुगल मॅप पाहून तुला मार्गदर्शन करतो. कपाळावर प्रश्नचिन्ह घेऊन निलेश ड्रायव्हिंग सीटवर बसला. बाबा त्याच्याशेजारी नि बाकीचे सारे मागच्या सीटवर. गाडी पळू लागली. बाबा मजेत गप्पा मारत होते.कर्जत ओलांडताच निलेशला वाटत होते आपण यंत्रवत गाडी चालवतोय. आता बाबा काचेतून बाहेर पहात बोलले," निलेश, समोर पहा,तो बंगला दिसतोय ना तिथे गाडी थांबव. निलेशने पाच मिनिटात गाडी एका आलिशान बंगल्यासमोर उभी केली नि विचारले, "बाबा कुणाचा आहे हा बंगला? आपण काय करायचे आहे"? बाबांनी डोळे मिचकावले नि बंगल्याची बेल दाबली. आतून एक वयस्कर माणूस "आलो आलो "ओरडत आला .त्याने बंगल्याचे दार उघडले. नवीन फर्निचर, सुंदर बंगला पाहून मुले, सुना, नातवंडे नि कुसूमताईंचे डोळेच विस्फारले. कुसुमताई बोलल्या, "अहो ,आता तरी सांगाल का काय गौडबंगाल आहे? कोणाचा हा बंगला ?हे काका कोण ज्यांनी बंगला इतका सुंदर सजवलाय? तशी रघुनाथरावांनी पत्नीचे डोळे झाकत त्यांना बाहेर घेऊन गेले. गेटवर ठळक अक्षरात लिहिले होते 'श्रमसाफल्य'.खाली नाव होते 'सौ कुसुम रघुनाथराव पाटील'आता मात्र सगळ्यांचे डोळे विस्फारून बुब्बुळेडोळ्यातून बाहेर पडतील की काय अशी सार्‍यांची अवस्था झाली. बाबा सर्वांना बैठकीच्या रूममध्ये घेऊन गेले नि बोलले, "अरे हा आपलाच बंगला आहे .माझी एक दूरची मावशी होती तिला जवळचे कोणीच नव्हते त्यामुळे तिने आपली सर्व इस्टेट माझ्या नावावर केली. ती गडगंज श्रीमंत होती. नि या बंगल्यात राहत होती. कामाच्या व्यस्ततेमुळे आपणाला कधी तिच्याकडे येता आले नाही, पण तिने वारस म्हणून माझे नाव लावले त्यात सर्व काही माझ्याच नावावर केले. सहा महिन्यांपूर्वीच ती वारली. एके दिवशी वकिलांनी मला फोन करून बोलावले आणि सर्व हकिगत सांगितली. मावशीची काळजी घेणारे हे रामुकाका मावशीवर मुलाप्रमाणे प्रेम करत. त्यांनी बंगल्याचे नूतनीकरण केले आणि मी मुद्दाम आमच्या लग्नाचा वाढदिवसाला तुम्हाला इथे घेऊन यायचे ठरवले. आता सगळा बंगला व्यवस्थित पाहून घ्या. विस्मित झालेले सर्वजण बंगला पाहू लागले. बेडरुम तरी अशी सजवली होती की आजच लग्न होऊन नवे जोडपे मधुचंद्र साजरा करणार होते.जेवणे वगैरे आटोपताच बाबांनी सर्वांना झोपण्याची सुचेना केली नि डोळे मिचकावीत कुसुमताईंचा हात पकडला.नि ओढतच त्यांना फुलांनी सजविलेल्या बेडरूमकडे घेवून गेले.मोठ्या आवाजात सर्वांना गुड नाईट करत बेडरुमचे दार लावुन घेतले.



Rate this content
Log in