Abhijeet Tekade

Drama Others

4  

Abhijeet Tekade

Drama Others

कुरूप (भाग ८) -नवी सुरुवात, नवी नाती

कुरूप (भाग ८) -नवी सुरुवात, नवी नाती

10 mins
345


तसे आयुष्य नेहमीच आपल्याला नवीन सुरुवात करण्याची संधी देत असते. आणि प्रत्येक व्यक्तीला सतत काहीतरी बदल अपेक्षित असतो. काहीतरी नावीन्याच्या शोधात तो असतो. नावीन्य हे नात्या-संबंधामध्ये, कामामध्ये, तर कधी स्वतःमध्ये अपेक्षित असतो. आणि मनुष्य या अपेक्षापूर्तीसाठी, प्रत्येक वेळेला नवीन सुरवात करतो; कधी तो यशस्वी होतो, तर कधी अयशस्वी. पण प्रयत्न सतत सुरूच असतात. लावण्यालाही अशीच एक संधी रिद्धीच्या माध्यमातून मिळाली होती. रिद्धी लावण्याला कँटीग मध्ये घेऊन तर आली होती; पण लावण्या आत जाताच थोडी अस्वस्थ झाली. जाऊन दोघी एका टेबलावर बसल्या. रिद्धीने चहा मागवला. 

 “रिद्धी तू म्हटले म्हणून मी आले; पण मला खरंच इथे गुदमरायला होते. मला माहिती आहे, मी थोडी जास्तच विचार करते; पण मला हे जमेल का?”, लावण्या म्हणाली. 

“अगं सोपं आहे! आपण मैत्रीचा हात पुढे करायचा, समोरचा ती स्वीकारणार का नाही, ते त्यांच्यावर सोपवून द्यायचे. जास्तीत जास्त काय, ती व्यक्ती नकार देईल. नाकारात्मतेलाही धाडसाने सामोरे जायला हवे. आणि त्यात तुझा तू अहंकार, अभिमान, मध्ये घालू नको म्हणजे झाले. 


तुला कमीत कमी हे समाधान राहील, की तू तुझा प्रामाणिक प्रयत्न केला. बरेच वेळेला नाराजी ही सोभवतालील परिस्थितीवर नसून, स्वतःवर असते. तुला इथे गुदमरायला होते. यात दोष हा दुसऱ्यांचा आहे का? कमी -अधिक प्रमाणात सर्वच गोष्टी कुठे ना कुठे कारणीभूत असतीलही. पण मग, यामधील कोणती गोष्ट तुझ्या हातामध्ये आहे, हे तू समजले पाहिजे.“

“हो गुरुमाई, कळलं…”, लावण्या थट्टेत म्हणाली.


तेवढ्यात मीनल कॅन्टींगला आली; आणि त्यांचा ग्रुप जिथे नेहमी बसतो, त्या जागेवर जाऊन ती बसली. तिची नजर लांबवर बसलेल्या रिद्धीवर गेली. तिने लांबून रिद्धीला स्वतःकडे येणासाठी इशारा केला. 

“हे लावण्या चल! तिकडे मीनल आवाज देते आहे.”, रिद्धी लावण्याला म्हणाली.

 मीनल आली माझे मागे-पुढे त्यांचा ग्रुप असेलच, हे लावण्याला ठाऊक होते; आणि त्यात सौंदर्यासुद्धा असेल. सौंदर्या लावण्याची बहीण आहे, हे अजूनपर्यंत कॉलेजमध्ये कुणाला ठाऊक नव्हते. आणि लावण्याला आता सौंदर्याला पेचात पाडायचे नव्हते.

“हे आपण आणखी दुसरीकडे जाऊ ना. त्याच ग्रुप बरोबर कशाला मैत्रीची सुरवात करायला हवी.”, लावण्या रिद्धीला म्हणाली. 

“का पण? त्यांच्याबरोबर का नाही आधी? आपले क्लासमेट्स ते. आणि सर्वच फार छान आहेत. चल!,नको विचार करू आता.”

यावर लावण्याचा नाईलाज झाला. लावण्या आणि रिद्धी, मीनल जवळ पोहचतात, तोच ग्रुपमधील इतर सर्व तिथे आलेत. त्यात सौंदर्याही होती. लावण्याला टेबलवरती बघून सौंदर्या अस्वस्थ झाली, आणि तिथेच उभी राहिली. ग्रुप मधील इतरांनी लावण्याला आणि रिद्धीला हाय केले. 

“हे सौंदर्या, तू अशी का उभी मूर्तीसारखी, बैस आता, एवढा रिस्पेक्ट नको देऊस आम्हाला, हा हा हा…” राहुल मस्करीत म्हणाला. यावर काही न बोलता सौंदर्या शांतपणे खुर्चीत बसली.

“हे गाईज, ही लावण्या देशमुख आपल्या क्लासमध्ये असते.” रिद्धीने सर्वाना लावण्याची ओळख करून दिली. आणि सोबत लावण्याला सर्वांची. सौंदर्याशी ओळख करून देताना, दोघीनींही एक दुसऱ्यांशी ओळख न दाखवता औपचारिकता म्हणून अभिवादन केले.

“लावण्या तुला मी बघितले बरेच वेळा, तू फार एक-एकटी असायची, वाटले तुझ्याशी बोलावं; मग वाटले, नाही आवडत काहींना जास्त लोकांशी बोलायला, म्हणून कधी स्वतःहून बोलायला झाले नाही माझे.”, पायल म्हणाली.

“नाही तसं काही नाही. मला आवडतं बोलायला.”, लावण्या म्हणाली.

“ग्रेट! मग येत जा आता आमच्या ग्रुप बरोबर, हॊकींनी सौंदर्या”, योगेश सौंदर्याकडे बघीत म्हणाला. 

“अं… हो .. “ सौंदर्या कचकत, नजर चोरीत म्हणाली. 

“हे! लावण्या देशमुख, सौंदर्या देशमुख, तुम्ही दोघी बहिणी तर नाही ना? नाही म्हणजे नावे फार सारखी वाटतात हा… हा … “ मीनल थट्टेत म्हणाली. आणि सर्व हसायला लागले. 

हे ऐकताच दोघीच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. त्यावर दोघीनींही काही प्रतिक्रिया दिल्या नाही. हे ग्रुपमधील कोणाच्या लक्षात आले नाही, मात्र रिद्धीच्या नजरेने हे हेरले होते . नंतर ग्रुपमध्ये बऱ्याच इतर विषयांवरती गप्पा-गोष्टी झाल्या. लावण्याला नवीन मित्र-मैत्रिणी मिळाल्याचा आनंद होता, पण सौंदर्यामुळे थोडी ती अस्वथच होती. 

******

रात्री घरी जेवणाच्या टेबलवरती , “काय ग, काय झाले सौंदर्याला? ती जेवायला का नाही आली? “ आईने लावण्याला विचारले. 

“मला ठाऊक नाही !”, लावण्या उत्तरली. 

बाबांनी बोलावल्यावर सौंदर्या जेवायला आली; मात्र ती गप्प खात होती. तिची ही शांतता बघून आईने विचारले, “सौंदर्या, तू आज शांत-शांत का?”

“विचार तुझ्या लाडक्या मुलीला!”, रागात सौंदर्या ताट लोटून, अर्धवट जेवण सोडून रूममध्ये निघून गेली. 

आईने नजरेने लावण्याला विचारले असता.

“काही नाही आई, आज मी तिच्या ग्रुप बरोबर मैत्री केली म्हणून हे सगळं … “, लावण्यानी आई बाबांना घडलेली हकीकत सांगितली. हे त्यांना आता नेहमीचेच झाले होते. दोघी बहिणी मधील शीत युद्धाला ते कंटाळले होते. त्यांनी यापुढे कधीचेच हात टेकले होते. तरी पालक म्हणून त्यांना समजून सांगणे गरजेचे, म्हणून बाबा लावण्याला म्हणाले, “ लावण्या तुम्ही लहान होत्या तेव्हा हे सगळं समजू शकत होतो, आणि विचार केला वयात आल्यावर तुम्ही थोडं समजदारीने वागाल.”

“पण बाबा यात माझी काय चूक, तुम्हीच सांगा?”, लावण्या म्हणाली. 

“बेटा मला तुझ्या कडूनतरी अपेक्षा आहे की तू समजून घेशील. तू प्रयन्त कर की तुमच्यातील हे अंतर कमी कसे होईल त्याचे. सांभाळून घे बेटा तू तिला… “, केविलवानेपने बाबा म्हणाले. एका बापाची मुलींबद्दल असलेली काळजी लावण्याला जाणवली. लावण्या रूममध्ये गेल्यावर सौंदर्या पुन्हा बडबड करायला लागली, ”काय गरज होती! तुला आमचाच ग्रुप मिळाला संपूर्ण कॉलेज मध्ये. मला ठाऊक आहे तू जळतेस माझ्यावर.” लावण्याला बाबांबरोबरचे नुकतेच झालेले संभाषण आठवले, आणि त्यामुळे ती सौंदर्याला काही प्रतिउत्तर न देता बेडवर झोपून गेली. 

घरी झालेल्या प्रकारामुळे, दुसऱ्या दिवशी कॉलेजला ब्रेकमध्ये, लावण्या रिद्धीला न सांगता एकटीच लायब्ररीला निघून गेली. सौंदर्याच्या ग्रुपचा भाग होऊन तिला सौंदर्याला दुखवायचे नव्हते. 

***

लिब्ररीमध्ये बुक शेल्व्हजनी बनलेल्या बोळीमधून फिरत असतांना लावण्या थांबली; आणि एका शेल्व्हमधील काही पुस्तके हाताळतांना, बाजूला असलेल्या बोळीमध्ये, एक तरुण पाठमोरा उभा, कसलंतरी बुक चाळत असलेला तिला दिसला. तिला तो परिचयाचा जाणवला. दोन तीन पावले मागे जाऊन, शेल्व्ह मधील पुस्तक काढून त्या तरुणाचा चेहरा तिने बघण्याचा प्रयत्न केला. तो पराग होता. जो तिला प्रथम दिवशी भेटला होता. पहिल्या दिवसानंतर तो तिला आजच दिसला. त्याला बघून तिला आनंद झाला. लगबगीने ती, पराग असलेल्या पुस्तकाच्या त्या बोळीमध्ये शिरली. परागचे अजूनपर्यंत तिच्यावर लक्ष गेलेले नव्हते. झपाटाने ती पावले टाकीत त्याचाकडे जायला लागली; आणि लगेच एका विचाराने तिने तिचे पावले रोखले, ‘ पराग मला आता ओळखेल का? तो मला कश्याला लक्षात ठेवेल. कितीतरी मित्र-मैत्रिणी झाल्या असतील त्याला आतापर्यंत. आणि माझ्यात असे काय? की तो मला लक्ष्यात ठेवेल ते. ’ह्या विचाराबरोबर तिचे पावले विरुद्ध दिशेने वळले. हातत असलेलं पुस्तक घेऊन ती तिथून निघून दूर एका टेबलावरती जाऊन बसली, आणि पुस्तक वाचण्याचा बहाणा करू लागली. तिचे संपूर्ण लक्ष दूरवर पराग असलेल्या त्या रॅकच्या बोळीकडेच होते. मग विचार आला ‘बोलवं का स्वतः आपणहून, तसा तो इतरांसारखा नाही. आणि रिद्धी पण म्हणालीच होती,आपण मैत्रीचा हात पुढे करायचा, स्वीकारणे न स्वीकारणे त्याच्यावर सोडून द्यायचे.’ या विचाराबरोबर तिची नजर सामोर एकटक त्या रॅककडे होती, ज्याच्या पल्याड पराग होता. आणि अचानक तो बाहेर नजरेसमोर आला. लावण्याना भांबावून खाली पुस्तकाकडे बघायला लागली.

ग्रंथालयातील शांततेत, बुटांच्या टापांचा आवाज तिच्या कडे येत असल्याचे तिला जाणवत होते. त्याबरोबर तिच्या हृदयाचे ठोके वाढत होते. आणि अचानक ती पावले तिच्या टेबलाजवळ येऊन थांबली. लावण्या नजर खाली घालून एकटक पुस्तकाकडे बघत होती. 

“हम्म! मला ही शिकवं उलट पुस्तक कसे वाचतात ते!” पराग थट्टेत म्हणाला. 

पुस्तक बंद करून भांबावून लावण्याने वर बघितले.

“ओळखलं का?”, परागने विचारले. 

“पराग तू! तुला कसं विसरेल, पहिल्या दिवशी तूच तर होता, ज्यानी मला मदत केली माझी.” लावण्या हसत म्हणाली.

“हं! पण बऱ्याच दिवसानंतर दिसलीस, कुठे असतेस तू? मला कधी कँटिंगला पण नाही दिसलीस.” परागने विचारले.

“हो मी कँटीगला कमीच जाते.”

“बाहेर जायचे? इथे लॅयब्ररीमध्ये कमी आवाजात बोलायला त्रास होतोय.” परागने विचारले.

“हो चल”, लावण्या जागेवरून उठत म्हणाली.

लॅब्ररीबाहेरच्या वऱ्हांड्यातुन चालतांना, काही काळ दोघेही थोडे शांतच होते. 

“कॉफी?” परागने थोडे कचकत विचारले. लावण्याला नवल वाटले. पराग सारख्या सुंदर तरुणाने तिला कॉफीला विचारलं याचे. मग पुन्हा तिने स्वतःची समजूत काढली कदाचित ती नको ते अर्थ लावते आहे. त्याने माणुसकी म्हणून, आणि मित्र म्हणून विचारले असावे. या विचारात असताना, पराग म्हणाला, ”मला वाटते तू कमी बोलते आणि विचार जास्त करते.”

“अं! नाही… , तसं काही नाही. पण इथे कँटीगला?”, लावण्या म्हणाली. 

आपण उगाच काहीतरी बोलून गेलो, आणि पराग काय अर्थ काढेल, असे वाटून ती म्हणाली, “नाही म्हणजे मला इथला चहा, कॉफी आवडत नाही.“

“मग बाहेर गेलो असतो. पण अर्ध्यातासानी माझे वर्कशॉप आहे.” पराग म्हणाला. 

पुन्हा चुकले असा विचार करून लावण्या म्हणाली, “आपण कँटीगपेक्षा इथेच गार्डनमधील बाकावर बसुयात.” 

लावण्याला तसेही कटिंगला जाणे टाळायचे होते. तिथे सौंदर्याचा ग्रुप असेल आणि पुन्हा नको ते वाद घरी उद्धभवतील, या विचारानेच खरी ती लायब्ररीमध्ये आली होती. 

लायब्ररीसामोर एक छोटे गार्डन होते. गार्डनच्या मधोमध, उतरत्या छपराचा लाकडी मनोरा (गझीबो) वेगवेगळ्या फुलांच्या झाडांनी वेढलेला होता. तिथे असलेल्या लाकडी बाकावर जाऊन ते बसले. दोघेही पुन्हा शांत झाले. मग पराग पुढे विचारीत, “घरी कोण कोण असत?”

“आई, बाबा आणि माझी एक बहीण असे आम्ही चौघे. वडील पीडब्लूडी मध्ये इंजिनीर आणि आई हाऊसवाइफ आहे. आणि … “बोलता बोलता लावण्या थांबली. सौंदर्याबद्दल तिने परागला सांगायचे टाळले. मग विषय बदलत लावण्याने परागला विचारले, “तुला इथे कॉलेजला भरपूर मित्र-मैत्रिणी झाले असतील. नाही?”

“हो भरपूर! आमचा चांगला ग्रुप झालाय. आणि तुझे”

“हो माझे पण झालेत… “ पुन्हा लावण्या शांत झाली हे बघून,

“तू फार मोजून मापून बोलतेस.” पराग म्हणाला. 

“नाही तसं काही नाही. माझे पप्पा म्हणतात, की मी फार बोलते.”

“म्हणजे तू फक्त पप्पाबरोबर जास्त बोलतेस?”

“आता रिद्धीबरोबर पण जास्त बोलायला लागली. आणि रोहन बरोबर...”, लावण्या प्रवाहात बोलली. 

“रोहन! बॉय फ्रेंड!”, परागने उत्सुकतेने विचारले. 

“नोवे! मी त्याच्याबद्दल तसा कधी विचार केला नाही. तो माझा बेस्ट फ्रेंड आहे, लहानपनापासूनचा” लावण्या म्हणाली. 

“आणि मी!” परागने लावण्याकडे बघत विचारले. लावण्याची आणि परागची नजारा-नजर झाली. लावण्याने लाजून नजर चोरली, आणि समोर बघायला लागली. मेघ दाटून आले होते विजांचा कळकाळात झाला आणि अचानक पाऊस सुरु झाला. बरेच दिवसाच्या विश्रांती नंतर आज पुन्हा पाऊस पडला होता, त्यामुळे प्रथम पावसाप्रमाणे मातीचा सुगंध आसमंतात दरवळू लागला. लावण्याच्या चेहऱ्यावर लाली होती. पावसाच्या सरीबरोबर जणू तिचेही हृदय आनंदाने नाचू लागले होते. कदाचित परागने सहजतेने तिला विचारले होते, त्याच्या मनात काय, ते ठाऊक नव्हते; पण लावण्या तिचे हृदय या छोट्या भेटीतच हरवून गेली होती. संपूर्ण कॉलेजमध्ये रिद्धीच्या आधी पराग एकटा होता, जो लावण्याबरोबर स्वतःहून एवढ्या आपुलकीने बोलला. परागला लावण्यामधे साधेपणा, निरागसपणा, प्रामाणिकपणा दिसला होता, ज्यामुळे तो खेचल्या गेला होता. पुढले ३० मिनटे सर्व भान हरवून दोघे गप्पांमध्ये रमलीत. वेळ कधी निघून गेला हे त्यांना कळलंच नाही. पाऊस शांत झाला. मनोरा (गझीबो) मधून चालत दोघे परत लाइब्ररीच्या वऱ्हांड्यात आले. लावण्याला शोधत रिद्धी लायब्ररीच्या वऱ्हांड्यात पोहचली होती. लांबून तिने दोघांना तिथे बघितले. पराग लावण्याचा निरोप घेऊन तिथून निघून गेला. रिद्धी चालत लावण्याकडे आली. 

“ओह! म्हणून का तू तुझा फोन ऑफ करून ठेवलेला.” रिद्धी लावण्याला म्हणाली. 

“म्हणजे?”, लावण्या अजाणपणे म्हणाली. 

“कोण होता तो हँडसम? त्याला भेटायला म्हणून तू मला न सांगता, कँटीगला न येता, परस्पर इकडे आलीस आणि आता अजाणतेचे प्रदर्शन”, रिद्धी लावण्याला छळतं म्हणाली. 

“अग तसलं काही नाही, मला लायब्ररीत काम होते. आणि तो मला अचानक इथे भेटला. तो दुसऱ्या ब्रांचचा आहे. आणि तू काय भलताच अर्थ काढतेय.” लावण्या म्हणाली.

“बरं नको सांगू तुला वाटेल तेव्हा सांग. चल आता लेक्चरला” रिद्धी म्हणाली. 

******

क्लाससमोरच्या वऱ्हांड्यात मोहित सौंदर्याची वाट बघत उभा होता. दुरून सौंदर्या आणि मीनल क्लास कडे येताना दिसल्यात. सौंदर्याचे लक्ष मोहितवर गेले.

“हे, हाय मोहित! काय कुठे असतोस? तू येत नाहीस इतक्यात कँटीगला.”, सौंदर्या म्हणाली 

“हो टाईमिंग मॅच होत नाही जरा! तुम्ही कशे आहात? आणि बाकी मंडळी दिसत नाहीय?”

“बाकी सर्व… , अरे तुला ठाऊक नाही! योगेश आणि पायलचे सूत जुडलेत; आणि आता ती लव्हबर्डस बनून फिरत असतात वेगळे.“ सौंदर्याने उत्सुकतेने सांगायला लागली. 

“ओह!..., बाय द वे, मी तुम्हाला इनव्हाईट करायला आलोय. छोटी पार्टी ठेवलीय घरी ” मोहित म्हणाला. 

“पार्टी! कसली?” मीनलने विचारले. 

“काही नाही, माझी बर्थडे पार्टी येत्या वीकएंडला शनिवारी. आणि कॉलेज सुरु झाल्यापासून तशी एकही पार्टी झाली नाही, म्हटलं थोडं चील करुयात.”

“वाव! हैप्पी बर्थडे इन ऍडवान्स” दोघीनी मोहीतला अभिवादन केले. 

“येऊ नक्की आणि सांगेल तुझा निरोप इतरांना”, एवढं बोलून दोघी क्लास कडे निघाल्या. 

मोहित तिथेच उभा सौंदर्याला जाताना बघत उभा होता. चार-पाच पावले चालून गेल्यावर मोहितने पुन्हा सौंदर्याला आवाज दिला. ती थांबून मागे वळली, मोहितने तिला मान हलवून इशारा करीत बोलावले. मीनलला पुढे जायला सांगीत सौंदर्या मोहित कडे परतली.

 “काय रे?” अजाणपने सौंदर्यानी विचारले. मोहित तिच्या थोडं आणखी जवळ येत, काही क्षण शांत उभा तिच्या चेहऱ्याकडे बघत राहिला, आणि कुठल्यातरी विचारात हरवून गेला. त्याला काही तरी सांगायचे हे सौंदर्याला त्याच्या नजरेतून कळले होते. सौंदर्याने पुन्हा त्याला आवाज देत ”हे! काय झाले, तु बोलावले मला!”

मोहित भानावर येत, “ओह सॉरी काही नाही, तू येशील ना नक्की… “ मोहितने अडखळत तिला विचारले. 

“अरे हो, बोलले ना तुला! आणि चल येते मी लेक्चरला उशीर होतोय मला. बाय!” सौंदर्या घाईत त्याला टाळत म्हणाली. “ओके बाय!” मोहित जड आवाजात म्हणाला . 

मोहितला आणखी काही बोलायचे हे सौंदर्याला कळून चुकले होते. आणि कदाचित तिला ते ऐकायचे नव्हते. त्यामुळे त्याला टाळून ती निघून गेली होती. मोहित सिनिअर होता; पण पहिल्या दिवसापासून त्याची सौंदर्याच्या ग्रुप बरोबर मैत्री जमली होती. सिनिअर्सचा त्यांचा वेगळा ग्रुप असूनसुद्धा बरेचवेळा तो सौंदर्याच्या ग्रुपबरोबर वेळ घालवायचा. कँटिंगलाही तो तिच्या ग्रुपबरोबर असायचा. 

मोहित हा शहरातील एका नामवंत श्रीमंत बापाचा एकुलता एक मुलगा. असे असून सुद्धा त्याला त्याचा गर्व नव्हता. दिसायला सुंदर, स्वभावाने मिलनसार, मित्रांवर जीव ओतणार आणि हळवा. त्याच्या लहानपणी त्याची आई वारली; मात्र त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी म्हणून दुसरे लग्न केले नाही. पण त्याच्या वडिलांना व्यापारामुळे हवा तो वेळ त्याला देता आला नाही. कुठेतरी तो एकटा होता. कॉलेजमध्ये बऱ्याच मुली त्याच्यावर मारायच्या; मात्र तो त्यांना भाव देत नव्हता. प्रथम दिवशी त्याने सौंदर्याला बघितले तेव्हाच त्याची विकेट पडली होती. तिच्या बरोबर मैत्री झाली, तिच्या इतर मित्रांबरोबर मैत्री झाली. त्यांच्यात तो रमु लागला. सर्वांनाही तो फार आवडायचा. त्याचा कल सौंदर्याकडे आहे, हे त्याने कोणाला कळू दिले नाही. जसा जसा वेळ जात गेला, तो तिच्या प्रेमात पडत गेला.. आता पर्यंत त्याने सौंदर्याला याबद्दल कळू दिले नव्हते; मात्र सौंदर्याला मोहीतचे तिच्याबद्दलचे आकर्षण असल्याचे तिला आधीच कुठेतरी जाणवले होते; 

आज त्याला तिला सांगायचे होते. मात्र तो हिम्मत करू शकला नाही. सौंदर्या कॉलेजमधील सर्वात सुंदर तरुणी होती, बरेच मुले तिच्यावर मरतात, हे तिला चांगले ठाऊक होते; त्यामुळे मोहितही असल्याच गर्दीचा एक भाग म्हणून ती त्याला बघत होती. मात्र मोहित तिच्या प्रेमात स्वतःला हरवून बसला होता. लहानपणी आई गेल्याचे दुःख घेऊन कित्येक वर्ष तो एकटेपणात जगला होता. आणि आता त्यालाही आयुष्याची सुरवात त्याच्या प्रेमाबरोबर करायची होती. 

प्रत्येकजण नवीन नात्यात गुंतत जात होतं. रिद्धीची लावण्याबरोबर मैत्री घट्ट जमली होती. परागबरोबरची मैत्री लावण्यासाठी एक नवीन सुखद अनुभव, एक उमेद घेऊन आली होती. तिच्यासाठी ती नवीन सुरवात होती.

मात्र ही नाती, हा आनंद असाच राहणार की नाही, हे काळ ठरवनार होता.


क्रमशः


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama