STORYMIRROR

Abhijeet Tekade

Drama Tragedy

3  

Abhijeet Tekade

Drama Tragedy

कु-रूप (भाग ७) - दृष्टिकोन

कु-रूप (भाग ७) - दृष्टिकोन

9 mins
119


प्रत्येक मनात खोलवर एक नवीन आशा जन्म घेत असते. एक आशा भंग पावली, की काही काळ निराशेचा घोर अंधकार पसरतो. नंतर पुन्हा नवीन आशा पल्लवित होते आणि हे चक्र निरंतर सुरूच राहते. लावण्याच्या जीवनात हा उतार-चढाव सारखा राहायचा. तिच्या दृष्टीकोनात बदल करून देणारी व्यक्ती तिच्या आयुष्यात लवकरच पदार्पण करणार होती.


त्यादिवशी कॅन्टीनमध्ये जरा जास्तच वर्दळ होती. प्रथम वर्षाचा प्रथम दिवस असल्यामुळे, प्रथम वर्षाबरोबर, नवीन चेहरे बघायला सिनिअर्सनीपण तिथे गर्दी केली होती.


सौंदर्या तिच्या नवीन ग्रुपबरोबर एका टेबलावर बसली होती. या ग्रुपमधील योगेश, रागिणी, पायल, हे सौंदर्याप्रमाणेच लोकल होते, तर मीनल आणि राहुल, दुसऱ्या शहरातून शिक्षणासाठी आलेले होते आणि  हॉस्टेलला राहायला होते. एका दिवसात त्यांच्यात चांगलीच मैत्री जमली होती. त्यांच्या गप्पांना आता ऊत आला होता.


समोसा खात राहुल म्हणाला, “काय यार सौंदर्या, भारी डेअरिंग केले तू!  सिनिअर्ससोबत पंगा घेतला.”


“पंगा काय, त्यात त्यांचीच चूक त्यांना दाखवली,” सौंदर्या सहजतेने बोलली. 


“अरे यार तुझं ठीक आहे, तू लोकल, आज घरी जाशील, पण आम्ही तर हॉस्टेलला असतो... आज आमची पुन्हा गाठ होईल त्यांच्याशी,” मीनल घाबरत म्हणाली. 


“घाबरायचं काय! चांगला दम दे त्यांना,” सौंदर्या म्हणाली. 


“नाही रे बाबा! आपल्याकडून नाही होणार...  हे सौंदर्या, तुझ्या त्या सिनियर मित्राला सांग ना, आमची रॅगिंग नको घेऊ ते,”  मीनल म्हणाली.


“मित्र! अगं मी नाही ओळखत त्याला. आजच तर बघितले त्याला,”  सौंदर्या म्हणाली.


“आम्हाला तर वाटले फार गहिरी दोस्ती आहे तुमची!” सौंदर्याला खिजवत योगेश म्हणाला.


“हा हा... ” सर्व हसले. तेवढ्यात सौंदर्याचा फोन वाजला, उत्साहाने फोन उचलून, ”हॅलो… हं… ओके, अरे पण तू ये ना कॅन्टीनला… काय म्हणतोस  मी येऊ तिथे… बरं ठीक आहे येते.”

 

“हे गाईज! यू कॅरीऑन, मी येते एका मित्राला भेटून...“ सौंदर्या निरोप घेत उठली.


योगेश पुन्हा खिजवत म्हणाला, “मित्र… हा…“


“गप रे! दुसरा चांगला मित्र आहे माझा, त्याला भेटायला चालली... बरं येते मी.”


सौंदर्या उठून, लावण्या बसलेल्या टेबलाजवळ गेली. लावण्या एकटी चहा पीत, काही तरी विचारात होती.


“तुझा फोन बंद आहे का?” सौंदर्याने विचारले.


लावण्या गोंधळून, “अगं तू! ये ना बैस.”


“नको! तुझा फोन बंद आहे का?” सौंदर्याने पुन्हा विचारले.


“अगं हो! खरंच बंद आहे! बॅटरी डिस्चार्ज झाली वाटते.” फोन चेक करीत लावण्या म्हणाली.


“तू कॉल करीत होतीस का मला?”


“नाही, मी नाही, रोहन...”


“रोहन! का?”


“तो आला आहे इथे.”


“इथे!” लावण्या उत्साहाने म्हणाली.


“हो इथे आणि त्यांनी आपल्याला बाहेर गेटवर बोलावले.”


रोहनने लहानपणी दोघींकडून वचन घेतले होते, की जर तो त्यांचा मित्र म्हणून भेटायचे असेल, तर त्या दोघींना एकमेकींशी असलेले मतभेद विसरून एकत्र यावे लागेल. आजपर्यंत त्या दोघी याचे पालन करीत होते.


कॉलेजबाहेर, झाडाखाली असलेल्या चहाच्या टपरीवर रोहन त्यांची वाट बघत होता. त्याला बघून दोघी आनंदी झाल्या.


रोहनच्या पाठीवर थाप मारीत सौंदर्या म्हणाली, “काय रे इथे कसा? तू तर मुंबईला जाणार होतास.”


“अरे काय सांगू, नशीब माझं… तुमच्या समोरचं कॉलेज मिळालं.”


“काय सांगतोस! तू तर जे जे स्कूलला ऍडमिशन घेणार होतास ना?” लावण्याने विचारले.


“त्यांना माझी पेंटिंग्स  नाही आवडली. मग मीच म्हटलं, जा उडत, मला काय! तुमचंच नुकसान… हा हा…” रोहन मस्करीत म्हटला.


“आणि म्हटलं इथेही चांगले आर्टस् कॉलेज आहेत, मग मुंबईला कशाला!  इथे घरच्या भाकरीवर शिक्षण होईल, नंतर बघू.”


“ग्रेट! आणि तू आत का नाही आलास आमच्या कॅन्टीनला?  इथे या टपरीवर बोलावले आम्हाला...” सौंदर्या म्हणाली.


“अरे काय त्या बंद कॅन्टीनमध्ये. इथे बघ, किती मोकळं वाटतंय. या  झाडाखाली छान चहा, सिगारेटची मजा कुछ और आहे. आणि इथला चहा घेऊन बघ, कॅन्टीनचा चहा विसरून जाशील.” रोहन म्हणाला.


“बरं ते सोडा, कसा होता पहिला दिवस?”


“ग्रेट! फार मज्जा येतीये. आमचा छान ग्रुप जमलाय,” सौंदर्या उत्साहात म्हणाली.


इकडे लावण्याचा उतरलेला चेहरा बघून लावण्याचा एकटेपणा रोहनच्या लक्षात आला. रोहन लहानपणापासून लावण्याचा सर्वात जवळचा मित्र, तिला तो चांगला ओळखून होता. त्याला कळून चुकले होते की, सौंदर्याने लावण्याला तिच्या ग्रुपमध्ये सामील केलेले नाही. यावर तो जास्त न बोलता विषय बदलत म्हणाला, “लावण्या, अगं तुम्ही येत जा चहाला इकडे, म्हणजे आपली रोज भेट होत जाईल. आणि मी माझ्या नवीन ग्रुपची तुम्हाला ओळख करून देतो.”


“हो नक्की!” लावण्या उत्सहाने म्हणाली.


तिच्या कॉलेजला ती तशीही एकटी पडली होती आणि आता ती रोहनला वाटेल तेव्हा भेटू शकत होती. त्यानंतर संपूर्ण आठवडा असाच गेला. लावण्याची अजूनही क्लासमध्ये कोणाशी मैत्री जमली नव्हती. रोज क्लासमध्ये तिच्या बाकावर ती एकटीच असायची. सर्वच आपापल्या ग्रुपमध्ये रमू लागले होते. बाकी विद्यार्थ्यांना आता नवीन ओळखीची गरज नव्हती. त्यामुळे तिला आता तिचा एकटेपणा आणखीनच खायला लागला. कॅन्टीनमध्ये जाण्याचे ती टाळू लागली. रोहन तसा लावण्या, सौंदर्याला भेटायला चहाच्या टपरीवर बोलवायचा, पण सौंदर्यासुद्धा आता तिच्या नवीन मित्र-मैत्रिणींमध्ये रमायला लागली होती. त्यामुळे ती त्याला भेटायला जाणे टाळायला लागली. लावण्याच्या एकटेपणाला रोहनचाच आधार होता. तिचा एकटेपणा रोहनच्या लक्षात आला होता, त्यामुळे तोही तिला सौंदर्याशिवाय भेटायला तयार व्हायचा. रोज ब्रेकमध्ये लावण्या रोहनला भेटायला जायची, कधी एखादे लेक्चर ऑफ असले, तर ती परस्पर रोहनला कॉल करून, त्याला भेटायला बोलवायची. रोहनने तिला कधी टाळले नाही. एकदा मात्र रोहनने तिला विचारले, “लावण्या तुला एक सांगू?”


“बोल की.”


“कॉलेजला जेव्हा कधी वेळ असतो, तू इथे येतेस, मला भेटायला. तू तिथे वेळ द्यायला हवा. त्याशिवाय का तुला नवीन मित्र-मैत्रिणी होतील.”


लावण्या रोहनची नजर चोरीत, नाराजीने म्हणाली, “आता तुला पण माझ्याशी मैत्री नको असेल तर नाही येणार भेटायला.”


लावण्याचा रडका, दुःखी चेहरा बघून, विषय बदलत, रोहन मस्करीत म्हणाला, ”अगं मी नवीन मित्राबद्दल, म्हणजे बॉयफ्रेंड बद्दल बोलतोय.“


लावण्या लाजत हसत, पाठीवर थाप मारीत, “चल बदमाश! तसं काही नाही… मला असलं काही नाही करायचे.”


रोहन पुन्हा मस्करीत, ”पण तुझं लाजणे तर काही वेगळंच सांगतेय... बरं सोड, तुला जेव्हा सांगायचे तेव्हा सांग. आणि हं, तुला कधी वाटले तर भेटायला ये. संकोच करू नको.”


दुसऱ्यादिवशी रोहन टपरीवर त्याच्या कॉलेजच्या मित्र-मैत्रिणीच्या ग्रुप बरोबर आला. लावण्याला पण बोलावून घेतले, त्याने त्याच्या ग्रुपबरोबर तिची ओळख घालून दिली. त्यांनीही तिचा आपुलकीने स्वीकार केला. लावण्या हळूहळू रोहनच्या ग्रुपबरोबर चांगलीच रमू लागली. तिला कॉलेज परिसरापेक्षा आता चहाच्या टपरीवर सहजता, मोकळेपणा जाणवत होता. कॉलेजला ती फक्त लेक्चर अटेण्ड करण्यासाठी म्हणून असायची.  इतरवेळी ती रोहनच्या ग्रुपबरोबर चहाच्या टपरीवर असायची. सौंदर्या मात्र  क्वचित कधीतरी रोहनला भेटायला यायची.


***************************************


आतापर्यंत लावण्याला तशी क्लासमध्ये एकटी बसायची सवय झाली होती, मात्र अजूनही कॉलेज कॅम्पसमध्ये तिला गुदमरायला व्हायचं.


एक दिवस क्लासमध्ये लेक्चरच्या आधी लावण्या नेहमीप्रमाणे तिच्या बाकावर एकटी पुस्तक वाचत बसली असताना, अचानक बाजूने आवाज आला, “हाय!”


लावण्याने वळून बघितले, तर एक नवीन विद्यार्थिनी उभी होती. दिसायला गोरीगोमटी, उंच कपाळ, बोलके डोळे, सडपातळ बांधा, ती स्मित हास्य करीत, हस्तांदोलनासाठी हात पुढे करून उभी होती. लावण्याने आश्चर्याने तिचे हस्तांदोलन स्विकारीत, “हाय” केले. लावण्याला क्लासमध्ये स्व

तःहून तिच्याशी परिचय देणारी ती पहिली होती.

 

“मी रिद्धी, इथे बसू?”, रिद्धीने हसतमुखाने विचारले.

 

“येस अफकोर्स!  बैस की...” बाकावर थोडं सरकत लावण्या विनम्रपणे म्हणाली.


रिद्धी बाकावर बसत पुढे म्हणाली, “आज माझा पहिलाच दिवस, मी काही पर्सनल कारणामुळे कॉलेज जॉईन करायला उशीर लागला.”


“तुझं नावं…?” रिद्धीने लावण्याला विचारले.


“ओह सॉरी! मी लावण्या.”


“नाईस टू मीट यू!”


रिद्धी मूळची पुण्याचीच होती. आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. वडील पोस्टात पोस्टमास्तर, आई गृहिणी, आर्थिक परिस्थिती तशी जेमतेम होती. रिद्धीला आयआयटीला शिक्षण घेण्याचे स्वप्न होते आणि त्यासाठी तिने एंट्रन्स JEE साठी भरपूर परिश्रम केले होते. मात्र, काही महिन्यापूर्वी रिद्धीच्या वडिलांना पॅरालीसीसचा मोठा अटॅक येऊन गेला होता; त्यामुळे ते  बिछाण्यावरच होते. त्यांचा सांभाळ करायला आईव्यतिरिक्त कोणीच जवळ नसल्यामुळे, रिद्धीने स्वतःच्या इच्छा मारून, पुण्यातच शिक्षण घेण्याचे ठरवले होते.


तिने आयआयटीला जावे, म्हणून तिच्या वडिलांनी तिला बराच आग्रह केला, पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती. 

इथे कॉलेज सुरू झाल्यापासून वडिलांची तब्बेत ठीक नसल्यामुळे, ती कॉलेजला येऊ शकली नव्हती. त्यांच्या तब्बेतीत सुधार होताच तिने जॉईन केले. 


लावण्याला आता रिद्धीसारखी समजदार बेंच पार्टनर मिळाली होती. दोन लेक्चर झाल्यानंतर ब्रेक झाला.

लावण्या ब्रेकमध्ये नेहमीप्रमाणे रोहनला आणि त्याच्या ग्रुपला भेटायला चहाच्या टपरीवर जायची, पण रिद्धीला कॅन्टीन ठाऊक नसल्यामुळे ती तिच्याबरोबर कॅन्टीन दाखवायला निघाली. 


नेहमीप्रमाणे सिनिअर्सचा ग्रुप व्हरांड्यात उभा होता. रिद्धीला बघून सिनिअर्समधील पक्या म्हणाला, “अरे ही नवीन फुलझडी कधी आली, आपल्याला पत्ताच नाही.” हे ऐकताच रिद्धी थांबली. लावण्या घाबरून रिद्धीच्या मागे झाली. त्यांना थांबलेलं बघून काही काळ सिनिअर्सच्या ग्रुपमध्येपण शांतता पसरली. ती शांतता भंग करीत रिद्धी स्मितहास्य करीत म्हणाली, “अरे तुम्हाला कसे कळले, माझे पेट नेम फुलझडी आहे ते.  माझ्या बाबांनी माझे नाव फुलझडी ठेवले. मी चरचर बोलते म्हणून.” ऐकून सर्व हसायला लागले. रिद्धी लगेच हात समोर करून, “हाय माझं नाव रिद्धी, आपले नावं?” पक्या तिच्या तोंडाकडे पाहतच राहिला. एवढ्या आत्मविश्वासाने, सकारात्मकपणे आणि आदराने कोणी त्याला इंट्रो दिला नव्हता. “मी... मी… प्रकाश.” पक्या म्हणाला. तेवढ्यात एकजण मध्येच म्हणाला, “ये पक्या तुझं नाव प्रकाश आहे! आम्हालाही आताच कळलं, हा हा हा… “ सर्व हसायला लागले.


“ये, गप रे!…“ पक्या ओरडला. रिद्धी ने आदरपूर्वक प्रकाशला अभिवादन केले. सोबत लावण्यानेपण स्वतःची ओळख करून दिली. रिद्धीच्या या वागण्यावरून पक्या फार प्रभावित झाला. पक्या तर तोऱ्यात, “ये रिद्धी कूच हेल्प लगी तो बोलना, तू अबसे हमारी दोस्त.”


“हो नक्की”, रिद्धी हसत म्हणाली.


रिद्धी ही अशीच स्वभावने नम्र, बुद्धीने तीव्र, नेहमी हसत, सर्वांना आपलंसं करून घेणारी होती. सिनिअर्सचे हे परिवर्तन बघून लावण्या रिद्धीपासनं फार प्रभावित झाली.


लावण्याने रिद्धीला कॅन्टीनपर्यंत सोडले आणि आत न जाता बाहेरूनच रिद्धीचा निरोप घेत म्हणाली, “हे रिद्धी, मी निघते मला एका मित्राला भेटायला जायचे आहे. क्लासला भेटू पुन्हा बाय!” 


रिद्धीला हे थोडे विचित्रच वाटले, पण रिद्धीचा तसा पहिलाच दिवस आणि लावण्यालातरी ती कोण्या अधिकाराने थांबवणार होती.


रिद्धी कॅन्टीनला पोहोचली,  सौंदर्या तिच्या ग्रुपबरोबर तिथेच होती. सोबत मोहित, पक्या आधीच तिथे होते. पक्यानी रिद्धीला आवाज दिला.


“हे तू तर मागे होतास, माझ्या आधी इथे?”, रिद्धीने विचारले.


“तुमने अभी हमे जाना ही कहा  है!” पक्या बढाई मारीत म्हणाला.


“बरं तुझी ओळख करून देतो.” पक्याने रिद्धीची ओळख सगळ्यांशी करून दिली. मागील काही दिवसात बरेच काही घडले होते.  मोहित आणि सौंदर्याची अधूनमधून गाठ पडायला लागली होती. हाय-बाय करता-करता त्यांच्यात मैत्री झाली होती. आणि  बरोबर ग्रुपची मैत्री झाली होती. आता रिद्धीला पक्याने मैत्रिण मानले आणि ग्रुपनेपण तिचा स्वीकार केला.


हळू-हळू काही दिवसांमध्ये रिद्धीची सर्वांशी चांगली मैत्री जमली. सर्वांना ती आवडायला लागली. तिच्यातील सकारात्मकता सर्वांना आकर्षक करीत असे. लावण्याला हे बघून आश्चर्य वाटायचे, की रिद्धीने मागून येऊन इतके मित्र-मैत्रिणी कशी मिळवले ते. आता क्लासमध्ये ती कोणत्याही बाकावर बसू शकत होती.


मात्र, रिद्धी लावण्याच्या शेजारीच बसायची.  लावण्या मात्र अजूनही कुठेतरी एकटीच हरवलेली असायची. अजूनही ती ब्रेकमध्ये कॅन्टीनला जायचे टाळायची.


एकदा क्लास संपल्यावर कॅन्टीनच्या दिशेने रिद्धीबरोबर जात असताना, लावण्या रिद्धीला म्हणाली, ”रिद्धी तुला एक विचारू?”


“हा बोल ना”


“तू प्रथम दिवशी माझ्या बाकावर बसायला का आलीस? तू सामोर दुसऱ्या कोणत्याही बाकावर बसू शकली असतीस.”


त्यावर रिद्धी म्हणाली, “व्यक्तीची गरज जिथे असते, त्याचे तिथे असणेच योग्य, तिथेच त्याची किंमत राहते.”


“म्हणजे?”


रिद्धी विषय बदलत म्हणाली, “काही नाही गं, तू एकटी होतीस ना, म्हणून मी इथे तुझ्याजवळ बसायला आले. आता मी एक विचारू?”


“हो विचार ना,” लावण्या म्हणाली.


“तू कॅन्टीनला का येत नाहीस? आणि मी तुला कधी क्लासमध्ये कुणाशी बोलताना बघितले नाही.”


लावण्याला यावर काय उत्तर द्यावे कळत नव्हते. या प्रश्नाला तिला कधी सामोरे जावे लागेल, याचा तिने विचार केला नव्हता. तिने थोडावेळ विचार केला आणि म्हणाली, ”माझे इथे कोणी मित्र-मैत्रिणी नाही झालेत, आणि बाहेर रोहन, त्याच्या ग्रुपबरोबर मला जास्त बरं वाटते.”


रिद्धी, ”खरंच फक्त हे कारण आहे? का आणखी काही? आणि तुला इथे मित्र-मैत्रिणी का नाही झालेत? याबद्दल तू विचार केलास.”


“कदाचित मी त्यांना आवडली नसावी. कदाचित मी दिसायला ही अशी कुरूप म्हणून.” लावण्या उत्तरली.


“व्यक्ती अनुभवातून शिकतो, गोष्टींचे आकलन करतो आणि एक धारणा बनवतो. काही वेळा तो बरोबर असतो, तर काही वेळ तो चुकीचा. हे समजायला हवे. तू त्यांना आवडली नाही, हे तुला वाटले, आणि तुला हे सहन होत नसल्यामुळे, तू त्यांना सामोरे जात नाहीस, करेक्ट?” रिद्धी म्हणाली.


“नाही… म्हणजे... तसंच कारण असेल हे मी सांगू नाही शकत. पण मला त्यांना फेस नाही करायचे. कदाचित ते माझा स्वीकार करणार नाही ही भीती...”  लावण्या म्हणाली.


“पण तू कधी स्वतः काही प्रयत्न केलेत त्यांच्याशी बोलण्याचा? आता हेच बघ, मी स्वतःहून तुझ्याशी बोलायला आली. पण जर, मी तुझ्या बाकावर बसायला आली नसती, तर तू स्वतःहून माझ्याशी बोलायला कधी आली असती का?” रिद्धीने विचारले.


“अम... कदाचित नाही.” लावण्या उत्तरली.


“मग तू कशी अपेक्षा करतेस, की ते तुझ्याबरोबर स्वतःहून मैत्री करतील ते,” रिद्धी म्हणाली.


रिद्धीचे बोलणे लावण्याला कुठेतरी पटायला लागले होते. ती शांतपणे ऐकत होती. बोलता बोलता दोघी कॅन्टीनसमोर असलेल्या गार्डनजवळ आल्यात.


“मनात नको ती भीती, नकारात्मकता, विना समजून निष्कर्ष काढणे, नंतर पश्चात्ताप करणे, या सर्व कारणांनी तुझी सतत कोंडी होईल. कोण काय विचार करतो, तू त्यावर विचार करू नको. तू स्वतः काय विचार करते, ते महत्त्वाचे,” रिद्धी म्हणाली.


“तू फार फिलॉसॉफिकल बोलतेस. पण प्रॅक्टिकली…” लावण्या म्हणाली.


“पुन्हा निष्कर्ष नको काढू. चल! तू आज माझ्याबरोबर कॅन्टीनला आत.” रिद्धीने लावण्याला कॅन्टीनला यायला भाग पाडले होते.


लावण्याबरोबर भेदभाव झाला, किंवा नाही, हा प्रश्न नव्हता. लावण्या, ही त्याबद्दल काय विचार करते, ती कशी प्रतिक्रिया करते, तिच्या मानसिक जडणघडणीवर याचा काय परिणाम होतोय, हा प्रश्न महत्त्वाचा होता. तिला एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघण्यासाठी, योग्य प्रतिक्रिया देण्यासाठी  रिद्धीने प्रवृत्त केले होते.


क्रमशः 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama