STORYMIRROR

Abhijeet Tekade

Drama

4.0  

Abhijeet Tekade

Drama

कुरूप (भाग ५) - प्रतिस्पर्धा

कुरूप (भाग ५) - प्रतिस्पर्धा

9 mins
338


संमेलनाच्या दिवशी मुख्य अतिथी म्हणून आलेल्या, सुप्रसिद्ध नृत्यांगना प्रभादेवी, मुलींचा भरतनाट्यमचा कार्यक्रम बघून फार प्रभावित झाल्यात. मुख्यतः लावण्याच्या प्रदर्शनाबाबत त्यांनी प्रिंसिपल मॅडम आणि संपदा मॅडमकडे भरभरून स्तुती केली. लावण्याला स्वतःजवळ बोलावून, उत्तम नृत्य केल्याबद्दल तिला शाबाशी दिली. सर्वांसमोर तिची मान गर्वाने ताठ झाली. संपदा मॅडमलाही आता गहिवरून आलं होतं; कारण अप्रत्यक्षरित्या त्यांनाही ही शाबासकी होती. संमेलनाच्या शेवटी बक्षीस वितरण झाले; दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लावण्याला इतर अभ्यासू स्पर्धांमध्ये, जसे की, निबंध लेखन, क्वीझ कंपेटिशनसाठी परितोषीकं मिळाली. 


पण यावर्षीचे, हे या नृत्याबद्दल भेटलेले पारितोषिक तिच्यासाठी विशेष होते. 


आज लावण्या तिच्या गुणांमुळे आकर्षणाचा केंद्र बनली होती. ती प्रेक्षकांमध्येही चर्चेचा विषय होती. बऱ्याच पालकांनी लावण्याच्या आई-वडिलांना त्याबद्दल बोलून दाखवले, आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

 

हे सगळं बघून लावण्याच्या आई-वडिलांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू होते. 


राजेशला कुठेतरी खंत होती की, तो पालक म्हणून लावण्याच्या प्रतिभेची पारख करू शकला नाही. ती उत्तम असूनसुद्धा तिला काढण्यात आलं होतं; आणि आपण तिचीच चूक गृहीत धरली. लावण्याच्या आईलासुद्धा याचा पश्चात्ताप वाटत होता. 


समाजात व्यक्तीची पारख करणारी, रुपाला नाही तर गुणाला महत्व देणारीही लोकं आहेत, याची प्रचिती प्रभादेवींच्या मध्यमातून मिळाली. 


त्या दिवशी लावण्याच्या आनंदाला ठिकाणा नव्हता. घरी आल्यावरसुद्धा आई-बाबांनी तिचे गुणगान केले. त्यावेळी मात्र सौंदर्या थोडी फुगली होती. कारण सौंदर्याच्या मते आजची कीर्ती, कौतूक, तिच्या वाटणीचे होते, जे भाग्यानी लावण्याला लाभले होते. 


संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे सुट्टी होती. सुट्टीचा दिवस मुलींसाठी मनसोक्त खेळण्याचा, धमाल करण्याचा असायचा. परंतु त्या दिवशी, सकाळी-सकाळी सौंदर्याला अभ्यास करीत असल्याचे बघून बाबांनी तिला विचारले, “काय गं, आज सकाळीच सुट्टीच्या दिवशी अभ्यास!”


त्यावर सौंदर्या म्हणाली, “यावर्षी मला क्लासमध्ये टॉप करायचे आहे.”


बाबा (राजेश) म्हणाले, “बरं! कळलं! चल आता नाश्ता करायला, आणि लावण्याला उठव.”


“मी नाही, तुम्हीच उठवा.”


सौंदर्याच्या या उत्तरावर दुर्लक्ष करीत राजेशनी लावण्याला उठवले.


सौंदर्याचा रोष लावण्यावर होता. काल ती पहिल्यांदाच दुर्लक्षित झाली होती; आणि तिला त्यात स्वतःचा पराभव झाल्याचे जाणवत होते. पराभवाची सवय नसल्यामुळे, ते पचवणे, ते सहन करणे, तिला अशक्य होते. लहानपानापासूनच सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या मुलांच्या बाबतीत हे असं होतं. कोणी त्यांना दुर्लक्षित केलेले खपत नाही. सौंदर्याच्या मते लावण्या त्याला कारणीभूत होती. 


लावण्या ही दरवर्षी वर्गात अभ्यासामध्ये अव्वल येत असे. जसे लावण्यानी नृत्यात सौंदर्याचे पारितोषिक हिरावून घेतले होते; त्याप्रमाणे अभ्यासात प्रथम क्रमांक पटकावून, लावण्याला पछाडायचा ध्यास तिने धरला होता. 

 

सकाळचा नाश्ता आटोपल्यावर, लावण्याने सौंदर्याला खेळायला विचारले असता, सौंदर्या नकार देत म्हणाली, “मला अभ्यास आहे, आणि तू मला मुद्दाम खेळायला नेते आहेस. तुला वाटतं मी टॉप नाही केले पाहिजे म्हणून.”


त्यावर लावण्या म्हणाली, “मला कशाला वाटेल. आणि तुला नाही यायचे तर नको येऊस. मी जाते.” 


धावत धावत लावण्या दाराजवळ गेली. दार उघडले तर दारात रोहन होता. 


“सौंदर्या नाही येत खेळायला?” रोहनने विचारले.


“नाही. ती नाही म्हणते.”


तेवढ्यात आई रोहनला आवाज देत म्हणाली, “रोहन बेटा, ये आत. तूच समजव तिला, बसलीय सकाळपासून आभास करीत, रूममध्ये.”


रोहन मस्तीत उड्या मारीत रूममध्ये गेला आणि सौंदर्याला म्हणाला, “इतकी काय अभ्यास करायचे?”


“मला टॉप करायचे क्लास मध्ये.” 


“अगं बराच वेळ आहे परीक्षेला. आतापासून अभ्यास केला तर तू विसरून जाशील. आणि तुला मग परीक्षेच्या वेळी पुन्हा तेच करावे लागणार. मग काय इतका अभ्यास करून फायदा.”


“हा हा हा ... ” रोहन आणि लावण्या दोघेही हसायला लागली. 


“ये जा वेड्या. काही बोलतोस, मी नाही येत.” सौंदर्या रागात त्याला म्हणाली. 


रोहन पुन्हा तिची खोड काढीत म्हणाला, “अगं चल ना, प्लीज! आम्हाला आमच्यातर्फे इतर मुलांशी भांडायला कोणीतरी लागेल. आणि तू तर आपल्या ग्रुपचा दादा आहेस.” 


त्यावर सौंदर्या चिडून उठली, “मी भांडखोर का! थांब, दाखवते तुला!”


रोहनने धावता पाय काढला. रोहन आणि लावण्या धावत दारातून बाहेर पडले; आणि सौंदर्या त्यांच्या पाठीमागून धावत निघाली. रोहन तसा बोलण्यात फार पटाईत असल्यामुळे, त्याने तिला खाली गेल्यानंतर, तिची स्तुती करून हरभऱ्याच्या झाडावर चढवले आणि तिला खेळासाठी मनावले. 


लावण्याच्या आणि सौंदर्याच्या संबंधात आज प्रथमच एवढी कटुता जाणवत होती. एरवी तसे त्यांचे चांगलेच जमायचे. शाळेत, वर्गामध्येही दोघी एकत्र, एका बाकावर बसायच्या, सोबत जेवायच्या, खेळायच्या. दोघींच्या आवडी-निवडीत सुद्धा फार साम्य होते. विशेष म्हणजे दोघींचा जवळचा मित्रही एकच, तो म्हणजे रोहन. 


सुट्टीनंतर दुसऱ्या दिवशी शाळेत, सौंदर्यानी वर्गात स्वतःची बसायची जागा बदलली. हे बघून लावण्याला थोडा राग आला. सौंदर्याच्या या वागण्यामुळे, सौंदर्याला तिचे यश खपत नाही, असे लावण्याला जाणवायला लागले. 

 

त्या दिवशी शाळेच्या मध्याला सुट्टीमध्ये, कॅन्टीनला लंच करीता रोहन आणि लावण्या एकत्र बसले. सौंदर्या मात्र दुसऱ्या मुलींबरोबर त्यांच्या टेबलवर जेवायला बसली. “ती आपल्याबरोबर का नाही जेवत? काय झालंय हिला?” हे रोहनने लावण्याला विचारले. 


लावण्या म्हणाली, “माहित नाही. कालपासूनच अशी विचित्र वागतेय. क्लासमध्येसुद्धा आता माझ्याजवळ नाही बसत ती.”


रोहन जागेवरून उठत, “थांब तिला आणतो बोलावून.” 

 

रोहनने तिला बोलावले; पण आता लावण्यानेसुद्धा तिच्याबरोबर बसायला नकार दिला. तेव्हा रोहनने दोघींना एक अट घातली की, जर त्याच्याशी मैत्री टिकवायची असेल तर , तो जेव्हा कधी असेल, तेव्हा त्या दोघींना सोबत असावे लागेल. नाही तर तो त्या दोघींशी कधीही बोलणार नाही. यावर दोघींचा नाईलाज झाला. 


त्या दिवसानंतर, रोहन असेल तेव्हाच त्या दोघी एकत्र असायच्या. इतर वेळी त्या दुरावल्या होत्या. घरात एका रूममध्ये असूनसुद्धा, आता सौंदर्या लावण्याबरोबर खेळायची नाही. त्यांच्या संबंधामधील हा बदल त्यांच्या आई-वडिलांनासुद्धा जाणवला. अधून-मधून ते त्यांना बोलायचे, ‘तुम्ही दोघी बहिणी, मग एकत्र खेळायचे, एकमेकांची काळजी घ्यायची.’ पण या सांगण्याचा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. आता हळूहळू लावण्यापण तिच्या त्या तिरकस वागण्यामुळे कमीच बोलायची. आई-वडिलांना वाटले कालांतराने हे सगळं ठीक होईल. सध्या दोघी लहान असल्यामुळे, हट्ट धरून बसल्या असतील. 


दिवसामागून दिवस गेले. सौंदर्या फार जोमाने अभ्यासाला लागली होती. क्लासमध्ये जशी दोघींची प्रतिस्पर्धा सुरु झाली होती. शिक्षक वर्गामध्ये जेव्हा कधी मुलांना प्रश्न विचारच्या, तेव्हा कोण आधी हात वर करून उत्तर देतं, याची त्या दोघींमध्ये होड लागायची.


सहामाही परीक्षा झाली, त्यामध्ये कोण्या विषयात लावण्याला जास्त गुण, तर कोण्या विषयात सौंदर्याला. मात्र एका टक्क्याने सौंदर्याला लावण्याने पछाडले; तेव्हा ते सौंदर्याला खपले नाही. मात्र आई-बाबांना तर कौतुक होते, कारण एक मुलगी क्लासमध्ये अव्वल होती आणि दुसरी मुलगी दुसऱ्या क्रमांकावर. पण सौंदर्याला त्यात समाधान नव्हते; आई-बाबांना तिला फार समजावे लागले, तेव्हा तात्पुरती ती सामान्य झाली.


पण दोघींचे शीतयुद्ध सुरूच होते. वार्षिक परीक्षा जवळ आली. दोघीही एकमेकींना पछाडण्यासाठी जोमाने तयारीला लागल्या होत्या. रोहन अधूनमधून खेळायला बोलवायचा तेवढ्यापुरत्या त्या खेळायच्या; पण कधी कधी दोघींपैकी एकीने जरी आभ्यास करायचे ठरवले, तर दुसरी ते बघून खेळायला जायची नाही.


वार्षिक परीक्षा झाली. निकाल आला; त्या वेळेस प्रथम सौंदर्याने लावण्याला पछाडले. लावण्याला पछाडून सौंदर्याने तिचे लक्ष पूर्ण केले होते. त्याचा तिला फार आनंद झाला. सौंदर्याचे आनंदी असणे म्हणजे लावण्याला खिजवल्याप्रमाणे भासू लागले. 

आई-वडिलांना आता मात्र चिंता वाटत होती, कारण या प्रतिस्पर्धेचा अंत त्यांनाही ठाऊक नव्हता. शेवटी त्यांच्या वडीलांनी शाळेत दोघींना वेग-वेगळ्या वर्गात सामील करण्याची शिफारस मुखाध्यापकांकडे केली आणि त्यांन

ी ती मान्य केली. लावण्या रोहनच्या वर्गात, ६ब मध्ये गेली. त्यानंतर दरवर्षी दोघी आपापल्या क्लासमध्ये अव्वल यायच्या; पण त्यामध्येही कोणाला किती गुण जास्त, यावरून दोघी एकमेकींबरोबर तुलना करायच्या. 


दहावीमध्ये दोघीनींही चांगले गुण मिळवले आणि बारावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. मात्र तिथेही वेगवेगळ्या वर्गात.

दोघीही तारुण्याच्या उंबरठ्यावर होत्या. वयात आलेली सौंदर्या आणखीनच सुंदर दिसायला लागली होती. तिच्या पांढऱ्या हळदीसारख्या अंगावर वेगळाच निखार दिसत होता. तिच्या नारंगी ओठांना कोणत्याही लिपस्टिकची गरज भासत नव्हती. तिच्या हसऱ्या चेहऱ्यावरील गालाची खळी कोणत्याही तरुणाला घायाळ करील अशी होती. एखाद्या नटीलासुद्धा लाजवेल असे तिचे रूप होते. कोणतीही नजर तिला चुकवू शकत नव्हती. तिची एक नजर, कोण्याही तरुण हृदयाचे ठोके चुकवायला पुरेसी होती. आणि तिला हे चांगलेच ठाऊक होते. त्यामुळे तिला तिच्या रूपाचा अहंकार असल्याचे तिच्या व्यक्तिमत्वात झळकत होते.


या विपरीत लावण्याचा निर्जीव, असामान्य चेहरा, हा सहानुभूतीचा पात्र ठरत होता. पण तिचे पाणेदार डोळे मात्र फार बोलके होते. तिच्या मनातील भावनांचा आलेख तिच्या डोळ्यांमध्ये दिसत असे. 


वयाच्या या टप्प्यावर येईपर्यंत पदोपदी तिला बरेच असे अनुभव आले होते, ज्यांनी तिला तिच्या कुरूप होण्याची जाणीव करून दिली होती. याची छाप तिच्या मनावर अशी पडली की, कारण नसतानाही प्रत्येक अनोळखी नजरही जशी तिला हीन लेखत आहे, असे भासायचे. त्यामुळे अशा नजरा टाळण्याकरिता ती, स्वतःची नजर नेहमी खाली ठेवायची. पण तरीही तिच्या हृदयात कुठे तरी आशेचा दीप तेवत होता. आता कुठे आयुष्याच्या नवीन अध्यायाला सुरुवात झाली होती. स्वकर्तृत्वावर आयुष्यात काहीतरी मोठे करू, याची तिला खात्री होती. त्यामुळेच नंतर लावण्या बारावीत शाळेत प्रथम आली. दोघीनींही इंजिनीअरिंग एंट्रन्सला चांगला स्कोर केला होता. 

 

बारावी नंतर जेव्हा इंजिनीअरिंग कॉलेजला ऍडमिशनची वेळ आली, तेव्हा शहरातील सर्वात उत्तम कॉलेज दोघींनाही हवे होते; आणि दोघींची शाखाही एकच (कॉम्प्युटर इंजिनीअरिंग) असल्यामुळे, त्यांना एकाच वर्गात प्रवेश घ्यावा लागला. ऍडमिशन झाल्यावर, दोघी वडिलांबरोबर एकदा कॉलेज बघायला गेल्या होत्या. कॉलेजची ती भव्य इमारत बघून दोघी फार उत्साहित झाल्या. कॉलेजची वास्तू ५० वर्षे जुनी, दगडी बांधकामाची होती. कॉलेजचा परिसर बराच मोठा होता; त्यात सभोवताली जुनी मोठाली दाट झाडे, इमारतीचे आणि त्या परिसाराचे सौंदर्य वाढवीत होते. कॉलेजच्या प्रवेश द्वारातुन आत शिरताच मध्यभागी एक मुख्य इमारत होती. तिथे कॉलेजचे ऑफिसेस, स्टाफचे केबिन्स होते. त्या इमारतीच्या दोन्ही बाजूला काही अंतरावर इतर इमारती होत्या. 


प्रत्येक इमारत ही दगडी बांधकामाची आणि तेवढीच भव्य होती. प्रत्येक इमारतीला, त्या इमारतीसोबत धावत असलेले व्हरांडे, त्यात प्रत्येक १० फुटला असलेले दगडी खांबांची रांग छताला आधार देण्याबरोबरच, त्या इमारतीची शोभा वाढवीत होते. 


हे सगळं बघून त्या आणखीच हूरुपल्या आणि कॉलेज सुरु होण्याची वाट बघू लागल्या.


काही दिवसात कॉलेज सुरु होणार होते. पुस्तकांबरोबर दोघींनीही स्वतःसाठी कपडे, मेकअप खरेदी केले. शाळेतल्या त्या विटाळवाण्या पोशाखापासून आता मुक्तता झाली होती. 


कॉलेज जीवन म्हणजे, स्वछन्दता; यौवनाच्या उंबरठ्यावर मिळालेला मोठासा कोरा कॅनव्हास, ज्यावरती आपल्या भावनारुपी, स्वप्नरुपी, आकांक्षारुपी, ब्रशने हवे ते रंग उधळायचे. ७० एमएमची अशी फिल्म ज्यामध्ये रोमान्स, ऍक्शन, ड्रामा हे सर्व बघायला मिळण्याची संभावना होती. दोघीही कॉलेजला जाण्यासाठी आतुर झाल्या होत्या. 


स्वछन्दपणे नवीन जगात भरारी घ्यायला त्या उत्सुक होत्या. कल्पनांची विमाने मनाच्या नभात त्या उडवू लागल्या होत्या. आणि आपापल्या स्वप्नामध्ये फार हरवून गेल्या होत्या. 

 

कॉलेजच्या पहिल्या दिवशी, दोघी नटून थटून कॉलेजला जायला निघाल्या. एकत्र न जाता घरून वेगवेगळ्या निघाल्या. सौंदर्या ऑटोने, तर लावण्या सिटी बसने कॉलेज करिता निघाली. जून महिना लागून गेला होता. पावसाच्या सरींनी भेट दिली होती. मातीचा सुगंध मनातील उत्साहाला द्विगुणित करीत होता. सौंदर्या ऑटोने आधीच कॉलेजला पोहोचली होती; मात्र बस ट्रॅफिकमध्ये अडकल्याने लावण्याला पोहोचायला उशीर झाला होता. 


आज पहिला दिवस असल्यामुळे प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांना ऑडीटोरीयममध्ये जमायचे होते. तिथे कॉलेजचे डीन विद्यार्थ्यांना संबोधन करणार होते. 


लावण्या कॉलेजला पोहोचली व घाईघाईत मुख्य इमारतीत प्रवेश केला. तिला पोहोचायला उशीर झाला असल्यामुळे, प्रथम वर्षाचे कोणीच विद्यार्थी तिथे दिसत नव्हते. व्हरांड्यातून जात असलेल्या एका स्टाफला तिने ऑडिटोरियमचा पत्ता विचारला. मुख्य इमारतीच्या मागील भागात, एका उभ्या रेषेत असणाऱ्या इमारतीनंतरच्या इमारतीत ऑडिटोरियम असल्याचे त्याने सांगितले. ती घाईघाईत तिकडे निघाली. त्या इमारतीच्या व्हारांड्यात पोहोचल्यावर, तिथे बऱ्याच इतर दालनांची दारे तिला दिसली. त्यामुळे नेमके दार कोणते, हे तिला ठाऊक नव्हते. एका दालनात शिरली, तर तिथे मोठी लायब्ररी होती. पुन्हा बाहेर येऊन उशीर झाल्यामुळे, व्हारांड्यातून घाईत इकडून तिकडे धावत प्रत्येक दालन बघायला लागली; आणि अचानक एकाला जाऊन धडकली. तिच्या तोंडून लगेच “सॉरी” निघाले. तिने वळून बघितले तर, समोर एक उंचपुरा, सुंदर तरुण उभा होता.


चेहऱ्यावर स्मित हास्य करीत तो म्हणाला, “इट्स ओके.” कोणत्याही तरुणीला अपेक्षित असे त्याचे रूप होते. ते असूनसुद्धा त्याच्यात जराही अहंकार दिसत नव्हता. त्याच्या डोळ्यांमध्ये तिला आदर, नम्रता दिसत होती. त्याला बघून ती काही सेकंद स्तब्ध झाली. शांतता तोडत दोघांच्या तोंडून निघाले “ऑडिटोरियम!…” आणि दोघेही हसले.


“हाय! मी पराग, फर्स्ट इयर.” तो तरुण स्वतःचा परिचय देत म्हणाला. 


लावण्या थोडी कचकत, “मी लावण्या, फर्स्ट इयर”. 


पराग म्हणाला, “नाईस टू मीट यू!... मी पण ऑडिटोरीयमकडेच निघालो, शेवटून दुसरे दार… लेट्स गो!” 


लावण्या त्यावर काही न बोलता त्याच्या बरोबर चालत ऑडीटोरीयमला निघाली. तिला परागला बघून काय बोलावे सुचलेच नाही. दोघे ऑडिटोरियममध्ये पोहोचले. आत अंधार होता, स्टेजवरती भाषणे सुरु होती. पराग मोबाइलचा टॉर्च ऑन करून सीट शोधायला लागला. मधेच त्याला त्याचा एक मित्र भेटला. त्याच्या शेजारी काही सीट्स खाली होत्या. पराग आणि लावण्या एकमेकांच्या शेजारील सीटवरती बसले. थोड्या वेळात भाषणे संपली. ऑडिटोरीयमच्या आतील दिवे लागले. कार्यक्रम सुरु होण्याआधीच, विद्यार्थ्यांना त्यांच्या शाखेनुसार समूह करून बसण्याची सूचना केली होती. पण लावण्या आणि पराग उशिरा आल्यामुळे त्यांना हे ठाऊक नव्हते. कार्यक्रमानंतर शाखेचे प्राध्यापक त्यांच्या-त्यांच्या शाखेच्या विध्यार्थ्यांना कॉलेज कॅम्पस, लॅब्स, क्लास रूम दाखवणार होते. 


लावण्या परागच्या समुहाबरोबर बाहेर पडली. प्राध्यापक त्यांच्या समूहाला घेऊन त्यांची कार्यशाळा आणि डिपार्टमेंट दाखवायला घेऊन गेले. लावण्या चकित होऊन हळूच परागला म्हणाली, “हे आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट का दाखवत आहेत?”


पराग “मग! तू पण इलेक्ट्रॉनिक्सलाच आहेस ना?”


“नाही! मी कॉम्प्युटरला”


पराग, “ओह! सॉरी मी तुला विचारलेच नव्हते; पण आम्ही सगळे इलेक्ट्रॉनिक्सला आहोत.”


लावण्या चिंतेने, “माझा क्लास कुठे असेल? मी आता त्यांना कुठे शोधू! मला टीचर्स काय म्हणतील.”


तिची चिंता बघून पराग धीर देत म्हणाला, “आपण शोधू त्यांना. नको काळजी करू.” परागने त्याच्या एका मित्राला खुणावत बोलावले आणि त्याच्या कानात काहीतरी सांगून, प्राध्यपकाचे लक्ष चुकवीत, तो लावण्याला घेऊन तिच्या कॉम्प्युटर शाखेच्या समूहाला शोधायला निघाले. काही वेळात ते दोघे कॉम्प्युटर डिपार्टमेंटला पोहोचले व तिथे तिला तिच्या वर्गातील विद्यार्थी दिसले. पराग लावण्याचा निरोप घेत, “ते तुझे क्लासमेटस, मी निघतो आता, भेटू नंतर.”


लावण्याला चिंतीत बघून परागचे असे मदत करणे, तिच्या मनाला स्पर्शून गेले होते. 


तिच्या ध्यानात आले की, ती त्याचे आभार मानायला विसरून गेली होती. मनोमन तिने त्याचे आभार मानले. 


लावण्या तिच्या समूहात सामील झाली. तिथे सौंदर्या आधीच त्या समूहात होती. तिच्या जवळ जात लावण्या हळूच म्हणाली, “तू मला का नाही बोलावले, मी चुकून दुसऱ्या ग्रुपबरोबर गेले होते.”


त्यावर तिरकसपणे उत्तर देत सौंदर्या म्हणाली, “कोणी सांगितले तुला उशिरा यायला!”


लावण्याला जाणवले की सौंदर्यापासून कोणतीही अपेक्षा करणे चुकीची आहे. कारण ती सौंदर्यासाठी फक्त एक प्रतिस्पर्धी होती. 

 

क्रमशः


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama