Suresh Kulkarni

Abstract

2.1  

Suresh Kulkarni

Abstract

कायाकल्प!

कायाकल्प!

23 mins
1.9K


आज कौसल्याबाईंना ते पुन्हा जाणवले. पांघरून नेहमीचेच होते. पूर्वी कधी, ते झोपताना डोक्यावरून घेतले की, पाय बाहेर जात नसत. हल्ली बरेचदा पाय बाहेर जात होते. काहीतरी बदलत होत. नक्की काय हे त्यांना कळेना. आज डॉक्टरांना सांगायला हवं. 

कौसल्याबाई वय वर्ष पंच्चावन. सुखवस्तू घरातील. नवरा लवकर गेला. शरयूच -मुलीचं-करियर घडवलं. हाल अपेष्टा सोसल्या. आता त्या तश्या सुखात होत्या. शरयू न्यूयार्कला होती. तिची काळजी नव्हती. तरी त्यांना एक खन्त होतीच. फक्त पंच्चावनीत त्यांच्या चेहऱ्यावर, सुरकुत्यांनी जाळे विणायला सुरवात केली होती! कंबरदुखी, गुडघेदुखी, थकवा, चालतानाची लागणारी धाप या व्यथा त्यांनी स्वीकारल्या होत्या. पण अकाली झालेला म्हातारा चेहरा! तो त्यांना नको होता! त्यांच्याच वयाच्या त्यांच्या मैत्रिणी, योगा, जिम, डाएट, काय काय करून मस्त मेंटेन करून होत्या. आहेत त्या पेक्षा, चार सहा वर्षांनी तरुण दिसायच्या. त्यांना काही टिप्स विचारल्या तर म्हणायच्या 'अग, इतकं काय त्या चार सुरकुत्यांचं मनाला लावून घेतसे? वयोमानाप्रमाणे हे होतच. अजून दहा एक वर्षांनी, आम्हाला पण हे फेस करावंच लागणारच आहे! ' चोम्बड्या मेल्या! सहानुभूतीच्या नावाखाली -तू दहा वर्षांनी बुड्डी दिसतेस -हेच सुचायच्या! पण शरीने अमेरिकेतून डॉ. राजेंचा पत्ता पाठवला होता, दोन वर्षा खाली. तिनेच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली होती. आणि त्यांनी डॉ. राजेंची ट्रीटमेंट सुरु केली होती. सावकाश का होईना, त्यांच्या कायाकल्पास सुरवात झाली होती. नो जिम, नो योगा, नो डाएट! फक्त एक इंजेक्शन मानेच्या मागे! ते हि तीन महिन्यातून एकदा!

                                                                              ००० 

डॉ. राजे. अस्ताव्यस्त केसांचा, उंच आणि स्लिम, गबाळा राहणी असणारा माणूस! बारीक सोनेरी काडीच्या चष्म्यातून लुकलुकणारे निरागस निळसर डोळे! पण हा साठीतला गृहस्थ, त्याच्या म्हणजे -डर्माकोलॉजितला 'बाप' माणूस! एक प्रस्त! जिनियस! आणि संशोधक! 

नेहमीचे स्किन सॅम्पल, आणि ते मानेतील इंजक्शन देऊन झाल्यावर, डॉ. राजेंनी कौसल्याबाईंच्या हातावरच्या आणि डोळ्या जवळच्या सुकुत्यांचं निरीक्षण करून पाहिलं. आणि समाधानाने मान हलवली. नजरेत न भरणारी असली तरी, प्रगती होतीच. आज त्यांनी मुद्दाम आज जरा ज्यास्त कॉन्सन्ट्रेशनचा डोस दिला होता. जेणेकरून रिझल्ट लवकर मिळतील. 

"कौसल्याबाई, तुम्हाला या तीन महिन्यात काही बदल वाटतोय का?"

"हो तर! मी ते सांगणारच आहे. माझे पाय पाघरुणा बाहेर जातात हल्ली!" 

"अजून?" काय सांगावं, हे हि या बाईला काळात नाही, अशा नजरेने पहात डॉक्टरांनी विचारले. 

"मला, न काही तरी वेगळंच वाटतंय!"

" म्हणजे? मला तर तुमच्यात काहीच वेगळं दिसत नाही."

"कसे दिसेल? मला आतून काहीतरी बदलत असल्या सारखे वाटतंय!"

"नक्की काय वाटतंय, सांगू शकाल?"

"मला न हल्ली, पूर्वी सारखं थकायला होत नाही!" हि सिमटम पॉसिटीव्ह असली तरी सायकॉलॉजिकल असावी, म्हाणून डॉक्टरांनी दुर्लक्ष केले. 

"मग चांगलंच आहे कि!"

"अजून, मला पूर्वी पेक्षा खूप एनर्जीटिक वाटतंय! गुडघेदुखी -कंबरदुखी पळून गेलीयय! तुमची औषध लागू पडताहेत! चेहरा पण जरा बरा दिसतोय!"

"ठीक आहे. पण फार स्ट्रेनिस म्हणजे थकवणार काही करू नका. कारण तुमचे हार्ट खूप वीक आहे. वर मधुमेह! तेव्हा जपून रहा."

कौसल्याबाई निघून गेल्या, त्या दिशेला पहात, 'वेडी बाई!' ते स्वतःशीच पुटपुटले. कारण ते जी ट्रीटमेंट देत होते, त्यात फक्त त्वचेच्या संबंधित औषधे होती. 

त्वचा हि शरीरातील बदलाशी संबंधित असते. वय वाढेल तसे शरीरातील अवयव क्षीण होत जातात. मग बाहय कातडीवरही, जरा किंवा झुरळया पडायला सुरवात होते. माणसाचा चेहरा 'म्हातारा' दिसायला लागतो. हे नैसर्गिकच असते. जर शरीरातील अवयवांचा आणि त्वचेचा असलेला संबंध तोडता आला तर? त्वचेचे वय थांबवता येईल. पुराणांतील वरा प्रमाणे माणूस 'अजरामर' नाही झाला तरी, 'अजर ' मात्र नक्की होवू शकेल! आणि यावरच डॉ. राजेंचे गुप्त संशोधन गेल्या दहा वर्षांपासून चालू होते! त्यांच्या अथक प्रयत्नांना यश येत होते! त्यांनी एक हार्मोन तयार केले होते. ते एकदा पाठीचा कणा आणि कवटीच्या जोडातून मेंदूत सोडले कि ते मेंदूवर आपला आमल सुरु करणार होते. मेंदू शरीरसंचलन करताना, त्वचेस न बदलण्याचे संकेत देणार होते! हे हार्मोन टप्या -टप्याने देत एका ठराविक वया पर्यंत त्वचा आली कि थांबायचे होते. 

                                                                             ००० 

मॉर्निगवॉक करून आलेलं डॉ. राजे आपले स्पोर्टशूज काढत असताना त्यांचा फोन वाजला. कौसल्याबाई? या वेळेस? आणि तेही पर्सनल फोनवर?

"हा, बोला कौसल्याबाई. आज सकाळीच? तेही माझ्या पर्सनल नंबरवर? काही विशेष?"

"सॉरी डॉक्टर, पण एक गोष्ट आत्ता माझ्या निदर्शनास आलीय. ती तुमच्या कानावर घालावी म्हणून फोन केला."

"काय?"

"माझ्या डोळ्या शेजारच्या त्या तीन सुरकुत्या अस्पष्ट झाल्यात!"

डोस देऊन आठवडाही झाला नाही अन परिणाम सुरु झाला? क्षणभर डॉक्टर विचारात पडले. 

"अहो, सकाळी चेहऱ्याचे स्नायू रिलॅक्स असतात, त्वचा आरद्र असते, त्यामुळे सुरकुत्या क्षीण दिसू शकतात! रात्री झोपताना पहा! अन हो, आत्ताचा एक सेल्फी काढून ठेवा! रात्रीची पण काढा!"

"काय म्हणता? सेल्फी काढू? अन त्याच काय करू?"

"मला पाठवा!"

"ई SSS श!!" कसल्याबाई फोनवर लाजल्या. 

"अरे देवा! अहो मला, झाला असेल तर, तो बदल कळवा, म्हणून सेल्फी पाठवा म्हणतोय!" खरच हि बया म्हणजे कठीण काम होते. 

                                                                            ०००  

 सकाळचा चहा झाला होता. कौसल्याबाईंनी स्वतःला समोरच्या पूर्णाकृती आरश्यात न्याहाळलं. आरशाच्या वरच्या चौकटीला त्यांचे प्रतिबिंब टेकले होते. पूर्वी दोन बोटांची फट रहायची! त्यांनी पुन्हा निरखून पहिले. बरोबर! पूर्वी कंबरदुखीमुळे त्या नकळत किंचित वाकून उभ्या राहत आणि चालत. आता तो त्रास नसल्याने त्यांच्या पाठीचा कणा ताठ झाला होता! डॉ. राजे म्हणजे साक्षात 'अश्विनीकुमार' होते! थँक्स डॉक्टर!

त्यांनी माळ्यावरचे, शरीने पाठवलेले स्पोर्टशूज काढले. धूळ झटकली, आणि ते पायात घालून त्या घराबाहेर पडल्या. हे शूज घातल्यावर त्यांना एकदम कॉलेजचे दिवस आठवले. रनिंगमध्ये मिळालेली असंख्य मेडल्स आणि त्या निमित्याने झालेले कौतुक पण आठवले! ते सोनेरी दिवस! तो 'त्याचा' उबदार सहवास! कुठे असेल सुरश्या, कोणास ठाऊक? पुन्हा ते दिवस परत यावेत, असे त्यांना प्रकर्षाने वाटले. किती तरी दिवसांनी, त्या अश्या सकाळच्या मोकळ्या हवेत निघाल्या होत्या. त्यांच्या सत्तर फ्लॅटच्या इमारती भोवती एक छोटासा जॉगिंग ट्राक होता. त्यांनी चार पावलं थोडेसे भरभर चालून पहिले. काही त्रास झाला नाही. 

"हाय, कौशल्यकाकू! आज एकदम फिरायला?" शेजारची मंजिरी, हाय करून जॉग करत पुढे निघून गेली. 

पुन्हा त्यांनी आठ दहा पावले जरा जोरात चालून पहिले. नो प्रॉब्लेम! पर्स मध्ये सॉरबिटॉटची गोळी असल्याची खात्री करून घेतली. वाटला त्रास तर घेऊ. थोडं जॉग करूयात! त्या जॉगिंग करून घरी आल्या तेव्हा तासभर उलटून गेला होता! थकवा वाटत नव्हता, उलट फ्रेश वाटत होते! उद्या रनिंग? पाहू करून! त्यांनी मनाशी ठरवून टाकले. 

                                                                            ००० 

डॉ. राजे डोळे फाडून कौसल्याबाईंनी पाठवल्या सेल्फी आहेत होते. तेव्हड्यात रोजी -त्यांची पीए -कुरियरने आलेले मुंबई आणि कलकत्ता लॅबचे कौसल्याबाईंचे स्किन रिपोर्ट घेऊन आली. ते मुद्दाम रिपोर्ट्स कुरियरने मागवत. कारण आजून त्यांचं संशोधन 'ऑफ लाईनच'ठेवायचे होते. 

" सर, काय इतकं त्या मोबाईलवर पहाताय?" रोजीने विचारले. 

"त्या कौशल्याबाईंनी त्यांच्या 'सेल्फी ' पाठवल्यात, त्या पहात होतो!" म्हातारा चळावला कि काय?

डॉक्टरांना बोलण्यात काहीतरी गल्लत झाल्याचे रोजीच्या चेहऱ्यावरून कळले. 

"नाही! म्हणजे मीच ते मागितले होते!" अजून गैरसमज! जाऊ दे. त्यांनी रोजीला फार स्पष्टीकरण देण्याचे टाळले. 

"रोजी, अशात म्हणजे, आपली ट्रीटमेंट सुरु केल्या पासून तुला त्या कौशल्याबाईत काही फरक जाणवतोय का?"

"हो! त्या हल्ली खूप ऍक्टिव्ह वाटतात. स्किन खूप फेयर वाटतीय, आणि त्यांचा आवाज आधी थोडा खर्जात होता, आत्ता तो खरखरे पण जाणवत नाही!" 

" थँक्स रोजी! यु मे गो!"

रोजी गेल्याची खात्री केल्यावर, त्यांनी नुकत्याच आलेल्या स्किन रिपोर्टमध्ये डोके घातले. अधून मधून ते कौसल्याबाईंची सेल्फी पहात होते. बाई बावळट होती. पण खरे बोलत होती! खरेच तिच्या कपाळावरली आणि डोळ्याच्या शेजारच्या सुरुकुत्या साठ टक्क्यांनी कमी झाल्या होत्या! शिवाय मुंबई रिपोर्ट प्रमाणे त्यांच्या कातडीचे वय अठ्ठेचाळी होते, तर कलकत्ता रिपोर्ट सत्तेचाळीस दाखवत होते! हा वैज्ञानिक पुरावा होता! ट्रीटमेंट सुरु केली तेव्हा दोन्ही लॅबचे रोपोर्ट पन्नाशी दाखवत होते! म्हणजे 'अजरत्वचा फार्मुला' हाती आला होता! आता काय? रिसर्च पेपर ऑर्गनाईझ करून लिहणे, मेडिकल मॅगझिनच्या देणे, मेडिकल कॉन्फरन्सेस मध्ये पेपर वाचणे, चर्चा तर होणारच, एखादे वेळेस -नोबल पण पदरी पडेल! जगभरातील औषध कंपन्या मागे लागणार, प्रसिद्धी, नावलौकिक, अन पैसाच - पैसा !!!- डॉक्टर विचारात गढून गेले. 

                                                                          ०००  

 नेहमीचे रुटीन चेकिंग आणि स्किन सॅम्पल दिल्यावर कौसल्याबाई या तीन महिन्यात झालेला बदल डॉक्टरांना सांगत होत्या. त्याची त्वचा खूप फेयर दिसत होती, आणि आवाजात गोडवा आला होता, हे रोजीचे निरीक्षण खरे होते. पण त्या, आज जे सांगत होत्या त्यावर डॉक्टरांचा विश्वास बसणे शक्यच नव्हते. 

"तुम्ही जे सांगताय त्यावर कसा विश्वास ठेवू?"

"अहो, इतकी आनंदाची बातमी आहे, आणि तुम्ही पुरावा मागताय?"

"अहो, तुम्ही रोज चार किलोमीटर, चालता किंवा जॉगिंग नाही तर रनिंग करता! एक हार्ट प्रॉब्लेम असणारी, छप्पन वर्षाची बाई, कसलाही सराव नसताना एक दिवस सकाळी उठून रनींगला जाते! यावर कोण विश्वास ठेवेल?"

कौशल्याबाईंनी शांतपणे मोबाईल काढला. त्यावरील फिटबीट हेल्थबॅन्डचे ऍपमधील रिझल्ट ओपन केले, आणि मोबाईल डॉक्टरांना दिला. गेला महिनाभराचे त्यावर, डेली स्टेप्स, रनिंग डेटा, जिने किती चढ उतार केले, पीकलेव्हलला असलेला हार्ट बिटिंग, हा सगळा पुरावा कौसल्याबाईंच्या बोलण्याचे समर्थन करत होता! हि बाई आपल्याला चिट तर करत नाही ना? हा एक वेडगळ विचार डॉक्टरांच्या मनात येऊन गेला. 

डॉक्टरांकडून मोबाईल परत घेवून कौसल्याबाई 'बाय' करून निघण्याच्या बेतात असताना, अचानक डॉक्टरांना ती गोष्ट खटकली. 

"कौशल्याबाई, थोडे ऑड वाटेल, पण विचारतो, तुमचे केस खूप सिल्की आणि शायनिंग दिसताहेत,हल्ली तुम्ही कोणता हेयर डाय वापरता?" ट्रीटमेंट साठी आल्या तेव्हा, त्याचे केस पिकल्याच डॉक्टररानी पाहिलं होत. 

" गेल्या दोन महिन्या पासून मी डाय वापरायचं सोडून दिलंय! माझे केस नैसर्गिक रित्या काळे होत आहेत!" क्षणभर डॉक्टरांच्या डोळ्यात रोखून पहात त्या म्हणाल्या आणि झटक्यात निघून गेल्या!

न्याचुरली केस काळे? हा, बरोबरच आहे! डोक्याची सुद्धा त्वचाच कि, त्यात हि बदल होणारच. सहाजिकच हेयर फॉलिकल्स डार्क पिगमेंट तयार करत असतील. केस काळे होणे अपेक्षितच होत. खरे तर कौशल्याबाई अकाली वृद्धत्वाची समस्या घेऊन त्यांच्या कडे आल्या होत्या. आणि डॉक्टरांनी फक्त आणि फक्त त्याचीच ट्रीटमेंट सुरु केली होती. हि चपळता, वाढता स्टॅमिना, कम्बर आणि गुडघेदुखी नाहीशी होणं, ते रनिंग, हे हे सारे अपिक्षित नसलेले बदल होते! काय होतंय हे दिसत होत, पण का होतय हे कळत नव्हतं! आपलं काही चुकतंय का? या विचारात डॉक्टरअसताना, अचानक कौशल्याबाई परत आल्या. 

"सॉरी डॉक्टर, माझी बॅग चुकून येथेच राहिली म्हणून यावं लागलं." त्या बसल्या होत्या त्या खुर्चीच्या पायाशी ठेवलेली पिशवी त्यांनी उचलली. घाईतउचलताना पिशवीचा एकच बंद हाती आल्याने, पिशवीतील वस्तू जमिनीवर सांडल्या. त्या वस्तू परत पिशवीत भरताना, एका वस्तूने डॉक्टरांचे लक्ष वेधून घेतले. 

"शरयू आली आहे का ?" त्यांनी विचारले. 

" नाही, का?"

" मग --- ते सॅनिटरी नॅपकिन्स?" डॉक्टरांनी अडखळत विचारले. 

"माझ्या साठीच! काल थोडं लागल्या सारखं वाटलं!" कौसल्याबाई जाताजाता म्हणाल्या. 

डॉक्टर मात्र वेड्या सारखे त्या गेल्या त्या दिशेला पहातच राहिले!

"सर, काय बाई आहे?" रोजीच्या प्रश्नाने डॉक्टर भानावर आले. 

"काय झालं?"

"सर, कौशल्याबाईंना हार्ट प्रॉब्लेम आहे ना?"

"हो. काय झालं?"

"मघाशी त्या, लिफ्ट बंद होती म्हणून चार मजले पायऱ्याचढून वर आल्यात!"

"काय?" अविश्वासाने डॉक्टर उद्गारले. 

                                                                            ००० 

कौसल्याबाईंच्या नुकत्याच आलेल्या स्किन रिपोर्टसनी डॉक्टरांची  'काहीतरी चुकतंय,' हि शंका अधिक दृढ केली. त्या रिपोर्ट नुसार सॅम्पल स्कीनचं वय होते चाळीस! त्वचेचं वय थांबणे अपेक्षित असताना, ते कमी होत असल्याचे संकेत मिळत होते! काही दिवसापूर्वी झालेल्या आनंदाची जागा आता काळजीने घेतली होती. हार्मोन प्रोसेसची पुन्हा खातरजमा करणे गरजेचे होते. काहीतरी चुकत होते एव्हडे मात्र खरे होते. 

त्यांनी तडक आपल्या बंगल्यातले ग्यारेज गाठले. त्याच्या बेसमेंट मध्ये त्यांच्या लॅबचा पसारा होता. त्यांनी लॅब अनलॉक केली. आत नेहमीचेच वातावरण होते. नेहमी प्रमाणे, आतील इलेकट्रोनिक्स मशीनरीची असेंब्ली, एका लयीत आणि मंदपणे धडधडत होती. एका कोपऱ्यात 'जुही ' आणि 'रंभा ', या दोन माकडिणीनचा पिंजरा होता. त्या हार्मोनचा प्रयोग त्यांच्यावर यशस्वी झाला होता. त्या नॉर्मल होत्या. कौसल्याबाईन सोबत जुही आणि रंभेला पण ते 'तो ' स्किन अँटीएजिंगचे हार्मोन देत होते. त्यांच्या कातडीचे वय गेल्या सात वर्षांपासून वाढले नव्हते. मग मानवी शरीराचा प्रतिसाद का विपरीत येत होता? 

डॉक्टरांनी सर्वप्रथम चार दिवसाखाली कौसल्याबाईंना दिलेल्या लॉटमधले हार्मोन अंपुल रेडिएशन साठी ठेवले होते, ते मशीन मधून काढले. 'जुही'ला पॅरोलाईज करून, तिच्या मानेत टोचले. तिला तिच्या पिंजऱ्यात अलगद ठेवून दिले. मग त्यांनी मशीनमध्ये वापरले जाणारे, बायोइन्पुट्स चेक केले. सर्व स्पेसिफिकेशन परफेक्ट होते, अगदी नॅनो डिजिट पर्यंत! मग त्यांनी त्या सोफिस्टिकेटेड असेंब्लीच प्रत्येक पार्ट काळजी पूर्वक तपासला. कोठे ओव्हरफ्लो किंवा लिकेज नव्हते. सगळंच व्यवस्थित होत. मग असं का व्हावं? ते विचार मग्न होऊन, ठिकठिकाणी जोडलेल्या डाटा प्रोसेसिंगच्या इलेकट्रोनिस इंडिकेटरच्या लुकलुकत्या दिव्यांकडे पहात राहिले. मेकॅनिकल लूप होत तर दिसत नव्हता, पण एखादा सॉफ्टवेयर डिफेक्ट असेल तर?

त्यांनी ती असेम्ब्ली, ज्या कंपनीने त्यांच्या साठी स्पेसिफिकली बनवली होती, तिला फोन करून आपली शंका बोलून दाखवली. त्याच दिवशी कंपनीचे दोन तरुण तंत्रज्ञ तातडीने फ्लाईट मध्ये बसले होते.

काही हि झाले तरी या हार्मोनचा ऍंटीडोस तयार करणे गरजेचे होते. कौसल्याबाईंना दिलेल्या डोसमध्ये काही तरी बिनसले असावे याची खात्री आता डॉक्टरांना वाटू लागली होती. आणि तसेही कुठल्याही मेडिसिनचा अँटीडोस गरजेचा असतो. 

                                                                           ०००  

डॉ. राजे क्लिनिकला आल्याबरोबर त्यांनी रोजीला इंटरकॉम करून बोलावून घेतले. 

"रोजी, हि यादी. यातील सर्व साहित्य ताबडतोब मागवून घे!"

रोजीने ती यादी नजरेखालून घातली. त्यात क्वचित लागणारी आणि अतिशय महागडी औषधे होते. त्यातली काही ड्रग्स तर, डॉक्टरांनी गेल्या पाच वर्षात एकदाही वापरलेली नव्हती!

"सर, यातील बहुतेक ड्रग्स आपल्याला लागत नाहीत. खूप कॉस्टली आहेत म्हणून विचारतीयय!"

"रोजी, यु नो, आपण जे अँटीएजिंग स्किन हार्मोन बनवलाय, त्याचा अँटीडोस तयार करायचा आहे. त्यासाठी हे ड्रग्स गरजेचे आहेत."

"अँटी डोस कशाला? ते तर खूप सेफ आहे! आपण खूप काटेकोर चाचण्या घेतल्या आहेत!"

"ते जरी खरं असलं तरी, एका रिसेन्ट केस मध्ये मला अनपेक्षित परिणामाची शंका येतीयय! आपल्या हार्मोनमुळे फक्त स्किन एज थांबणे अपेक्षित आहे. पण त्या केस मध्ये स्किनएज थांबतच नाही तर कमी होतंय!"

" रिसेन्ट केस म्हणजे, कौसल्याबाईंची का?"

"शट-अप रोजी! कितीदा तुला सांगितलं आपल्या संशोधनातील पेशंटची नाव घ्यायची नाहीत! कोणी ऐकलं तर? अजून आपलं संशोधनाला वैद्यकीय  क्षेत्राची स्वीकृती नाही!" डॉक्टर भडकले. 

"सॉरी सर, आपण दोघेच आहोत म्हणून मी बोलून गेले." 

" ठीक, या पुढे लक्षात ठेव!"

रोजी डॉ. राजेंच्या केबिन मधून बाहेर पडली. समोरच्या मेन एंट्रन्स मधून घाईघाईने लिफ्टकडे जाताना पाठमोऱ्या कौसल्याबाई तिला ओझरत्या दिसल्या! Wow! परफेक्ट फेमाईन फिगर, ग्रेसफुल चाल! रोजीला क्षणभर त्यांचा हेवा वाटला!

                                                                         ००० 

कौसल्याबाईनी घरी आल्याबरोबर ऑनलाईन न्यूयार्कची फ्लाईट बुक केली. भराभर पॅकिंग करून घेतले. घराजवळच्या बँकेत त्याचे खाते होते. त्यातून होते तितके म्हणजे साडेतीन लाख रुपये काढून घेतले. तडक त्यांनी इंटरनॅशनल एअरपोर्ट गाठले. एक्सचेंज कॉउंटरवर जवळचे रुपये, डॉलरमध्ये बदलून घेतले. रात्री साडेअकराच्या बोईंग मध्ये त्या बसत होत्या, तेव्हाच डॉ. राजेंनी फोन केलेल्या कम्पनीचे दोन इंजिनियर्स एअरपोर्ट बाहेर पडत होते! काही क्षणात कौसल्याबाईंनी भारत सोडला होता!

                                                                        ०००  

ते दोघे इंजिनियर्स साधारण आठरा तास डॉ. राजेंच्या लॅब मध्ये होते. त्या दोघांनी प्रथम ती असेम्ब्ली बंद करून, हार्मोन सिंथसायझिंगची प्रोसेस थांबावी. असेंब्लितली प्रत्येक मशीन, मशीन मधला प्रत्येक पार्ट, प्रत्येक कनेक्शन, वायरिंग, सॉफ्टवेरचेजोड तपासून पहिले. सगळं ओके! मग त्यांनी सॉफ्टवेयरचे प्रोग्रामिंग चेक केले. नो लूपहोल! शेवटी दोष सापडला तो शेवटच्या रेडिएशन युनिटला जोडलेल्या इंडिकेटर मध्ये! लास्ट स्टेजला हार्मोन, कितीही काळ रेडिएशनला एक्सपोज होते, हे दाखवणारे इंडिकेटर अपेक्षित रिडींग दाखवत असले तरी, ते बंद पडले होते! कौसल्याबाईंना दिलेले हार्मोन ओव्हर ऍक्टिव्हेटेड होते! जुही ते रेसिस्ट करू शकली होती, म्हणून ती स्टेबल होती!

                                                                       ००० 

दुसरे दिवशी, सक्काळीच डॉ.राजे क्लिनिकला आले. त्यांनी कौशल्याबाईंना फोन लावला. मोबाईल लागेना. स्वीचऑफ! मग त्यांनी लँडलाईन ट्राय केला. नुस्ती रिंग वाजत होती. कुठे गेली हि बया? बहुदा रनिंगला गेली असेल! पण तासाभरानेही त्यांना कौशल्याबाईंना कॉन्टॅक्ट करता आला नाही, मग त्यांनी रोजीला त्यांनी फोन केला.

"रोजी, क्लिनिकल येताना कौशल्याबाईंना गाडीत घालून आण! ती बया फोनवर सापडत नाहीय! म्हणून तुला सांगतोय!"

आज डॉक्टर कौशल्याबाईंना एका वेगळ्या अँगलने तपासायचे होते. त्या ओव्हरऍक्टिव्हेटेड हार्मोनने मेंदू मार्फत शरीरात काय थैमान घातले आहे हे पहायचे होते. 'जुही' ते हार्मोन एक तर रेसिस्ट करू शकणार होती, किंवा तिच्यावर परिणाम उशिरा दिसणार होते. 

'माझ्या साठीच!' म्हणून सॅनिटरी पॅड्स पिशवीत घालतानाच्या कौसल्याबाई! डॉ. राजेंच्या नजरेसमोर हालत नव्हत्या. त्या वेळेसची, ती त्यांच्या डोळ्यातली चमक, गालावरली आणि नाकाच्या शेंड्यावरली लकाकी, त्याच्यातील तारुण्याची साक्ष देत होती! त्यांचं ते रनिंग, जिनेचढ़ण, 'मला आतून बदल्या सारखं वाटतय !' म्हणणं, हे सगळं या ओव्हर ऍक्टिव्ह हार्मोन मुळेच होत! रोजी हात हलवत आली. 

"सर, त्या घरी नाहीत. कालच त्या बॅगा घेऊन घराबाहेर पडताना फ्लॅटच्या सेक्युरिटीला दिसल्या!"

डॉक्टरांनी कपाळाला हात लावला! शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी अमेरिकेत शरयूशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. कौशल्याबाईंच्या त्वचेचं वय नव्हे तर, त्यानचेच ऍज रिव्हर्स होत आहे कि काय? हि शंका डॉक्टरांना बेचैन करत होती!

                                                                            ०००  

कौसल्याबाई स्वतःला गरम कपड्यात लपेटून सोफ्यावर बसल्या होत्या, आणि शरयू त्यांच्या समोर जमिनीवर फतकल मारून बसली होती. 

"आई, मला अजूनही वाटतंय कि तू चूक करत आहेस! तू डॉ. राजेंच्या संपर्कात असायला हवास! असा अचानक, तू भारत सोडायला नको होतस!" 

"नाही शरे! माझा निर्णय योग्यच होता! माझ्या नशिबानं म्हण कि, डॉ. राजेंच्या गाढवपणान म्हण, मला माझं हरवलेले तारुण्य परत मिळतंय! आणि ते मला हवंय! मी पुन्हा राहून गेलेले जगणार आहे! केलेल्या चुका टाळून जगणार आहे! मूर्खपणें लाथाडलेली सुख पुन्हा उपभोगणार आहे! 'लोक काय म्हणतील?' या पोकळ भीती पायी, राहून गेलेलं मी पुन्हा जागून पहाणार आहे! आजच तुम्हा तरुणांचं 'जग' आणि 'जगणं ' मला जगायचंय! नियतीने दिलेली संधी मी दवडणार नाही! तो डॉक्टर मला ऍंटीडोस देऊन पुन्हा म्हातारी करण्याच्या विचारात होता! मी त्याला रोजीशी बोलताना ऐकलंय! आणि म्हणून मी अशी तडकाफडकी निघून आले! मी त्याचा फोन नंबर ब्लॉक केलाय! तू हि कर! मी येथे असल्याचे सांगू नकोस!" कौसल्याबाईंनी शरयूला निक्षून सांगितले. वाव! शी इस रियली लकी! शरयूला आईचा मुद्दा पटला होता!

खरेच नियतीने 'संधी' दिलीयय का, 'शाप ' हे येणारा काळच ठरवणार होता!

                                                                            ०००

निसर्गच्या नियमाविरुद्ध मिळालेल्या आदेशाचा मेंदूने स्वीकार केला होता! म्हणूनच शरीरातल्या प्रत्येक पेशीला ते आदेश मिळत होते! आणि त्यांचे पालन केले जात होते! यातून त्या मेंदूच्या पेशी सुद्धा सुटल्या नव्हत्या! कौसल्याबाईंचे वय झपाट्याने कमी होत होते. शरयूला आईला सोबत नेताना सुरवातीस कौतुक वाटायचे, मग हेवा वाटू लागला आणि आता तर तिला काळजी वाटू लागली होती. कारण त्या आता तिच्या लहान बहिणी सारख्या भासू लागल्या होत्या! सुरवातीला मी लाईफ पुन्हा एन्जॉय करीन म्हणणाऱ्या कौसल्याबाई, हल्ली उदास अन एक्कलकोंड्या होत होत्या! त्यांच्या गालावर पिंपल्स गर्दी करत होते! 

एक दिवस आपला हात दाराच्या वरच्या बोल्ट पर्यंत पोहचत नाही, त्या साठी टाचेवर उभे रहावे लागते हे कौसल्याबाईंच्या लक्षात आले. त्यांनी भिंतीला टेकून उंची मोजली. तीन इंचाने उंची कमी भरत होती! रोजच्या वापरातले कपडे मोठे होऊ लागले, शूज पण मोठे होत होते. 

आता मात्र शरयूने धीर सोडला. फारकाळ थांबणे तिला शक्यच नव्हते. आई झोपली असताना, एके रात्री तिने डॉ.राजेंना रिंग केली. 

" डॉक्टर, आईच काय करू?"

"अहो, कुठं आहेत त्या? अन काय झालंय? मला न सांगता त्या अचानक बेपत्ता झाल्यात!"

"तीच चुकलंच! सॉरी! पण ---"

"पण काय?"

"अहो, तुमच्या ट्रीटमेंटने तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्याच, नाही तर वय पण कमी होतंय! काय दिलंत तुम्ही तिला? मी काय करू शकते तुम्हाला कल्पना आहे ना?" शरयूने एकदम आक्रमक सूर लावला. 

"मिस! मला दोष देऊ नका! आता माझे ऐका! नंबर एक, तुमच्या आई, माझी ट्रीटमेंट अर्धवट सोडून निघून गेल्या. दुसरे, ट्रीटमेंट सुरु करण्यापूर्वी 'हा उपचार, मी  माझ्या जवाबदारीवर घेत आहे, त्याचे बरे - वाईट झालेल्या परिणामास डॉक्टर किंवा त्यांचा कर्मचारी वर्ग जवाबदार रहाणार नाहीत.' हे त्यांनी लिहून दिलीय!"

"पण तिचे कमी होणारे वय थांबवावे लागेल ना?" शरयूचा आवाज नरमला होता. 

" तेच तर मी म्हणतोय! मी त्यांच्या साठी ऍंटीडोस तयार करून ठेवलाय! त्यांना ताबडतोब घेऊन या क्लिनिकला!"

"डोंबल! कशी आणू? पासपोर्ट, पंचावन्न वर्षाच्या कौसल्याबाईचा अन कौशल्याबाई विशीतल्या! येथे डोमॅस्टिक फ्लाईटला अडथळे येताहेत, भारतात कशी आणू? त्या पेक्षा तुम्हीच या, तो ऍंटीडोस घेऊन अमेरिकेला!"

"ते हि शक्य नाही! तो डोस मायनस पन्नास डिग्रीला फ्रीज केलेला असतो. वापरण्यापूर्वी तो ऍक्टिव्हेट करावा लागतो! त्याला बहात्तर तास लागतात आणि तो ऍक्टिव्ह डोस चाळीस मिनिटात द्यावा लागतो! आणि ते फक्त माझ्या लॅब मध्येंच शक्य होईल!"

"मग, आता हो काय करायचं?" शरयूचा आवाज रडवेला झाला होता. 

"शरयू, तुम्ही आधी शांत व्हा. सत्य स्वीकारा. त्यांचं वय अजून किती कमी होईल हे मला नाही सांगता येत! येथे क्लिनिकला असत्या तर---- पण आता त्याचा उपयोग नाही. मी सांगतोय ते नीट ऐका." नंतर डॉक्टर बराचवेळ बोलत होते. त्यांच्या प्रत्येक वाक्यगणिक, आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय याची कल्पना शरयूला येवू लागली. ती नखशिखांत हादरत होती! कारण ते सत्य असले तरी, भयानक होते!

"आता मी काय करू?" शरयू खचून गेली होती. जगातल्या सगळ्या, सर्वोत्तम वैद्यकीय सेवा अमेरिकेसारख्या प्रगत देशात सज्ज असताना, तिच्या आई साठी त्या निकामी होत्या! तिचा इलाज फक्त डॉ. राजेच करू शकणार होते. हे सगळं कॉऊंसिलरला समजावून सांगून भारतात जाण्याची परवानगी मिळवणं वेळ खाऊ होत, आणि सहजासहजी तिच्या म्हणण्यावर कोणीच विश्वास ठेवणार नव्हतं. आता फक्त जे होईल ते फेस करणे तिच्या हाती होते. 

"आणि सर्वात महत्वाचं, मला त्यांच्यातील प्रत्येक बदल कळवत रहा! आपल्याला हि लढाई मिळून लढायची आहे!" डॉ. राजेनी शेवटची सूचना दिली आणि ऑफ लाईन झाले. 

                                                                         ००० 

कौसल्याबाई दिवसेंदिवस लहान होत राहिल्या! डॉ.राजेंना, शरयू तिच्या आईचे म्हणजे कौसल्याबाईंचे फोटो पाठवू लागली. अपेक्षित असले तरी डॉक्टर ते पाहून हादरत होते. लवकरच शरयूला एक बाबागाडी घ्यावी लागली! त्यात लोकरी स्वेटर- टोपी घातलेल्या गोंडस 'आईला', सकाळ संध्याकाळ गार्डनमध्ये फिरवून आणू लागली! निसर्गक्रमात झालेला मानवी हस्तक्षेप नियतीला रुचला नव्हता!

                                                                     ०००

डॉक्टर राजे काळजीत पडले.ते डोळे मिटून आपल्या आरामखुर्चीत बसले होते. कौसल्याबाईंचं वय झपाट्याने घटत होत. याच वेगाने ते घाटात गेले तर? त्या छोटं बाळ -अभ्रक -गर्भाचा गोळा------बापरे! शेवटी काही पेशींचा समूह अन मग----! खाड्कन त्यांनी डोळे उघडले! त्यांना दरदरून घाम आला होता! हे काय करून बसलोय आपण? त्यांनी बेसिनपाशी जाऊन तोंडावर पाण्याचा हबका मारला. असं धीर सोडून चालणार नव्हतं. नाही म्हटलंतरी त्यांना कौशल्याबाईंच्या भविष्याची कल्पना आलीच होती. ते तडक उठले आणि आपल्या व्यक्तिगत लायब्ररीत घुसले. वैद्यकीय शास्त्रावरील अगणित पुस्तके, संदर्भ, मान्यवरांचे थिसीस, तेथे होते. त्यात काही फसलेले रिसर्च पेपरही होते. त्यांनी त्यांना हवे असलेले साहित्य बाजूला काढले आणि लॅम्प लावून त्यात डोके खुपसले. दोन दिवसांनी ते त्या लायब्ररीतुन बाहेर आले तेव्हा त्यांचे डोळे, इंगळी डसल्यागत लालभडक झाले होते. नाही होणार तर काय होणार? अठ्ठेचाळीस तास वापरल्याचा तो परिणाम होता. पण चेहऱ्यावर मात्र काहीतरी गवसल्याचे समाधान होते!

डोळे थकले असले तरी त्यांना झोप येणार नव्हती. ते उठून त्यांच्या लॅब मध्ये गेले. त्यांनी कौशल्याबाईंना दिलेल्या हार्मोनचा डोस 'जुही' आणि 'रंभा' या माकडिणींना पण दिला होता. रंभा एका ठराविक वयात थांबली होती. पण जुहीचे वय मात्र वेगाने कमी होत होते. 'जुही साठी,आज incubetrs ची सोया करावी लागणार.' ते स्वतःशीच पुटपुटले. 

                                                                            ००० 

"डॉक्टर व्हिक्टर?"

"या "

"डॉक्टर राजे फ्रॉम इंडिया हेयर! " डॉ व्हिक्टर आणि राजेंची भेट एका मेडिकल सेमिनार मध्ये झाली होती. हा बाबा पण एका गुप्त संशोधनात गुंतला होता. याचे फिल्ड गायनीकचे. दोघांनी आपल्या संशोधनाचे अनुभव शेयर केले. घनिष्ट मैत्रीचा सांधा तेव्हाच जुळला होता. डॉ. राजेंनी कौसल्याबाईंची केस त्याला नीट समजावून सांगितली. 

" माय गॉड! डॉ. राजे, तुम्ही म्हणता तसे झाले तर, त्या तुमच्या कौसल्याबाई एम्ब्रियो स्टेज पर्यंत जाऊ शकतात! पण जर तो पर्यंत केला सेल जिवंत राहू शकले तरच. "

"देयर यु आर! तेच तर करायचंय! आणि ते तुम्ही करू शकता! माझा साठी प्लिज ते कराल?"

डॉ. राजेंना नाही म्हणणे व्हिक्टरला शक्य नव्हते.

"पण डॉ. राजे, सागोरेसी पहावी लागेल!"

"आत्ता पासून मिळती का ते पहा. पैशाची काळजी करू नका मी रिइम्बर्स करतो!"

"ओके!" व्हिक्टरने फोन कट केला. साले हे इंडियन जिनियस असतात, असा काहीसा विचार त्याच्या डोक्यात पिंगा घालत होता. 

                                                                        ००० 

"हॅलो, शरयू. मी राजे."

"हा.बोला डॉ."

"मी आत्ता डॉ.व्हिक्टरशी बोललो आहे. कसल्याबाईंची केस आम्ही डिस्कस केलीय. तू त्यांना घेऊन त्यांच्या कडे जा. विश्वास ठेव सर्व व्यवस्थित होईल! फक्त तू त्याच्या कडे जा. ते तुला सगळं समजावून सांगतील!"

दुसरेच दिवशी शरयू कौशल्याबाईंना घेऊन डॉ.व्हिक्टरकडे गेली. संध्याकाळी परत आली तेव्हा ती भारावून गेली होती. काय या डॉक्टरांचं डोकं चालत? काय तर म्हणे होईल तोवर बाळ incubetr मध्ये सांभाळायचं, आणि मग सीझर करून एखाद्या बाईच्या गर्भाशयात ठेवायचं! आणि त्या बाईच्या शरीरं तो गर्भ नाकारला तर? येथे डॉ व्हिक्टर थोडे घुटमळे होते. त्याला दोन कारण होती. एकतर भारतीय सगोरेसी महिला अमेरिकेत मिळणं आवघड, दुसरं म्हणजे बाळाची स्वीकार्यहता जमणं दुरापास्त! त्याहून मोठी अडचण होती ती हे रिव्हर्स सीझर होत. सात महिन्या पर्यंत incubetr ठीक, त्या पुढं मातेचं शरीरच सुरक्षित! 

"शरयू, मला खरं तर ऑड वाटतंय विचारायला, पण विचारतो, तुम्ही घ्याल हि रिस्क? तुमच्या आई साठी!"

शरयूने होकार दिला होता. त्याच दिवशी पासून शरयूची ट्रीटमेंट सुरु झाली, आई होण्याची! 

  ०००

आज शरयूने पाठवलेला फोटो पाहून डॉक्टरांच्या अंगावर काटाच आला. त्यात शरयू नऊ महिन्याची प्रेग्नंट दिसत होती! आणि त्या फोटो खाली कॅप्शन होते. ' मी माझ्या आईची आई झाले!' डॉक्टरांना खूप गिल्टी वाटू लागले. हे माझ्या हातून काय झालाय? या सगळ्या गोष्टींना मी तयार केलेले ते 'अजरत्व' देणारे हार्मोन जवाबदार आहे! 'समस्या नाही असा माणूस नाही, आणि समाधान नाही अशी समस्या नाही.' या तत्वावर डॉक्टरांचा विश्वास होता.

                                                                         ००० 

शरयूच्या प्रेग्नंसीचे काउंट डाऊन सुरु झाले. तिच्या पोटाचा आकार कमी होणारे फोटो डॉ. राजेंना येत होते. 

आणि एक दिवस शरयूचा फोन आला. तो घेताना डॉक्टरांचा हात थरथरत होता. काय सांगू या पोरीला? माझ्या मुळे ती पोरकी होणार! त्यांनी मोबाईल कानाला लावला. 

"डॉक्टर, हा माझा तुम्हाला माझ्या आई संदर्भातील शेवटचा फोन असेल. Thanks a lot. मी तुमची खूप आभारी आहे! कोणीच माणूस अमर नसतो. माझ्या आईलाही, कधीतरी मरण येणारच होते! पण तुमच्यामुळे तिला, पुन्हा तारुण्य, किशोरावस्था, बालपण आणि आता गर्भावस्था अनुभवायला मिळतं आहे! ती ज्या मार्गाने या जगात आली, त्याच मार्गाने परत जाणार आहे! मृत मानवाचा देह जाळला किंवा पुरला जातो! मातीत मिसळतो. पण त्याला माझी आई इतिहासात आणि भविष्यातही एकमेव अपवाद असेल! मला माहित आहे, माझ्या पोटातील तो गर्भ आकसतच जाणार आहे! आणि कधीतरी ---माझी मासिकपाळी सुरु होईल! तेव्हा मी खऱ्या अर्थाने पोरकी झाली असेन!" पुढे तिला बोलता येईना. आणि डॉक्टरांना ऐकवेना!

"सर, मी लॅबमध्ये गेले होते. तेथे 'जुही' दिसली नाही आणि-----" 

"आणि 'रंभा 'प्रेग्नन्ट आहे!" डॉक्टरांनी रोजीचे वाक्य पूर्ण केले! 

रोजी आपल्या बॉस कडे पहातच राहिली!

                                                                      ०००  

डॉक्टर खडबडून जागे झाले. शरयू बाबा गाडीत बसून त्यांना बाय - बाय करत होती! त्यांनी बेडशेजारचा चष्मा पुसून डोळ्यावर चढवला. शरयू? ती सुद्धा या प्रेग्नन्सीमुळे वय कमी होण्याच्या विकारास बळी पडू शकेल? त्यांनी तडक शरयूला फोन लावला. 

"शरयू, आता तुझी परस्थिती कशी आहे?"

"कशी म्हणजे?"

"कितवा महिना?"

"कदाचित तिसरा! पण का?"

" ताबडतोब निघ! भारतात उतरल्याबरोबर ताबडतोब माझ्या क्लिनिकला यायचं! विमात बसलीस कि फोन कर!"

                                                                      ००० 

दोन स्पेशल इंटेन्सिव्ह केयरच्या, वेल इक्विप्ड रूम रोजीने सज्ज केल्या. त्यातील एकात शरयूची रवानगी झाली. त्यांनी सर्व प्रथम शरयूला तपासली. काही विपरीत दिसत नव्हते. सोनोग्राफीत फिटस हेल्दी दिसत होता. त्यांनी दुसरे दिवशी रोजीला ऑपरेशन थेयटर सज्ज् करायला सांगितले आणि एका सिनियर गायनीकला फोन केला. 

"डॉक्टर तुम्ही काय चालवलंय?" शरयूने विचारले. 

" काही नाही! मी शेवट पर्यंत प्रयत्न करणार आहे! मला माझे काम करू दे!"

"तुम्ही अबॉर्शन तर करणार नाहीत ना? तसे असेल तर त्याला माझा नकार असेल!" शरयूने आपली शंका बोलून दाखवली. 

"नाही!" डॉक्टर कोरड्या सुरत म्हणाले. मघाशी कसलेसे इंजक्शन दिले होते, शरयूला ग्लानी येऊ लागली. 

डॉक्टरांनी मग घाईने तिला ऑपरेशन थेटर मध्ये नेले. अनस्थीशीयाचा असर सुरु झाल्यावर, त्यांनी गायनीकच्या मदतीने ऍक्टिव्हटेड अँटीहार्मोनचा डोस, गर्भाच्या वयाच्या प्रमाणात दिला!

शरयूला काही बदलल्या सारखे वाटले नाही. बाळाचे पोटातील अस्तिव तिला जाणवत होते. रोज सकाळ संध्याकाळ सोनोग्राफी मात्र केली जात होती. 

आजच्या सोनोग्राफीचा रिपोर्ट पाहून डॉक्टरांचे डोळे लुकलुकले. गर्भाचे वय घटणे थांबले होते, आणि ते निसर्गनियमाप्रमाणेच वाढीस लागल्याचे दिसत होते! तिसऱ्या महिन्यापर्यंत कमी होत आलेला गर्भ पुन्हा वाढत होता!

                                                                        ००० 

सहा सात महिन्यांनी डॉ. राजेंच्या घरी, रोजीने सारी तयारी करून ठेवली होती. दोन फुलांनी सजवलेले पाळणे हॉलच्या मध्यभागी ठेवले होते. समारंभ नामकरणाचा होता, हे तेथल्या तयारीवरून कोणाच्याही लक्षात आले असते. पाहुणे निवडकच होते. 

एका पाळण्या जवळ शरयू बसली होती. तिच्या मांडीवर गुटगुटीत बाळ होत. 

रोजीने आत्याची भूमिका बजावली. 

"शरयू, काय नाव ठेवायचं बेबीच? म्हणजे अमेरिकेत ऑड वाटू नये म्हणून विचारते!"

"जुही ठेव!" 

मग त्या बाळाचे नाव जुही ठेवले गेले  

"डॉक्टर, दुसरा पाळणा कोणासाठी आहे? कोठे आहे दुसरी बेबी?" कोणी तरी विचारले. 

डॉक्टर शेजारच्या रूम मध्ये गेले आणि ती 'बेबी' आणि तिची आई घेऊन आले. सर्वाना आश्चर्य वाटले. त्या बाळाची आई इतके लोक बघून डॉक्टरांच्या मागे लपली. मखमली कपड्यात गुंडाळलेले ते बाळ फुलासारखे अलगद हातात घरून डॉक्टर पाळण्यापर्यंत आले. रोजीने लगबगीने ते डॉक्टरांकडून घेतले. 

डॉक्टरांच्या मागे लपलेली 'रंभा' माकडीण चांगलीच बावचळी होती. रोजी आणि डॉक्टर ओळखीचे होते पण बाकीचे लोक सम्पर्कातले नव्हते. 

"हि 'रंभा ', शरयू तू सोसलेला त्रास या रंभेनीही सोसलंय! आज आपण तिच्याहि मुलीचे नाव ठेवणार आहोत! आणि हे काम हि रोजीकडेच आहे. मित्रानो, हि रंभा जरी वानर असली तरी, तिची मी माझ्या मुलीसारखीच काळजी घेतली आहे. आज ती शेवटचा दिवस माझ्या सोबत असेल. उद्या मी तिला तिच्या जगात म्हणजे जंगलात सोडून देणार आहे! ती कधीही आली तरी, तिच्यासाठी या, तिच्या माहेरची दारे उघडीच असतील!"

"सर, पण या बाळाचे नाव काय ठेवायचंय?"

"मी सांगू?" शरयू म्हणाली. 

"काय?"

"कौसल्या ठेवा!"

सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्या थांबल्या तरी डॉक्टर एकटेच टाळ्या वाजवत होते, ओल्या डोळ्यांनी! रोजी पाहुण्यांना बर्फी वाटण्यात गुंतली होती. 


Rate this content
Log in