Jyoti gosavi

Thriller

4.2  

Jyoti gosavi

Thriller

काळ आला होता पण वेळ आली नव्हती

काळ आला होता पण वेळ आली नव्हती

4 mins
233


आपल्याला वाटतं त्याने आपली द्रौपदीसारखी पाठराखण करावी ,पण आपली भक्ती कुठे द्रौपदीसारखी आहे? 


आता इथे नाव सांगण्याची पण गरज वाटली का?

 

नाही! कारण द्रौपदीचा पाठीराखा एकच, अखिल ब्रह्मांडाचा कर्ताधर्ता, लोकांचा आवडता, लहानात लहान होणारा, मोठ्यात मोठा होणारा, एकमेव भगवान श्रीकृष्ण.


हे सगळं पुन्हा एकदा आठवण्याची गरज काय? कारण तशी एक घटना झाली. 

आता मला कोरोना पॉझिटिव होऊन, ट्रीटमेंट घेऊन, जवळजवळ आठ-नऊ महिने होऊन गेले. आणि घरात अधून मधून मला आलेल्या अनुभवांची आम्ही चर्चा करत असतो. तुम्ही कोणी विश्वास ठेवा, अगर नका ठेवू, पण मला ती रात्र जशीच्या तशी आठवते. 


जेव्हा माझा काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. कारण मी तर अर्धवट जागृत नाही, तर पूर्ण जागृत होते. फक्त डोळे मिटून पडले होते. झोप लागलेलीच नव्हती. त्यात अशा अवस्थेमध्ये मला एक उंच, काळा बुरखा घातलेला, चेहऱ्याच्या जागी पोकळी आणि डोक्यावर रेनकोटसारखी टोपी, अशी आकृती रात्रभर दिसत होती. त्याचं डोकं पंख्याला भिडलेलं आणि तो एखाद्या करकोच्यासारखी काटकोनात मान वाकवून, माझ्याकडे वाकून वाकून बघतोय, असं मला रात्रभर जाणवत होतं. 


शेवटी पहाटे पहाटे मी प्रार्थना केली, 

"कृष्णा" तू मला माझ्या घरी परत नेणार आहेस ना? येताना मी तुला सोबत घेऊन आली आहे. 

तेव्हा जाताना परत घरी घेऊन जाणं तुझं काम आहे. आणि त्या क्षणी मला कृष्ण माझ्या उशाला बसलेला जाणवला. माझ्या उशाला एक लाल प्लास्टिकची खुर्ची होती. कृष्ण त्यात बसलेला मला दिसला. 


मी विचार केला छे! तो कृष्ण आहे. तो असा प्लास्टिकच्या खुर्चीत कशाला बसेल? त्याबरोबर मला माझ्या उशाला  सिंहासनावरती बसलेला तो भव्य-दिव्य कन्हैया दिसला. त्याच क्षणी तिकडे माझ्या छोट्या मुलाला स्वप्न पडत होते, आईचं काहीतरी वाईट झालंय आणि तो मला सीपीआर देतोय. आणि त्याच वेळी त्याला पण तिकडे श्रीकृष्ण दिसला होता .


पण आता बरे झाल्यानंतर माझा तो भक्तिभाव कमी झाला. माझा विश्वास डळमळला, माझी नियत फिरली. 

कोणत्या कोणत्या गोळ्या आपण खाल्ल्या? त्याचे साईड इफेक्ट काय आहेत? असं पाहताना, टॅमिफ्लू नावाच्या गोळ्यांचा  साईड इफेक्ट, हॅलूसीनेशन (Hallucination)आहे.


मला वाटले तसेच काहीतरी झाले असेल, ते  हॅलूसीनेशन असेल, हे माझ्या मनाचे खेळ असतील, ही चर्चा मी मोठ्या मुलाशी करत असताना, तो म्हणाला आई ! असं बोलू नकोस, मी तुला आजपर्यंत सांगितलं नाही. पण तो " ग्रिम रिपर "होता.आता "ग्रिम रिपर " हे नावच मी पहिल्यांदा ऐकलेले होते.


अरे बाबा हे"ग्रिम रिपर" काय आहे? मी त्याला विचारले.


तेव्हा तो म्हणाला, आई! सगळ्या धर्मांमध्ये ही संकल्पना आहे की, माणसाच्या मृत्यूच्या वेळी मृत्यूचा दूत येतो, 

आपण त्याला यमदूत म्हणतो. त्यांच्यामध्ये अजून काही वेगळा शब्द असतो. परंतु कल्पना तीच आहे. 

जी माणसे एकदम मरणाच्या दारात जाऊन, त्याचा दरवाजा ठोठावून, आलेले आहेत त्यांना हा ग्रिम रिपर दिसतो. 

मग त्याने मला गूगल वरती त्याचा फोटो दाखवला. खरोखर मला डोळ्यापुढे दिसलेला, तशाच पद्धतीचा तो मनुष्य होता, किंवा ती आकृती होती. 


जी मी आधी कधीही पाहिलेली नव्हती, ऐकलेली नव्हती, त्याच्या हातामध्ये एक कुदळीसारखे वेपन होते. आणि तो म्हणे त्या वेपनने व्यक्तीचा आत्मा ओढून घेतो. परंतु मला दिसला तेव्हा त्याच्या हातामध्ये "वेपन"वगैरे नव्हते. परंतु तो माझ्या शेजारी उभा राहून रात्रभर माझ्याकडे वाकून वाकून बघत होता. हे मात्र मला पक्के आठवत आहे. 

त्या क्षणी माझ्या शरीरभर काटा उभा राहिला, डोळे भरून आले, कृष्णा तू पाठव राखण केलीस, तू प्रत्यक्ष आला होतास ,पण मी मूर्ख, मला ते समजले नाही. किंवा अजुनही मला ते भास- आभास असे वाटत होते .


आम्ही अपेक्षा करतो की, त्याने आमची द्रौपदीसारखी पाठराखण करावी, पण आम्ही कुठे द्रौपदीसारखी भक्ती करतो? आम्ही कुठे त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो?


द्रौपदीबाबतीत एक किस्सा आहे, द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगानंतर जेव्हा श्रीकृष्ण वनामध्ये पांडवांना भेटायला गेले, तेव्हा द्रौपदी कृष्णा वरती रुसली होती. कृष्णाने विचारले, सखी काय झाले? 


ती म्हणाली कृष्णा! माझ्याशी बोलू नकोस, मी तुझ्यावर रागावले आहे .


अरे पण मी केले काय? तू माझ्यावर का रागावलीस?


कृष्णा! तुझ्यासारखा भाऊ असताना, तुझ्यासारखा पाठीराखा असताना, तुझ्यासारखा कृष्णसखा असताना, माझ्यावरही वस्त्रहरणाची वेळ का आली? आणि तू वेळेत का आला नाहीस?


तेव्हा कृष्णाने विचारले द्रौपदी! तुला वस्त्र कोणी पुरवली? 


कृष्णा! ती तूच पुरवलीस, हे साऱ्या जगाला माहित आहे. पण तू यायला एवढा उशीर का लावला? 


तेव्हा कृष्णाने तिला मोठे मार्मिक, आणि सुंदर उत्तर दिले. 


तो म्हणाला द्रौपदी! जोपर्यंत तुझं संरक्षण, तूच करत होतीस. तुझ्या साडीच्या निऱ्या आणि पदर तू तुझ्या हाताने धरून ठेवत होतीस, तोपर्यंत मला येण्याची वेळ नव्हती. 

तू काही, मला बोलावलं नाहीस, पण जेव्हा तू निऱ्याचे दोन्ही हात सोडले, आणि हे कृष्णा! हे माधवा !करत दोन्ही हात वरती केलेस, तेव्हा तुझ्या लज्जेचे रक्षण करणं ही माझी जबाबदारी होती. 

जेव्हा तू आर्ततेने हाक मारली तेव्हा मी आलो.


या उत्तरावर द्रोपदी निशब्द झाली, निरुत्तर झाली, 

मला तो प्रसंग आठवला, मला स्वतःची लाज वाटली. त्याने खरोखर येऊन आपलं रक्षण केलं, आणि आपण मात्र आजही त्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. 

असो ही एक अनुभूती आहे म्हणतात ना "काळ आला होता, पण वेळ आली नव्हती" आणि माझ्या कृष्णाने त्याला पळवून लावलं.


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller