जयश्री ,पाऊस आणि कोको भाग १
जयश्री ,पाऊस आणि कोको भाग १
जून महिना नुकत्याच सुरू झाला होता टीव्हीमध्ये सारख्या बातम्या येत होत्या, मान्सून लवकरच येणार आहे पण केव्हा येणार हे नक्की सांगितलं नव्हतं. ऑफिसच्या सुट्ट्या अजून संपल्या नव्हत्या जवळपास दहा दिवस तरी सुट्ट्या होत्या मग त्या दहा दिवसात काय करायचं, असा विचार डोक्यात येत होता घरच्यांना विचारलं तर ती म्हणायची “जा कुठेतरी फिरून ये”पण सोबत यायला कोणी तयार नव्हतं कारण सगळ्यांना त्यांच्यी, त्यांची कामे होती. त्यामुळे कुणालाही काही जबरदस्ती करता येत नव्हती आणि तसेही नुकताच जयश्रीने चार चाकी वाहन चालवण्याचा वर्ग पूर्ण केला होता. तिला वाहन चालवण्याचा परवानाही मिळाला होता. घरची माणसंही तिला म्हणायची चार चाकी शिकली आहेस मग जा घेऊन आणि ये फिरून. गाडी चालवण्याचा अनुभव केव्हा घेणार? या सगळ्या गोष्टी ऐकून जयश्रीलाही वाटायचे की खरं आहे. आपण गाडी शिकलोय मग त्याचा उपयोग तर व्हायलाच पाहिजे. मग पुढचे दोन दिवस तिने खूप विचार केला आणि ठरवलं की जवळपास का होईना कुठेतरी फिरून यायचं तेही एकटीनेच.
