जुन्या फोटोंमधील आठवणी
जुन्या फोटोंमधील आठवणी


नव्या जमान्यात सगळ्या गोष्टी नव्याने. क्षणाक्षणाला तोंडाचा पाउच करुन सेल्फी काढणे.
फोटोसुद्धा नव्या ढंगाने काढले जातात. कोणत्याही प्रसंगाला बॅकग्राउंडला म्युझिक दिले जाते.
पण हे सर्व क्षणिक वाटतं. दोघांचेच फोटो नटलेले असतात. पुर्वी मात्र एकत्र कुटुंब असायचं. ठराविक प्रसंगाला सगळ्यांचा एकत्र फोटो अल्बममधे असायचा. मामाचा तोकड्या खाकी चड्डीतला फोटो, मावशीच्या चपचपीत तेल लाऊन घातलेल्या घट्ट दोन वेण्या बघताक्षणी हसू आवरता येत नाही. आजीचा तोंडाचा चंबु करुन हसायची पद्धत, ती हसरी आजी फोटोत लक्ष वेधुन घेते. मिशा पिळत उभे राहीलेल्या आजोबांचा फोटोत
सुद्धा धाक, दरारा जाणवतो. आयला, हे बघ आजोबा असा चटकन तोंडातून उद्गार बाहेर पडतो.
कोणत्याही प्रकारची लाज, शरम न बाळगणारा छोटा काका बनियनने आपलं गळके नाक पुसायचा असे मजेदार फोटो बघून कुटुंब किती प्रेमात न्हालेले असायचं असा जिवंत भास होतो. ताईच्या लग्नात तर फोटो काढायची मजा मस्ती काही औरच असायची. कानपिळीच्या प्रसंगाला नवर्यामुलाचा करकचुन कान पिळायचा. त्याच्या चेहर्याची वेदना टिपली जायची. कशी जिरवली असा कान पिळणार्याचा आसुरी आनंद तोंडावर दिसायचा. हळवी आजी " मेल्या मुडद्या " असे शालजोडीतले उद्गार काढायची. अग आजी हा फोटो आहे असं सांगून तिला गप्प बसवायचे.
असे अनेक प्रसंगांचे काळेपांढरे फोटो मनात रंग भरुन जातात. पुर्वीचे अल्बम बघून मरगळ आलेल्या मनाला टवटवीत करुन जातात. मग मोठा झालेला काका खुशीत काकुच्या कानी शीळ घालतो. बार बार देखो, हजार बार देखो, मन नाही भरत, फोटोतल्या आठवणी नाही सरत !