सुरस खाण्याची आठवण
सुरस खाण्याची आठवण


चवीचे खाणार त्याला देव देणार. म्हणावसं वाटते खाण्यासाठी जन्म आपुला. असंच एकदा गंगापूर डॅम बघण्यासाठी
पिकनिकला गेलो. जाता जाता एका शेतात क्षणभर विश्रांतीसाठी थांबलो. घनदाट आंब्याच्या झाडाची सावली, बाजूला
रांजणातले गारगार पाणी. मस्त गोल करुन डबे उघडायला सुरुवात झाली. प्रत्येकाच्या डब्यातल्या पदार्थांचा घमघमाट
सुटला होता. जोशी काकुंनी केलेल्या अळूवडीचा डबा क्षणात फस्त झाला. हिरव्यागार अळूच्या पानावर चण्याच्या पीठाचे
भरपूर सारण, चिंचगुळाचा आंबटगोड कोळ, खसखस तिळाचा मारलेला तडका. जिभेवर ठेवताच चटकन विरघळणारी
अळूवडीची चव विसरता येत नाही.
माने आजींनी तर भट्टीत भाजलेल्या ज्वारीच्या लाह्या, मटक्यात जमवलेले दही, खोबर्याचा किस, मीठमिरची,
कोथींबीर आणून आमच्यासमोर दहीकाला केला. अप्रतिम असा दहीकाला खाऊन कृष्णालाही दहीकाला आवडायला लागला
की काय अशी आजीची टर उडवली. आनंदाने आजीच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.
प्रेम ओतून केलेले पदार्थ थोडे खाल्ले तरी मन तृप्त होते हे मात्र खरे...