ग्रहण
ग्रहण
मध्यमवर्गीय कुटुंब, गरीबीत पण चेहेर्यावर हास्य. संसाराची घडी बसवता बसवता अचानक कोरोनाचा शिरकाव झाला. संसाराची घडी विस्कटली गेली. नवर्याचा रोजगार बंद झाला, मोलमजुरी मिळेनाशी झाली. हा धक्का सहन न झाल्याने नवर्याने आत्महत्या केली. क्षणात दुःखाचा डोंगर कोसळला. पण पाठीमागे तीन वर्षाचे लेकरू गळ्याला मिठी मारून बसले. त्याला बघून मेलेलं मन जाग झालं. कंबर कसून कुठे धुणीभांडी, स्वयंपाकाचे
काम मिळते का म्हणून घरोघर वणवण फिरत राहीले. नवर्याच्या विम्यातुन एक साधा मोबाइल खरेदी केला. जरूर नव्हती, पण आशा होती की कोणीतरी कामाला बोलवेल. कोरोनामुळे माझ्याही कामाचा दरवाजा बंद झाला. माणुसकीच्या नात्याने कोणी उरलंसुरलं पोटाची खळगी भरण्यासाठी देत होते.
एका दिवशी लेकराला पुढ्यात घेउन झोपले. अचानक फोनची घंटी वाजली. आशेने पटकन फोन उचलला. जिथे मी पहिलं काम करत होते त्या मॅडमचा फो
न आला "अगं संध्याकाळी ये" असं म्हणून फोन बंद केला. माझ्या हो, नाही उत्तराची पण वाट बघितली नाही. चला काम मिळालं म्हणून मी पण आनंदी झाले. झपझप पावले टाकत मुलाला बखोटीला धरत मॅडमकडे गेले. दरवाजा बंद होता. दारात धान्याची पिशवी आणि जुने कपडे ठेवलेले होते. दारावरची बेल मारली खरी, पण मॅडमने दार न उघडता खिडकीतुनच सांगीतलं "अगं सूर्यग्रहण संपले ना म्हणून धान्य व कपडे ठेवले बघ. घेऊन जा तुला". पिशवीवरचा माझा हात क्षणात दूर झाला, डोळ्यात खळकन पाणी आले. डोळ्याला पदर लावत म्हंटले "मॅडम जीवनालाच ग्रहण लागले त्याला ठिगळही पुरत नाही. नको मला तुमचे ग्रहण काळातले दान. पाठी लेकरू आहे". मुलाला पटकन उचलून कडेवर घेत थरथरत्या पावलाने चालू लागली.
तिला बघून क्षणात मनात विचार आला अजून कोणतं ग्रहण तिच्या नशिबी बाकी आहे. मनात काहूर माजले. ती पाठमोरी दूर गेली खरी. पण तिचा करारी चेहरा माझ्या नजरेसमोरून हलत नव्हता.