लोभस पहिली दिवाळी
लोभस पहिली दिवाळी
नुकतंच एप्रिलमध्ये लग्न झाले. अजुन हळदीचा रंग अंगावर चमकत होता.
लाड, कोडकौतुक सर्वांकडून भरभरून होत होते. आनंदात, उत्साहात भर घालणारा सण दिवाळी आला. माहेरी जाण्याची ओढ लागली. पण सासरची प्रेमाची सक्त ताकीद मिळाली पाडवा झाल्यावर माहेरी जायचे. कळी थोडी हिरमुसली.
हसत हसत लक्ष्मीपुजन झाले. पाडव्याची पहाट उजाडली. पाडव्याला नवर्याकडून काहितरी गिफ्ट मिळते.. ही हुरहुर मनात घर करुन होती. अहो माझ्यासाठी काय आणले म्हणुन त्यांच्या कानी कुजबुज पण केली.
अरे असं असतं का म्हणुन स्वारी चपला घालून प्रेझेंट आणायला निघाली. माझ्या नाकावर राग आला हे स्वारीने टिपले.
ओठावर उसनं हसू आणुन आरतीचे तबक सजवले. पाटाभोवती सुंदर रांगोळी पण काढली. औक्षण केले, पण तबकात प्रेझेंट
दिसले नाही. ताट ठेवण्यासाठी वळले तर डोळयाच्या कडा पाणावल्या. सासुबाईंच्या ओंजळीत गुलाबाच्या पाकळ्यांनी माझ्यावर पुष्पवर्षाव केला. सासर्यांनी हसत हसत पेढा भरवला. दिराने त्याच्या जवळील चाफ्याची फुले माझ्या ओंजळीत देऊन
तु गृहलक्ष्मी, तु अन्नपुर्णा म्हणुन माझा गौरव केला. मग दिमाखात यांनी माझ्या अंबाड्यावर मोगर्याचा गजरा माळला.
माझ्या खांद्यांवर हिरवीगार पैठणी टाकली, पायात नवे पैंजण घातले. माळलेल्या गजर्याचा सुगंध घेत कानी कुजबुजले
सगळ्या नात्यांमध्ये तु प्रेमाचं घर कर. नात्यांचा धागा मजबुत कर.
असा हा पाडवा अविस्मरणीय. डोळयांतले घळघळ पाणी गालावर ठिबकले.
कधी आईबाबांना जाऊन सांगते असं झाले. सासरच्या कोडकौतुकाचा सोहळा माहेरी सांगण्यासाठी मन वेगाने घोडदौड करु लागले.