जीवनगाणे
जीवनगाणे


जीवनाच्या पटांगणावर खूप मोठी हिरवळ पसरलेली. सुख-दुःखाचे खेळ खेळता खेळता, कधी हरलो कधी जिंकलो.
अनुभवाची शिदोरी उघडली की क्षणभर मनावरचे ओझे उतरल्यासारखे होते. लहानपण खेळण्यात, बागडण्यात, खोड्या काढण्यात गेले. तरूणपणी शाळा, कॉलेज. आयुष्याच्या रस्त्यावर वेगळं वळण गवसलं नाही.
नवीन काही शिकायचे म्हटले तर वयाने बुजूर्ग लोकांचा विरोध असायचा. मुलीने स्वयंपाक, शिवणकाम, विणकाम यात तरबेज असावे असेच त्यांना वाटायचे. त्यामुळे अंगचे कसब दडपले गेले ही एक खंत सलत राहते. कराटे, जिम, एथलेटीक्स शिकायची मोठी हौस होती. पण त्याला घरच्यांचा विरोध, कुठं जायचं उड्या मारायला असं टोचून बोलणं. बरंच काही शिकायचं राहून गेलं हे मात्र खरं. पुर्वी हे शिकण्याची फी पण कमी असायची. पण त्यावेळी तिही जास्त वाटायची. काळानुसार फी वाढत गेली, तरीही आपण जे केले नाही ते आपल्या मुलामुलींना प्रशिक्षण देऊन उज्वल भवितव्याचे स्वप्न बघतो.
भातुकलीचा खेळ खेळता खेळता संसाराचा खेळ सुरू झाला. साथ चांगली, रस्ता वळणावळणाचा. तरी ठेचकळत न चालता, वाट काढली, पुढे आलो. कधी रडता रडता हसलो, हसता हसता रडलो. उभे आयुष्य मजेने घालवले.
आता म्हातारपणी खळखळ हसून मुखी राम नामावली जपत ईश्वरा तुझ्या पायाजवळ बोलव ही इच्छा.