'जळ उठलय'
'जळ उठलय'


"आर दिन्या बास झालं की आता, चल निघूया" आस पांडू आणि राजा दिनकरला, बोलत हुते, "पण तो कुठला ऐकतोय. "आर जरा थांबा, ती बत्ती तेवढी नीट धरा, आज लै मासं घावत्यात, आन तुम्ही चला म्हणताय व्हय? दिन्या बोलला. त्यावर पांड्या बोलला "बक्कळ मिळालतय, आता जाऊया घरला." "आर गप्प पांड्या कटकट करू नग" दिन्या चिडून बोलला.
"आर हे लक्षण काही ठीक दिसत नाय, जळ उठलयं असं वाटतया" राजा बोलला. "ये तू कुणाला भ्या दावतुयास या दिन्याला, भुतासंग कुस्ती खेळलेल्या या दिन्याला?.. मागल्या टायमाला बी असंच केलसं, पल्याडल्या काठावर पाटील झाडाखाली सिगरेट फुकत बसलं हुतं आन लाल ठिपका बघून तू घाबारलास मी हाक मारली तवा ते पाटील हायत म्हणून कळलं.
"आरं आज आमुश्या हाय " राजा बोलला. "गप्पा भित्र्यानो" आस म्हणत तो हातात असलेल्या ठिक्यात मासं टाकत हुता. तेवढ्यात कुठुनतरी कुत्र्याच्या रडण्याचा भेसूर आवाज आला. पोतं भरलं तस दिन्याचं समाधान झालं, आण तो पाण्याच्या भायेर काठावर आला. पोतं पाटुंगळीवर टाकलं आन म्हणाला "चला निघूया. "छोटीशी डगर चढुन तिघबी वर चालायला लागलं, तेवढ्यात दिन्याचा पाय सटाकला. आन तो धापकन ठिक्यासकट जोरात आपटला, दिन्या आयाय ग.... म्हणतं जोरात वराडला. तसं पांडू आणि राजा माग वळले आण त्याला दोन्ही बगलत हात घालून उचलू लागले ,तर त्याला उठताच यीना. त्याच्या पाठीवरल ठीकं शेजारीच पडलं हुतं, राजानं ते उचलून बाजूला ठेवलं. ठीक लैच जड लागत हुतं, म्हणून बघीतल तर ठीक दगडानचं भरलं हुतं. पांडू आणि राजाचा अंदाज खरा हुता. भुताटकीच हुती ती, जळ उठलं हुतं. मनातून दोघं बी चांगलेच टराकले हुते. तेवढ्यात जवळच्या झाडीतन पक्षाचा कर्कश्श आवाज आला. दोगबी जाम घाबारले, दिन्या कळवळत हुता. दोघांनी दिन्याला फरफटत फटफटीपर्यंत आणला. कसाबसा त्याला फटफटीवर दोघांच्या मधी बसवला आन राजानं फटफट गावाच्या दिशेने पळीवली. मागच्या बाजून भेसुर आवाज गावाच्या यशीपातुर पाठलाग करत हुता. मारुतीच्या मंदिराजवळ येऊपर्यंत आवाज येत हुता.
गावात गेल्यावर वरडून त्यांनी लोकांना जाग केलं. दिन्याला समद्यानी उचलून घरात नेलं. झाला प्रकार त्यांनी जमलेल्या माणसांना सांगितला. माणसं बोलली, "लई शान हायसा, तुम्हाला कधी कळायच, येळबीळ बघत न्हाय आन निघता माशाला. आज आमुशा हाय , जळ उठलं हुतं, थोडक्यात वाचला."
दिन्या लै इवळत हुता. त्येचा खुबा निसाटला हुता. बायकोन त्याचा खुबा चांगला शेकवला, हळदीचा लेप घातला. माणस सांगतील तो उतारा तेच्यावरुन काढला, अंगारा-धुपारा लावला.
सकाळ झाल्यावर दिन्याला तालुक्याच्या ठिकाणी दवाखान्यात नेला. डाक्टर उपचार सुरू झाले, पण दिन्या दिवसेंदिवस खंगतच गेला. आन एक दिवस तो हे जग सोडून गेला.
(ग्रामीण भाषेतील ही कथा (भयकथा) पुर्वीच्या लोकांकडून ऐकलेली कथा आहे. ही कथा मी निव्वळ मनोरंजनासाठी लिहिली आहे. कथा कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा.)