'माझी गौराई'
'माझी गौराई'
उद्या जेष्ठागौरीचे आगमन होणार, पण माहेरी जायला मिळणार नाही म्हणून साक्षी जरा हिरमुसली झाली होती, दोन दिवस ती गुणगुणत होती.
बंधू येईलं, येईलं न्यायला गौरी गणपतीच्या सणाला...
पण बंधू येणार नव्हता आणि माहेरी ही जाता येणार नव्हतं, म्हणून आज ती जरा उदास होती. नवविवाहित असलेल्या साक्षीला माहेरचा गौरीचा सण आठवत होता. हा सण म्हणजे माहेरवाशिनींचा ... आपली ही लग्नानंतर ची पहिलीच गौर पण माहेरी जाता येत नव्हते, म्हणून ती नाराज झाली होती. तिच्या सासूबाईंनी हे सारं ओळखलं होतं.
"साक्षी दोन दिवस घरात तांदळाचे मोदक बनताहेत, आज तुमच्याकडे घाटावर पाटणला बनतात तसे गव्हाचे मोदक बनव बरं.." सासूबाई तिचा मूड ठीक करण्यासाठी बोलत होत्या, "हो आई बनवते मी गव्हाचे मोदक" म्हणत ती मोदकाच्या तयारीला लागली, वेलची आणि जायफळाचा सुगंध घरभर पसरला.
साक्षीचे माहेर पाटण आणि सासर चिपळूण जवळ, घाटमाथ्यावर गव्हाचे मोदक बनतात तर कोकणात तांदळाचे मोदक बनतात. सासूबाई बोलत होत्या "तुझ्या माहेरी गव्हाचे मोदक गणपतीच्या नैवेद्याला बनवतात, कारण तिकडे गहू जास्त प्रमाणात पिकतो आणि कोकणात तांदूळ पिकतो. ज्या विभागात जे धान्य जास्त पिकते त्या धान्यापासून तिथल्या देवाच्या नैवेद्याचे पदार्थ बनतात."
"साक्षी तुझा हा लग्नानंतर पहिलाच गौरीचा सण आहे इकडे नवविवाहीत मुली गौरीला वसा घेतात बरं", असं म्हणत सासुबाई तिला पुजेचा विधी सांगु लागल्या. सुपात पुजेचं साहित्य, पाच प्रकारची फळे, देवासाठी बनवलेले पाच गोड पदार्थ, मोदक, लाडू, करंजी, शंकरपाळी, रवा, बुंदीचे लाडू, हे पाच सुपात भरायचे आणि नवविवाहीतेने नवीन साडी नेसून विधीवत गौरीपुजन करायचे, साहित्याने भरलेल्या सुपाने गौराईला डोक्यापासून खाली असे पाच वेळा ओवसायचे (ओवाळायचे), ओटीत वसा घ्यायचा आणि या पाच सुपातला वसा पाच घरात देऊन यायचा असा असतो ओवसा. "छान आहे हा पुजा विधी पण आमच्याकडे संक्रांतीला ओवसा असतो." साक्षी बोलली. "हो तोही करू आपण", सासुबाई बोलल्या.
साक्षी ही आता तिच्या माहेरच्या गौराई बद्दल बोलू लागली. गौरी आगमनादिवशी खेळले जाणारे खेळ, गौरीचा आवडता फुलोरा आणि , आगमनादिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य. ज्वारीची भाकरी, शेपु भोपळीची मिक्स भाजी, वडी, मसालेभात कोशिंबिर आणि अखंड हिरवी मिरची असा गौराईचा नैवेद्य, गौराई माहेरवाशीण म्हणून बनवलेल्या भाजी भाकरी पाच घरात गौरीची बुत्ती म्हणून वाटायची. आणि गौरी पुजनादिवशी पुरण पोळी, गोडधोड पदार्थांचा नैवेद्य.
इकडे ही कोकणात काही वेगळा नैवेद्य नसतो, भाजी भाकरी, आणि गौरीपुजनाला गोडाधोडाच्या नैवेद्या बरोबर तिखटाचा ही नैवेद्य असतो बरं या माहेरवाशिणीला.. सासुबाई गालात हसत तिला माहिती देत होत्या. साक्षीला या गोष्टीचं नवल वाटलेलं पाहून त्या सांगू लागल्या, अगं गणेशाला तिखटाचा नैवेद्य नाही चालत म्हणून माय- लेकरांच्या मध्ये पडदा धरला जातो आणि नंतर गौराई जेवतात. साक्षीला ही नवीनच माहिती मिळाली होती. ती सांगू लागली, अहो सासुबाई आमच्याकडे ज्यांच्याकडे गौरी बरोबर गणपतीचे विसर्जन होते त्यांच्याकडे असे तिखटाचे (मटणाचे) जेवण असते, त्याला मोडा असे म्हणतात. गौरीविसर्जनादिवशी सकाळी गौरीचा मुखवटा सुपात घेऊन दोरे घेतले जातात. दही भाताचा नैवेद्य दाखवून नंतर दुपारी गावातील मुली गौराईची परतीची गाणी म्हणत नदीवर गौरी विसर्जनासाठी जातात. तिथे फेर धरून झिम्मा, फुगडी घालतात खुप मज्जा आणि धम्माल असते. भान हरपुन साक्षी हे सगळं सांगत होती जणु ती ही फेर धरून त्या फेरात नाचत होती.
तीच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासाठी सासुबाई तिला बोलतं ठेवत होत्या. "हे सगळं आपण ही इथे करणार आहोत. आपल्या अंगणात सगळ्याजणी खेळ खेळायला जमतात. उद्यापासुन तीन दिवस मनसोक्त खेळा, गौरी पुजनादिवशी गौराईचे जागरण करा, गाणी, फुगडी घाला, उखाणे घ्या." सासुबाई बोलत होत्या. अन् साक्षीला गौरीपुजनादिवशी भानोर वाजवत म्हणलेली गौराईची गाणी आठवू लागली आणि या गौराई ची कळीही हळूहळू खुलत होती....
(महाराष्ट्रात प्रत्येक विभागानुसार चालीरीती , नैवेद्यात थोडीफार विविधता आहे. त्या विविधता प्रत्येकाने जपत आपापल्या परीने उत्सवाचा आनंद घ्यावा.)
कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.
सर्व वाचकांना गौरी गणपतीच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा.