जबाबदारीची जाणीव कधी होणार?
जबाबदारीची जाणीव कधी होणार?
२२ मार्चला कर्फ्यु असताना सायंकाळी पाच वाजता काही ठिकाणी लोकांनी एकत्र येऊन घोळक्या घोळक्यानी थाळी, टाळ्या आणि झेंडे नाचवत, घोषणा देत जो काही आनंदोत्सव साजरा केला. त्या अतिउत्साहामुळे दिवसभर घरात बसून जे कमावले होते ते क्षणार्धात गमावले. आता काय म्हणावं बरे लोकांच्या या मानसिकतेला?... खरे म्हणजे सर्वांनी आपल्या घरातील गच्चीत, खिडकीत उभे राहून डॉक्टर, नर्सेस आणि सफाई कामगारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी हा या मागचा उद्देश होता. हा उद्देश सफल ही झाला. देशात सर्वत्र लोकांनी आपापल्या खिडकीतून, गच्चीवरून टाळ्या, थाळ्या वाजवून अतिशय आनंदाने कृतज्ञता व्यक्त केली, त्यातून एक प्रकारची सकारात्मकता निर्माण झाली होती.
समाजातील काही लोक अतिउत्साही आहेत, आणि या अतिउत्साहापायी ते काय करत आहेत, त्याचे काय परिणाम होतील हेच हेतूपुरस्सर विसरत आहेत. पंतप्रधानांनी टाळ्या वाजवून आभारप्रदर्शन करायला सांगितले होते. या विधानाचे नेटकऱ्यानी वेगवेगळे अर्थ काढून मेसेज पसरवायला लगेच सुरूवात केली, आणि हे पुर्णपणे उमजून न घेता देशातील काही लोकांनी याला उत्सवाचे स्वरूप आणले, तेव्हा त्यांना माहित नव्हते का? जमावबंदी आहे, पण लक्षात कोण घेतो? त्यांना वाटले असावे (सोशल मिडियाच्या पोस्टवरून) आता बारा तासात कोरोनाचा पुर्णपणे नायनाट झाला असेल. निव्वळ हलगर्जीपणा.
काही महाभाग संचारबंदी असताना, लॉकडाऊन असताना रस्त्यावरून, बाईक वरून मास्क लावून फेऱ्या मारत आहेत. त्यांना पोलीसांकडून चांगलाच प्रसाद मिळत आहे. अशा प्रकारचं वर्तन करून पोलीस यंत्रणेवर आपण खुप मोठा ताण टाकत आहोत याचं त्यांना काहीच वाटत नाही. थोड्या वे
ळापुर्वी एक व्हिडीओ पाहिला एक महिला पोलिसांबरोबर हुज्जत घालत होती. साध्या वेशात असलेल्या पोलिसाला आय कार्ड दाखव म्हणत होती. अतिशय त्वेषाने, वाईट पद्धतीने ती महिला त्यांच्याबरोबर बोलत होती. पोलिस अशा फिरकस्त्यांना फटकत आहेत ते लोकांच्या भल्यासाठीच ना?.... तुमच्या आणि देशातील जनतेच्या भल्यासाठी पोलीस आपलं कर्तव्य बजावत आहेत, मग या लोकांनी त्यांना अधिक ताण कशाला द्यायचा?..
मोटरसायकलवाले सगळेच दवाखान्यात जातोय असा बहाणा सांगत आहेत. अशा लोकांना ना स्वत:ची काळजी ना इतरांची. काहीजण तर रस्त्यावरचा हालहवाला बघायला बाहेर पडत आहेत. जीवनावश्यक वस्तूसाठी बाहेर पडणे वेगळे आणि नुसतेच गंमत म्हणून परिसरातून फेरफटका मारायला बाहेर पडणे वेगळे. समाजातील असे घटक आपली मानसिकता बदलायला तयार नाहीत. लकडी शिवाय मकडी वटत नाही असचं आता म्हणाव लागतंय. पण कोणत्या ठिकाणी आपण पोलिसांची शक्ती वाया घालवतोय हे कळायला हवे ना?..
अफवा पसरवणे, चुकीचे संदेश पाठवणे यासाठी देखील काही जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. काय आनंद मिळतो अफवा पसरवून यांना?.
अशा विचारसरणीच्या लोकांनी आता स्वत:ला बदलायला हवं. देश फार मोठ्या संसर्गजन्य आजाराचा सामना करत आहे. घरी बसायचं आहे,ते स्वत:साठी, कुटुंबासाठी सर्व देशवासियांसाठी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करायला हवे. अन्यथा इटली सारख्या देशाची , निष्काळजीपणामुळे झालेली अवस्था आपण बघतच आहोत. आपल्या प्रशासनाने योग्य वेळी योग्य असा निर्णय घेतला आहे, त्याला पूर्णपणे साथ देणे ही सध्या सगळ्या देशबांधवांची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी जबाबदारी आहे. यातच स्वहित, समाजहित आणि देशाचं हित आहे.